पश्चातापाची टोचणी

Submitted by हेमंत नाईक. on 20 April, 2023 - 10:10

स्नेहमिलनाची एक मित्रकथा,

मी नंदू खाचणे, वय वर्षे साठ. केसांनी डोक्यावरून रजा घेऊन संपूर्ण डोके हे पाटा पीच प्रमाणे क्रिकेटचे मैदान झालेलं असलं तरी त्यामध्ये असलेल्या सर्व चेतापेशी अजूनही दहावितल्या मुलाच्या. अजूनही कोणताही अन्याय झाला तर पाच बोटांची मूठ लागलीच घट्ट आवळून धरणारे माझ्या सळसळत्या धमण्यातील गरम चिर तरुण रक्त. नाही म्हणायला पूर्वीपेक्षा माझी बोली वयापरात्वे किचित मवाळ झाली असल्याचे मित्र म्हणतात, पण मला तसें वाटत नाही. कुणी चुकीचे काम करत असले तर प्रथम गोड शब्दात.. गोंजारून समजावतो नाही समजला तर..दोन चार शिव्या हासडायला मी मागे पुढे बघत नाही.. अजूनही माझ्या मोठया आवाजाला घाबरून समोरचा सरळ होतो... पण त्या नाठाळाने स्वभाव बदलला नाही तर या वयात देखील लाथा बुक्क्याने त्याचे भूत उतरावयाला मी मागे पुढे बघत नाही. असे वर्णन मी केल्यावर माझे चित्र तुमच्या डोळ्यापुढे नक्की निर्माण झाले असेल.

मी आज तुमच्या पुढे माझी झालेली चूक ४५ वर्षांनी कबूल करतोय. मी त्यावेळी आठवी किंवा नववीत शाळकरी मुलगा.. अन्याया विरुद्ध लढाताना कुणालाही घाबरायचे नाही असे शिक्षण देणारी आमची शाळा. त्यामुळे तो फॉर्मुला डोक्यात फिट्ट बसलेला. जात्याच थोडा भडक डोक्याचा. क्रिकेट आवडायाचे पण स्पिन हळुवार बॉलिंग टाकणे अजिबात आवडत नव्हते .... अगदी जोरात बॉल टाकून विकेट चे तुकडे केले की अत्यानंद व्हायचा.

नववीत शाळेत असताना जिन्यावरून खाली उतरताना काही मुले धक्काबुक्की करीत होते, मी त्यांच्या मागे शांततेत जात होतो.प्रयोगशाळा तळमजल्यावर असल्याने वर्गातून दोन जींने उतरून आवाज न करता शिस्तीत खाली जायचा आमचा शिरस्ता होता, पण आज काही मुलामुळे गोधळ आवाज वाढला होता.
त्यामुळे जोशी सर घाईघाईत बाहेर आले ते गोंधळ करणारे मुले नेमके वळले आणि नेमका मी समोर आलो, पाहतो तर समोर नवीन जॉईन झालेले जोशीसर.
मग काय विचारता जोशी सरांनी मला लाईनीतून बाहेर काढले, नवीनच लागल्याने शिक्षा करताना मुलांचे ऐकून घेण्याची वृत्ती नव्हती आणि गोंधळ करणारा मीच असल्याचा गैरसमज करून मला कानफटीला कारण नसताना त्यांच्या राकट हाताने चागल्या सात आठ थापटा मारून माझे दोन्ही गाल लाल केले.... हे ही मला विशेष वाटले नाही, पण नेमका त्याच वेळी वर्गातून जाणाऱ्या चार पाच मुलींचा घोळका माझ्याकडून बघून फिस्सकन हसला आणि माझा त्या वयात अपमान म्हणजे काय? याची प्रथमच मला जाणीव झाली.

सरांचा मनात तीव्र राग आणि संताप झाला होता. मी कारण नसताना, माझी काही एक चूक बळीचा बकरा बनलो होतो. त्या दिवशी शाळेत काय झाले काही समजत नव्हते.शाळेत शिकवल्या प्रमाणे जोशी सरांच्या अन्यायाविरुद्ध मनाने बंड पुकारले.
वचपा कसा काढायचा याचा मी विचार करत होतो आणि संधी चालून आली जोशीसर सायकलवरून येताना घराजवळ दिसले त्यांनी समोरच सायकल लावली आणि बाजूच्या घरात ते भेटावयास आले होते.. मी भरकन घरात गेलो घरातून करकटक आणून सरांच्या दोन्ही चाकांच्या ट्यूब मध्ये भोसकले.. भस्सकन हवा बाहेर येताच माझ्या झालेल्या अपमानाचा बदला पूर्ण होणार होता. पण देवाला ते मान्य नव्हते आणि सरांनी मला नेमके त्या ठिकाणी उभे पहिले मीच हवा काढल्याचे त्यांच्या बहुदा लक्षात आले असावे.

