हद्दपार जोसेफ ब्रॅाडस्की - २

Submitted by shabdamitra on 27 March, 2023 - 21:29

“ माझी मानवप्राण्यात तरी गणना कुणी केली? मी माणूस आहे ही मान्यता कुणी दिली?” ब्रॅाडस्कीने हे प्रश्नातून दिलेले उत्तर ऐकून सरकारी वकील व न्यायाधीश गप्प झाले. “ हे तू कुठे शिकलास? “ न्यायाधिशानी विचारले. “ हे म्हणजे ?” ब्रॅ्डस्कीने प्रतिप्रश्न केला. त्यावर न्यायाधीश बोलू लागले,” हे म्हणजे ह्या कविता- बिविता करणे… तू तर शाळाही धड पूर्ण नाही केलीस ! तिथे…”

“ शाळाकॅालेजात शिकवित नाहीत. आणि मला वाटते तुम्ही जे ‘हे’ म्हणालात ते कोणी कुणाला शिकवणेही शक्य नाही.मला .. मला तुमचे ‘हे’ देवानी दिले असावे.” इतके सांगून ब्रॅीडस्की थांबला. त्याला, जणू ठरवलेच होते त्याप्रमाणे सायबेरियाच्या एका भागात सक्तमजुरीची पाच वर्षाची शिक्षा दिली.

त्या आधीही त्याला वेळोवेळी पोलिस चौकीत चौकशीला जावे लागत होते. बरेच वेळा कोठडीची हवाही खावी लागे. पण ही सक्तमजुरी म्हणजे अत्यंत कठोर शिक्षा होती. .

नामवंत रशियन आणि इतर युरोपियन देशांतील कवि, विचारवंतांनी ब्रॅाडस्कीला दिलेल्या शिक्षेविरुद्ध जेव्हा आवाज उठवला तेव्हा त्याची शिक्षा कमी करून सुटका केली. पण त्याला १९७२ साली हद्दपार केले.

हद्दपार होऊन कोणत्याही देशाचा नागरिक नसलेला,अधांतरी हद्दपार झालेल्या ब्रॅाडस्कीला प्रख्यात कवि W. H. Auden ने खूप मदत केली. ब्रॅाडस्की अमेरिकेत आला. त्यावेळी त्याने ‘साल १९७२’ नावाची कविता लिहिली. कुणालाही आपले गाव, राज्य, देश सोडताना,तेही शिक्षा म्हणून, जे दुःख होते; आठवणींची गर्दी होते तसे ब्रॅाडस्कीलाही झालेच असणार.

आपली प्रेयसी, सहचरी मरिना बास्मानोव्हा हिला आणि तिच्यापासून झालेल्या आपल्या अवघ्या पाच वर्षाच्या लहान मुलाला लेनिनग्राद मध्येच सोडून यायचे त्या ताटातुटीचे दुःख वेगळेच. लहान मुलाचे भवितव्य तरी सुरक्षिततेचे असावे म्हणून त्याचे आडनावही बदलावे लागले. आईचेच आडनाव त्याला लावले. ब्रॅाडस्कीच्या अनेक प्रेम कविता जणू तिच्यासाठीच , तिलाच उद्देशून लिहिल्या आहेत. त्याची बायको मरिना उत्तम चित्रकार होती. पोर्ट्रेट करण्यात प्रविण होती.

ब्रॅडस्की अमेरिकेत आला. पण त्याची उदास किंवा ‘आता काय राहिले जगण्यासाठी’ अशी भावना प्रबळ होऊ लागली असावी. म्हणून तो नंतर येणारे म्हातारपण डोळ्यासमोर आणून म्हणतो,” मरण जवळ येतेय्, त्याची पूर्व तयारीही सुरु होईल. लवकरच केस गळतील, दात पडतील, डोळ्यांच्या खाचा होतील!” - पण हाडाचा कवि असल्यामुळे ह्याच मालिकेत तो—“ क्रियापदे,उपपदे, प्रत्ययही गळून पडू लागतील ! “असे सुस्कारा टाकून म्हणतो. त्याचे खरे दुःख हे असावे.

पण ह्या नैराश्यातून तो लगेच बाहेरही आला. पुन्हा लिहू लागला. कविता रशियन भाषेतून करू लागला. इतर लिखाण इंग्रजीत लिहू लागला. भाषेची उपजत आवड असल्यामुळे त्याने इंग्रजीही चांगले आत्मसात केले.

