द मिल हाऊस मर्डर्स (सुइशाकान नो सात्सुजिन): अयात्सुजी युकितो

Submitted by पायस on 20 April, 2023 - 06:45

"माझ्यापुरते सांगायचे तर डिटेक्टिव्ह कथा एकप्रकारचा बौद्धिक खेळ आहे. कादंबरीच्या स्वरुपात वाचक-डिटेक्टिव्ह, वाचक-लेखक अशा पातळ्यांवरील तर्काधिष्ठित खेळ. बस्स! त्यामुळे "शाकाई-हा" प्रवाहातल्या लेखकांच्या वास्तववादी कथा, ज्या जपानमध्ये कधीकाळी खूप लोकप्रिय होत्या, या कथाप्रकाराच्या मागण्या बिलकुल पुर्‍या करत नाहीत. कोणा ऑफिस लेडीचा स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये खून होतो आणि टाचा झिजवून पोलिस तिच्या बॉसला अटक करतात. खुनाचे कारण काय तर - अफेअरमधून झालेले ब्लॅकमेल! भ्रष्टाचार, अंतर्गत राजकारण, आधुनिक समाजव्यवस्थेचे दुष्परिणाम इ. इ. मधून घडणारे ठोकळेबाज गुन्हे - आता ही कथानके पुरे! काळ कोणताही असू देत कमाल डिटेक्टिव्ह, भव्य वाडे, संशयितांची मांदियाळी, चक्रावून टाकणारे गुन्हे हेच अवीट रहस्यांचे खरे घटक. कथानक पूर्णत: काल्पनिक असेल तर अधिकच बेहत्तर! हेतु असा की तुम्हाला या उकलप्रक्रियेतून आनंद मिळाला पाहिजे; पूर्णतया तर्कशुद्ध आनंद!"
「僕にとって推理小説は、あくまでも知的な遊びの一つなんだ。小説という形式を使った、読者対名探偵、読者対作者の刺激的な論理の遊び。それ以上でも以下でもない。 だから、一時期日本でもてはやされた"社会派"式のリアリズム云々は、もうまっぴらなわけさ。1DKのマンションでOLが殺されて、靴底を擦り減らした刑事が苦心の末、愛人だった上司を捕まえる。——やめてほしいね。汚職だの政界の内幕だの、現代社会の歪みが生んだ悲劇だの、その辺も願い下げだ。ミステリにふさわしいのは、時代遅れと云われようが何だろうが、やっぱりね、名探偵、大邸宅、怪しげな住人たち、血みどろの惨劇、不可能犯罪、破天荒な大トリック……。絵空事で大いに結構。要はその世界の中で楽しめればいいのさ。但し、あくまで知的に、ね」

- मूळ उतारा व स्वैर अनुवाद, Decagon House Murders (जुक्काकुकान नो सात्सुजिन, 十角館の殺人)

~~~~~

पूर्वपीठिका
२३ मार्च २०२३ रोजी अयात्सुजी युकितो (綾辻行人) लिखित The Mill House Murders (सुइशाकान नो सात्सुजिन, 水車館の殺人) चा इंग्रजी अनुवाद युएस वगळता जगभर प्रकाशित झाला. अनुवादाची युएस आवृत्ती २ मे २०२३ रोजी प्रकाशित होते आहे. डिटेक्टिव्ह फिक्शनच्या वाचकांना ही कादंबरी याकाता मालिकेतील दुसरी कादंबरी म्हणून माहिती असते. मायबोलीवर या धाटणीच्या कादंबर्‍याविषयी लिहिलेले मी फारसे बघितलेले नाही . त्यात अनुवादांचा, खासकरुन जपानी, फ्रेंच, इटालियन, अर्जेंटिनिअन रहस्यकथांचे अनुवाद, मोठ्या प्रमाणावर अभाव. गेल्या काही वर्षात लॉक्डरूम इंटरनॅशनल आणि पुश्किन व्हर्टिगोमुळे परिस्थिती बदलत आहे. या कथा सर्वांनाच भावतातच असे नाही. म्हणून सुरुवातीस याचा प्रिक्वेल Decagon House Murders मधील लेखकाची भूमिका स्पष्ट करणारा उतारा दिलेला आहे (Decagon House Murders सुरुवातच या उतार्‍याने होते, इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहे). तरी सुइशाकानच्या अनुवाद प्रकाशनाचे औचित्य साधून या प्रकारातील पुस्तकांची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे.

