हा मधुमास नवा

Submitted by मनीमोहोर on 2 May, 2023 - 16:55
लंडन स्प्रिंग,  magnolia, cherry blossam

हा मधुमास नवा

ह्या वर्षी स्प्रिंगच्या अगदी सुरवातीपासूनच लंडन मुक्कामी आहे आणि इथला स्प्रिंग अनुभवते आहे. आपल्याकडे आपण जशी “नेमेची येणाऱ्या पावसाची” आतुरतेने वाट बघत असतो तसंच इथे कायम रहाणारी मंडळी ही वाट बघत असतील कदाचित स्प्रिंगची पण माझा अनुभव पहिलाच असल्याने मला तर खूपच अप्रूप वाटतय.

साधारण मार्च अखेरीस इथली वेधशाळा घड्याळं मागे का पुढे कुठे तरी करून हिवाळा संपल्याचं जाहीर करते. सूर्योदय एक तास लवकर होतो आणि सूर्यास्त एक तास उशीरा, त्यामुळे दिवस चांगलाच मोठा होतो. असो. ऑफिशियली जरी हिवाळा गेला असं जाहीर केलं असलं तरी ह्या वर्षी अजून थंडी खूप आहे. रात्री तपमान शून्यापर्यंत खाली जातंय आणि दिवसा कोट घातल्या शिवाय बाहेर जाता येत नाहीये. उन्हं पडतायत पण त्याला तितकासा जोर नाहीये.कधी कधी पाऊस ही आहे. एकदा दुपारी तडतड गारांचे गोळे ही पडले पाच मिनिटं. मुंबईला कधी गारा बघायला नव्हत्या मिळाल्या त्या इथे बघितल्या . मजा आली. बच्चा पार्टी “ स्नोबेरीज स्नोबेरीज “ करत छत्री घेऊन अंगणात गेली. त्यांना गारा कश्या मटकवायच्या हे सांगताना माझ्या मनातला बालभाव जपत मी ही टाकली एक तोंडात. Happy रच्याकने गारांना " स्नो बेरीज " हा शब्द मला फारच आवडला आहे.

गारांनी अंगण भरून गेलं
20230502_163822_0.jpg

एक दिवस पाऊस नव्हता, छान सूर्यप्रकाश होता म्हणून चक्कर मारायला बाहेर पडले. साधारण दुपार होती तरी थंड हवा आणि निस्तेज सूर्यप्रकाश ह्यामुळे पाखरांची किलबिल ऐकू येत होती. कबुतरं, मैना, कावळे, चिमण्या उडताना ही दिसत होते. त्यातच पांढऱ्या पोटाचा जांभळा / काळा मॅगपाय आपले v आकाराची पांढरी नक्षी असलेले पंख फडफडवत त्याच्या निमुळत्या लांब शेपटीच्या साहाय्याने हलकेच झोके घेत आकाशात भरारी घेताना दिसला तेव्हा तर फारच मस्त वाटलं.

वाडी बाहेर पडून जेव्हा मेन रोड ला लागले तेव्हा आश्चर्याने डोळे विस्फारलेच गेले माझे. नेहमीचाच परिसर पण ओळखू येणार नाही इतका वेगळा आणि सुंदर दिसत होता. रस्त्याच्या कडेला उगवलेल्या गवतावर मोठी मोठी शेवंती सारखी दिसणारी पिवळी डँडीलायन फारच उठून दिसत होती. काही झाडं सर्व संग परित्याग करून अजून ही समाधी अवस्थेत होती. काही आपले कळ्यांचे डोळे चोळत हळू हळू जागी होत होती आणि काही मात्र नखशिखांत पांढऱ्या / गुलाबी रंगात सजली होती. एखाद्या यक्षाने जादूच्या कांडीने सामान्य रूपाच्या मुलीचं परिवर्तन सुंदर परीमध्ये करावं असंच वाटत होतं त्यांच्या कडे बघून. तो पांढरा / गुलाबी रंग जणू आसमंतात ही फाकला होता. पूर्ण फुललेली ती पांढरी झाडं वाऱ्यावर डुलताना पाहून जणू आकाशातून झरा वाहतोय असं वाटत होतं. आणि उंचच उंच वाढलेल्या, पांढऱ्या फुलांचा साज चढवून उभ्या असलेल्या झाडांकडे पाहून भर दुपारी आकाशात चांदण्या चमकतायत असा भास होत होता.

