पुराना मंदीर

Submitted by रघू आचार्य on 6 May, 2023 - 14:01

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
सुधीर मोघेंच्या या ओळी पडद्यावर अक्षरश: वास्तवात आणणारा पुराना मंदीर हा प्युअर रामसेपट आहे आणि त्यांच्या चित्रपटातला सर्वात यशस्वी सुद्धा.

रामसेंबद्दल अनेक अफवा असायच्या. रामसे हे मुंबईतल्या एका झपाटलेल्या वास्तूत हे राहतात हे ऐकलेले होते. त्यांच्या चित्रपटाचे पोस्टर्स सुद्धा भयानक असायचे. ते सगळेच्या सगळे प्रौढांसाठी असायचे. अशात एकदा सामरी ३ डी हा चित्रपट डोअरकीपरने सोडल्याने पाहिला. आपल्याला अडवले नाही याचा इतका आनंद होता कि कधी हा पराक्रम सर्वांना सांगतो असे झालेले. तर हा पहिला भयपट जो थेटरात पाहिला. त्यातले सामरी हे जे पात्र आहे त्याचा ओरिजिनल स्त्रोत म्हणजे पुराना मंदीर.

२०० वर्षांपूर्वी एक राजा हरमन सिंग दुसर्‍या कुठल्यातरी गावातून आपल्या राजधानीत परतत असतो. हिंदीत राजा आणि ठाकूर एकच असतात. राजा म्हटला कि छोटंसं राज्य आलं, राजधानीचं शहर आलं. ठाकूर नेहमी गावात राहतात. तिथे त्यांची हवेली असते आणि गावकरी त्यांना राजा म्हणत असतात.

रामसेंच्या ठाकूर, राजा अशा भूमिका नेहमी त्रिलोक कपूर हा घार्‍या डोळ्यांचा अभिनेता करायचा. संध्याकाळच्या वेळेला गावच्या वाटेवर असताना रथाचं चाक तुटतं. राजा खाली उतरतो तर राजकुमारी रूपाली त्याला दिसत नाही. (राजकुमार्‍यांना रूपाली, वैशाली अशी नावे ठेवत असतील का ? दोनशे वर्षांपूर्वी गायत्री देवी, खेम कौर, साहिब कौर, कर्णावती, यल्लमा, चेलम्मा, ब्रिंदा देवी अशी नावे प्रचलित असावीत).

तर ही रूपाली (साईडने बीना राय सारखी दिसणारी झी हॉरर शो मधली भूतनिका - विशाखा छोटू ) पाय मोकळे करायला एका सुनसान गुहेकडे येते.

राजा ( + ठाकूरला आपण इथून पुढे राठा म्हणूयात,) पण घाबरतो. (राठा म्हणजे आपले ते टेबलफॅन नव्हेत)
त्याला लक्षात येतं कि हा सामरीचा इलाका आहे. सामरी हा काळी जादू येणारा शैतान असतो. त्यामुळे त्याची दहशत असते. इथे रामसेंचं ओळखीचं पार्श्वसंगीत वाजू लागलं कि भूत यायची नांदी आहे हे समजतं.

मंदीराच्या मागच्या बाजूला झाडी, जंगल आहे. त्यात पारंब्यांच्या मधून एक गुहा दिसते. त्या गुहेत गेलं की दरवाजा चित्रपटातल्या प्रमाणे एकमेकांना येऊन मिळणारे बोगदे आहेत. त्यात साप, विंचू, वटवाघळं हे दिसायलाच पाहीजेत. वटवाघळाने हिरॉईनच्या चेहर्याजवळून फडफड करत जावे हे एटीकेटस ते पाळते. प्रत्येक प्राणी पक्षाची एक सभ्यता असते. ती जपायलाच पाहीजे.

अजून तरी राजकन्येला सुबुद्धी व्हावी ना ? पण नाही. ती पुढे पुढे जात राहते आणि एक भयानक जनावरासारखं दिसणारं पण मनुष्यासारखी आकृती असलेलं सात फूट उंच एक भूत समोर येतं. याला भूत म्हणावं कि शैतान हा गोंधळ होतो. त्याचे डोळे लाल असतात. इथे वेगात असंख्य व्हायोलिन वाजवून भय निर्माण करण्याचा प्रयत्न होतो.

राजकन्या किंचाळते. भूत तिला पकडतं आणि गळ्याला चावतं. पाठीमागून ते चावतं कि रक्त पीतं हे काही दिसत नाही. पण राजाचे सैनिक धावत येतात तेव्हां राजकन्येचे डोळे पांढुरके घारे झालेले असतात. डोळ्यांचा रंग बदलला कि माणूस बाद हा रामसेंचा नियम आहे तो समजून घेतला पाहीजे. हा नियम चित्रपटागणिक बदलत जातो. कधी कधी एकाच चित्रपटात बाद झालेल्या पीडीताचे डोळे लाल , कधी डोळ्याच्या ठिकाणी काळ्या खाचा किंवा कधी कधी पांढरा रंग पण मोतीबिंदू झाल्यासारखी हिरवी घारी बुब्बुळं दिसतात.

राजा सैनिकांना सामरीला पकडण्याचा आदेश देतो. हे भूत आहे तर दोरखंड टाकून पकडलं कसं जातं ?
चांदोबा वाचून पूर्ण अंगावर धोतर नेसलेलं, डोळ्याच्या ठिकाणी काळी वर्तुळं असलेलं आणि मागे शेपूट असलेलं असं भूत माहिती झालं. भूताच्या त्या प्रतिमेवर रामसेच्या भूताची प्रतिमा स्थापन करायला थोडा वेळ लागतो.

देवाचं असतं तसंच असतं हे. ज्याचा त्याचा देव त्याच्या कल्पने एव्हढा ! तसंच भूताचं पण असतंय.
दरवाजा मधलं भूत सात आठ फूट उंचीचं पण लाज लज्जेसाठी एक फाटकी पांढरी कफनी घालणारं होतं. त्याच्य़ा पाठीवर हे भलं मोठं कुबड होतं. चेहरा जितका विद्रूप असेल तितका रामसे विश्वात भूताला मान असतो. हे म्हणजे मेन स्ट्रीम सिनेमात हिरो जेव्हढा देखणा असेल तेव्हढा तो मोठा स्टार च्या बरोब्बर उलटं झालं. अशा चित्रपटात कुरूप, विद्रूप भूत हेच सुपरस्टार असतं.

पकडल्या गेलेल्या भूताला तिथल्याच पुरान्या मंदीरात आणतात. इथे शंकराची सिनेमात असते तशी मूर्ती असते. हे सिनेमावाले महादेवाची पिंड दाखवत नाहीत. त्या बिचार्‍या महादेवाला बच्चनची बडबड पण सहन करावी लागते आणि विधातामधल्या दिलीपकुमारची दमदाटी पण सहन करावी लागते. विश्वनाथ मधला शत्रुघ्न सिन्हा पण महादेवाच्या मंदीरात त्याच्या मूर्तीसमोरच घंटा बडवत बेशुद्ध होतो. अरे पण बाळांनो, ज्याची मूर्ती कुठल्याच देवळात नसते तिथेच तुम्हाला हे का सुचावे ? बाकीच्या देवांचं तुम्हाला काय वावडं आहे ? का भोळा सांब आहे म्हणून प्रत्येकाने आपलं फायदा उपटावा ?

हेमा सारख्या सुंदर ललना पण कृष्णाची मूर्ती जवळ ठेवतात. त्याला सखा मानतात आणि साकडे मात्र महादेवाला घालतात कि असाच बॉयफ्रेंड मिळू दे. ठीक आहे, महादेवाला काही फरक पडत नाही, पण ते देव नसते तर काय वाटले असते हे ज्याचे जळते त्यालाच कळणार ना !

एरव्ही हे सिनेमावाले मंदीरात जाणार, नावे हिंदू असणार पण लग्न ठरलं कि चर्चमधे जाणार. तिकडे हिरवीन मडमेच्या ड्रेसमधे आणि हिरो सूटात बूटात येणार. सूरज बडजात्याच्या नावाने चांगभलं कि त्याने भारतीय लग्नाला प्रतिष्ठा दिली, म्हणून आता चर्चमधे लग्नाला जात नाहीत. नाहीतर आख्ख्या भारतात लग्नासाठी चर्चेस भाड्याने घ्यायचा धंदा सुरू झाला असता.

पडद्यावर एक सैनिक सामरीवरचे आरोप वाचून दाखवतो. त्यानुसार याने अनेक जणांचे रक्त पिले, अनेकांना ठार केले तर माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य म्हणजे स्मशानातून प्रेतं उकरून खाल्ली असे उल्लेख येतात.

