टेक्सस मध्ये स्थलांतर

Submitted by आस्वाद on 6 April, 2023 - 14:07

पँडेमिक सगळ्यांच्याच आयुष्यात उलथापालथ करून गेला. रिमोट काम करणं नॉर्म झाला. अजूनही ऑफिसमध्ये पूर्णवेळ ५ हि दिवस माझ्या तरी ओळखीत कोणीच जात नाहीये. बहुतेक कंपन्यानी हायब्रीड मॉडेलचा स्वीकार केलाय. अर्थात हे फक्त डेस्कवर्क करणाऱ्यांसाठी. पण या सगळ्याचा समाजमनावर खूप खोलवर परिणाम झालाय. मुळात आपण सगळी धावपळ कशासाठी करतोय, हा प्रश्न बहुतेक लोकांनी गेल्या ३ वर्षांत एकदा तरी स्वतःलाच विचारला असणार आहे. ज्यांना शाळकरी मुलं नाहीत त्यांनी तर या संधीचा फायदा घेत मोठ्या शहरातून गाव गाठले. एकदा का तुम्ही out of state मूव्ह झाला की कंपन्यांनी नेहमीसाठीच रिमोट वर्क करायला परवानगी द्यावीच लागली. याचा फायदा टेक्सस, फ्लोरिडा सारख्या राज्यांना तर झालाच पण Arkansas सारख्या अगदी 'चार्मिंग' नसलेल्या राज्यांमध्येही घरांच्या किमती डबल झाल्या.
नमनाला घडाभर तेल ओतून झालंय तर आता मुद्द्यावर येते Happy
बरेच दिवसांपासून विचार चालू आहे की New Jersey मध्ये राहून आपल्याला काय मिळतंय ज्यासाठी आपण २-३% प्रॉपर्टी टॅक्स, इनकम टॅक्स, स्टेट टॅक्स भरतोय. आम्ही दोघेही रिमोट वर्क करतो आणि बहुतेक कंपनी कायमचं रिमोट देऊ शकते. आतापर्यंत मुलांच्या शाळेसाठी, नोकरीसाठी इथे राहतोय. पण टेक्सस मध्येही चांगल्या शाळा आहेत. दोन-तीन मित्र जे न्यूयॉर्क/न्यूजर्सीहून मूव्ह झाले ते टेक्ससचे गुणगान गात आहेत. घराच्या किमती जवळजवळ ५०% कमी आहेत. टॅक्स नाही. त्यामुळे भरपूर फरक पडतोय, असं त्यांचं मत पडतंय. पण हे खूपच मोठं decision असणार आहे आमच्यासाठी कारण आम्ही इथे नुकतंच २ वर्षांपूर्वी घर घेतलय. पण आता नवऱ्याला हे घर घेतल्याचा पश्चताप होतोय. inflation, वाढलेल्या किमती आणि आमचे न वाढलेले पगार याने यात अजूनच भर पडतेय.
मूव्ह होणं कठीण आहे. फक्त सांगोवांगीच्या बोलण्यावर विश्वास कितपत ठेवायचा, हा प्रश्न आहे. प्रॉपर्टी prices इथे बसून चेक करता येईल पण जे नुआन्सस असतात त्यांची मोजमाप कशी करणार. racism, गन laws, गर्मी हे नेहमीचे टेक्सस विरुद्धचे पॉईंट्स आहेत. पण हे किती सिरीयस आहेत हे समजत नाहीये.

तुमची मतं ऐकायला आवडेल. टेक्सस शिवाय दुसरा ऑपशन सुचवला तरी चालेल. शाळा मेन प्रायोरिटी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेक्सास बरोबर नॉर्थ कॅरोलीना (रिचर्च ट्रँगल एरिया), अटलांटा जवळ अल्फारेटा, कमिंग ई. भाग - हे पण चेक करा. गेली ३-४ वर्षे खूप संख्येने लोक या भागांत मूव्ह करत आहेत, त्यात अनेक भारतीय सुद्धा आहेत. स्पेसिफिक टेक्सास बद्दल फारशी माहिती नाही पण डलास, ऑस्टिन ला खूप भारतीय लोक आहेत अनेक वर्षे राहात असलेले.