~~~~~

ओकायामाच्या डोंगराळ भागात सुइशाकान आहे. सुइशा म्हणजे वॉटर व्हील आणि कान (याचा उच्चार याकाता असाही होतो) म्हणजे पाश्चिमात्य बांधणीचा महाल/वाडा/गढी. नावाला साजेसे सुइशाकानमध्ये मोठ्ठे वॉटर व्हिल आहे, ज्याचा उपयोग वीजनिर्मितीकरता होतो. सुइशाकान फुजिनुमा इस्सेइ या प्रसिद्ध चित्रकाराने बांधून घेतला आणि त्याचा मुलगा फुजिनुमा किइची हा विद्यमान मालक आहे. तेरा वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात किइचीचा चेहरा विद्रूप झाला आणि तो हे वैगुण्य लपविण्याकरता रबर मास्कचा वापर करतो. बायको युरिए आणि वाड्यातले मोजके नोकर वगळता त्याचा फारसा कोणाशी संपर्क नाही. सुइशाकान अशा रीतिने इतर समाजापासून पूर्णपणे विलग असे स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. वर्षातून एकदाच सुइशाकानचे दरवाजे बाहेरील लोकांसाठी खुले होतात. दरवर्षी वडलांच्या स्मरणदिनी किइची मोजून चार व्यक्तींना त्याच्या वडलांची उत्तमोत्तम चित्रे बघण्याचे व मेजवानीचे आमंत्रण देतो - वर्षातून केवळ एक दिवस.

१९८५ मध्ये हा दिवस चक्रावणारा होता. रात्री मुसळधार पाऊस चालू असताना हाऊसकीपरचा टॉवरवरून खाली पडून मृत्यु होतो. घरातील भट्टीमध्ये किइचीच्या मित्राचे, मासाकी शिन्गोचे तुकडे तुकडे केलेले प्रेत सापडते. तर पाहुण्यांपैकी एक, फुरुकावा बंदिस्त खोलीतून नाहीसा होतो आणि किइचीच्या वडलांनी चितारलेले एक अतिशय मौल्यवान चित्र गायब होते. फुरुकावाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्याने ते चित्र चोरले, चोरी करताना त्याला बघणार्‍यांचे खून केले आणि तो पसार झाला असा निष्कर्ष काढला जातो. पण तो एवढ्या वादळी रात्री, बंद खोलीतून सर्वांची नजर चुकवून कसा निसटला ते कोणालाही सांगता येत नाही.

१९८६, एका वर्षानंतर पुन्हा एकदा सुइशाकानचे दरवाजे उघडतात. गेल्या वर्षी आलेले पाहुणे (फुरुकावा वगळता) पुन्हा एकदा हजेरी लावतात. यावेळी फुरुकावाच्या जागी आलेला पाहुणा आहे शिमादा कियोशी - जो फुरुकावाचा मित्र आहे. हाय-हॅलो होते आणि चहासोबत गप्पा रंगतात. शिमादा हळुवारपणे गेल्या वर्षी घडलेल्या घटनांचा विषय काढून रहस्याचा पुन्हा एकदा मागोवा घ्यायला सुरुवात करतो. पुन्हा एकदा सुइशाकानमध्ये चक्रावून टाकणार्‍या घटना घडू लागतात. या भूत-वर्तमान धाग्यांची जुळणी करून केलेली उकल म्हणजे द मिल हाऊस मर्डर्स.