सामरीचं काय करायचं या प्रश्नावर काही सरदार सांगतात कि याची खांडोळी करून इथेच दफन करावं. तर एक म्हणतो कि याला भिंतीत चिरडून टाकावा. एकेक सल्ले येतात. त्या वेळी मायबोली असतं तर कोतबो विभागात या सैतानाचे काय करावे या धाग्यावर काय काय सल्ले आले असते !

एक वृद्ध ब्राह्मण पुढ्यात येतो. हा राजगुरू असल्याचे नंतर समजते. च्यायला राठा भलताच खानदानी राजा निघाला. तर हा राजगुरू संथ गतीने सांगतो , " महाराज, मेरी विचारधारा यह कहती है कि, इसे पवित्र अग्नी के हवाले कर दो".
जाळून टाकासाठी पवित्र अग्नी के हवाले हे ठीक. पण मेरी विचारधारा वगैरे जड जड शब्द कशाला ? सामान्य लोक विचार करतात. राजगुरू आहे म्हणजे तो विचार च्या ऐवजी विचारधारा करेल असे असावे बहुतेक.

पण राठा म्हणतो कि याचं डोकं उडवा आणि धड पुराना मंदीरच्या मागे तर शीर हवेलीच्या तळघरात दफन करा. म्हणजे धड आणि शीर कधीच जोडलं जाणार नाही. यावर पुजारी म्हणतो कि ठीक आहे , पण शंकराचं हे त्रिशूळ त्याच्या मस्तकावर ठेवून द्या म्हणजे हा कधीच बाहेर येणार नाही.

जर हे भूत आहे तर त्याचा शिरच्छेद कसा होईल ? शिरच्छेद होणार आहे म्हणजे हा मनुष्ययोनीतला प्राणी आहे. तर मग त्याचे शीर आणि धड जोडण्याचा काय संबंध ? बरं ते इतकं लांब ठेवण्यामागे धोका आहे असे राजाला वाटते तर जाळून टाका सांगणारे बरोबरच सांगत होते ना ? कि मी राजा आहे, मला तुमच्यापेक्षा थोडं अधिक कळतं हे म्हणून पुढच्या आफतीची तजवीज राठाने केली ? ही काय मनसेची सभा आहे का असल्या वात्रट शिक्षा द्यायला ?

शिरच्छेदाच्या आधी सामरी शाप देतो कि तुझ्या पुढच्या पिढ्यांमधे कुठलीच स्त्री जी आई बनणार आहे, ती जिवंत राहणार नाही. आई झाल्याबरोबर ती भयानक मौतीने मरेल. आणि ज्या दिवशी माझे धड आणि शीर जोडले जाईल त्या दिवशी तुझ्या वंशाचा सर्वनाश होईल.

जितकी राजाची शिक्षा वात्रट त्याहीपेक्षा जास्त अचाट सामरीचा शाप आहे. तुला त्याचा निर्वंशच करायचाय तर शापच तसा दे ना भुत्याभावा ! हे असं अर्धवट अर्धवट कशाला ? त्यातही स्त्री आई झाल्यावर म्हणजे बाळ तर मोठं होणारच आहे. आई व्हायच्या आधीच मरायचा शाप असता तरी त्याचा बदला पूर्ण झाला असता. त्याच्या वंशातल्या पुरूषाचं लग्न ठरलं कि सुहागरात्रीच्या ( शंका असेल तर मीलनाच्या आधी अशी दुरूस्ती चार तासाच्या आत करत) आधीच तो मरणार असाही शाप देता आला असता. पण सामरीला शंका असेल कि यांना सुहागरात्रीसाठी लग्नाचं बंधन नसतं. त्यामुळे शापातून नक्कीच पळवाट निघाली असती.

सामरीचे धड एका काळ्या कॉफीन मधे आणि शीर एका कॉफीनमधे ठेवतात. २०० वर्षांपूर्वी सिंग नावाचा हिंदू राजा विजापूरला राज्य करत होता हे मान्य केले की हिंदू राजा कॉफीन बनवून घेत असेल हे पटायला जड जात नाही. ज्या कॉफीनमधे शीर ठेवतात त्यात त्रिशूल ठेवून वरून साखळदंडाने त्याचा पक्का बंदोबस्त केला जातो.

म्हणजे हा मेल्यावर पण आपले शीर घेऊन धडाकडे जाईल याचा इतका विश्वास !
हे भूत किंवा दानव किंवा जे काही अस्तित्व आहे त्याच्या मनात या क्षणी काय विचार असतील ?

गुंतलेले प्राण ह्या खोक्यांत माझे
मुंडका हा देह शोधे शीर माझे

काहीही असो, भारतात हिंदू पुरूषांनी दोन लग्न करू नयेत असा कायदा असला तरी तक्रार फक्त बायकोलाच करता येते, इतरांना त्यात हस्तक्षेप करता येत नाही असा उ:शाप असल्याप्रमाणे सामरीचा शाप आणि ठाकूरची शिक्षा यामुळे पुढचे भूतायण घडते.

इथून पुढे हरमनसिंग नंतर कोण कोण जमीनदार झाले हे निवेदन येते. ते लिहून नाही घेतले तरी चालेल. कारण ते फक्त कथा दोनशे वर्षे पुढे सरकवण्याच्या कामी येते. प्रत्यक्षात मधल्या या राजांना कथेच्या दृष्टीने काहीच महत्व नाही.

आताच्या काळातला राठा मुंबईत आहे. प्रदीपकुमारला या भूमिकेत पाहताना जीव कळवळतो. कुठे बादशहा जहांगीर, शाहजहान च्या भूमिका आणि कुठे एका गावातून मुंबईला आलेला गावठी राजा ! ब्रिटीशांच्या काळात राजे रजवड्यांचं असंच अध:पतन झालं असेल हे प्रदीपकुमारला पाहून पटते. त्याला सुमन नावाची कन्या आहे. ती कॉलेजला जाताना फिल्मी संस्कारांप्रमाणे बापाच्या गळ्यात पडते. फिल्मी बाप सुद्धा मुलीचे कोडकौतुक मिनिटामिनिटाला करत असतात. हे फिल्मी बाप्स मुलीला कधीच हाग्या दम भरत नाहीत. मुलींना त्यांची भीती वाटत नाही. फिल्मी आया मुलाचे कौतुक करतात. अशी आई आपल्याला मिळाली असती तर किती बरं झालं असतं हा विचार चुकून घरात बोलून दाखवला तर आपले जन्मदाते खूष झाले असते कदाचित !

तर ही सुमन पंजाबी सलवार कुडत्यात कॉलेजला निघते. तिथून थेट स्विमिंग पूल मधे वन पीस बिकिनीतच दिसते. आता वन पीस बिकिनी म्हणजे अंगभर कपडे वाटण्य़ाचा काळ असल्य़ाने तिने किती बोल्ड सीन दिलाय हे कळायचं नाही नव्या पिढीला. गेले ते दिवस !
ही स्विमिंग पूलातून बाहेर येण्यासाठी शिडीवर येत असतानाच मोहनीश बहल जस्टीस चौधरी फेम टोपी आणि गॉगल घालून तिथे येतो. तो फोटोग्राफर असतो आणि स्विमिंग पूलवर बिनधास्त कॅमेरा घेऊन फिरत असतो. टिळक टॅंकवर असा कॅमेरा घेऊन फिरला असता तर गार्डसनी धू धू धुतला असता.

हिरॉईन पूलसपाटीच्या वर येतेय, हिरो वरून खाली पाहतोय.
तर ती विचारते कि "क्या देख रहे हो इतना ?"
टच्चकन डोळ्यातंच पाणी येतं. एखादीने किती अबोध, अजाण असावं ? खरोखर निरागसतेचा असा कळस पाहून गहीवरून येतं. पोरी (आता आजी असेल) अब रुलायेगी क्या ?
पण हिरोचं सूचक पण चावट उत्तर ऐकून ती लाज लाज लाजते.
बिकीनीत (त्या काळच्या) मुलीला लाज येऊ नये का ? ( ये एक धागा बनताही है. कुणी काय घालावं हा त्याचा चॉईस आहे, तुमची नजर... तिने लाजू नये का ? वगैरे वगैरे ... मग चावे, बोचकारे, वाघनख्या, घायाळ किंकाळ्या... मायबोली धाग्यात ऑडीओ पोस्ट्सची सोय दिली तर काय मज्जा येईल ! ) .

