अक्षपातळी

Submitted by अवल on 17 April, 2023 - 08:44

एक जुना लेख, इथे टाकला नव्हता बहुतेक

(पातळी म्हणजे ज्या अक्षावर व्यक्ती उभी असते ती पातळी इथे अपेक्षित आहे. इंग्रजीत ज्याला एक्स ऍक्सेस म्हणतात तो! आणि अक्ष पातळी म्हणजे ज्या अक्षावर व्यक्तीचे अक्ष - डोळे असतात ती )

मागे एकदा एक सुंदर चित्रपट एका मित्राने सुचवला. कर्मधर्म संयोगाने तो टीव्हीवर बघायलाही मिळाला. "दि डेड पोएट सोसायटी" या नावाचा. त्यातली "बाकावर उभं करणं वा राहाणं" हि फ्रेज फारच भावली. अन मग अनेक गप्पांमध्ये ही फ्रेज "जा बाकावर" या स्वरूपात मी अनेकदा वापरली. खरंतर हि फ्रेज आपल्या शालेय जीवनातला एक वाईट, लाज आणणारी गोष्ट! पण या चित्रपटाने हीच गोष्ट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलीय.

घरात मी सगळ्यात लहान. लहान असण्याचे अनेक फायदेही असतात पण त्याच बरोबर अनेक तोटेही ! मला आठवतं ते मोठ्या बहिणींनी माझ्या वयानुरूप लहान उंचीचा घेतलेला फायदा. मला हवी ती वस्तू हात वर करून उंच धरून ठेवणे, मुद्दाहून माझी खेळणी उंच टेबलावर ठेवणे. या अन अशा त्यांना गंमत वाटणाऱ्या पण मला भयंकर राग येणाऱ्या गोष्टी. त्यांना आता हे आठवणाराही नाही, पण माझ्या स्मरणात त्या घटना अगदी चित्रासारख्या ठसल्या आहेत. मोठं होत असताना त्यामागचा राग, हताशा गेली. नंतर तर घरात मीच सगळ्यात उंच झाले अन मग माझ्या उंचीचा सार्थ अभिमानच वाटत गेला. घर, शाळा, कॉलेज सगळीकडे, खेळांतही.

माझा मुलगा साधारण वर्षांचा असेल; नुकताच पावलं टाकू लागलेला. तेव्हा पलंगावरच एक खेळणे तो टाचा उंच करून प्रयत्न पूर्वक घेताना दिसला. अन मला चटकन माझे लहानपण आठवले. तेव्हापासून मग त्याच्या उंचीचा, त्याच्या हाताच्या पातळीवर त्याच्या वस्तू आहेत न हे पाहण्याची सवय मला लागली. अर्थातच त्याच्यापासून ज्या गोष्टी दूर राहाव्यात वाटतं त्या वर ठेवणं हेही झालंच. सर्वसाधारणात: ही दुसरी काळजी घेतली जाते पण पहिली? त्याबद्दल नेहमी जाणीवपूर्वकता असते का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा Happy

याच काळात त्याच्यासाठी, एक आडवी न होणारा (तळाला वाळू भरलेली) बाहुला आणलेला. त्याला तो अजिबात आवडत नसे. किंबहुना तो त्याला घाबरत असे. एकदा मी आडवी झालेले असताना तो बाहुला नेमका माझ्या जवळ होता. अन तेव्हा मला जाणवलं की त्या बाहुल्याचे डोळे भितीदायक दिसताहेत. मी चटकन उठून बघितलं तर तो बाहुला छान हसरा दिसत होता.म्हणजे माझ्या डोळ्यांच्या पातळीवर तो हसरा दिसत होता. पण माझ्या लेकाच्या डोळ्यांच्या पातळीवर तो बाहुला भितीदायक दिसत होता. मी लगेचच तो बाहुला नजरे आड केला. मला कळलं कि इतके दिवस मी माझ्याच लेकाला किती भितीदायक अनुभव खेळ म्हणून देत होते.

अन मग तेव्हापासून मला लेकाला द्यायच्या सगळ्या गोष्टी त्याचा अक्षपातळीवर जाऊन तपासायची सवय लागली. अनेकदा दुकानदार हसत. सोबतच्या व्यक्तींना हे सगळे हास्यास्पद वाटे. पण मला माझ्या लेकाचा आनंद आणि त्याला काय आरामदायक वाटेल ते जास्त महत्वाचा वाटे.

