अनात्म

Submitted by ज्येष्ठागौरी on 23 April, 2023 - 23:01

अनात्म
खरंतर मी लहानपणापासून त्यांना बघत आलेली होते, आमच्या घराच्या खालीच ते रहायचे. त्यांची मोठी मुलगी माझ्याएवढीच, चार सहा महिन्यानी मोठी असेल.सतत एकत्र खेळत, भांडत असायचो.मी त्यांना काका आणि त्यांच्या पत्नीला काकू म्हणायचे आणि माझी आजी सारखी तिकडे जायची पण त्यांच्या दारावरची पाटी आणि आमचं आडनाव वेगवेगळं. माझ्या सख्ख्या काकांसारखे ते आणि आम्ही एकत्र रहायचो नाही.कोणी विचारलं तर ते बापूंचे कुठले भाऊ हे मला सांगता यायचं नाही. आमच्या दिवाणखान्यात आजोबा , पणजोबा ह्यांच्याबरोबर एक अजून फोटो होता, तो अक्कांचा असं आई सांगायची.अक्का कोण असा प्रश्न विचारणारी मीच एकटी भोचक असंही म्हणायची.मग खालच्या काकूची पुण्यातच दुसरीकडे बदली झाली आणि त्यांचं बिऱ्हाड हललं. तरीही त्यांच्या नवीन ठिकाणी मी आजीबरोबर जायची.
थोडं मोठं झाल्यावर आईनं सगळं उलगडून सांगितलं.माझे वडिल तेरा वर्षांचे असताना त्यांची आई म्हणजे अक्का गेल्या.त्यावेळी माझ्या मोठ्या आत्याचं लग्न झालं होतं पण बाकी दोन्ही भावंडं बरीच लहान होती.आजोबा सैरभर झाले होते,ते निष्णात डॉक्टर असून अक्का टायफॉइडनी गेल्या ह्याचा त्यांना चांगलाच धक्का बसला होता.चार वर्षे बापू, त्यांची आजी आणि घरची गडी माणसं ह्यांनी घर थोपवून धरलं.पण चार वर्षांनी हा डोलारा सावरायला ,माझ्या आजोबांनी पुन्हा लग्न केलं.आमच्या घरात अतिशय सुधारकी वातावरण असल्यानं आणि अण्णासाहेब कर्वे ह्यांना देवासमान मानणं असल्यानं आजोबांनी एका विधवेशी विवाह केला ,तेंव्हा तिला एक दहा अकरा वर्षाचा मुलगा होता.आजी सागर, मध्यप्रदेशची होती आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटी इथून BA economics झालेली, उच्च शिक्षित होती.आजोबांनी त्या काकांना त्यांनी कोणतं आडनाव वापरावं हे त्या दोघांवर सोपवल्यानं काका त्यांच्या सख्ख्या वडिलांचं आडनाव वापरायचे.अशा तऱ्हेनं खालचे काका,त्यांच्या नावाची पाटी,आजीचं त्यांच्याकडे जाणं येणं हे समजलं.आजी होती तोवर हे जाणं येणं चालू होतं.आजी गेल्यानंतर मात्र ह्या काका काकूंशी संबंध राहिला नाही आणि एक कहाणी विस्मृतीत गेली.
काका काकू दोघेही डॉक्टर,काका विज्ञानात डॉक्टरेट आणि काकू वैद्यकीय क्षेत्रातील.त्यांचं लग्न होईपर्यंत आमचं सगळं कुटुंब एकत्र राहत होतं. काकांचा स्वभाव खूप शांत, गरीब आणि कमाल संकोची होता असं आई सांगायची.माझी आई लग्न होऊन घरी आली तेंव्हा दोन सख्खे आणि एक सावत्र दीर ह्यांच्याशी ते तिचे हम उमर असल्यानं चांगलं जुळलं.त्या काकांचं लग्न झाल्यावर मात्र त्यांचं बिऱ्हाड वेगळं झालं.जशी मोठी होत गेले तशी ह्या नात्याची गुंतागुंत समजायला लागली.बापू आणि आत्या, काका ह्या सगळ्यांनाच नवीन आईबद्दल जरा औपचारिकता जास्त होती, एक अवघडलेपण होतं. वडिलांची पत्नी आई म्हणून स्वीकारणे हे कठीण गेलं आणि आपल्याच वयाचा एक सर्वस्वी परका मुलगा त्याला भाऊ म्हणून स्वीकारणं ,तो आपल्या घरी राहणार हे समजून घेणं अवघड गेलं.ते तसं त्या काकांनाही गेलं असणार आणि नखभर जास्तच!कारण त्यांच्यासाठीही एक आघात आधीच होता, घर बदललं होतं आणि ते कोणाच्या तरी घरी आले होते अर्धवट वयात.