मोहनीश बहलचा पुनीत इस्सार हा मित्र आहे. दोघांच्या बोलण्यातून समजते की महागडा कॅमेरा गळ्यात लटकवेला मोहनीश बहल गरीब आहे त्यामुळे प्रदीपकुमार दोघांचे लग्न होऊ देणार नाही. इथे मैत्रीचे डायलॉग्ज येतात. मित्र जान की बाजी लावणार वगैरे रामसेंच्या कानावर गेले की तेच रामसेपटांचे चित्रगुप्त असल्य़ाने हा मरणार हे नक्की हे जाणत्या प्रेक्षकाला समजते.

सुमनचा बाप म्हणजे प्रदीपकुमारला पाहिले की भारत भूषण पण का आठवतो समजत नाही. दोघांनीही अभिनयाचा प्रयत्न केला नाही. तरीही दोघांचेही काही सिनेमे चालले. दोघांच्याही काही सिनेमातलं संगीत गाजलं. दोघेही आता हिरविनीच्या बापाचं काम करतात. हिरविनीच्या बापाला काही नाही तरी फक्त छातीवर हात ठेवून हार्ट अ‍ॅटॅकची अ‍ॅक्टींग आली कि झालं. नासीर हुसैन, भारत भूषण, ए के हंगल हे यात बापलोक होते.

प्रदीपकुमारची बहीण उर्फ मुलीची आत्या आशालता वाबगावकर त्याच्या बरोबरच राहते. बहुतेक शापामुळे तिचं लग्न लावून दिलं नसावं.
आत्या सांगते की सुमन बडी हो गयी है. त्यावर प्रदीपकुमारच्या चेहयावरून जरी समजत नसलं तरी पुढच्या संवादातून समजतं कि त्याला टेन्शन आले आहे. हे टेन्शन बडी झालेल्या मुलीचे पाय घसरण्याचे नसून शापाचे आहे.
यांचे शहरातल घर सुद्धा आलिशान आहे. संस्थानिक पेन्शन बंद झालेल्या राठाला असे घर कुठल्या मुंबईत परवडतेय म्हणजे सात पिढ्या बसून खातील एव्हढा पैसा असावा.

घरात शिरल्याबरोबर हवेलीच्या एक शतांश आकाराचा हॉल आहे. त्यातच एक धबधबा आहे. धबधब्याच्या पाण्याची धार पातळ असून ती पडद्यासारखी आडवी आहे.

इथे या धबधब्याचं प्रयोजन पाचच मिनिटात समजते.
रात्री राठाला या पाण्याच्या पडद्यावर सामरीचा चेहरा दिसत असतो. रात्रीच्या अंधारात चेहर्‍यावर खालून टॉच मारलाय का ?
रामसेंच्या चित्रपटामुळे त्या वेळची मुलं हा खेळ खेळत असत. एका मुलाने तर हद्दच केली. आमच्या बिल्डींगच्या मागे एक काका बाहेर अंगणात आरामखुर्चीत पेपर वाचत बसत. याने डोक्यावरून खाली धोतर पांघरले. गळ्याला धागा बांधला. डोळ्यावर काळा गॉगल ठेवला. त्याला दोन मुलांनी धरून चालवत काकांच्या पुढ्यात आणून ठेवले. गळ्याला धागा बांधल्याने खालचे धोतर अस्ताव्यस्त उडत होते. आत कोळसा फासून त्यावर खडूने फासळ्या रंगवलेल्या होत्या. संध्याकाळचा संधीप्रकाश होता. चेहर्यावर खालून टॉर्च मारला होता. काकांनी चहाचा घोट घ्यायला पेपर खाली ठेवला आणि समोर हे ध्यान बघून खुर्चीतून उडाले.

"मंजिरी मंजिरी, धाव लवकर, मला वाचव" म्हणत काका थरथर कापत खाली पडले. त्यांनी डोळे मिटून घेतले. ते बघून मुलं घाबरली आणि भूताने गॉगल काढून धोतर काढून टाकून धूम ठोकली. काकू काठी घेऊन त्यांच्या मागे पळाल्या. काकूंना पाहून खरं भूत सुद्धा पळालं असतं.

असाच टॉर्च मारलेला सामरी "तुम सब मरोगे" असा दम देत असतो. प्रदीपकुमारला रात्रीची झोप नसते.
हा सामरीचं काम करणारा अभिनेता प्रत्यक्षात मोठा उद्योजक होता. अनिरूद्ध अगरवाल नाव त्याचे. त्याला झालेल्या एका आजाराने त्याच्या हाडांची वाढ जास्त झाली. उंची भरमसाठ आणि चेहराही आडवातिडवा वाढल्याने तो दिसायला विचित्र होता. पण अभिनयाची आवड होती. त्यासाठी कामातून वेळ काढून मुंबईच्या चकरा मारायचा.

पुराना मंदीरची सगळी जुळवाजुळव झाली. पण भूताचा प्रश्न सुटत नव्हता. ते कसे दाखवावे याच्यावर जास्त चर्चा व्हायच्या. साहजिक आहे. जसा मुख्य इंडस्ट्रीला बच्चन तसं रामसेंसाठी भूत !

अशाच एका बैठकीत अचानक अ अ तिथे थडकला. त्याला पाहून रामसे भावांनी एकमेकांना मिठ्यात मारल्या. अशा रितीने अ अ चा रामसेंच्या विश्वात प्रवेश झाला. झी हॉरर शो मधेही त्याने पुष्कळ काम केले. त्याची कन्स्ट्रक्शन कंपनी होती. सुरत, अहमदाबाद, मुंबई अशा सर्व मुख्य शहरात कामे चालत. असे म्हणतात कि कुठल्याही हिरोपेक्षा अ अ जास्त श्रीमंत होता. अगदी कुठल्याही टॉपच्या हिरविनीपेक्षा व्हॅंप बिंदू तिच्या हिर्यांच्या बिझनेस मुळे जास्त श्रीमंत होती तसंच.

मोहनीश बहल आणि राठा कन्या सुमन हे जेवायला एका कॅब्रे क्लब मधे जातात. हे असे क्लब कुठे असतात याबद्दल खूप उत्सुकता होती. पण विचारणार कुणाला ? आणि पैसे कोण देणार या दोन अडचणींमुळे राहीलंच ते. या क्लब मधे लीना दास ही टू पीस ला झुरमुळ्या लावून नाचत असते. आताच्या मुख्य हिरविनींच्या अंगावर सुद्धा एव्हढी महावस्त्रे नसतात. पण त्या वेळी एखादी हिरवीन नेहमीपेक्षा "वेगळे" म्हणजे मान्यतांपेक्षा कमी कपडे घालून थेट पडद्यावर यायचं डेअरिंग करते ही कल्पनाच जास्त थरारक होती. ते थ्रिल अनुभवायला भारी वाटायचं. आतासारखे इंटरनेट सोडाचा, व्हीसीआर, व्हीसीपी सुद्धा नसण्याचा काळ असताना कॅब्रे म्हणजे अपुरे कपडे हा समज पक्का होता. त्यानंतर मग थेट परदेशात कॅब्रे बघताना बॉ बॉ बॉ बॉ बॉ बॉ झालं होतं. बरं या लीना दासने गप नाचून जायचं ना ? पण तिचा डोळा मोहनीश बहल वर. बहुतेक तेरी बांहो मे जाम आवडलेला असावा तिला. मग तिने त्याला जबरदस्तीने ओढून नाचायला नेणे, सुमन ने लगेच रागात त्याच्याकडे बघणं हे सगळे सोपस्कार पार पडतात. पण या भानगडीत एक फोटोग्राफर कम डिटेक्टीव्ह त्या दोघांचे गुपचूप फोटो घेत असतो. सुमन तडक घरी निघून जाते. नीट लक्ष द्या.

घरी प्रदीपकुमार त्या हवेलीच्या एक शतांश हॉलमधे सोफ्यावरच बसलेला असतो. तो सिगार फकाफका ओढत असतो म्हणजे तो घुश्शात आहे. सिगार, चिरूट इत्यादी श्रीमंती दाखवतच पण हा अभिनेता आता कोणत्या मूड मधे आहे हे दाखवायला सुद्धा या अ‍ॅक्सेसरीचा उपयोग होई.
पोरगी बापाला थापा मारून बघते. पण बाप काय बोलत नाही. मग पोरगी म्हणते "पप्पा रागावलात का ?"
आता रात्री बेरात्री एंशीच्या दशकात घरी येणारी पोरगी असल्यावर त्याने काय नाचायचं का ? वाह पोरी ! काय मस्त उशीर केलास, मी खूप खूष आहे तुझ्यावर असं म्हणायचं ? कि उद्या थोडी अजून उशिरा आलीस तर बरं होईल म्हणायचं ?