चेरी ब्लॉसम
20230502_165245.jpg

बुंध्यापासून अशी फुलं उमलली होती.

20230502_165636.jpg

हा पांढरा

20230502_170122.jpg

वाऱ्यामुळे पाकळ्यांची पखरण

20230502_165843.jpg

हे जवळून

20230502_170205.jpg

गुलाबी झाड
20230502_170458.jpg

भर दिवसा चांदण्या चमकतायत

20230502_170342.jpg

लंडन हे एक महानगर असलं तरी खेडं किंवा कन्ट्री साईड हा ह्या शहराचा आत्मा आहे. इथल्या लोकांना त्या जीवन शैलीची मनापासून आवड आहे त्यामुळे उपनगरे ही एखाद्या खेड्यासारखीच वाटतात मला इथली, फक्त जरा जास्त परिपूर्ण एवढंच. सगळी एक मजली घरं आणि प्रत्येकाच्या घरासमोर बाग. सध्या स्प्रिंगमुळे त्या बागातली फुलं ही फुलली आहेत आणि इथे घराला कुंपण जवळ जवळ नसल्यानेच तिथे उमललेली ट्युलिप्स, डॅफोडील्स आणि इतर ही अनेक फुलं परिसराची शोभा वाढवतच होती.

डॅफोडील्स
20230502_172428.jpg

ट्युलिप्स

20230502_172309.jpg

..
20230502_172406.jpg

नागरी वस्तीतील हे निसर्ग चित्र भान हरपून पहात असतानाच एका घरासमोर माझी नजर गेली आणि मी अक्षरशः भरून पावले. आज अनेक वर्षे मी समर मध्ये हे झाड पहात होते आणि साधारण अनंतासारखी पाने असलेलं अगदीच सामान्य दिसणारं हे झाड मालकाने बागेच्या इतक्या मध्यभागी का बरं लावलं असेल ह्या विचाराने चक्रावून ही जात होते. आज त्या कोड्याचं उत्तर मला मिळालं होतं. कमळाच्या आकाराच्या टपोऱ्या कळ्यानी आणि तळहाताएवढ्या गुलाबीसर पांढरट फुलांनी बहरलेला मॅग्नोलिया माझ्या समोर उभा होता. स्वच्छ सूर्यप्रकाशात निळ्याशार आकाशाखाली गोल घुमटाकार आकाराचा आणि बेताच्या उंचीचा मॅग्नोलिया नितांत सुंदर दिसत होता. हे सुलक्षणी झाड दारात असणं म्हणे भाग्याचं समजलं जातं जे अगदीच नैसर्गिक आहे. दारात मॅग्नोलिया असेल तर त्या घराची किंमत ही वाढते म्हणतात. असो. मी ह्याचे आधी फोटो बघितले होते, फोटो बघूनच हरखून ही गेले होते पण मला स्वप्नात ही कधी वाटलं नव्हतं की मी हे फुललेलं झाड कधी प्रत्यक्षात बघू शकेन. अश्या निखळ आनंद देणाऱ्या क्षणांची अजून ही आस असणे ह्यालाच जीवनेच्छा म्हणत असतील का ?

मॅग्नोलिया
20230502_173017.jpg

हा जवळून

20230502_172522.jpg

थंडी वारा पाऊस काही ही असलं तरी हल्ली मला छंद च लागलाय रोज चक्कर मारायला जाण्याचा. रोजचा नजारा वेगळा असतो. कधी थंडीमुळे डँडीलायनचे कळे दुपार झाली तरी उमललेले नसतात , कधी वाऱ्यामुळे फुलांच्या पाकळ्यांच्या रस्त्यावर पायघड्या घातलेल्या असतात. कधी खारुताई धिटाईने कुंपणावर आलेली दिसते. काही झाडांचा बहर ओसरून त्याना नवीन पालवी फुटायला लागलेली असते तर काही झाडं फुलायला लागलेली दिसतात. टप्पोऱ्या कळ्यानी डवरलेल्या एका झाडवर आता कोणत्या रंगाची फुल येतायत म्हणून रोज लक्ष ठेवून होते , पण माझा होरा साफ चुकला. त्याला फुलं येण्याऐवजी हिरवट चंदेरी पानांचीच फुल आली, आता हळू हळू ती मोठी होऊन झाड हिरव्या चंदेरी पानांनी भरून गेलंय.