आजीलाही नैसर्गिकपणे त्या काकांचा ओढा जास्त होता पण ती राह्यली मात्र आमच्याकडे. तिची सगळी आजारपणं, रागवे रुसवे,तिचा ताल सगळं आईनी आणि काकूने काढलं, पण ती गेली मात्र त्या काकांकडे.म्हणजे शेवटचे क्षण तिनं घालवले ते तिच्या मुलाकडे..असो ! पण आम्हा नातवंडांना तीच आजी, तिनं भरपूर लाड केले, आमच्याशी वाद घातले, प्रसंगी पाठीशी घातलं होती. आमच्यासाठी ती आमची आजी होती ,आईसाठी सासू होती पण बापूंसाठी ती आई नव्हती तर कारण ते चक्क अठरा वर्षाचे असताना ती आली होती.त्यांच्या आईच्या आठवणी पूर्ण ताज्या होत्या.तशा त्या कधीच शिळ्या झाल्या नाहीत.त्यांच्यात एक विलक्षण अवघडलेपण होतं.बापूंनी आजीसाठी सगळं केलं पण त्यांच्यातलं अंतर कायम राह्यलं.आजीचा स्वभाव आणि बापूंचं वय दोन्ही आड आलं.मारुन मुटकून नाती लादता येत नाहीत, जी टिकवायला धडपड करावी लागते ती खरी नाती नव्हेतंच!
आज बसल्या बसल्या त्या काकांचा विचार करतेय. त्यांचा अतीव संकोची स्वभाव आईनं अनेकदा सांगितलाय. त्यांना आपण उपरा आहोत असं वाटायचं त्यातून तो आला असावा का, असं वाटलं मला.ही घटना जवळ जवळ ऐंशी वर्षांपूर्वीची आहे.आमच्या घरी ते आश्रितासारखे वाढले का तर त्याचं उत्तर स्पष्ट नाही असं येईल कारण त्यांचं डॉक्टरेट होण्यापर्यंतच शिक्षण आजोबांनी केलं, कधीही आप पर भाव बाळगला नाही आणि नंतरही काकांचा संसार आमच्या कुटुंबाच्या आधाराने आमच्या आजूबाजूला फुलला.तरीही ती एक फरकाची सूक्ष्म किनार होतीच.
पण मला आत्ता कळतंय ते उपरेपण. त्यांच्या बाबतीत खूप मोठा काळ त्यांच्या मनातून ही उपरेपणाची भावना गेली नसणार हे आता उकलतंय.ते आमच्या घरात होते पण आमच्या घरातले नव्हते.त्यांचं दिसणं, असणं,बोलणं सगळं आमच्यापासून भिन्न होतं. सगळ्यांनी त्यांना सामावून घेतलं तरी त्यांना कसं वाटत असेल हे कसं ठरवणार आणि सांगणार?त्यांना कसं वाटलं असेल मूळ सोडून दुसऱ्या जागी रुजायचा प्रयत्न करताना! किती अवघड आहे, अनोळखी प्रदेशात आपली ओळख निर्माण करणं.
इतक्या मोठ्या नाही पण छोट्या मोठ्या प्रमाणात आपण उपरेपण भोगतोच ना आयुष्यात कधी ना कधीतरी.नवीन शाळा किंवा कॉलेजातील पहिला दिवस, कुठलाही प्रवास ,नवीन नाती, परदेशी प्रवास किंवा वास्तव्य, बायकांच्या बाबतीत तर लग्न.थोडक्यात कुठलाही बदल हा आप-पर भावाची आंदोलनं पेलत असतो, साक्षीदार असतो आणि त्यात स्वतःला सामावून घेऊन जगणारे आपण,काही थोडा काळ किंवा कधी कधी दीर्घकाळ उपरे असतो.कधी घरात, शाळेत, कॉलेजात, नोकरीत,नवीन गटात आपण कधी न कधी ही उपरेपणाची भावना अनुभवलेली असते.कधी तिच्यावर मात केलेली असते तर कधी तिनं आपल्यावर!कधी आतल्या आत कोमेजून जायला होतं तर कधी आपल्याच प्रतिक्रिया वेड्यावाकड्या होऊ शकतात.कधी इतर माणसं सामावून घेतात तर कधी आपण परिस्थितीशी जुळवून घेत असतो.