प्रदीपकुमार तिच्यापुढे ते फोटो टाकतो आणि विचारतो " कोण आहे हा ?"
लक्ष द्या बरं का. फोटोग्राफरने आताच थोड्या वेळापूर्वी फोटो काढलेत. पोरगी थेट घरी पण आली. त्या वेळी ना संगणक, ना डेस्कटॉप प्रिंटर. लेझर फोटो मशीन, ना फोटो फास्टची दुकाने पण नाहीत आलेली. पण सुमनच्या आधी फोटो पोहोचलेले. रामसे काळाच्या पुढे होते !

प्रदीपकुमारला आपली कन्या काय प्रताप करते हे समजते. मग ते तिला जाब विचारतात. घरात बंद करतात.
ती तिथून पळून जाऊन थेट समुद्रकिनायावर मोहनीश बहलला गाठते. मोबाईल, पेजर नसण्य़ाच्य़ा काळात घरात बंद असताना देखील हिरोचा ठावठिकाणा शोधण्याचे तिचे कसब हे गुगल मॅपच्या तोडीचे आहे. दोघांच्याही ब्रेनचा विशिष्ट हिस्सा इन्सॅट बी ला जोडलेला असणार. प्रदीपकुमार हिरोला मारायला गुंड पाठवतो. पण अचानक व्यायाम करणारा पुनीत इस्सार तिथे पोहोचतो आणि सर्वांची धुलाई करतो. त्या वेळी जोर बैठका काढताना दाखवला आणि दंड पीळदार दिसले की त्याला पहिलवान म्हणत. आताच्या सारखे दगडी सलमानी शरीर असण्याची गरज नसायची.

हिरो पण मग राठा कडे येऊन हिंमत दाखवतो. जोश दाखवतो. त्या जोशात मानसन्मानाचे डायलॉग्ज हाणतो. तसेच पळवून नेत नाही, हात मागून नेईन हे उपकाराच्या सुरात सांगतो. इथे राठा त्याला शापाची कहानी सांगतो.

त्याचा उलटा परिणाम होऊन पुनीत इस्सार त्याची बायको झालेली बिन्नी राय (दारासिंगच्या रुस्तम मधे त्याची हिरॉईन होती ही) मोहनीश बहल आणि आरती गुप्ता असे चौघेही हवेलीच्या शोधात बिजापूर संस्थानकडे गुपचूप रवाना होतात.
हवेलीकडे जातानाचा प्रवास नेहमी ठरलेला असतो. प्रवासात गाडी बंद पडणे. मग एखाद्या संशयास्पद किंवा वेडसत व्यक्तीची भेट होणे. तिने असंबद्ध आणि विचित्र डायलॉग हाणणे, प्रवासात डाकबंगला लागणे. तिथे एखादा कॉमेडीअन भेटणे. रात्री त्याने गाणे म्हणणे हे सर्व रीतभातीप्रमाणे पार पडावे लागते.

इथे गाडी बंद पडते पण ते पुनीत इस्सारचे बाहुबल दाखवण्य़ासाठीच. भूताच्या सिनेमातला हा हवेली / शैतानी इलाकाकडे जाणारा प्रवास सुरू झाला कि जाणकार प्रेक्षक जरा सावरून बसतो. चला स्टोरीला सुरूवात झाली. खडाखडी संपली. सी ग्रेड हिरो हिरॉईन्स भूतपटांच्या सुपरस्टारकडे निघाले. आता मज्जा येणार !

प्रवासात पार्श्वसंगीत म्हणून रामसेंचा फेमस आलाप आ आ आ आ आ आ आ अआआआ आआआआ आ कधी विलंबित तालात तर कधी द्रुतगतीने ऐकू येतो. त्याच्या सोबत स्ट्रीट गिटारवर वाजवलेल्या " टॅडॅटॅ टॅडॅटॅटॅटॅ टॅडॅटॅ टॅडॅटॅटॅटॅ टॅडॅटॅ टॅडॅटॅटॅटॅ टॅडॅटॅ टॅडॅटॅटॅटॅ टॅडॅटॅ टॅडॅटॅटॅटॅ " या ट्यूनने साथसोबत केली जाते. संपूर्ण चित्रपटात हा तुकडा वाजवला जातो. रामसेंच्या चित्रपटात संगीताचे एव्हढेच महत्व असते. पार्श्वसंगीत फक्त भूताच्या एण्ट्रीला उठावदार पाहीजे. बाकि गाणी श्रवणीय दिली आणि ती गाजली तर तो फाऊल धरला जातो. या चित्रपटात सुरूवातीच्या कॅब्रेडान्सच्या वेळी दिलेले आशा भोसलेच्या आवाजातले " मै हू अकेली रात जवान " हे गाणे आणि नंतरचे " वी बीते दिन याद है " गाणे चक्क श्रवणीय आहे. रामसेपटाला बिल्कुल शोभणारे नाही. त्यामुळे अजित सिंग संगीतकाराची हकालपट्टी झाली असणार. कारण त्यानंतर त्याच्या नावावर चालबाज लीडर, फकिरों कि बस्ती , विदेश, अजूबा कुदरत का असे सी ग्रेड चित्रपटातले तळागाळाचे सिनेमे दिसतात.

या चित्रपटातले बॅकग्राउंड स्कोर नंतर रामसेच्या भूतपटात आणि मालिकेत कायम येत राहिले.

एकदाचे चौघेही मैदानात येतात.
म्हणजे कथेच्या लोकेशनच्या जवळ येतात. रात्र झालेली. हे लोक नेमके पुराना मंदीरच्या जवळ आडोशाला थांबतात.
खालून पांढरा धूर निघत असतो, ते आपल्यासाठी धुके. पडद्यावर धुके हे नेहमी संशय, भीती गडद करते. हे कदाचित संशयाचे धुके असा शब्दप्रयोग वाचून होत असेल.

समोर ते पुराने मंदीर (जुने देऊळ या शब्दात ती दहशत नाही) आणि कॅमेरा चौघांच्या मागून घेतलेला. भयपटात या अ‍ॅंगलने इफेक्ट साधला जातोच. धुक्यातच चौघांच्या सावल्यांचा खेळ चाललाय.

कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या इथे
कुणी लावले दिवे वीजेचे रानात राऊळी इथे !

त्यांच्या पावलाशिवाय इतर कुठलाही आवाज नाही. सोबतीला तोच्च तो चिरपरिचित आ आ आ आ आ आ आ अआआआ आआआआ आ कोरस.
दोघी बायका मंदीरातल्या घंटा उड्या मारून वाजवतात. केव्हढा दणदणाट घुमतो त्या सुनसान परिसरात, ते ही रात्री अपरात्री !

कसं आहे, या चौघांना काहीच माहिती नाही. येताना हिरविनीने बापासाठी चिट्ठी ठेवली होती. त्यात आम्ही हवेलीत जात आहोत असे लिहीले होते. त्याच रात्री सामरीने दर्शन देऊन तुझी पोरगी तुझ्या बायकोप्रमाणेच माझ्या हातून मरेल असे बजावल्याने त्याला हार्ट अ‍ॅटॅक येऊन अंथरूण धरलेले आहे. नाहीतर त्याचा बेत होताच कि ताबडतोब यांना रस्त्यात गाठून मन वळवून माघारी घेऊन जावे. आता या चौघांनाही काहीही माहिती नाही. त्यांचे अज्ञान हेच प्रेक्षकांचे भय !

मंदीराच्या पाठीमागे काय आहे ते प्रेक्षकांनी पाहिलेय ना सुरूवातीलाच ! जुरासिक पार्क मधेही सुरूवातीलाच पिंजर्‍यातला दानासूर किती भयानक आहे याची कल्पना प्रेक्षकाला असते पण सिनेमात बेटावर फिरायला जाणार्यांना नसते. भय हे त्यांचे काय होणार म्हणून दाटत असते. बी, सी ग्रेडचे दिग्दर्शक असले तरी रामसे हुषार यात वादच नाही.

कॅमेरा पुढे आल्यावर शंकराची प्रसन्न मूर्ती पाहून नास्तिकाच्याही जिवात जीव येतो.
नास्तिकांना आस्तिक बनवायचं असेल तर त्यांना देवाधर्माची महती सांगू नका. भूताचं भय घाला, धारपांच्या कादंबर्‍या वाचायला द्या नाहीतर रामसे, महेश भटाचे भयपट पहायला लावा. दरवाजा आणि पुराना मंदीर पाहिल्यावरच लाईनीवर येतील. आणि...