लेक शाळेत जाऊ लागला, जरा मोठा झाला. माझं ऑफिस अन घर एकाच आवारात होतं. शाळेतून तो साडेचारपर्यंत येत असे. अन मी पाचला घरी. तो आधी माझ्या ऑफिसमध्ये येई, किल्ली घेई अन घरी जाई. त्याच्यासाठी डब्यात भरून ठेवलेला खाऊ घेऊन गॅलरीत बसून खात असे. ते होई पर्यंत मी घरी येत असे. त्याच्या सोबत शाळेतली वॉटरबॉटल असे. छान सेट झालेलं. एके दिवशी घरी आले तर लेक तहानलेला. पाणी दे पाणी दे. नेमकी शाळेत बाटली सांडलेली. बिचारा. पाणी प्यायलं तसं म्हणाला आई मावशीचा फोन आलेला तिला फोन कर. बहिणीला फोन केला तर ती कळवळलेली. मी विचारलं काय ग? तर म्हणाली "मगाशी फोन केला तर त्याला तहान लागलेली. मी म्हटलं मग पाणी पी. तर म्हणाला बाटलीतलं संपालं. मी म्हटलं की मग स्वयंपाक घरात जाऊन घे न. तर म्हणाला तिथे पाल आहे. मला भीती वाटतेय. मला इतकं वाईट वाटलं. आता ठीक आहे न तो?" अरेच्चा बिचारं पिल्लू. तेव्हापासून २-४ ठिकाणी पाणी भरून त्याला घेता येईल असं ठेवू लागले.

या सगळ्या गोष्टींमधून मला कळत गेलं की मुलांच्या पातळीवरून आपण बघायला हवं. अनेकदा मुलं रडत असतात, घाबरलेली असतात त्याचं कारण आपल्याला कळतच नाही. अशावेळी सरळ त्यांच्या पातळीवर जायला हवं. त्याच्या उंचीवर जायला हवं . त्यांच्या अक्षपातळीवर जाऊन पाहायला हवं. अनेकदा त्यांची अडचण आपल्याला समजलेलीच नसते, त्यांच्या पातळीवर आपण गेलो की आपसूक ती कळते अन मग ती सोडवताही येते.

अन मग अनेक वर्षांनी हा चित्रपट बघितला. अनेक पातळ्यांवर हा चित्रपट भिडत गेला. एक तर स्वतःच लहानपण, तेव्हाचे अनुभव आणि लेकाच बालपण आणि तेव्हाचे अनुभव तर आठवत गेलेच. पण त्याही पेक्षा कितीतरी जास्त हा चित्रपट शिकवून गेला. ही पातळी, ही अक्षपाताळी केवळ भौतिकच असते का? त्यासोबत जाणिवांची आणि नेणिवांचीही पातळी असते. त्यांचीही अक्ष पातळी असते. एकमेकांच्या या जाणीव नेणिवांच्या पातळ्या, अक्षपातळ्यांवर जाऊन विचार करता येतो का? त्या त्या व्यक्तीच्या जाणीव नेणिवांच्या अक्षपातळीवर जाऊन आपल्याला त्या व्यक्ती, त्यांचे विचार जास्त समजू शकतील का? इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या जाणीव नेणिवांच्या अक्षपातळ्या आपण अनुभवल्या तर आपल्या जाणीव नेणिवा जास्त प्रगल्भ होतील हे या चित्रपटाने ठळक केले. कुठेतरी ही जाणीव होती, पण त्याचे लखलखीत सत्य या चित्रपटाने उजळ केले.

अनेकदा प्रश्न सोपा असतो पण आपल्याला त्याचं उत्तर सापडत नाही; कारण त्या प्रश्नाच्या उत्तराच्या पातळीवर आपण जात नाही. एकदा का त्या त्या प्रश्नाच्या अक्षपातळीवर आपण गेले कि त्याचे उत्तर त्या अक्षपातळीवर सहज सापडते. त्या त्या अक्षपातळीवर जायला जमायला मात्र हवे. आणि म्हणूनच जमेल तेव्हा जमेल त्या बाकावर चढा. वेगवेगळ्या अक्षपातळींवरून दिसणारे विश्व न्याहाळावे , तिथले क्षितिज तपासावे हा छंद लावून घेतलाय.
---

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना
@चिन्गी, >>त्या त्या प्रश्नाच्या अक्षपातळीवर आपण गेले कि त्याचे उत्तर त्या अक्षपातळीवर सहज सापडते. त्या त्या अक्षपातळीवर जायला जमायला मात्र हवे.<< हा मूळ उद्देश्य लेखाचा Happy मुलांचा किस्सा मुद्दा स्पष्ट व्हावा म्हणून फक्त; एक स्टेपिंग स्टोन फक्त.

उंची बाबत अगदी खरे आहे. लेख पण छानच लिहिला आहेस.
सध्या आमच्या भु भु च्या उंचिवरुन त्याला काय दिसत असेल हा विचार करते मी नेहमीच. सुरवातीला पक्ष्यांकडे बघायचे त्याला कळायचे नाही. किंवा खारु ताई झाडावर चढल्या कि भु भु गोंधळायचा. मग त्याच्या उंचि इतके होऊन बसुन / वाकुन त्याला काय दिसते याचा अंदाज घेणे सुरु झाले.
आता हुषार झालेत भु भु भाऊ, मान वर कर करुन पक्षी / झाडे / विमानं सगळे बघतात.

छान लिहिलंय..
मुलगा असो, भू भू, अन्य आर्थिक परिस्थितीमधले.. किंवा आणखीही कोणी..
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.. हे खरंच..