कोस्टल एरियातून या कोणत्याही भागात जायचे म्हणजे एक पूण वेगळी अमेरिका दिसते. निर्णय घ्यायच्या आधी एकदा २-३ दिवसाचा वीकेण्ड तिकडे जाउन प्रत्यक्षात बघा एरिया आवडतो का. अर्थात अनेक एरिया तुम्ही राहू लागल्यानंतर काही काळाने जास्त आवडू लागतात. पण निदान आपण इथे येउ शकतो का इतका अंदाज येतो.

>>एकदा का तुम्ही out of state मूव्ह झाला की कंपन्यांनी नेहमीसाठीच रिमोट वर्क करायला परवानगी द्यावीच लागली. >> हे सगळ्यांसाठी झाले नाही. ज्यांच्यासाठी झाले त्यांच्यासाठी कायम राहील असेही नाही. बर्‍याच जणांना घरुन काम मात्र १०० मैलाच्या व्यासात , त्याच राज्यात वास्तव्य (नो आउट ऑफ स्टेट) असेही आहे.

तुमचा स्किल सेट, कामाचे स्वरुप आणि तशा प्रकारच्या कामाला असलेली संधी/ मागणी , सध्याची इकॉनॉमी, पुढेल करीअर ग्रोथ हे सगळे विचारात घेवून कुठे रहाणे योग्य असेल याचा निर्णय घ्यावा लागेल. त्याशिवाय त्या राज्यातील कायदे आणि तुमच्या कोअर व्हॅल्यूज कितपत जुळत आहेत - व्हॉट इफ सिनॅरिओ. टेक्सास म्हणजे गन्स, रेसिझम असा एकदम सरधोपट विचार करु नका. तुम्ही ज्या भागाचा विचार करताय तिथे काय परीस्थिती आहे असा विचार करा. आमच्या ओळखीतील दोन कुटुंबं टेक्सासला मुव झाली. त्यांच्या करीयर प्लॅन मधे या फेजला जे अपेक्षित होते ते मिळाले, पुढील करीअर ग्रोथसाठी योग्य अशा संधी आहेत, त्यांच्या कोअर व्हॅल्युजशी सुसंगत असे बाकीचे सर्व आहे त्यामुळे राहाणीमानाचा खर्च सध्या वाढूनही ते तिथे आनंदात आहेत.

शाळा मेन प्रायोरिटी आहे. >> मुलं किती मोठी आहेत? शाळेला प्राधान्य असा मोघम विचार न करता तुम्हाला चांगली शाळा म्हणून काय अपेक्षित आहे याचा विचार करा. मुलांना चांगली शाळा म्हणून काय अपेक्षित आहे हे त्यांच्याशी बोलून विचारात घ्या. शेवटी अमेरीका हा खंडप्राय देश आहे. प्रत्येक राज्यात तुम्हाला अतिशय चांगल्या ते बर्‍या या रेंज मधल्या शाळा आढळतील. त्यातून पुन्हा 'अ' च्या मुलासाठी चांगली वाटलेली शाळा 'ब' च्या मुलासाठी कदाचित तितकीशी चांगली ठरणारही नाही. त्यामुळे याबाबतचा निर्णय घेताना तुमच्या मुलांच्या गरजा विचारात घ्या आणि फक्त शाळा (कुमॉन, खाजगी ट्युटर, खाजगी कोच वगैरे नाही) या गरजा किती पूर्ण करणार आहे हे बघा. मुलाला काही समस्या उद्भवल्यास शाळा काय मदत करेल, काय रिसोर्सेस उपलब्ध असतील हे देखील विचारात घ्या.

टेक्सास खूपच मोठे ठरते - डॅलस, ऑस्टीन, सॅन अँटिनियो , ह्ञुस्टन कसला विचार करताय हे आधी ठरवावे लागेल.

स्टेट टॅक्स नाही हे खरे असले तरी प्रॉपर्टी टॅक्स , चांगल्या स्कूल डिस्ट्रिक्ट मधल्या सद्यस्थितीमधल्या मधल्या घरांच्या किमती नि त्याच लेव्हलचे राहणीमान धरता सेम लाईफ स्टाईल ठेवण्यासाठी तेव्हढाच खर्च होतो. देसी पॉप्युलर एरियामधे पँडेमिक च्या मूव्ह झालेल्यांच्या घरांच्या जवळजवळ दुप्पटीने घरांंच्या किमती झालेल्या आहेत ( अगदी वाढ्त्या रेट नंतरही ) नि अजून फारशी करेक्शन झालेली नाहीये. योग्य जागेवर राहिलात तर शाळा त्याच प्रतिच्या आहेत हा भाग खरा.