ॐ ह्रीं श्रीं ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ऊँ नमो भगवते महाबल
पराक्रमाय भूत-प्रेत पिशाच-शाकिनी-डाकिनी-यक्षणी-पूतना-मारी-महामारी
यक्ष राक्षस भैरव बेताल ग्रह राक्षसादिकम्‌ क्षणेन हन हन भंजय भंजय
मारय मारय शिक्षय शिक्षय महामारेश्वर रुद्रावतार ॐ फट् स्वाहा

हा भूत प्रेत बाधा निवारण मंत्र काही दिवसातच अचूक म्हणून दाखवतील.

पण त्यांना म्हणावं इथेच थांबा. नाहीतर नया नया सलमानखान दिन मे पांच बार नमाज पढता है च्या चालीवर ते पुढेही हनुमानचालिसा म्हणून दाखवतील. तसं नको.
मग इथे साक्षात महादेव आणि श्रीराम भक्त हनुमान यांच्या पॉवरवरून आणि प्रोटोकॉल वरून हक्कभंगाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. यावर काही व्रात्य विद्वान " नाही पण ते शंकर महादेव साप, नाग, राक्षस, भूत या सर्वांचे देव आहेत, तर सामरीला त्यांची भीती का वाटेल ?" असला काहीतरी प्रश्न विचारणारच. आपला चित्रपटच इथे महादेवाच्या त्रिशूळावर आधारीत आहे. कुंपणच शेत खाऊ लागले तर सामरीपासून रक्षण कोण करणार ?

मंडळी दमलेली असल्याने जेवून झोपतात.
पण शास्त्राप्रमाणे रात्री एका किंकाळीने हिरविनीला जाग येते. हिरवीन असो किंवा घरातली एकमेव बाई असो, रात्री जाग तिलाच यावी लागते. घर असेल तर रात्री तिला तहान लागते. मग जिन्यावरून अंधारात ती खाली येणार. खाली हॉलमधे ठेवलेल्या फ्रीजपर्यंत जाणार. पाणी पिणार आणि खांबाच्या आड तेव्हढा लाल रंगाचा झिरोचा बल्ब लावण्याची दक्षता तिच्या जीवनसाथीने घेतलेली असल्याने त्या मंद प्रकाशात तिला "ते" दिसणार आणि मग ...

याशिवाय अंध, बहिरा, मुका, पांगळा अशा व्यक्तींना सुद्धा रात्री झोपमोड होऊन किंवा चाहूल लागून, ऐकू येऊन, काही तरी दिसून त्याच्या मागे जावे लागते. जे स्वत:चे रक्षण करू शकणार नाही असा विश्वास बहुमताने प्रेक्षकांच्यात असतो त्यांच्याच बाबतीत संकटे येत असतात.

हिरवीन विजेरी घेऊन नेमकी देवळाच्या मागच्या बाजूला जाते. बरोब्बर त्याच गुहेत पोहोचते.
आता आ आ आ आ आ आ आ अआआआ आआआआ आ हा कोरस व्हायोलीनवर आणि टॅटॅटॅटॅ टॅटॅटॅटॅ टॅटॅटॅटॅ ही ट्युन पाईपवर असलेला म्युझिक पीस वाजत राहतो.
वेली, पारंब्यांच्या जाळीतून सुरू होणार्या गुहेत ती शिरते. आतली वटवाघळं, साप, घुबडं फडफड करतात. गुहेत बहुधा कुणी तरी भल्या माणसाने झिरोच्या बल्ब्सची व्यवस्था केलेली असावी. कारण विजेरीच्या मागून सुद्धा ती आपल्याला दिसते.

अचानक तिला ते शीर नसलेलं धड दिसतं. ते तिच्या दिशेने येत असतं. याला खोक्यात बंद करून, शीर अलग करून सुद्धा फरक पडत नाही. तिची किंकाळी ऐकून मोब तिथे पोहोचतो. पाठोपाठ पुई देखील दाखल होतो. शिरस्त्याप्रमाणे तिच्या म्हणण्यावर कुणाचा विश्वास बसत नाही. शीण आल्याने जागेपणी स्वप्न पडले असावे असा निष्कर्ष निघतो.

कथा बिल्ड अप होईपर्यंत फक्त ३८ मिनिटे झालीत. पुढचे दोन तास काय दाखवणार ?
एक तर ते भूत या सगळ्यांना मारून टाकेल किंवा हे सगळे मिळून भूताला मारतील.
त्याला फारतर अर्धा पाऊण तास ताणता येईल...
मग पुढे ?

सकाळी सकाळी हवेलीकडे जाताना यांना एक माणूस लाकडं तोडताना दिसतो. अंगावर जाड मळकट ब्लॅंकेट, त्यानेच चेहरा पण झाकलेला. अंगमेहनत केल्यावर थंडी पळून जाते खरं तर. मोब त्याच्याकडे जाऊन पत्ता विचारतो. तो चेहरा वळवतो तर सतीश शहा !
त्याचा एका बाजूचा चेहरा सत्यम शिवम सुंदरमच्या झिन्तामान प्रमाणे झालेला असतो.

"भईसाब हवेली को कौन सा रास्ता जाता है ?"
या प्रश्नावर तो कुर्हाड घेतलेला हात स्प्रिंगसारखा त्यांच्या दिशेने सरळे रेषेत पुढे आणतो. त्यामुळे सुमन दचकून मागे सरकते. हात ताठ करून कुर्हाड आडवी धरत हात तो आडव्या दिशेने उजवीकडे फिरवतो. हे काम त्याला त्या दिशेला डाव्या हाताचे बोट दाखवून कमी श्रमात सुद्धा करता आले असते. पत्ता सांगितल्याबरोबर दोघे पळून जातात. हा त्यांच्या मागे येतो. चालताना पुढचा पाय टाकताना पाऊल फेंदारलेले टाकून मागचा पाय गिरकी घेऊन चालल्यासारखा अंगाला झोके देत तो चालत असतो. जोडीला रामसे ट्यून. सुमन मागे बघते तर हा चेहरा दाखवत गूढ हसतो. त्यामुळे ती अजूनच घाबरून पळत सुटते.

रामसेंच्या सिनेमात ही विचित्र वागणारी माणसं भेटतच राहतात.
सतीश शहा सारख्या सूक्ष्म विनोदबुद्धी असलेल्या अभिनेत्याला अशा भूमिका कराव्या लागल्या आहेत. त्या करतानाच त्याने एण्जॉय केलं असणार म्हणून पुढे फिलिप्स टॉप टेन मधे त्याला मसाला कमी पडला नाही कधी. त्य़ाच्या एण्ट्रीमुळे किमान २५ मिनिटांची सोय झाली. तरी किमान पावणेदोन तास पळवायचाय सिनेमा.

इथून ते कारने वेगात निघतात. पुढच्याच सीन मधे रात्री ते हवेलीत पोहोचतात. सकाळी नाही अगदी संध्याकाळी जरी निघाले असतील (अंगावर ब्लॅंकेट मुळे दुपारची वेळ नक्कीच नाही) तरी चार तासाचा रस्ता कारला लागत असेल तर पुढच्या सगळ्या अंतर आणि काळ काम वेगाचे गणित अवघडच आहे.

हवेली अतिशय भव्य आहे. आतून बाहेर येणारा प्रकाश तिला गूढ बनवतो.
एखाद्या राजप्रसादारखी ती अवाढव्य आहे. ( मुरुड जंजीरा इथली समुद्र किनारी असलेली नबाबाची हवेली ).
जमिनीलगत लो अ‍ॅंगल कॅमेरा लावल्याने तिची भव्यता अंगावर येते.

हे चौकीदार म्हणून हाका मारत असताना एक मनुष्य वरच्या छज्जातून अगदी शांतपणे यांच्याकडे बघत असतो. तोच चौकीदार असतो. हाळीला प्रतिसाद द्यावा असे काही त्याला वाटत नाही. कधी तरी याचे पुण्यात दुकान असावे. अशा स्वभावाने ग्राहक गेल्याने ते भाड्याने देऊन इथे चौकीदाराची नोकरी पत्करलेली असावी.

हे बिचारे इकडे तिकडे बघत असताना अचानक सुमनच्या मागे एक पांढरे करडे केस पिंजारलेली , दात पडलेली बाई कंदील घेऊन विचित्र हसत ऊ ऊं ऊं करत येते. तिला पाहून सुमन पुन्हा किंचाळते. किंचाळण्याचे काम ती उत्तम करते. ती पळत जाऊन दोघांना बोलावून आणते. नशीब कि या वेळी ती इथेच उभी असते. तिला पुई दम देत कोण आहेस तू असे विचारतो.