अतिशय सूक्ष्म निरीक्षण! आणि मुलांच्या बाबतीत सहृदय असणे म्हणजे नेमकं काय हे उत्तम मांडलंत !
यानिमित्ताने मागे एका मॅनेजमेंट ट्रेनिंग मध्ये आम्हाला आमच्या ट्रेनर ने एक अशीच गोष्ट सांगितली होती ती आठवली. एकदा तो त्याच्या अगदी छोट्या मुलाला घेऊन दिवाळीच्या दिवशी शॉपिंग स्ट्रीटवरनं फिरायला बाहेर गेला होता. आजूबाजूला रंगीबेरंगी कपडे घातलेले लोक, दिव्यांचा झगमगाट, असे सगळीकडे आनंदी वातावरण होते. पण मुलगा मात्र सारखा किरकिर करत होता, रडत होता. त्यामुळे तो जरा वैतागलाच होता! मग त्याला नेमकं काय होते आहे ते बघण्यासाठी तो त्याच्या पातळीवर येऊन वाकून उभा राहिला आणि आणि त्याच्याशी बोलताना.. तो काय म्हणतोय ते ऐकताना त्याची नजर आजूबाजूला गेली , आणि त्याच्या एकदम लक्षात आले कि त्या मुलाच्या डोळ्याच्या पातळीवर फक्त सगळ्यांचे पाय आणि पायताणे दिसत आहेत आणि ते अतिशय बोरिंग आहे. मग आपली चूक लक्षात आल्यावर त्याने मुलाला उचलून खांद्यावर घेतले आणि मिनिटात भरत तो मुलगा एकदम आनंदी झाला..

खूप छान माहितीपूर्ण!

कदम लक्षात आले कि त्या मुलाच्या डोळ्याच्या पातळीवर फक्त सगळ्यांचे पाय आणि पायताणे दिसत आहेत आणि ते अतिशय बोरिंग आहे. >>

जत्रेत लहान मुलांना त्यामुळेच वडील लहान मुलांना दोन्हीकडे पाय टाकून खांद्यावर घेत!

मस्त लिहिलं आहे

आपण बरेचदा मुलांना किंवा कोणालाही गृहीत धरतो
त्यांच्या अक्षावर वेगळे प्रॉब्लेम आणि वेगळे आनंद असू शकतात हे लक्षातच आलं नाही कधी

रिमझिम यांचा भुभु चा किस्सा पण मस्त

छान लेख
आपला बहुतांश वेळ मीच कसा बरोबर हे दुस-याला पटत नसलं तरी पटवण्यात जातो.
अक्षपातळी म्हणजे सम्यक दृष्टी. असे मला वाटते

छान लेख. मुलांच्या बाबतीत बोलायचं तर रेल्वे तून जाताना.. गर्दीत उभं आहोत.. आणि मुलांना कडेवर घेतलं नसेल (तितकी लहान नसतील तर) तर तो प्रवास मुलांच्या दृष्टीने कसा होत असेल असं नेहमी मनात येतं.

खुप सुंदर लेख आहे. भरून आले वाचताना.

>>>ही पातळी, ही अक्षपाताळी केवळ भौतिकच असते का? त्यासोबत जाणिवांची आणि नेणिवांचीही पातळी असते. त्यांचीही अक्ष पातळी असते. एकमेकांच्या या जाणीव नेणिवांच्या पातळ्या, अक्षपातळ्यांवर जाऊन विचार करता येतो का? त्या त्या व्यक्तीच्या जाणीव नेणिवांच्या अक्षपातळीवर जाऊन आपल्याला त्या व्यक्ती, त्यांचे विचार जास्त समजू शकतील का?<<<
अगदी पटले. सर्व मुलांना एकाच मापात बसवून मग त्य मापात न बसलेल्या मुलांना अ‍ॅबनॉर्मल असे लेबल लावणे हे मुलांची मानसिक अक्ष पातळी ओळखली गेली नसल्याचे लक्षण आहे. त्यावरून पालकांच्या पालकत्वावर शंका घेणे, हे पालकांची अक्ष पातळी न ओळखण्याचे लक्षण आहे. अशा घटना नेहमी आजुबाजुला घडताना दिसतात आपल्याला. अगदी शाळांमध्ये सुद्धा.

यावरून आठवले ते तोत्तोचान मधले मुख्याध्यापक कोबायाशी ........ प्रत्येक मुलाच्या अक्षपातळिवर उतरून त्याला / तिला विकसित होण्यास मदत करणारे.

छान आहे लेख. अक्षपातळी शब्द ही आवडला.
हे पातळी ज्ञान झाल्यावर आपली अक्कल त्यांच्यावर कधी लादायची आणि कधी लादायची नाही हे ही तारतम्य आलं पाहिजे. फिजिकल पातळी वगळली तर इतर अनेक पातळ्या ही असतात. वाचन, खेळ, आवडनिवड इ पातळ्या आपण प्रसंगी (प्रत्येक लिहायचं राहिलं Wink ) वादावादी करुन सेट करत आणि बदलत रहायला लागतं. गाजर ते छडी अदला बदल करत नॅव्हिगेट करावं लागतं.

अमि थांकु
सामो Biggrin
अमित, हो म्हणूनच पुढे नेणीवांची पातळीही लिहिलीय Wink

भारी आहे!
असा कधी विचार केला नव्हता!