हीट झेपत नसेल २-३ महिने मरणाची गरमी असते हा मुद्दा लक्षात असू द्या. तुम्ही देसी पॉप्युलर एरियामधे असाल तर racism , गन laws इत्यादी नी फारसा फरक पडत नाही. कदाचित उलटच होत असेल Happy

फा म्हणतो तसे काही दिवस स्वतः राहून मगच निर्णय घ्या.

धन्यवाद फारएंड, स्वाती २, असामी.

आम्ही डॅलस जवळ बघतोय. बघतोय म्हणजे मित्र मंडळी तिथे मूव्ह झाली आहे. सो त्यांच्या नेबरहूड मध्ये घराच्या किमती वगैरे compare केल्या तर प्रचंड मोठी तफावत आहे. आम्ही न्यूजर्सीच्या पण pricey टाउन मध्ये राहतो. त्यामुळे असेल की आम्हाला त्या किमती पाहून स्टिकर शॉक बसतो. आणि त्या अनुषंगाने बाकी गोष्टी (e.g स्विम क्लास) पण स्वस्त वाटतायत.

@स्वाती: मुलगी एलेमेंटरी मध्ये आहे. तिला तर फक्त टीचर गोड गोड बोलणारी असली की मॅडम खुश Happy
स्वाती, मला भीती ही वाटतेय की तिथे डिव्हर्सिटी कितीशी असेल. फक्त स्थानिक व्हाईट आणि देसी मुलं शाळेत असतील तर त्याने फरक पडेल, हा विचार येतोय. आम्ही ग्रेटस्कूल रेटिंग पाहिलेत. रेटिंग्स तर चांगले आहेत. maybe I am overthinking.

@असामी: हो, इथे मरणाची थंडी आणि तिथे मरणाची गरमी! त्यापेक्षा @फारएंड म्हणतायेत तसं कॅरोलिनास weather-wise बेस्ट आहे. पण तिथे कोणी ओळखीचं नाहीये, सो अगदीच कोणी नसताना तिथे जाणं शक्य नाही वाटत आहे.

इतके लोक sunbelt स्टेट्समध्ये मूव्ह होत आहेत तेव्हा तिथलं culture काही वर्षांत बदलणारच, हे पण खरंय. काही काही लोक तर टेक्ससला नेक्स्ट कॅलिफोर्निया म्हणून मोकळे झालेत.

मी प्रश्न इथे यासाठी विचारलाय कारण आमच्या मित्र मंडळींचे मुलं एलेमेंटरी मधेच आहेत. कोणीच 'अनुभवी पालक' नाहीयेत.

टेक्सस चे माहित नाही पण एवढे म्हणेन की मुले एलेमेन्टरी स्कूल मधे आहेत आणि गोग्गोड टीचर एवढाच क्रायटेरिआ आहे तोवर घ्या निर्णय! Happy नंतर त्यांचा पण से असतो प्रत्येक बाबतीत आणि ती मित्रमंडळी, आपली स्कूल इ. सोडून यायला तयार होत नाहीत. टीन्सना असे उठून कुठे नविन ठिकाणी जाऊन नविन सोशल सर्कल मधे सेटल होणे हे चॅलेन्ज वाटू शकते. माझी मुलगी आता कॉलेज ला जाणार आहे तरी तिला आम्ही दुसरीकडे मूव होणे मान्य नाही, म्हणे तुम्ही इथेच रहा म्हणजे दर सुट्ट्यांमधे घरी येईन तेव्हा स्कूल फ्रेन्ड्स ना भेटायला बरे!

आम्ही डॅलस जवळ बघतोय. बघतोय म्हणजे मित्र मंडळी तिथे मूव्ह झाली आहे. सो त्यांच्या नेबरहूड मध्ये घराच्या किमती वगैरे compare केल्या तर प्रचंड मोठी तफावत आहे. >> तुम्ही फ्रिस्को प्रॉस्पर वगैरे बघत असाल तर प्र्चंड डीमांड मुळे किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत हे खरे आहे. हे सगळे मुबलक देसी असलेले भाग आहेत. इनफ इतर पॉप्युलेशन आहे पण देसी इन्फ्लो बघता ते तसे किती वर्षे राहिल ते सांगणे कठीण आहे. नेक्स्ट कॅलिफोर्निया चे माहित नाही पण नेक्स्ट हैद्राबाद नक्की होईल Happy