दुसऱ्या दिवसापासून माझी छळवणूक सुरु झाली, पदोपदी मी अपमानाचा आणि अन्यायाचा धनी होत होतो. जोशी सराबद्दल माझ्या मनात घृणा वाढली होती त्यांनाही मी बंड अन गुंड विदयार्थी वाटत होतो आणि परत ठिणगी पडली भूमितीच्या पेपरात मला मुद्दाम नापास करण्यात आले घरी आई वडिलांच मार खाल्ला, पेपर बघितला तर दोन प्रश्न तपासलेच नव्हते मी पास होतो. सरांची अढी काही करता सुटत नव्हती ती अजूनच घट्ट होता होती मी आकारण शिक्षा घेत होतो आणि माझ्या मनात अविचाराने जन्म घेतला. सरांना अद्दल घडवण्याचे ठरवले, संध्याकाळची उशिराची वेळ होती सर बॅचलर असल्याने खानावळीतून जेवण करून आपल्या रूम कडे परतत होते मनात त्यांच्या बद्दल तीव्र संताप होतो आणि मी धाडसी निर्णय घेतला जोशी सरांच्या मार्गांवर दबा धरून बसलो. तस बघितलं तर मी चौदा वर्षांचा तर सर एकवीसचे असतील सर बुटके मी तसा सशक्त आडदांड. जसे सर जवळ आले मी पुढे गेलो मुलींचे ते हसणं जिव्हारी लागलेले..कानात अजून ऐकू येत होत.. सारे धैर्य एकवटून सरांचे कानाखाली मी पूर्ण शक्तीने एकच पण सात थप्पडाचा बदला घेणारी एकच जोरात मारली आणि धूम्म पळालो,.. पण माझे दुर्दैव...अंधार असतांना सर ओळखणार नाही असे मला वाटले होते पण तेवढ्यात समोरून येणाऱ्या कारच्या प्रकाशात मी उजळून निघालो मी नंदू खाचणे असल्याचे सरांनी ओळखलं. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या आयुष्यात सुताई.. धुलाई म्हणजे काय असतें ते शाळेत दोन तीन सरांकडून मला कळलं. आई बाबांना शाळेत बोलावून हेडसराकडून मला आणि माझ्या पालकांना समज देण्यात आली. मी पण माझी बाजू हेडसरांना सांगितली. त्यांनी जोशी सरांना एकांतात समजावले. नंतर सर माझ्या वाटेला गेले नाही आणि मी पण त्याच्या वाटेला गेलो नाही. मात्र त्यांच्याबद्दलची माझ्या मनातली आढी कायम होती.

कालचक्र अविरत फिरत होते.. शाळा सोडून वीस वर्षे झाली होती, जोशी सरांचे घरावरून माझे रोज जाणे येणे होते. अशाच एका दुपारी मोटार सायकलवरून जातांना एका वृद्धास बेधुंद रिक्षावाला रस्त्यात उडवून पळून जात असताना, मी जोरात पाठालाग करून त्याला अडवण्याचा प्रयत्न करीत असताना, त्याने मलाही डॅश देऊन पळ काढला आणि माझा पण अपघात झाला. पायाचे हाडाचे दोन तुकडे पडले होते. समाजसेवा अंगाशी आली होती. मी रस्त्यावर पडलो अगदी जोशी सरांचे घरापुढे. सर चाळीशीत पोहचले होते. मला बघताच तात्काळ बाहेर आले आणि मला हात देऊन अंगणात खुर्चीवर बसवले पाणी आणून दिले मी वेदनेने विव्हळत होतॊ ताबडतोब सरांनी रिक्षा करून दवाखान्यात भरती करून त्यांनी स्वतः माझ्या घरी जाऊन ही घटना सांगितली माझे ऑपरेशन झाल्यावर चार पाच वेळा भेटायला आले येताना फळ घेऊन येत होते. मी मनातल्या मनात स्वतःलाच अपराधी मानत होतो. पूर्ण बरा झाल्यावर पेढे घेऊन सरांना भेटायला गेलो, माझी वीस वर्षपूर्वीची चूक कबूल केली आणि त्यांच्या पाया पडलो.

जोशीसर म्हणाले, "नंदू, ती गोष्ट तर मी पूर्ण विसरलो होतो.. तू अजूनही अन्यायाविरुध्द त्याच जोमाने आणि आता तर दुसऱ्या साठीही लढतो हे बघून तू माझा शिष्य असल्याचा मला अभिमान आहे. "

सर माझे जरी कौतुक करत होते तर कौतुक ही मला नको वाटत होते.. ते झोंबत होते.

एक गोष्ट मात्र नक्की त्यांच्या बद्दलची अढी त्यांनी मदतीचा हात देताना..केव्हाच विरली होती.

कोणाही बद्दल पूर्वग्रहदूषित करणे चुकीचे आहे ,आयुष्यात जजमेंटल होणे टाळा, हीच मला शिकवण मिळाली होती . आज जोशी सर नाहीत. अवघ्या पंचेचाळीसव्या वर्षी हार्टफेलने गेलेत . आज तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर आज सर्वासमोर चुकीची कबुली देऊन मी सरांच्या आत्म्याला मी नमन करतो.

.. नंदू

Group content visibility: 
Public - accessible to all site users