रहस्यकथांच्या नियमित वाचकांना यावरून साधारण गुन्ह्याचे स्वरुप सहज सांगता येईल. पण सुइशाकानचा तो मुद्दा नाही. डिटेक्टिव्हने पूर्ण उकल करण्याआधी तुम्ही अंदाज बांधून त्याला सिद्ध करण्यास आवश्यक ते सर्व धागेदोरे गोळा करू शकता की नाही या खेळाभोवती ही कादंबरी फिरते. या कथेतील हू-डन-इटचे उत्तर अगदीच किरकोळ आहे, पण हाऊ-डन-इट आणि त्या हाऊ-डन-इटचा तर्कशुद्ध शोध घेता यावा यासाठी पेरलेले क्लू शोधणे हा या कादंबरीचा गाभा आहे. यातली लॉक्ड रूम ट्रिक तितकीशी इंप्रेसिव्ह नाही, त्यापेक्षा अधिक चांगल्या अगणित ट्रिक्स आपल्याला इतर कथांमध्ये सापडतात. कथेचे मुख्य बलस्थान त्यातली नॅरेटिव्ह ट्रिक आहे.

कथानक १९८५ आणि १९८६ अशा दोन समांतर घटनाचक्रातून उलगडत जाते. जेव्हा अखेरीस ती दोन्ही समांतर घटनाचक्रे एकरुप होतात तेव्हा कोडे सोडवताना खूप मजा येते. अयात्सुजी या विविध पातळ्यांवरील समांतर घटनाचक्र शैलीचा कायम वापर करतो आणि तिच्या सर्वप्रकारांमध्ये तो वाकबगार आहे - जसे इथे भूत-वर्तमान अशी दोन समांतर घटनाचक्रे आहेत. याच्या सीक्वेल मेइरोकान नो सात्सुजिन (लॅबिरिंथ हाऊस मर्डर्स, याचा अनुवाद अजूनतरी उपलब्ध नाही) मध्ये आपल्याला एका काल्पनिक कथेविषयी सांगितले जाते ज्यात चार लेखकांचे त्यांनीच लिहिलेल्या कथांनुसार त्यांचे खून होतात. आणि ही काल्पनिक कथा प्रत्यक्षात पण घडलेली असल्याने कोडे सोडवताना काल्पनिक वर्णन आणि प्रत्यक्षातील घटना यांची सरमिसळ होते. त्यामुळे वेगवेगळ्या नॅरेटिव्ह्चे खूप काळजीपूर्वक वाचन करावे लागते. अन्यथा वाचक अगदी सहज मिसडिरेक्ट होतो.

कथेचा टोन अतिशय ड्राय आहे. बर्‍याचदा अयात्सुजीची पात्रे कार्डबोर्ड कटआऊट्स वाटू शकतात. हॉरर चित्रपटांमध्ये जसे बर्‍याचदा पात्रांपेक्षा वातावरणनिर्मितीवर भर दिला जातो अगदी तशी लेखनशैली आहे. त्यामुळे ही शैली सर्वांना भावेलच असे नाही. पण ही शैली जाणीवपूर्वक स्वीकारलेली आहे. यात कोणतीही कॅरेक्टर स्टडी नाही आणि लेखक अगदी स्पष्टपणे सांगतो की तसे करण्याची त्याची इच्छादेखील नाही. हा स्टान्स पचेलच असे नाही. व्यक्तिश: सांगायचे तर मला ही प्रांजळ भूमिका आवडते. मिस्टरी/हॉरर/थ्रिलरच्या नावाखाली लिटररी व्यक्तिचित्रणे, इरोटिक कथानके खपवली गेली की वाचक/प्रेक्षकाची घोर निराशा होऊ शकते. त्यामानाने अयात्सुजीच्या धाटणीच्या लेखकांनी सेट केलेल्या क्लिअर अपेक्षा आणि त्या अपेक्षांची तंतोतंत पूर्ती मी प्रेफर करेन.