वाढलेल्या किमती आणि आमचे न वाढलेले पगार याने यात अजूनच भर पडतेय. >> पूर्णवेळ 'वर्क फ्रॉम होम' असतांना पगारवाढ आणि पदोन्नतीची फारशी अपेक्षा न ठेवणे/करणे हे सहसा ओपन सीक्रेट असते. तुमची कंपनी तुमच्या होम स्टेट मधल्या कॉस्ट ऑफ लिविंग नुसार पगार कमी सुद्धा करू शकते. हा पॉसिबल पे कट, घर विकण्यासाठी एजंटचे कमिशन, मुविंग एक्स्पेन्सेस हे सगळे मुद्दे तुम्ही विचारात घेत असालच.

नेक्स्ट कॅलिफोर्निया चे माहित नाही पण नेक्स्ट हैद्राबाद नक्की होईल >> हो अगदी.. पँडेमिकनंतर आलेल्या हाउसिंग बुम मध्ये टेक्सासमध्ये घर घेतलेल्या फॅमिलीजचे हाऊस वॉर्मिंग सेरेमनीचे हजारो विडिओज आले आहेत यू-ट्यूब वर.

हा धागा इंटरेस्टिंग आहे, माहिती मिळत्ये . अमेरिकेच्या इतर भागांविषयी जाणून घेण्यासाठी!
इकडून बे अरियातून बरीच लोकं बाहेर जातायत.
काही काही लोक तर टेक्ससला नेक्स्ट कॅलिफोर्निया म्हणून मोकळे झालेत.>>>
ओळखीचे काही लोक टेक्सासला गेले, पण त्यांना तिथे फारसे रुचले नाही असे ते सांगतात. किंवा "nothing like बे एरिया " असे कंमेंट्स मिळाले.
आम्ही सुद्धा दोन एक वर्षांपूर्वी हा विचार करत होतो, , टेक्सास ला मोठी आणि स्वस्त घरं आहेत, तेव्हा थोडा फार research केलेला.
टेक्सासला घरं मोठी असल्याने, हीट आणि कोल्ड दोन्ही जास्त असल्याने, इलेक्ट्रिसिटी बिल जास्त येतं. प्रॉपर्टी बिल जास्त असतं हे पण ऐकलेलं.
बऱ्याचशा दिवसां मध्ये खूप मोठं यार्ड असूनही अति ऊन किंवा थंडी मुले ते वापरता येत नाही, काही भागात खूप दमट आणि उष्ण असते .
आणि बाकी सांस्कृतिक भेद तर आहेतच.

पण टेक्सास ला राहणाऱ्या लोकांच मत जाणून घ्यायला आवडेल

कारण इकडे CA , बे एरियात महागाई, टॅक्सेस विकोपाला चाललंय. एक पर्याय मिळाला तर बरं होईल.

मुल एलिमेन्टरी मधे आहेत तेव्हा हवे ते मुव्हिन्ग करुन हव्या त्या करियर जन्प घेता येतात, दुसर म्हणजे घर रेन्ट करुन मुव्हिन्ग करता येइल म्हणजे अगदिच नाहि जमल तर परत जाताना अडचण होणार नाही.
पॅनडेमिक मधे कॅलिफोर्निया मधुन जत्थेच्या जत्थे लोक टेक्सास मधे मुव्ह झालेत.

तसे बघायला गेले तर अलास्का सगळ्यात स्वस्त आहे. स्टेट ईनकम आणी सेल्स टॅक्स नाही. अ‍ॅकरेज सारख्या बर्याच शहरात सिटी टॅक्स पण नाही. प्रोपर्टी टॅक्स पण कमी. तसेच रेसिडट ला स्टेट गव्हरमेंट दर वर्षी काही हजार डॉलर देते. Happy

माझे पण काही मित्र टेक्सास मध्ये स्थलांतर झाले आहेत. घरभाडे जास्त आहेत ही तक्रार सगळे करतात पण डलास मध्ये चांगल्या भागात घरे /शाळा मिळत नाहीत ही प्रमुख तक्रार आहे . माझ्या एका मित्राला सरकारी शाळेत जागा न मिळाल्याने चार्टड स्कुल मध्ये जावे लागणार आहे ते पण ४ महिने घरी बसल्यावर. चार्टड स्कुल हा प्रकार काय आहे ते मला माहित नाही . टेक्सास निवासी यात थोडी भर घालु शकतात.