कधी माणसं परक्या ठिकाणी तर कधी आपल्या स्वतःच्या घरातही उपरी असतात, कधी लोकं त्यांना उपरं करतात तर कधी स्वभावतःच उपरी असतात. कधी आयुष्यभराच्या नात्यात उपरेपणा असतो, वरवर सगळं चांगलं पण आतून ती मायाच नाही असाही अनुभव येतो. कधी नवखी नव्हे तर अगदी आपली गणगोताची माणसं काही बाबतीत परकी वाटतात.कधी कांद्याची साल आणि पापुद्रे हळुहळू निघावे असे उपरेपणाचे पदर अलगद निघत,सुटत राहतात तर कधी अगदी घट्ट न सुटणारे तसेच राहून जातात.त्या न सुटलेल्या निरगाठी फार कठीण करतात आयुष्य.कधी हातमिळवणी करावी लागते तर कधी दोन हात! कधी सहवासाने,तर कधी वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या समजूतदारपणानी कंगोरे बोथट होत जातात आणि आपण आपलेपणानी प्रवास करायला लागतो.उपरेपणाच्या वाटा फार कठीण, कधी तो बाह्य गोष्टींनी येतो तर कधी आपल्या मनातून येतो.नको असणारी नाती किंवा आपल्या मनाविरुद्ध तयार झालेली नाती किंवा गोष्टी हे तर कुरणचं बनतं उपरेपणासाठी. काही नाती तर चक्क विनाकारण बदनाम आहेत ह्यासाठी.
आपल्या मन आकसून घेण्याच्या सवयीतून, संकोचातून आपण अनेकदा मोकळ्या हवेला, वातावरणाला, व्यक्तींना सामोरं जाऊच शकत नाही. मोकळं आकाश, असीम क्षितिज जरी समोर आलं तरी पायातली ती एक बारीक अदृश्य साखळी जखडून ठेवते.अनेकदा दोन व्यक्ती एकमेकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर जोखत राहतात. नवीन नातं, घर, वातावरण ह्या बरोबरचं अधिकार,भाषा, संस्कृती भिन्नता, सांपत्तिक स्थिती ,स्वभाव,वय, अहंकार, स्वतःबद्दलच्या वेगळ्या कल्पना ह्या सगळ्या गोष्टी दोन व्यक्तींमधल्या उपरेपणाला खतपाणी घालत राहतात.
कधी कधी मात्र समोरची व्यक्ती, वातावरण किंवा परिस्थिती अशी येते की अगदी दिलखुलास व्हायला होतं, कुठलेही किंतु मनात न येता,स्वतःच्या क्षमतांबद्दल कुठलीही शंका न येता आपण मोकळे होतो.समोरची व्यक्ती किंवा वातावरण आपल्या व्यक्तिगततेवर आक्रमण न करता तरीही आपल्याला सामावून घ्यायला तयार असली तर सोने पे सुहागा!मग हळुहळू कमळ उमलत जातं, फुलत जातं, त्यातलं सगळं चांगुलपण बाहेर येत राहतं.मैत्रीच्या आणि आपलेपणाच्या नात्यात हे मिटलेपण पार नजरेपलीकडे निघून जातं.
वडिलांची नोकरी पुण्यात असल्यानं एकाच ठिकाणी, शिक्षण ,नोकरी आणि लग्न झालं त्यामुळे त्या दृष्टीनं अगदी कमी बदल घडले.पण तरीही शालेय वयात दर वर्षी नवीन तुकडीत जायच्या कल्पनेनं पोटात खड्डा पडायचा.ती भावना खूप काळ राह्यली.एक काहीतरी न्यून बाळगून होते मनात,आपण कोणाशी बोलायला गेलो आणि आपल्याला स्वीकारलं नाही कोणी तर काय अशा दुष्ट शंका त्या शाळकरी मनात यायच्या. शाळा आणि घर अशा अगदी छोट्या वर्तुळात फिरलं आयुष्य. हे सगळं निरखून की काय कोण जाणे,मी नाटकात काम करावं ह्यासाठी भाऊ घेऊन गेला, तर तिथली अख्खी जनता खुन्नस खाऊन आपल्याकडे बघतेय असं वाटायला लागलं आणि आपण तिथं उपरे आहोत असं प्रकर्षानं वाटायला लागलं, अक्षरशः डोळ्यात पाणी भरुन आलं,घसा दुखल्यासारखा व्हायला लागला.ह्यातलं 'वाटायला' लागलं हे फार महत्त्वाचं होतं!