कवतिक बिवतिक

Submitted by निमिष_सोनार on 11 April, 2023 - 08:09

कोणत्याही घरातील आणि ऑफिसमधील बिघडलेल्या नातेसंबंधांचे, राजकारणाचे आणि असंतोषाचे पहिले कारण म्हणजे:

फक्त घडलेल्या चुकांबद्दल पुन्हा पुन्हा टीका करणे आणि नकारात्मक बोलणे जेणेकरून समोरच्या व्यक्तीच्या आत्मविश्वासानचे खच्चीकरण होईल.

टीका करताना हे तर सांगितलेच पाहिजे की काय चुकले (कोण चुकले हे नाही) पण त्या बरोबरच टीका करणाऱ्याला चुकलेली गोष्ट कशी सुधारावी हे पण माहिती पाहिजे आणि त्याने ते सांगितले पाहिजे तरच टीकेला काही अर्थ उरतो.

दुसरे कारण म्हणजे:

चांगल्या केलेल्या कामाचे कधीही कौतुक न करणे.

एक वेळ पैशांचा कंजुषपणा किंवा काटकसर समजू शकतो कारण पैशांची बचत करायलाच हवी. पण चांगल्या शब्दांची बचत करून वाईट शब्दांची उधळण कशाला करायची? नाहीतर, मनात हरिनाम आणि मुखातून शिव्या!

आज पूर्वीपेक्षा कधी नव्हे एवढे धकाधकीचे जीवन झाले आहे. लोक आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा विद्यार्थी आपल्या शैक्षणिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अविरत धावत आहेत. त्यात टीका आणि कौतुक याचा समतोल पाहिजे.

हा समतोल नसला तर सुसंवाद आणि कालांतराने संवाद पण हरवतो आणि वाद, विसंवाद आणि विवाद यांची एन्ट्री होते.

टीका ही विधायक असावी, विध्वंसक नसावी. कौतुक म्हणजे खुशामद नसावी तर प्रेरणादायी असावे. टीका किंवा कौतुक हे कुठल्यातरी हेतूंनी प्रेरित नसावे. ते निर्मळ आणि निखालस असावे. टीका शक्यतो कमी माणसांत किंवा एकांतात आणि कौतुक सर्वांसमोर केले पाहिजे.

तसेच व्यक्तीच्या समोर त्याचे कौतुक करू नये हे चूक आहे. कौतुक असो व टीका, त्या व्यक्ती समोरच केली पाहिजे.

एका व्यक्तीजवळ दुसऱ्याचे कौतुक किंवा टीका करून काय फायदा? तो मूळ व्यक्तीला सगळे खरेच सांगेल कशावरून? तो त्यात साखर टाकेल की मीठ मसाला हे आपल्याला काय नाहीत?

मात्र, काही व्यक्ती त्यांच्यावर कुणी टीका करो अथवा कौतुक त्यामुळे त्यांना फरक पडत नाही. त्यांना स्वतःला माहिती असते की आपण करतोय ते चांगले की वाईट. टीका होवो की कौतुक, ते तटस्थ राहतात आणि स्वतः च्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम करून घेत नाहीत म्हणजे ते कणखर असतात. निगरगट्ट नाही!

बरेचदा, एखाद्यावर टीका किंवा कौतुक याचा काहीच परिणाम होत नसेल तर तो कणखर किंवा निगरगट्ट असेलच असेही नाही. तर त्याचे आणखी एक कारण असू शकते की, त्या व्यक्तीच्या मनात टीका किंवा कौतुक करणाऱ्या व्यक्तीबद्दल किंमत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users