दुसरे टेक्सास मध्ये दोन महिने तापमान तिन अंकी असते. भयंकर गरमी असते. टेक्सास स्प्रेड असल्याने दुसर्या शहरात जॉब मिळाला तर ट्रेव्हल करणे अवघड असते. न्यु जर्सी छोटे असल्याने आणि न्यु योर्क सिटी च्या जवळ असल्याने जर नोकरी बदलायची असल्यास सोपे जाईल. ह्याचा पण विचार करावा.

माझे वयंक्तिक मत : तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही स्थलांतर करा. मुल नविन जागेत पण रुळतात. माझी मुले ३ खंड, ४ देश, ५ वेगळ्यावेगळ्या सिस्टम मध्ये शिकली आहेत. सोशल मिडियामुळे ते सगळ्याशी संपर्कात आहेत. अमेरिकन स्कुल सिस्टम खुप सोपी आणि अ‍ॅडॅप्टिव आहे त्यामुळे त्याना नाही अवघड जाणार.

डलास मधे शाळा चांगल्या नाहीतच. तुम्ही जर जवळ फ्रिस्को, प्लेनो, मकिनी, अ‍ॅलन अशा ठिकाणी बघितले तर शाळा चांगल्या आहेत. सगळीकडे देसी अगदी भरपूर आहेत.

"Arkansas सारख्या अगदी 'चार्मिंग' नसलेल्या राज्यांमध्येही घरांच्या किमती डबल झाल्या." - Lol हे वाक्य आवडलं. अजून एक वेल-केप्ट सिक्रेट सांगतो. अर्कान्सा चे दोन भाग आहेत. एक नुसतं अर्कान्सा आणि एक 'नॉर्थवेस्ट अर्कान्सा'. सहसा नॉर्थ्वेस्ट अर्कान्सात रहाणारे आपण नॉर्थवेस्ट अर्कान्सात रहातो असंच सांगतात (जसं टेनेसी वाले, नुसते टेनेसी वाले असतात किंवा इस्ट टेनेसीवाले असतात). Happy

>>आम्ही दोघेही रिमोट वर्क करतो आणि बहुतेक कंपनी कायमचं रिमोट देऊ शकते.<<
हि परिस्थिती कायमस्वरुपी राहणार आहे का, याची खात्री करा. अमेरिकेत जॉब सिक्युरिटि हा प्रकार नसतो. शिवाय आता वारे विरुद्ध दिशेने वाहायला सुरुवात झाली आहे. जे एंप्लॉइ ऑफिसमधे येण्याकरता टाळाटाळ करत आहेत त्यांच्यावर डिसिप्लनरी अ‍ॅक्शन घेतली जात आहे. पँडेमिकच्या आधीहि तुमचा जॉब रिमोट असेल तर गोष्ट वेगळी. असे बरेच आहेत जे प्योर कंसल्टिंग करणारे, रोड वॉरियर आहेत. जे पुर्विहि रिमोटच होते. तुम्हि त्या प्रकारात मोडत नसाल तर सध्याच्या ट्राय-स्टेट मधुन मुव होण्याचा विचार देखील करु नका. जॉब अपॉर्च्युनिटीच्या दृष्टिकोनातुन ती खूप मोठि रिस्क आहे..

टेक्सस, अ‍ॅरिझोना इवन मांटॅनाचा बबल फुटण्याच्या मार्गावर आहे...

स्वगत: न्यूजर्सीत काही अशी फार थंडी नसते. नॉर्थ इस्ट सोडून कॅलिफोर्निया सोडलं तर मी तरी कुठे जाणार नाही.

दोलायमान वाटतं असेल तर वरती लिहिलंय तस वेगवेगळ्या वेळी जिकडे जाणार असं वाटतं तिकडे आठवडा राहून बघा. आणि डोक्यात विचार आलाय ना, मग जा. नाही जमलं तर परत या. दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणं हे वाटतं तितकं कठीण आणि स्टिकी नाही. पोरं लहान आहेत तर असे डिसिजन घ्या, नाही जमलं तर परतीचे दोर कोणी कापलेले नाहीत. आर्थिक बाबी तुम्ही बघालच. भविष्यात ... अरे आपण तिकडे जायला हवं होतं... अशी खंत वाटणार असेल तर जा. अनुभवा.