ती (साधना खोटे) मुकी असते हे तो पुणेरी नोकर सांगतो. हा नोकर म्हणजे आपले सदाशिव अमरापूरकर. एक से एक कलाकार रामसेंच्या तर्‍हेवाईक भूमिका साकारायला पुढे आल्याचे पाहून रामसेंना बी ग्रेड म्हणण्याची हिंमत होत नाही. कदाचित रामसेच्या पिक्चरमधे काम केले तर सामरी पावतो अशी यांची श्रद्धा असेल. ही मुकी बाई त्याची आई असते. मंगली. आणि याचे नाव दुर्जन !

एव्हढी सणकी पात्रे आली. काळजी गेली.

दुर्जन त्यांना हवेलीत नेताना एकेका पूर्वजाच्या चित्रासमोर नेऊन कहाणी सांगत असतो. पण सुमनला सामरीच्या काळातला राठा पाहून चक्कर येऊ लागते. तिला कसलीतरी जाणीव होऊ लागते. तसविरीने डोळे फिरवणे, डोळे जिवंत असणे हे प्रकार इथेही येतात.

सकाळी सकाळी सतीश शहा हवेलीत दाखल होतो. तो सुमनला पाहून तिच्या जवळ येतो. पुन्हा किंकाळ्या. मग दमदाटी. त्याला दुर्जनने लाकडं घेऊन बोलवलेले असते. सर्वांसाठी चूल पेटवायला. रॉकेल, गॅस अशा सोयी राजे लोकांना अवघड आहेत का ? इतक्या वर्षांनीही वीजेचे दिवे चालू आहेत म्हणजे बिल भरतात वेळच्या वेळी. चौकीदाराचा पगारही जात असेल. त्या वेळी काय गुगल पे , नेटबॅंकिंग नव्हतं. बरं ते जाऊ द्या.

आता हवेलीत चित्रविचित्र घटना घडू लागतात.
हिरविनींना स्वच्छ ठेवणे ही निर्माता दिग्दर्शकाची जबाबदारी असते. हिरो वगैरे आपले आपण बघून घेतात. त्यामुळे हिरविनीला नेहमी शॉवर खाली जावे लागते. मग शॉवर मधून रक्त येणारच की. शॉवर असला म्हणून काय झालं ? त्याला असंख्य डोळे आहेत. हिरविनीची अंघोळ आणि आक्रीत ही परंपरा डायल एम फॉर मर्डर पासून हिचकॉकने सुरू केली आहे. रामसेंनी ती फॉलो केल्याने बहुधा त्यांना इंडीयन हिचकॉक म्हणत असावेत.

आता पुनीत इस्सार आणि त्याची बायको बिन्नी बाहेर भटकायला जातात. नदीकिनारी उघड्या अंगाने पुई व्यायाम करत असतो. रामसे फक्त पुरूष प्रेक्षकांचाच विचार करत नव्हते. भयंकर पुरोगामी होते ते. त्याला व्यायाम करताना पाहून बिन्नी रॉय भयंकर कडक स्वप्ने बघते. ही अशी स्वप्ने राज कुंद्राच बघू शकतो. बायको हॉट स्वप्नात सुद्धा फक्त आणि फक्त नवर्‍याचा विचार करते , नवरे तसे लिबरल असतात. वसुधैव कुटुंबकम ही वृत्ती त्यांच्यात जात्याच असते.

इतक्यात काही जंगली लोक पुईला उचलून नेतात. या आदिवासींचा ड्रेसकोड उर्सुला अ‍ॅंड्रेसच्या माऊंटन गॉड्स ऑफ कॅनिबल्स या चित्रपटासारखा पानाच्या आकाराची कमरचे वल्कले, डोक्यात पिसं आणि अंगावर पांढरे पट्टे असा आहे. हे आदिवासी प्रत्यक्षात गब्बरसिंग सारखा दिसणार्‍या डाकू मच्छरसिंगचे डाकू आहेत. पुई कराटे खेळून रस्त्यातच बायकोला सोडवतो.

डाकू मच्छरसिंगच्या भूमिकेत जगदीप असल्याने हवा येऊ द्या च्या स्टाईलचा पण महाळुंगे बुद्रुक गावच्या गणपतीतल्या स्थानिकांच्या कार्यक्रमाच्या लेव्हलचा शोलेचा स्पूफ सुरू होतो. गब्बरचे संवाद जगदीपच्या आवाजात आणि हावभावासहीत बघणे हा नाईलाज मधला वेळ भरून काढायचा असल्याने प्रेक्षक सुद्धा सहन करतो. या स्पूफ मधे शोलेतल्या ठाकूरच्या भूमिकेत राजेंद्रनाथ आहे. त्याचे नाव सरदार मुर्दाडसिंग आहे आणि बसंती ललिता पवार आहे.

मच्छरसिंह वारंवार बसंतीला छेडत असल्याने ठाकूरने त्याच्यावर पंधरा हजार रूपये इनाम ठेवलेले आहे. त्याचे दोन्ही हात मच्छरसिंगने कापलेले आहेत. या सगळ्या उतारवयातल्या कॉमेडिअन्सने तासभराची जबाबदारी शिरावर घेतली आहे. त्यात पुई मच्छरसिंगला पकडून देणार आणि नंतर वेषांतर करून सोडवून आणणार आणि इनाम निम्मे निम्मे वाटून घेणार ही फोडणी दिलेली आहे. त्यामुळे सुरमा भोपालीचे पात्र रद्द झाले.

राजेंद्रनाथ एका कबिल्याचा सरदार आहे. या कबिल्याचा ड्रेसकोड वेगळा आहे. त्यात धीरजकुमार हा तरूण सरदार आहे. हा प्रत्येक संवाद चावून बोलत असतो. त्याला एक बहीण पण आहे. ही बहीण पुई वर फिदा आहे.

मधल्या काळात परत हवेली, हवेलीत सुमन, सुमनच्या मागे दुर्जनची आई अचानक तिच्या शयनकक्षात येऊन मागे राहणे, तिचे दचकणे आनि मग ती पाणी द्यायला आल्याचा खुलासा हे सगळे घडत असते. सांगा (सतीश शहा) ला वाटत असते की हे मुंबईवरून हवेलीतला खजिना शोधायला आले आहेत. हवेलीत खजिना आहे असे त्याचे म्हणणे तो दुर्जनच्या गळी उतरवतो. दुर्जनची आई काहीतरी सांगत असते. पण बिचारी मुकी असते.

पुई, बिन्नी , सुमन आणि संजय (मोब) नदीवर अंघोळीला गेले असताना धीरजकुमारची बहीण त्याच्यावर सुमनच्या समोरच डोरे डालण्य़ाचा प्रयत्न करते. ही आदिवासी कन्या आहे पण नदीत पोहण्यासाठी तिच्याकडे रेनबो कलरचे टू पीस बिकिनी सूट्स आहेत. या गोंधळात सुमनचा गैरसमज होतो. पण या कन्येचा उपयोग मोब ला हवेलीची माहिती काढण्यासाठी करायचा असतो.

त्याच्या कडे याशिवाय दुसरा मार्गच नसणार. गावात दोन तर्‍हेचे ड्रेसकोड असणारे दोन आदिवासी कबिले असलेले हे गाव कुठे असेल ? यांच्या पैकी कुणी हवेलीचे रहस्य सांगू शकणार नाही ही कल्पना मोबला आधीच आल्याने कबिल्याच्या तरूणीशी प्रेमाचे नाटक करून माहिती काढण्याचा हा प्रयत्न म्हणजे हनी ट्रॅपच की. मग कबिल्याचा उपसरदार चिडणार नाही का ?

हा मसाला कमी म्हणून आता पुई आणि बिन्नीचे गाणे सुरू होते.

इकडं प्रेक्षक बी ग्रेड हिरो हिरविनीचा रोमान्स पाहून वैतागलेला असतो. तो आलाय कशाला ? तुम्ही दाखवताय काय ? ज्याला भूत बघायचंय त्याला भूत दाखवा. ज्याला रोमान्स बघायचा त्याला रोमान्स दाखवा. सिंपल !

कुस्तीत खडाखडी लांबली कि पब्लिक चेकाळतं. एकदा बो डेरेकचा पिक्चर बघायला गेलो होतो. तर मोठे मोठे न समजणारे संवाद चालू होते. एक पोरगं ओरडलंच " अरे गप्पा काय मारता ? मुद्द्यावर या !" तसं रामसेच्या पिक्चर मधे आता भूत दाखवा म्हणून पब्लिक उतावीळ झालेलं असतं.
रामसेही जास्त ताणत नाहीत.