कथेचा अनुवाद हो-लिंग वांगने केला आहे. याच्या प्रिक्वेलचा अनुवादही त्यानेच केला होता. हो-लिंग या कथांचा कट्टर चाहता आहे आणि त्याचा ब्लॉग व डिस्कॉर्ड सर्व्हर या कथांच्या चाहत्यांमध्ये फेमस आहे. तो या प्रकारातील कथांचा उत्तम अनुवादक आहे. इन जनरल, माझे निरीक्षण आहे पुश्किन व्हर्टिगोने प्रकाशित केलेले अनुवाद बर्‍यापैकी अचूक असतात आणि कथेचा मूळ टोन शक्य तितका सांभाळला जातो. तसेच हे कथानक समजण्याकरता फारसा कल्चरल काँटेक्स्ट आवश्यक नाही. पण हे नमूद करेन की या कथेत बरेच मेटा रेफरेन्सेस आहेत. उदा. रबर मास्कने विद्रूप चेहरा झाकणारे पात्र जपानी कथांमध्ये अनेकदा आढळते. गाजलेल्या "इनुगामी-के नो इचिझोकु" (इनुगामी फॅमिली) कादंबरीतील सुकेकियो या पात्राद्वारे प्रथम हा ट्रोप वापरला गेला. त्यामुळे अनेकदा या पात्रांना त्या त्या कथेतील सुकेकियो असेही गंमतीने म्हटले जाते. हे मेटा रेफरेन्सेस माहिती असतील तर ही कादंबरी वाचताना अधिकच मजा येते. अर्थात रहस्य पुरेसे सशक्त असल्याने हे संदर्भ ठाऊक नसतील तरी हरकत नाही.

१९८७ मध्ये जुक्काकुकान नो सात्सुजिनमधून अयात्सुजी आणि त्याचा डिटेक्टिव्ह शिमादा कियोशी यांनी पदार्पण केले. या मालिकेत एकूण नऊ पुस्तके आहेत आणि दहाव्या पुस्तकात या मालिकेचा समारोप होण्याची शक्यता आहे. या मालिकेला याकाता (किंवा कान) मालिका म्हणण्याचे कारण यातील सर्व कथानके भव्य वाड्यांमध्ये (याकाता) घडतात. हे सर्व वाडे नाकामुरा सेइजी या वास्तुविशारदाने बांधलेले आहेत आणि सर्व वाड्यांमध्ये काही ना काही विशेष यंत्रणा आहे. नाकामुराचा कथानकांशी थेट संबंध नसला तरी प्रत्येक कादंबरीत आपल्याला त्याच्याविषयी थोडी थोडी माहिती मिळत राहते. नऊ पुस्तकांनंतर आता बरीच माहिती दिली गेल्याने वाचकांचा होरा आहे की अखेरच्या पुस्तकात या मोठ्या रहस्याची उकल करून मालिका समाप्त होईल. आशा आहे की जुक्काकुकान आणि सुइशाकानप्रमाणेच मालिकेतील इतर कादंबर्‍यांचे अनुवादही लवकरच प्रकाशित होतील.

~~~~~

होनकाकु-हा (本格派)
मला ठाऊक आहे त्यानुसार मराठीत विदेशी होम्स-पॉयरो आणि देशी ब्योमकेश-फेलुदा वगळता डिटेक्टिव्ह कथांचे फारसे अनुवाद उपलब्ध नाहीत. त्यामुळे अयात्सुजीची भूमिका मराठी वाचकाला अधिकच परकी वाटू शकते. यासाठी त्या भूमिकेमागचा थोडासा इतिहास इथे जोडत आहे.