पानांच्या कळ्या

20230502_173105.jpg

आपल्याकडे ह्या दिवसात उकाडा असतो, गरम होतं असतच पण तरी फुललेले बहावा, गुलमोहर पाहून डोळ्याचं पारणं फिटतं . जीव शांत होतो. कोकणात आमच्या देवळाजवळचा पांढरा चाफा उन्हाळ्यात हातचं काही न राखता बहरतो. आंबे, फणस, कोकमं, करवंदं उन्हाची काहिली सुसह्य करतात आणि रसना तृप्ती ही करतात. मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हाय वे वरचा विक्रोळी पट्टा गुलाबी चेरी ब्लॉसममुळे ह्या दिवसात नितांत सुंदर दिसतो. पिंपळाला नवी कोवळी तांबूस पालवी ह्याच दिवसात येते. आमच्या गल्लीच्या तोंडावर असलेला भला मोठा करंज ही ह्या दिवसात नव्या तुकतुकीत पानांनी आणि थोडा कडसर वास असलेल्या छोट्या छोट्या पांढऱ्या लालट फुलांनी सजतो. ह्या सगळ्या तिकडच्या आठवणी येत आहेतच. पण इथले हवामान खूपच वेगळे असल्याने नित्य नवा अनुभव देणारे सृष्टीचे नवे विभ्रम सध्या अनुभवते आहे...

हेमा वेलणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच आवडता ऋतु. थंडीनंतर पालवी फुटलेली झाडं आणि वेगवेगळ्या रंगाची फुलं बघायला फारच छान वाटतं.

सुंदर लेख. सहज भावाने लिहिलेला. फोटोही तितकेच सुंदर.
यूरोप आणि अमेरिकेतली पानगळ सुद्धा अशीच सुंदर असते.
स्प्रिंग आणि autumn दोन्ही सुंदर..
" उदये सविता रक्तो, रक्तश्चास्तमने तथा ।
संपत्तौ च विपत्तौ च साधूनाम् एकरूपता ।।"
फक्त एकच शंका : विक्रोळी येथे पूर्व महामार्गावर असलेले वसंती गुलाबी फुलांचे वृक्ष Tabebuia Rosea असावेत का?

मनीमोहोर, सुंदर फोटो आहेत. त्या ट्युलिप च्या फोटोखाली जो फोटो आहे त्यातली किरमिजी फुले कुठली आहेत? व्हिंका? आमच्या मिडवेस्टच्या झोन ५ मधे व्हिंकाचा बहर उन्हाळ्यात येतो.

आणी हा आमच्या नेबरहुडचा दुसर्‍या बाजुचा प्रवेश. ही एका रांगेत ब्रॅडफर्ड पेअर्सची झाडे आहेत ज्यांना स्प्रिंगमधे असा पांढर्‍या शुभ्र फुलांचा भरभरुन बहर येतो.

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद .

मुकुंद , सगळे फोटो मस्तच आहेत. त्या ट्युलिप च्या फोटोखाली जो फोटो आहे त्यातली किरमिजी फुले कुठली आहेत? >> नाही हो माहित , मला एवढी नावं वैगरे माहीत नाहीत. ही फुलं रस्त्यावर कुंपणाच्या भिंतीच्या फटीत ही फुलली आहेत इथे प्रॉपरली लावली आहेत एवढंच.

विक्रोळी येथे पूर्व महामार्गावर असलेले वसंती गुलाबी फुलांचे वृक्ष Tabebuia Rosea असावेत का? >> हीरा, असतील तुम्ही म्हणताय तेच , माझं ज्ञान अगाध आहे ह्या बाबतीतलं. गुलाबी रंग म्हणून मला वाटलं चेरी ब्लॉसम एवढंच ...