मग खजिन्याच्या आशेने सांगा दुर्जन मोब आणि पुई व लक्ष ठेवतात.
या दोघांना तसविरीच्या मागे एक भिंतीतला गुप्त रस्ता सापडतो. या रस्त्याने एका तळघरात जाता येतं. इथेच सामरीचे शीर ठेवलेले असते. त्यासोबर त्रिशूळ सुद्धा असतो. त्रिशूळ काढल्याबरोबर सामरीचे डोळे उघडतात. त्याबरोबर दोघे कॉफिन बंद करतात.

सांगा आणि दुर्जनचा समज होतो कि त्यांना खजिना सापडलाय. त्यामुळे रात्रीच तो हस्तगत करण्यासाठी ते योजना आखतात. त्याप्रमाणे दुर्जन बग्गी घेऊन सांगाची वाट बघणार. सांगा खजिना घेऊन बग्गीत चढणार आणि रात्रीत ते दुसरीकडे हलवणार असतात.
सांगा तळघरात जाऊन कॉफिन उघडतो. त्रिशूळ बाजूला करतो. त्याला सामरीचे डोळे उघडे दिसतात. त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर तो हिप्नोटाईज होतो. हे दाखवण्यासाठी सांगाच्या डोळ्यांना शंकरपाळीच्या आकाराचा पांढरा रंग फासला आहे. म्हणजे हा आता बाद. हा झोंबी झाला. तो आता ती पेटी ओढत बग्गीत चढतो.

बग्गीचा पाठलाग मोब आणि पुई करू लागतात. पण सामरी जादूई शक्तीने जंगलात एक झाड रस्त्यात पाडतो. त्यामुळे त्यांची कार पुढे जाऊ शकत नाही. इकडे कबिलेवाले मोबला मारायला मशाली, भाले घेऊन निघालेले असतात. दुसरीकडे जगदीपचे डाकू.
या गोंधळात सांगा सामरीचे शीर पुराना मंदीरच्या मागे जाऊन धडाला जोडतो. आणि नैवेद्य म्हणून स्वत:चे बोट कापून रक्त त्याच्या शीर आणि धडावर ओततो. रामसे मेडीकल सायन्स प्रमाणे दोनशे वर्ष वेगळे ठेवलेले धड आणि शीर जोडले असता त्याला कुणाच्याही रक्ताची धार एम सील प्रमाणे अर्पण केली कि ते जिवंत होतं. कॉफीन मधे बॉडी दोनशे वर्षे ताजी राहू शकते. त्यासाठी डीप फ्रीजर किंवा पिरॅमिडची गरज नाही.

ज्या गावात लाकडं तोडून चूल पेटवतात तिथे राजेशाही बग्गी हे वाहतुकीचे साधन असते.
या पुरान्या मंदीर पासून हवेलीत यायला या चौघांना कारने चार ते दहा तास लागले होते. पण बग्गी मात्र रात्री निघते, रात्रीच पोहोचते. अंतर आहे कि वॉर्म होल ?

इथून सैतानाचे तांडव सुरू होते.
सैतान थेट हवेलीत दाखल होतो. तिथे सुमन एकटी असते. पहिला बळी दुर्जनचा जातो.
सैतानाच्या जनरेला बिन्नी पडते. ती जीव वाचवायला हवेलीच्या गच्चीवर पोहोचते. तर तिथे सैतान आधीपासूनच हजर असतो. बिचारी बिन्नी वरून पडून जीव गमावते.
(बिन्नीच्या समोरून कॅमेरा घेताना पाठीमागे मुरूड जंजीराचा समुद्र दिसतो. विजापूरला समुद्र बांधलाही असेल).

एकंदरीत सगळे तांडव होऊन निम्मे लोक गारद झाल्यावर सगळी पार्टी पुन्हा पुरान्या मंदीरात पोहोचते.
इथे मात्र दोनशे वर्षांपूर्वीची चूक न करता सैतानाला शिवाच्या त्रिशूलने ठार केले जाते.

एव्हढे सगळे झाल्यावर राठा प्रदीपकुमार पण पोहोचतात. राक्षसाचा वध केल्याने खानदान कि इज्जत विसरून ते मोहनीश बहलचा स्विकार देखील करतात. आणि अशा रितीने देवाच्या साक्षीने शेवट गोड होतो.

शेवटी हम लोग प्रमाणे दादामुनी आले असते तर कुणाचे कुठे चुकले हे त्यांनी नक्कीच सांगितले असते.
दोनशे वर्षांपूर्वी राठाने त्याला जाळले नाही. दोनशे वर्षांनंतरच्या राठाने भावी जावयाला आणि मुलीलाही पूर्ण कल्पना दिली नाही. त्यांनी सुद्धा आततापणा करून हवेली गाठली. आणि सांगा दुर्जनने लालसेपोटी अनर्थ केला.

सामरी असा का झाला असेल ? असा का वागला ? तोच तसा वागला नसता तर त्याला शिक्षा झालीच नसती.
पण जर हा मनुष्ययोनीतला प्राणी असेल तर असा का वागत असेल ? असे प्रश्न पडताना दादामुनींनी या ओळी गाऊन दाखवल्या असत्या.

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे , पिल्लु तयात एक
कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळे ते वेगळे तरंगे

सगळ्या शंकांची उत्तरे मिळून जातात.
शेवटी इतकाच निष्कर्ष निघतो कि एखाद्याला हिडीसफिडीस करू नये. नाहीतर पुढे होणार्या एव्हढ्या मोठ्या अनर्थाला आपणही जबाबदार असू. सर्वांवर प्रेम करा.

महत्वाचे म्हणजे भूताला घाबरा आणि देवावर विश्वास ठेवा. भले मायबोलीवर नास्तिक बनून हिरीरीने आस्तिकांची मापे काढली तरी चालेल.
ते भूताला समजते का ?

(समाप्त)

मोहनीश बहलच्या तेरी बाहो मे ( ब्लू लगून इन्स्पायर्ड) चित्रपटाच सहनिर्माते होते शाम रामसे. त्यांनी गळ घातल्याने त्याने या सिनेमात काम केले. हा चित्रपट पाहिल्यावर नूतन भडकली होती. तिने रामसेंना माझ्या मुलाचे करीयर बरबाद केले म्हणून फैलावर घेतले होते. चित्रपट एव्हढा चालला कि बच्चनच्या चित्रपटाऐवजी लोक पुराना मंदीरला जात होते. पण त्या यशामुळे मोहनीश बहलला त्यानंतर सगळ्या बी, सी ग्रेड चित्रपटांच्याच ऑफर्स येऊ लागल्या. त्याच्याच आगे मागे आलेल्या हिरो, बेताबच्या यशाने त्याची करीयर संपल्यातच जमा होते. ते मैने प्यार किया पासून पुन्हा बर्‍या वळणावर आले.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या वेळी ना संगणक, ना डेस्कटॉप प्रिंटर. लेझर फोटो मशीन, ना फोटो फास्टची दुकाने पण नाहीत आलेली. पण सुमनच्या आधी फोटो पोहोचलेले. रामसे काळाच्या पुढे होते !
>>> फुटलो...

धमाल परिक्षण आचार्य तुम्ही कहर लिहिता. तुम्हाला दर आठवड्याला एक ह्या वेगाने चित्रपट चिंध्या मायबोली वर प्रकाशित करण्याचा आदेश देण्यात येत आहे :).

तुम्ही केलेलं वर्णन वाचून फार उत्सुकता वाटली म्हणून अनिरुद्ध अग्रवाल चे फोटो गुगल वर बघितले. त्यांना acromegaly हा pituitary gland stimulation in adult age हा विकार असावा असा माझा कयास आहे. मी ह्या विकाराच वर्णन फक्त पाठ्यपुस्तकात वाचले होते आज ह्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रत्यक्ष बघितले. चित्रपट आपल्या ज्ञानात भर घालतात ती अशी!

भारी लिहिलंय.मी पाहिला होता हा व्हिडिओ कॅसेट वर.
वीराना बद्दल पण लिहा.
ते आआआआ म्युझिक आणि त्यातली रेल्वे चे सांधे बदलल्या सारखे आवाज असलेली गिटार हे जाम आवडायचं.

Lol जबरी लिहिलंय.

“ बाकि गाणी श्रवणीय दिली आणि ती गाजली तर तो फाऊल धरला जातो.” - ह्या नियमाला सणसणीत अपवाद आहे - https://youtu.be/dEgZ4sEQJrc

फेफ - सलाम तुम्हाला ! अचूक निरीक्षण !!! हे कोणत्याही ए ग्रेडच्या चित्रपटातले असावे असे आहे.
धन्यवाद या माहितीबद्दल.