हा पूर मात्र एखाद्या आठवड्यात तितक्याच ताकदीनं ओसरला कारण त्या सगळ्यांनी मला खुल्या दिलानं त्यांच्यात सामावून घेतलं. त्यांच्या तोंडावर होणाऱ्या फटकळ चेष्टेनं,मनापासून आलेले राग लोभ,पुढे मागे न बघता धडाकून बोलण्यानं, टीका आणि कौतुक हे निर्मळपणे कसं स्वीकारायचं शिकले आणि मग एक वेगळी दुनिया खुली झाली. ह्या घटनेनं मला माझ्यातल्या त्या अनात्म भावनेवर मात करायसाठी मदत केली.आयुष्यात ही भावना येणारच नाही असं नाही पण त्याच्यावर मात करणे किंवा संपूर्ण दुर्लक्ष करणे किंवा तिची तीव्रता कमी करणे हे थोडं फार जमायला लागलं. उपहास,चेष्टा,दुस्वास,दुर्लक्ष,अहंभाव, न्यूनगंड,असूया, महत्वाकांक्षा ह्या सगळ्या शाखा असतात उपरेपणाच्या.आपण कधीतरी प्रयत्न करुनसुद्धा ती परकेपणाची भावना नाही मिटवू शकत .कधी त्या माणसाच्या जवळ असतो शरीरानं पण मनानं असंख्य योजने लांब असतो.ती दरी नाही भरु शकत,पण ती व्यक्तीही स्वतःशी
मोठा संघर्ष करत असते हे एकदा कळलं की मग एकदम मुक्त मुक्त वाटतं. आत्मीय सगळेच असतात असं नाही, सगळेच होतील असंही नाही. तसंच अनात्म ही भावनाही कायम टिकणारी नाही.
त्या काकांच्या बाबतीत त्यांच्यात असणारी ही भावना कधी गेली का माहिती नाही,ते त्या अनात्म बंदीवासातून बाहेर पडले का ते कळायला आजतरी मार्ग नाही, पण कदाचित त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांना जमलं असेल.आई आणि बापू ह्या विषयावर माझ्याशी अनेकदा बोलले होते. बापूंना ह्या नात्याची तिसरी मिती जाणवली होती, समजली होती,ती त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली होती.पण वेळ निघून गेली होती, बापू आणि काका दोघेही वयाच्या वेगळ्या टप्प्यावर होते.बापूंनी काकांच्या काही चुकांबद्दल त्यांना मनोमन क्षमाही केलेली होती,पूर्वी नसेल कदाचित पण नंतर ते ह्या भावनिक गुंतागुंतीबद्दल वेगळा विचार करु शकले.त्यांचं पोरकेपण आणि परकेपण जसं त्यांना होतं तसं त्या काकांनाही होतं भिन्न असलं तरी हे त्यांना मान्य होतं.आज त्यांच्याबद्दल विचार करावासा वाटला हे खरंय आणि एका काळाच्या खूप पुढे असलेल्या आजोबा ,आजीचा, त्यांच्या निर्णयानं, सावरलेल्या दोन कुटुंबाचा आणि त्या बरोबर आलेल्या वेगवेगळ्या नात्यांच्या आणि भावनिक आंदोलनांचा, कल्लोळांचा विचार ओघानं आला.अनात्म ह्या शब्दाचे बरेच अर्थ आहेत त्यातलाच एक अर्थ आत्मा नसलेलं किंवा उपरेपणा किंवा परकेपणा असलेलं, आत्मन, आत्मीय नसणारं ते 'अनात्म' असाही कळला.तिन्ही काळात आत्म अनात्म हा भोवरा असणार आहेच.
त्या काकांच्या जाणत्या वयातल्या आठवणी कमीच आहेत पण आज अनात्म ह्या शब्दामुळे त्यांचा विचार आला.माझ्या बाजूनं तरी मी भूतकाळातली ती उपरेपणाची अनात्म भावना हवेत फुंकर मारुन उडवून दिली.
©ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चिंतनातून व्यक्त झालेल्या भावना पोहोचल्या..
कधी आयुष्यभराच्या नात्यात उपरेपणा असतो, वरवर सगळं चांगलं पण आतून ती मायाच नाही असाही अनुभव येतो. कधी नवखी नव्हे तर अगदी आपली गणगोताची माणसं काही बाबतीत परकी वाटतात>>पटलंय.