दुसर्‍या विश्वयुद्धाच्या दरम्यान जपानमध्ये डिटेक्टिव्ह कथा लिहिण्यास सक्त मनाई होती. त्यामागची कारणे तूर्तास बाजूला ठेवूया. विश्वयुद्ध संपल्यानंतर १९४६ मध्ये होनजिन सात्सुजिन जिकेन (होनजिन मर्डर्स) ही कादंबरी प्रचंड गाजली. यात रहस्य आणि रहस्याची उकल यावर दिलेला भर जपानी वाचकांना भावला. त्यामुळे पुढची काही वर्षे त्या ढाच्याची बरीच पुस्तके आली. साठच्या दशकामध्ये मात्सुमोतो सेइचो या लेखक/समीक्षकाने या प्रवाहावर कडाडून टीका केली. गुन्ह्यामागची गुंतागुंतीची कारणे व मानसिकता (मूळात गुन्हा घडतोच का?), गुन्ह्याला पोषक ठरणारी सामाजिक परिस्थिती इ. वर भाष्य करणे मात्सुमोतोला अधिक महत्त्वाचे वाटले. मग दोन दशके मात्सुमोतोप्रणित प्रवाहाची चलती होती. या प्रवाहांना अनुक्रमे होनकाकु-हा (ऑर्थोडॉक्स, कोडीवजा रहस्यांवर भर) आणि शाकाई-हा (सोशल, कॅरेक्टर स्टडीच, साहित्यिक मूल्ये, सामाजिक परिस्थितीवरील भाष्ये) म्हणतात.

१९८० मध्ये सेनसेइजुत्सु सात्सुजिन जिकेन (तोक्यो झोडिअ‍ॅक मर्डर्स) या कादंबरीने चित्र हळूहळू पालटले. या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहे आणि यातली ट्रिक शंभर टक्के एकमेवाद्वितीय आहे. मी ती ट्रिक इतर कोणत्याही भाषेतील कुठल्याही रहस्यकथेत बघितलेली नाही. अखेर १९८७ मध्ये जुक्काकुकान प्रकाशित झाली आणि पुन्हा एकदा वाचक होनकाकु कथांकडे परतले. या नव्या होनकाकु लेखकांनी स्वत:ला शिन-होनकाकु (नवे ऑर्थोडॉक्स) म्हणवून घ्यायला सुरुवात केली. अर्थातच हे केवळ मतप्रवाह आहेत आणि बहुतांशी आधुनिक लेखक या दोन विचारधारांची सांगड घालतात. अगदी अयात्सुजी देखील याकाता मालिकेव्यतिरिक्त पुस्तकांमध्ये मध्यम मार्ग चोखाळतो. या मध्यममार्गाचे सर्वोकृष्ट उदाहरण माझ्यामते हिगाशिनो केइगो लिखित योगिशा एक्सु नो केनशिन (द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स, इंग्रजी अनुवाद उपलब्ध) मध्ये सापडते. (दृश्यमची मेन ट्रिक या पुस्तकातल्या ट्रिकवर बेतलेली आहे. मला मूळ ट्रिक जास्त आवडते पण दृश्यमने तिचे भारतीयीकरण उत्तम केले आहे.)

ही डेव्हलपमेंट आणि हा इतिहास मला खूप रंजक वाटतो. या धर्तीवर इंग्रजी रहस्यकथांमध्येही एलरी क्वीन, जॉन डिक्सन कार, डोरोथी सेयर्स यांच्या लेखनात एक विशिष्ट विचार आढळतो जो होनकाकुशी मिळता-जुळता आहे आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून अधिक वास्तववादी रहस्यकथांची निर्मिती झाली. तो इतिहासही खूप रंजक आहे. द रॅबिट होल गोज व्हेरी डीप! तरी त्याविषयी आणि इतर होनकाकु पुस्तकांविषयी पुन्हा कधीतरी.