@पर्णिका Lol दर आठवड्याला हा आदेश मागे घ्यावा. या चिंध्या लिहायलाच दोन महीने लागले. स्लो आहे स्पीड. शेवट तर गुंडाळलाच कंटाळून Lol
र्या चे र्‍या हे बदल अजून चालू आहेत. Happy

@मी अनु , वीराना पाहिला आहे. जवळपास सारखाच आहे. तरी प्रयत्न करेन.
रेल्वे चे सांधे बदलल्या सारखे आवाज असलेली गिटार >>> हे निरीक्षण भारी आहे.
च्रप्स, संप्रति, हपा, विकु, सामो, अनघा सर्वांचे आभार __/\__

अर्धाच वाचला आहे Happy

पाय मोकळे करायला एका सुनसान गुहेकडे येते. >>>
प्रत्येक प्राणी पक्षाची एक सभ्यता असते. ती जपायलाच पाहीजे. >>>
दरवाजा मधलं भूत सात आठ फूट उंचीचं पण लाज लज्जेसाठी एक फाटकी पांढरी कफनी घालणारं होतं. >>>
सामान्य लोक विचार करतात. राजगुरू आहे म्हणजे तो विचार च्या ऐवजी विचारधारा करेल असे असावे बहुतेक. >>>
२०० वर्षांपूर्वी सिंग नावाचा हिंदू राजा विजापूरला राज्य करत होता हे मान्य केले की हिंदू राजा कॉफीन बनवून घेत असेल हे पटायला जड जात नाही. >>>
टिळक टॅंकवर असा कॅमेरा घेऊन फिरला असता तर गार्डसनी धू धू धुतला असता. >>> Lol हे फार भारी आहे

राजकुमार्‍यांना रूपाली, वैशाली अशी नावे ठेवत असतील का ? >>> कथालेखकाने बहुधा फर्ग्युसन रोडवर बराच काळ घालवला असेल आणि तेथे असताना या नावांचा विशेष राग आल्याने आपल्या कथांमधे भूत होणार्‍या राजकन्यांची नावे वैशाली/रूपाली ठेवत असेल Happy

हा सामरीचं काम करणारा अभिनेता प्रत्यक्षात मोठा उद्योजक होता. अनिरूद्ध अगरवाल नाव त्याचे. त्याला झालेल्या एका आजाराने त्याच्या हाडांची वाढ जास्त झाली. उंची भरमसाठ आणि चेहराही आडवातिडवा वाढल्याने तो दिसायला विचित्र होता. पण अभिनयाची आवड होती. त्यासाठी कामातून वेळ काढून मुंबईच्या चकरा मारायचा.-
He started his career as a civil contractor at the Bhabha Atomic Research Centre in Mumbai. He took a long break from his job due to ill-health and quit his job. He debuted in the Hindi film, ‘Teri Maang Sitaron Se Bhar Doon’ (1982). Later, one of his friends asked him to meet Ramsay Brothers. Fortunately, at that time, Ramsay Brothers were looking for an actor who could play ghost in their films and cast Anirudh as ‘Samri’ in the film, Purana Mandir in 1984.

खूप मजा आली वाचताना. एकदम धमाल लेख आहे हा. हसू आवरत नाही.
रच्याकने ही नायिका म्हणजे नेहमी पेज थ्री वर दिसणारीआरती सुरेंद्रनाथ आहे ना?

कथालेखकाने बहुधा फर्ग्युसन रोडवर बराच काळ घालवला असेल आणि तेथे असताना या नावांचा विशेष राग आल्याने आपल्या कथांमधे भूत होणार्‍या राजकन्यांची नावे वैशाली/रूपाली ठेवत असेल >>>> Lol
तिथल्या वेटींग मुळे हा राग निघाला असेल Lol

आरती सुरेंद्रनाथ आहे ना? >> त्या वेळी तरी आरती गुप्ता होती. क्रश वगैरे नसल्याने कुणी सुरेंद्र नाथ झाला असेल तरी समजलं नाही. Lol

एरव्ही हे सिनेमावाले मंदीरात जाणार, नावे हिंदू असणार पण लग्न ठरलं कि चर्चमधे जाणार. तिकडे हिरवीन मडमेच्या ड्रेसमधे आणि हिरो सूटात बूटात येणार. सूरज बडजात्याच्या नावाने चांगभलं कि त्याने भारतीय लग्नाला प्रतिष्ठा दिली, म्हणून आता चर्चमधे लग्नाला जात नाहीत. नाहीतर आख्ख्या भारतात लग्नासाठी चर्चेस भाड्याने घ्यायचा धंदा सुरू झाला असता. >> ह्यावर वेड्यासारखा हसलो. !

मस्त. जबरदस्त. आज मी डब्यात पावभाजी व साखर लावलेले लांबडे गुलाबजामुन आणलेले. त्यामुळे लंच मध्ये वाचायला राखुन ठेवलेले. मध्येच एक डुलकी काढली व उरलेला भाग वाचून काढला. सर्वच मस्त जमले आहे म्हणून एखादेच वाक्य कापून लिहि त नाही. अजून येउद्या. परत परत वाचणार आहे.

“ कथालेखकाने बहुधा फर्ग्युसन रोडवर बराच काळ घालवला असेल आणि तेथे असताना या नावांचा विशेष राग आल्याने आपल्या कथांमधे भूत होणार्‍या राजकन्यांची नावे वैशाली/रूपाली ठेवत असेल” - Rofl वा फा!! Happy

आज नीट वाचला. सगळे पंचेस 'जमले' आहेत.
'केला इशारा जाता जाता' हा quintessential तमाशापट आहे तसा हा सिनेमा quintessential रामसे पट !

धमाल लिहिले आहे. Lol
फार एन्ड+१, वर्म होल, एम सील Lol

पंचेस धमाल आहेत किती अन् काय कोट करू. तुम्हाला इतक्या आतल्या गोटातल्या बातम्या कशा माहिती असतात. मोहनीश बहल-नूतन किस्सा.
सिनेपत्रकार होता का ? निष्कर्ष तर Lol

भन्नाट लिहिले आहे Lol पंचेस वाचताना कणेकरांच्या "फिल्लमबाजी" ची आठवण झाली. शिवाय प्रत्येक पात्र साकारणाऱ्या कलाकारांचे नाव आणि जे तपशील दिलेत ते खरेच वाखाणण्याजोगे आहे. खूप मेहनत घेतली आहेत तुम्ही.

>> व्हीसीआर, व्हीसीपी सुद्धा नसण्याचा काळ असताना कॅब्रे म्हणजे अपुरे कपडे हा समज पक्का होता. त्यानंतर मग थेट परदेशात कॅब्रे बघताना बॉ बॉ बॉ बॉ बॉ बॉ झालं होतं

Lol

>> “बाकि गाणी श्रवणीय दिली आणि ती गाजली तर तो फाऊल धरला जातो.” - ह्या नियमाला सणसणीत अपवाद आहे
वाह! कुठेतरी हरवलेलं गाणं अनेक वर्षांनी ऐकलं Happy

असामी, अमा,विकु, अस्मिता, अ तुल आपणा सर्वांचे आभार.
लांबला आहे लेख. त्यामुळे संयम राखल्याबद्दल विशेष आभार.

तुम्हाला इतक्या आतल्या गोटातल्या बातम्या कशा माहिती असतात >> घरी येताना जाताना, फावल्या वेळात कारमधल्या सिस्टीमवर रेडीओ किंवा युट्यूबवर सिनेमाबद्दलचे व्हिडीओज बघत (ऐकत) टाईमपास करतो. कधी कधी बायकोने झाप झाप झापल्यावर पण मन हलके करायला असे व्हिडीओज उपयोगी पडतात. Lol

मी काल पंधरा मिनिटे हा सिनेमा बघितला. सैतानाला त्याचे पापाचे पाढे अक्षरशः वाचून दाखवे पर्यंत. मला मनात "अरे, त्याला माहित आहे आधीच, he doesn't even care " झालं. हा सैतान म्हणजे भुतांचा abacus संगणक आहे. फार बेसिक दिसतो. Lol
आता 'विराना' वगैरे सुचवतंय यूट्यूब. तुम्हीही 'रामसे'तू बांधा व अजून असे लेखन येऊ द्यात. Proud

निलुदा धन्यवाद

गणेशोत्सवात एखादा लेख पूर्ण होईल असे वाटत नाही. हाच चालवून घ्या. Proud
( कसं काय पूर्ण केलं एव्हढं लिहून , विश्वास बसत नाही).