एकदाच काय ते बोलून टाकू

Submitted by मित्रहो on 7 April, 2023 - 09:59

होळीच्या पूर्वसंध्येवर एक हलकीफुलकी कविता लिहिली होती. खास पुणेकर प्रेमींसाठी, यात बरेचसे पुण्याचे संदर्भ आहेत. मी पुण्यात पूर्वी राहिलो असल्याने माझे संदर्भ आधीचे आहेत.

खूप झाले एफसीचे कट्टे आणि वैशालीचे दोसे
ते कॉफीत झुरन आणि मनात बोलणं
गुडलक मधे बसून स्वतःलाच बॅड लक म्हणणं
सारा राग मग पार्किंग नाही म्हणून काढणं
सार आता संपवून टाकू
तू हिंजवाडीला येते की मी कोथरुडला येऊ ते सांग
एकदाच काय ते मनातल सारं बोलून टाकू

खूप झाल्या इंस्टाच्या पोस्टी आणि एफबीच्या स्टोऱ्या
ते डेटाच संपणं आणि वायफायच गंडणं
ते बोलण्यात गाणं आणि गाण्यात बोलणं
नेहमीचाच गोंधळ अन नेहमीच्याच कहाण्या
साऱ्याचा शेवट आता करुन टाकू
तू कात्रजच्या घाटात भेटते की मी सिंहगड चढून येऊ ते सांग
एकदाच काय ते मनातल सार बोलून टाकू

काय होणार आहे बोलून टाकल एकदाच सारं तर
ना खडकवासल्याच धरण फुटनार ना मुळशीच
मग कशाला राव उगा तोंड लपवत भ्यायचं
आन मनातल्या मनात म्हात्रे पुलावर कुढत बसायचं
ना लैला मजनू, ना बाजीरावमस्तानी
आपली कहानी आपणच लिहून टाकू
मस्तानी पित बोलायच कि काटाकिर खात बोलायच ते सांग
एकदाच काय ते मनातलं सारं बोलून टाकू

@मित्रहो (https://mitraho.wordpress.com)

Group content visibility: 
Use group defaults