सांजसखी

Submitted by अनिरुद्ध अग्निहोत्री on 14 April, 2023 - 18:56

शांत पसरली सांज सुखाची मंद दिवे लावूनी
चंद्रकलेचे रूप पाहण्या रुळली तारांगणी

रमली खुलली कळी उमलली अबोल गंधाळुनी
अवचित किरणे पर्ण चुंबने घेता कवटाळुनी

कूजनमाला स्वररत्नांच्या बनी घुमू लागल्या
सांन्द्र धुक्याने बिलगून घेता हरितलता झाकल्या

कणकण मुरले अमृत झरले दवबिंदूंच्या हाती
ओल सुखाने बहरून आल्या नवतेजाच्या ज्योती

चित्र गोजिरे जणू स्वप्नवत सरले उमलून रजनी
सांजसखी तू अशी सोयरी रोज फुलावी नयनी

- अनिरुद्ध

Group content visibility: 
Public - accessible to all site users