एक प्रश्न मनात येतो
आयुष्यातील ध्येय, स्वप्न अमेरिकेत पूर्ण झाली आहेत.
पैसा ,इज्जत अमेरिका नी दिला आहे.
दहा वीस वर्ष तिथेच आहात.
भारतात ना तुम्ही परत येणार आहात ना तुमची पुढची पिढी.
कोणत्या शहरात राहायचे ते तेथील स्थानिक लोकांना विचारा.
मराठी वेब page वर हा प्रश्न विचारण्याचा हेतू काय?
इथे मराठी लोक भारतात राहणारी आहेत.
आणि तुम्ही आता अमेरिकन आहात.
भारत शी असा पण काही संबंध नाही

हि परिस्थिती कायमस्वरुपी राहणार आहे का, याची खात्री करा. >> +१

जे एंप्लॉइ ऑफिसमधे येण्याकरता टाळाटाळ करत आहेत त्यांच्यावर डिसिप्लनरी अ‍ॅक्शन घेतली जात आहे. >>> काही इतर ठिकाणी अगदी इतके नसले तरी तुमच्या ग्रोथ मधे फरक पडू शकतो. ज्यांना मॅनेजरियल पाथ मधून पुढे जायचे आहे त्यांच्याकडून बहुतांश वेळा ऑफिसमधेच असण्याची अपेक्षा केली जाईल. हे सगळीकडे होईल असे नाही पण अनेक ठिकाणी ऑलरेडी होत आहे.

हवामानाच्या दृष्टीने जॉर्जिया (अटलांटाची काही उपनगरे), नॉर्थ कॅरोलीना चा रिसर्च ट्रँगल हे मॉडरेट आहेत - म्हणजे कॅलिफोर्नियापेक्षा जास्त थंड पण इस्ट कोस्ट पेक्षा खूपच कमी. घरातून बाहेर सुद्धा पडता येत नाही असे दिवस फार कमी असतात, ते ही विंटर मधे. कोस्टल भागांपेक्षा गर्दी कमी आहे (आता वाढत चालली आहे). रिसर्च ट्रँगल पासून पश्चिमेला तीन तासांवर (स्मोकी) माउण्टन्स, तर पूर्वेला तीन तासांवर व्हर्जिनिया बीच ते मर्टल बीच इतकी मोठी कोस्टलाइन व विविध "बीचेस" हे आहे. जाने-फेब मधे एक दोनदा बर्फ पडतो व २-३ दिवस सगळे ठप्प होते. वीज व नेटवर्कचा प्रॉब्लेम नसेल तर पब्लिक उलट एन्जॉय करते. एरव्ही किमान विंटर जॅकेट घालून बाहेर पडू शकता - आणि न्यू जर्सीवाल्यांना तर काहीच वाटणार नाही. उन्हाळ्यात अगदी घराबाहेर पडता येणार नाही इतके गरम सहसा नसते. लास वेगास किंवा आपल्याकडे दिल्लीत हवेत धग पाहिली आहे तसे नॉर्थ कॅरोलीना मधे नाही. इथे आउटडोअर खेळणे वगैरे चालू असते, अगदी सिव्हीयर वेदर वाले एखाद दुसरे दिवस सोडले तर.

या जनरल एरिया मधे - नॉर्थ कॅरोलीना मधे चांगली पब्लिक कॉलेजेस/युनि. आहेत (एनसी स्टेट, व यु एनसी), प्रायव्हेट मधे तर ड्यूक युनि. आहेच. जॉर्जिया टेक व युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया/व्हर्जिनिया टेक या सुद्धा आहेत. त्या त्या राज्यात एक वर्षापेक्षा जास्त काळ (कॉलेज मधे जाण्या आधी) जर राहात असाल तर पब्लिक कॉलेज मधे रेसिडेण्ट म्हणून फी सुद्धा कमी असते

खरतर न्यु जर्सी पेक्षा आणी पुर्ण युएस मधे उत्तम वेदर, देसी कम्युनिटी, ब्ल्यु स्टेट,चान्गल्या शाळा हे सगळे टिकमार्क पुर्ण करणार एकच राज्य आहे ते म्हणजे कॅलीफोर्निया पण भ य क र महागाई आहे, कदाचित न्यु जर्सीपेक्षाही जास्तच असेल.