ओव्हरऑल सुइशाकान अर्थात द मिल हाऊस मर्डर्स क्लासिकल रहस्यकथा आहे. जर कोडीवजा रहस्यकथा आवडत असतील तर सुइशाकानही आवडायला हरकत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मिल हाऊस मर्डर्स रहस्यकथा फारच रोचक वाटते आहे. तुम्ही लिहिलेला गाळीव ईतिहासही ईंटरेस्टिंग आहे.
रहस्यकथा आणि त्यातल्या त्यात मर्डर मिस्ट्री खूपच आवडतात.
मागे मायबोलीवरच अशा मर्डर मिस्ट्री सोडवायच्या कोडीवजा रहस्यकथा वाचल्याचे आठवते आहे.

तुम्हाला जापनीज लिहिता/वाचता येते?..फारच अ‍ॅमेझिंग.

प्रतिसादांचे आभार Happy

जपानी मिस्टरी फिक्शन खूप रंजक प्रकार आहे आणि त्यातले लेखक अजूनही खूप प्रयोग करतात. त्यामुळे अजूनही त्या पुस्तकांमध्ये नव्या संकल्पना सापडतात. वरची ओळख इंटरेस्टिंग वाटली असेल तर आणखी काही नावे जोडत आहे.

१) इनुगामी कर्स (इनुगामी-के नो इचिझोकु), योकोमिझो सेइशी - इंग्रजी अनुवाद उपलब्ध. चित्रपट स्वरुपातही उपलब्ध - https://www.youtube.com/watch?v=A6mImVm2CXc
किनदाईची कोसुके त्यांचा शेरलॉक होम्स. ही त्याची सर्वात भारी केस.
२) आऊट (आऊतो), किरिनो नात्सुओ - इंग्रजी अनुवाद उपलब्ध. ही डिटेक्टिव्हपेक्षा थ्रिलरला जास्त जवळ जाते आणि या लेखिकेची भूमिका शाकाई-हा धारेत मोडते. जर वर विशद केलेली होनकाकु-हा ची भूमिका पटत नसेल पण रहस्यकथा आवडत असतील तर ही कादंबरी तुम्हाला आवडण्याची शक्यता आहे.
३) कुबिनाशी नो गोतोकी तातारु मोनो, शिनझो मित्सुदा (अनुवाद उपलब्ध नाही.शीर्षकाचा स्वैर अनुवाद - जे कबंधांप्रमाणे शाप देतात त्यांची गोष्ट)
ही गेल्या दोन दशकातली पॉसिबली सर्वात भारी रहस्यकथा आहे. किमान मला ठाऊक असलेल्या अमेरिका/ब्रिटन/स्वीडन/डेन्मार्क/फ्रान्स/अर्जेंटिना/इटली/भारत/चीन/दक्षिण कोरिया/जपान या देशांतल्या २००० नंतरच्या रहस्यकथांमध्ये ही टॉप ३ मध्ये असेल. हिचे अपील एका वाक्यात सांगायचे तर - पूर्ण रहस्य सोडवण्याकरता डिटेक्टिव्हला ३७ छोटी रहस्ये सोडवून त्या उत्तरांची एकत्र जुळणी करायची आहे आणि पूर्ण पुस्तकातले केवळ एक वाक्य नीट वाचले तर ही सगळी रहस्ये एका फटक्यात सुटतात. थोडेसे बिरबलाच्या 'न फिरवल्याने' सारखे. हिचा अनुवाद कधी होईल, माहित नाही. पण झालाच तर मस्ट रीड!

जपानी रहस्य कथांची Introduction आवडली. त्यातले होनकाकु-हा आणि शाकाई-हा असे २ कॅटेगरी खूपच interesting वाटले. अनुवाद मिळवून वाचले पाहिजे.