आहाहा डोळे निवले..
काय नशीब आहे तुमचे.. कोकणसे निकले और लंडन मे अटके Happy

सुंदर चित्रे!
सफरचंदाची झाडंही अशीच पांढरी धुप्प होतात. इकडे अजुन एखाद-दोन आठवड्यात होतील बहुतेक. झाडावर एकही पान नाही आणि फुलंच फुलं. स्प्रिंग मध्ये चिक्कार पाऊस पडतो, वारा ही असतो. त्यात ही अती प्रचंड नाजुक फुलं आणि त्यांच्या पाकळ्या इतस्ततः उडत असतात. काय सुंदर दिसतं ते दृष्य! पाकळ्या तर इतक्या नाजुक की आरपार दिसतं.
इथल्या छोटुकल्या स्प्रिंग समर मुळे झाडं पानं वगैरे फुटुन प्रकाशसंस्लेषण वगैरे होऊन मग फुलं फ़ळं अशा कशाची वाट बघतच नाहीत. आदल्या मोसमात सगळ्या रसांची निर्मिती करुन ते सगळे रस जमिनीखाली मुळात साठवुन ठेवतात. कारण सहा महिने उणे तापमान. एकदा का शून्यावर तापमान गेलं की हे सगळं सामान वर पाठवून आधी फुलं येतात. त्याचं परागीभवन झालं की फळांची प्रोसेस चालू होते. मग पानं फुटुन त्यातुन अन्ननिर्मिती चालू होते. Happy
निष्पर्ण झाडावर ही फुलं फार भारी दिसतात. चेरी काय सफरचंद काय फार सुरेख दिसतात झाडं.

किरमिजी म्हणजे ती जांभळी फुलं का? ती मॉर्निंग ग्लोरी असावी.

लेख व प्रचि खूप आवडली.
>>>>>" उदये सविता रक्तो, रक्तश्चास्तमने तथा ।
संपत्तौ च विपत्तौ च साधूनाम् एकरूपता ।।"
हीरा तुम्ही लिहीलेले सुभाषित फार आवडले.

मी दोन वर्षांपूर्वी ट्युलिपचे कंद (विंटर सॉ) वाले आणलेले पण लावायचे राहिल्याने गेल्यावर्षी स्प्रिंग सॉ केले. तर एकही झाडं आलं नाही. वेळेवर नाही लावले कंद आणि घालवले २५ -३० डॉलर पाण्यात म्हणून ओरडा खाल्ला. तर यावर्षी त्याठिकाणी आठ - दहा झाडं उगवुन आली आहेत. छान मोठ्या कळ्या आल्या आहेत. दोन तीन दिवसात उमलल्या की टाकेन फोटो.
त्या कंदांना विंटर सॉ म्हणजे विंटर सॉ. ते काय ते १०० १५० दिवस बिलो झिरो तापमान लागतं म्हणजे लागतंच दिसतंय. गम्मत वाटली असे दीड वर्षे डॉर्मंट राहुन फुटलेले बघुन. Happy

नेत्रसुखद धागा !

प्रतिसादातही रंगांची रेलचेल.

@ हीरा, साधूनाम् एकरूपता _/\_

डोळे निवतील असे सुंदर फोटो आहेत. वर्णनही सुंदर.
मॅग्नोलियाचं झाड किती सुंदर आहे! मी मॅग्नोलिया म्हणजे अनंत समजत होते. काल स्वान्तसुखाय यांचा चाफ्यावरचा लेख वाचताना कळलं की हा चाफ्याचा प्रकार आहे.
अमित, माझं एकदा हळदीच्या बाबतीत असं झालं होतं Happy आईने सप्टेंबरमधे इकडे येताना घरची ओली हळद आणली होती. बऱ्याचशा हळदीचं तिने लोणचं केलं आणि दोन हळकुंडं कुंडीत लावून ठेवली. आत्ता उगवतील, मग उगवतील अशी वाट बघून मग मी नाद सोडून दिला. पुढच्या वर्षी जून महिन्यात बरोब्बर उगवली! Happy

अमितव,
इंटरेस्टिंग माहिती!
(लॅब गर्ल पुस्तकाची आठवण झाली.)

Pages