थंडी वाटतं असेल तर खालील जप १०८ वेळा रोज करा. महिन्याभरात गुण येईल.
वी डोन्ट हॅव अर्थक्वेक्स, वी डोन्ट हॅव हरिकेन, वी डोन्ट हॅव अ ॲलिगेटर्स!

धन्यवाद सगळ्यांना. आम्ही आतापर्यंत खूप घरं बदलली. दर २-३ वर्षांनी बदलतोच. अगदी स्वतः घर विकत घेऊन ही! त्यामुळे हे घर घेतल्यावर वाटलं की हे फॉरेव्हर होम आहे. पण आता खूप जवळचे मित्र मूव्ह होत आहेत आणि जाताजाता डोक्यात किडा टाकून जातायेत.
मला newjersey मध्ये १२ वर्ष झालीत, नवऱ्याला १६-१७ वर्षं झालीत. त्यामुळे हे सगळं सोडून तिकडे जाणं worth आहे का, याचा विचार करतोय. माझ्यासाठी गर्मी खूप मोठा drawback आहे
पुढचा विचार करता (financially) मूव्ह होणं बरोबर वाटतं. इथे १८-२० हजार प्रॉपर्टी टॅक्स आहे आज जो दर वर्षी वाढतोच आहे. बाकी टॅक्सेस पण चालू राजतीलच. मग रिटायरमेंट नंतर आपण हे कसं अफफोर्ड करू, याचं उत्तर नाही आहे. जन्मभर ज्या घरासाठी मॉर्टगेज भरलं, memories बनवल्या ते रिटायरमेंट नंतर सोडून छोट्या घरात जायचं, हे काही पचनी पडत नाहीये. शिवाय आजच सगळं सोडून दुसरीकडे जावं वाटत नाही तेव्हा रिटायरमेंट नंतर कसं वाटेल? नवरा म्हणतो आपण इथे राहिलो तर retire होऊच नाही शकणार.
हे सगळं असलं तरी असं वाटतंय की बाकी लोकं पण तर राहतातच आहेत. maybe we are missing something...
बाकी जॉब्सचा लोड नाही घेत मी कारण मला तसं पण जॉब change करायचंय.

>>मराठी वेब page वर हा प्रश्न विचारण्याचा हेतू काय?
इथे मराठी लोक भारतात राहणारी आहेत.

कदाचित तुम्हाला कल्पना नसेल कि मायबोलीवर असणारा मराठी लोकांचा एक मोठा वर्ग अमेरिकेत राहतो. तसेच मायबोली हे संकेत स्थळ असल्यामुळे अमेरिकेतून देखील वापरता येते.

>>कोणत्या शहरात राहायचे ते तेथील स्थानिक लोकांना विचारा.
हा मुद्दा बरोबर आहे आणि तेच आस्वाद यांना अपेक्षित आहे. फक्त इतर races च्या लोकांकडून माहिती घेण्यापेक्षा ते मराठी लोकांकडून घेत आहेत. कारण भारतीयांना भारतीयांकडून (ते ही मराठी) त्या भागातील भारतीयांच्या राहणीमानाची मिळालेली माहीती ही इतर races कडून मिळालेल्या माहिती पेक्षा जास्त उपयुक्त असेल नाही का?

आणि ते किंवा त्यांची भावी पिढी भारतात येणार नसतील म्हणून त्यांनी भारतातल्या संकेत स्थळावर प्रश्न विचारू नयेत असा कमीत कमी मायबोली या संकेत स्थळावर तरी नियम नाहीय.

माझे $०.०२. मी टेक्सास मध्ये राहिलो नाहिय पण ६ वर्षे California मध्ये राहिलो आहे. ह्युस्ट्न येथे एका मित्राकडे फिरायला जाणे झाले होते ४-५ दिवस. तेव्हा मला भारतासारखा वेदर आवडला होता. तो मित्र आता गेली २२ वर्षे तिकडे राहतो आहे आणि आनंदी आहे पण तो इतर कुठे राहिला नाहीय. स्टेट बदलल्यामुळे येणार्‍या बदलांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी असावी. तुम्ही NJ मध्ये अप स्केल एरियात राहता, त्यास तोडीस तोड कोणते भाग आहेत आणि तिथे खरच किती cost saving होईल याचा विचार करा. कारण cost saving चा विचार करून एखाद्या लो स्केल भागात स्थलांतर करणे पुढे जाऊन त्रासदायकच ठरेल.