सध्या यु ट्युब वर दाखवत असलेल्या अग्निहोत्र सिरीअल मध्ये असाच भाग कथानकात आहे. प्रभामामी व दिनेश अग्निहोत्रींच्या घरी राहतात.
प्रभामामी व अप्पा लग्न करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलाच्या मनात एक शंका राहते. तो घर सोडून जातो. दिनेश व त्या मुलग्यात कायमचा दुरावा राहतो. आपण सहन केलेले दिनेशच्या मनातून कधीही जात नाही.

छान लेख नेहमी प्रमाणेच. पुलेशु.

खुप छान चिंतन .. अनात्म हा नवीन शब्द्ग समजला, त्यासाठी धन्यवाद. पुढिल लेखनाच्या प्रतिक्षेत

तुम्ही फारच छान लिहीता. अगदी खोल, अर्थगर्भ. वाचावसं वाटतं, पण मनात अगदी खोलवर दडवून ठेवलेल्या भावनांचं आवरण निघेल, अशी धास्ती वाटते. वाचल्यावर हलकं, निर्मळ वाटतं.
अनात्म हा नवीन शब्द कळला. तुमच्या लेखांची शीर्षकेही वेगळीच असतात. तुमची शब्दसंपदा उत्तम असणार.

तुमच्या काकांसारखीच कथा श्री.गिरीश कार्नाडांच्या ज्येष्ठ बंधूंची होती. लिंक दिली आहे.
https://www.maayboli.com/node/70208

खूपच तरल आणि हळुवारपणे लिहिलय... एक एक वाक्य पुरेपूर व्यक्त करते आहे स्वतःला... पुन्हा पुन्हा सावकाशपणे समजून उमजून घेत वाचण्यासारखा लेख आहे.

छान चिंतन
मला हे आठवलं
कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते
कहीं पे निकल आये जन्मों के नाते
है मीठी उलझन बैरी अपना मन
अपना ही हो के सहे दर्द पराये
कहीं दूर जब दिन ढल जाये...

याच बरोबर हे ही आठवले...
पक्षी अंगणी उतरती। ते का गुंतोनिया राहती॥ तैसे असावे संसारी। जंववरी प्राचीनाची दोरी॥

हे ही वळवळलं डोक्यात
कधी कधी आपण फक्त आणि फक्त एकटे असतो. हे प्रत्येक व्यक्ती साठी खरं असावं.
Civilization is departure from nature.

छान लिहिलंय नेहमीप्रमाणे.

आमच्या नात्यातल्या एकांनी वयाच्या जवळजवळ पन्नाशीत लग्न केलं. जिच्याशी केलं, ती चाळिशीची घटस्फोटिता होती आणि तिला दहा वर्षांचा मुलगा होता. त्या मुलालाही यांनी दत्तक घेतलं. लग्नानंतर वर्ष-दीडवर्षात यांना नवीन बाळ झालं. त्यानंतर एकदा ते चौघेही आमच्या घरी आले होते. तेव्हा त्या मोठ्या मुलाकडे बघताना मला जरा वाईट वाटलं कारण तो या सगळ्यात उपऱ्यासारखा बसला होता. नवीन बाळाशी तो खेळत होता, पण तेव्हाही सावत्र वडील त्याला जरा जास्तच धाक दाखवत होते असं मला वाटलं. आज तुमचा हा लेख वाचून त्याची आठवण झाली.