सप्तपदि

Submitted by अवल on 9 April, 2023 - 18:21

(सात सात शब्दांचा समूह, म्हणून सप्तपदि.
एका मैत्रिणीचा सायकलीवरून वारी करण्याचा संकल्प आहे. तर त्यावरून पहिली सप्तपदि सुचली. मग पुढचंही काही सुचत गेलं. चुभूद्याघ्या.)

चालवुनि चाका, गरगरा पायी
भेटीलागी जिवा, चक्रधारी!

चालविशी किती, अनाथांच्या नाथा
आस लागली, पंढरीनाथा!

डोईवरी हात, ठेवी आजोबा
त्यांच्यातच पाही, विठोबा!

अभंग गाई, तुक्याची सावली
टेकतो माथा, विठुमाऊली!

संपत्ती सत्ता, संपेना हाव
सुटो पाश, गुरूराव!

सोडोनिया सारा, सग्यांचा संग
आलो पायाशी, पांडुरंग!

धावाधाव किती, पडतो पाया
भेट आता, पंढरीराया!

ओव्या, अभंग आणि विराणी
तुची आता, विठाई!

भवसागर संपला, भास मनाचा
तोही सोडव, श्रीहरी!

विचार, वंचना, वादळ मिटलं
मज सावरी, विठ्ठल!

उखडेल अता, वरलिया रंग
भरुनिया राही, पांडुरंग!
---

Group content visibility: 
Public - accessible to all site users