>> मराठी वेब page वर हा प्रश्न विचारण्याचा हेतू काय?
इथे मराठी लोक भारतात राहणारी आहेत.
कदाचित तुम्हाला कल्पना नसेल कि मायबोलीवर असणारा मराठी लोकांचा एक मोठा वर्ग अमेरिकेत राहतो. तसेच मायबोली हे संकेत स्थळ असल्यामुळे अमेरिकेतून देखील वापरता येते.>> त्यांना कल्पना नसावी की मायबोली ही वेबसाईट अमेरिकेत राहणार्‍या अजय गल्लेवाले ह्यांनी सुरु केली आहे.

<< मराठी वेब page वर हा प्रश्न विचारण्याचा हेतू काय? >>

-------- या विषयावर मायबोलीकर हेमंत यांचे मार्गदर्शनरुपी सल्ला मिळविणे हा मुख्य हेतू असावा. Happy
भारत/ अमेरिका / इतर असे काही राहिलेले नाही. कुणीही, कुणालाही, कसलाही सल्ला / मदत मागू शकतो, विचारु शकतो आणि परती मधे सल्ला देऊ शकतो.

>>नवीन Submitted by सायो on 9 April, 2023 - 22:48>> +१

अमेरीकेत रहाणार्‍या मराठी लोकांसाठी मायबोली हे हक्काचे माहेर! इथे प्रश्न विचारला की साधक-बाधक चर्चा होवून योग्य माहिती मिळते.

तुम्ही नॉर्थइस्टमध्ये राहता का? मग अमेरिकेचा एक नकाशा घ्या आणि त्याच्यावर डार्ट फेका. तो जिथे कुठे जाऊन लागेल तिथे मूव्ह व्हा. यू विल बी बेटर ऑफ. हेमावैम Proud

खरतर न्यु जर्सी पेक्षा आणी पुर्ण युएस मधे उत्तम वेदर, देसी कम्युनिटी, ब्ल्यु स्टेट,चान्गल्या शाळा हे सगळे टिकमार्क पुर्ण करणार एकच राज्य आहे ते म्हणजे कॅलीफोर्निया पण भ य क र महागाई आहे, >>> प्राजक्ता आता गेल्या २-३ वर्षांतील हवामान पाहता ते "उत्तम वेदर" क्रेडेन्शियल्स आता तितके राहिले नाहीत Happy

चांगल्या शाळांबद्दल - मला वाटत नाही की कॅलिफोर्नियात सर्वसाधारणपणे इतर राज्यांपेक्षा चांगल्या शाळा आहेत. उलट कॅलिफोर्नियामधे त्या एक दोन झिपकोड्स मधे सेण्ट्रलाइज्ड आहेत (बे एरिया मधे कुपर्टिनो स्कूल डिस्ट्रिक्ट व इतर एक दोन). त्यामानाने इतर राज्यांत खूप विखुरलेल्या भागात चांगल्या शाळा आहेत. त्यामुळे राहण्याजोगा भागही बराच मोठा आहे.

देसी कम्युनिटी सुद्धा इतरत्र भरपूर झाली आहे. पूर्वी बे एरिया मधे सनीवेल्/फ्रीमॉण्ट होते व न्यू जर्सी मधे तशीच १-२ नेबरहूड असतील (एडिसन, इस्ट ब्रन्सविक?) तशी अनेक राज्यांत आज तयार झाली आहेत. देसी इकोसिस्टीम पूर्ण तेथे आहे.

मुळात देसी कम्युनिटी हा प्रकार ओव्हररेटेड आहे Happy नव्याने इथे आलेल्यांना गरज लागते. पण नंतर इतपतच असावे की गावात देसी स्टोअर्स, रेस्टॉ असावीत. महाराष्ट्र मंडळ असावे. हिंदी पिक्चर्स अधूनमधून बघता यावेत. कधी ममं ने मराठी आणावेत. गणपती व इतर प्रोग्रॅम्स असावेत. पण नेबरहूड जरा डायव्हर्सच असावे Happy थोडे देसी पाहिजेतच, पण थोडेच पाहिजेत Wink

फा+१. शेवटच्या पॅराला +२ Wink
देसी एरिआ ड्रायव्हेबल अंतरावर असावा. पण देसी नेबरहुड नको. ते डायव्हर्सच असावे. Happy

Pages