काही वर्षांपूर्वी मायबोलीवर एक गोष्ट वाचली होती. त्यात एका character ला puzzle/mystery सांगतात आणि त्याने तिथल्या तिथे लाऊड थिंक करून सोडवायची असते. हाऊ डन इट सारखे. तिथे character development काही न्हवते. Purely puzzle solving. तसल्या गोष्टीला होनकाकु-हा म्हणता येते का?
मला डिटेल्स आठवत नाहीत नाहीतर लिंक दिली असती

नवीन प्रतिसादांचे आभार!

Purely puzzle solving. तसल्या गोष्टीला होनकाकु-हा म्हणता येते का? >> बरोबर. याच गोष्टींना होनकाकु-हा म्हणतात. वर नमूद केल्याप्रमाणे अगदी प्युअर होनकाकु-हा गोष्टी (तुम्ही दिलेल्या उदाहरणासारख्या) कमी असतात पण जेव्हा कोडे सोडवणे हा कथेचा मुख्य हेतु असेल आणि पात्रे/वातावरण निर्मिती हे केवळ कोड्याचे सेटअप म्हणून वापरलेले असतील तर त्या कथेला होनकाकु-हा मध्ये मोजतात.

कसला इंटरेस्टिंग परिचय आहे! वाचते आता अनुवाद मिळवून.
(आधी नुसते शीर्षक वाचून मला वाटले ख्रिस आणि अलेक्सीची नवीन कथा सुरू होतेय की काय? Proud )

https://www.maayboli.com/node/2275
(Only a genius... - slarti)
ही कथा म्हणताय का नाबुआबुनमा?

थँक्स श्र Happy
ख्रिस आणि अलेक्सीची नवीन कथा >> Happy

असामी >> वर आलेली सर्व नावे इंग्रजी मध्ये (आणि अ‍ॅमेझॉन लिंक्स)
<पुस्तकाचे नाव> <(लेखकाचे नाव)> - <अ‍ॅमेझॉन लिंक>\n<टिप्पणी, if any>

इंग्रजी अनुवाद उपलब्ध
१) The Mill House Murders (Yukito Ayatsuji) - https://www.amazon.com/Mill-House-Murders-Classic-Japanese/dp/1782278338/
सुइशाकान - वर वर्णिलेले कथानक या पुस्तकाचे आहे.
२) The Decagon House Murders (Yukito Ayatsuji) - https://www.amazon.com/Decagon-House-Murders-Yukito-Ayatsuji/dp/1782276343/
जुक्काकुकान - सुइशाकानचा प्रिक्वेल. सुरुवातीचा उतारा या पुस्तकातील आहे.
३) The Devotion of Suspect X (Keigo Higashino) - https://www.amazon.com/Devotion-Suspect-Detective-Galileo-Novel-ebook/dp/B0044781ZQ/
४) The Inugami Curse (Seishi Yokomizo) - https://www.amazon.com/Inugami-Curse-Pushkin-Vertigo-ebook/dp/B081Y2BHHY/
५) The Tokyo Zodiac Murders (Soji Shimada) - https://www.amazon.com/Tokyo-Zodiac-Murders-Pushkin-Vertigo-ebook/dp/B00RKQ6REK/
६) Out: A Thriller (Natsuo Kirino) - https://www.amazon.com/Out-Thriller-Natsuo-Kirino/dp/1400078377/

वर नमूद केलेले, इंग्रजी अनुवाद उपलब्ध नाही पण हायली रिकमेंडेड
७) Kubinashi no Gotoki Tataru Mono (Shinzo Mitsuda) - https://www.amazon.com/首無の如き祟るもの-ミステリー・リーグ-ShinzoÌ-Mitsuda/dp/4562040718/

Happy मला खरं आवडेल याचा अनुवाद करायला. वेळ होईल तसा आधी माबोवरच या पुस्तकावर एक वेगळा धागा काढतो. नाहीतर मी एकटाच इतर कोणी नावही न ऐकलेल्या पुस्तकाची जाहिरात करत बसायचो Lol