१९७३ मध्ये ब्रॅाडस्कीच्या कवितांचा Selected Poems प्रसिद्ध झाला. कवितांचे भाषांतर जॅार्ज एल. क्लाईन ह्यांनी केले होते. आणि प्रख्यात कवि डब्ल्यु एच ॲाडेन यांनी मार्मिक प्रस्तावना लिहिली होती. त्यानंतर १९८० साली त्याचा आणखी एक काव्यसंग्रह Part of Speech प्रकाशित झाला. हा संग्रह त्याची विशेष ओळख म्हणून गणला जातो. ब्रॅाडस्की ह्या कविता-संग्रहामुळे खूप नावाजला जाऊ लागला. त्यामुळे त्याला इंग्रजी बोलल्या जाणाऱ्या इंग्लंड अमेरिका आणि युरोपसह अनेक देशात प्रसिद्धी मिळाली. तो प्रख्यात झाला. ब्रॅाडस्कीने त्याच्या कवितांतून, कवितेची भाषाच बदलली असे समीक्षक, जाणते रसिक म्हणू लागले.

त्याचे History of Twentieth Century हे १९८६ साली प्रसिद्ध झाले. त्यात फारशा न झोंबणाऱ्या पण डिवचणाऱ्या, बारिक चिमटे काढणाऱ्या कविता आहेत. त्याच बरोबरीने उपहासात्मक, विडंबन कवितांचाही समावेश आहे.,

ब्रॅाडस्की हा साहित्याचा भोक्ता होता. उत्तम वाचक होता. मोलमजुरी, मदतनीस, हरकाम्या अशी विविध तऱ्हेची कामे करत असतांनाही तो कविता करीत असे. त्याच बरोबरीने त्याचे वाचनही चालूच असे.

ब्रॅाडस्कीवर १३-१४ व्या शतकातील इटालियन कवि आणि तत्वज्ञ डान्टे , इंग्लिश कवि जॅान डन आणि त्यांच्या काळापासून डब्ल्यु एच ॲाडेन पर्यंतच्या आधुनिक कवींचा प्रभाव होता. अमेरिकन कवि रॅाबर्ट फ्रॅास्टचा तो मोठा चाहता होता. वेस्ट इंडिज बेटातील कवि डेरेक वॅालकॅाट त्याचा मित्र होता. त्याच्या मित्रांमध्ये कवि, वक्ता, लेखक, नाटककार Seamus Heaney सुद्धा होता. ब्रॅाडस्कीच्या स्वभावाच्या सर्व कंगोऱ्यांना सांभाळून घेणारा त्याचा चाहता, शेमिस हिनी स्वतः उत्तम कवि व लेखक होता. श्रेष्ठ रशियन साहित्यिक, कवि,नाटककार, आणि कादंबरीकार पुश्किन आणि दुसरा नामवंत रशियन साहित्यिक व नोबेल विजेता (1958) बोरेस पॅस्टरनॅक ह्यांच्या परंपरेतील ब्रॅाडस्की मानला जातो.

काळ माणसाला कसा घडवत असतो हेच वाड•मय सांगत असते. ब्रॅाडस्कीचे वाड•मयही ह्याला अपवाद नाही. पण प्रतिभावंत,बुद्धिमान आणि विचारी कवि,लेखक ज्या शैलीने आणि ज्या शब्दांतून सांगतो त्या मुळेच तो थोर म्हटला जातो. ब्रॅाडस्की त्यापैकी एक आहे.

ब्रॅाडस्की हा प्रथम कवि आहे. तो कवितेचा अभिमानी आहे. आणि त्याने उत्कट प्रेमही केले होते. कविता आणि प्रेम ह्या विषयी तो जास्त बोलणार सांगणार हे ओघाने आलेच. मागच्या लेखात, त्याने एके ठिकाणी “प्रेमाला पर्याय कविता होय.” म्हटल्याचा उल्लेख केला. तर त्याचे ‘दैवत’ असलेला कवि,मॅन्डलस्टॅम , (सत्ताधाऱ्यांच्या विरोधी मताच्या किंवा ज्यांच्या पासून सत्ताधीशांना धोका आहे ह्या नुसत्या संशयानेही त्यांना छळवणुकीच्या ,सक्त मजुरीच्या छावण्यांत (‘गुलाग’) शिक्षा म्हणून पाठवले जात असे) त्या ‘गुलाग’ मध्ये शिक्षा भोगत असताना थंडी आणि उपासमारीने मेला. त्या बंडखोर, शहीद कवि मॅन्डलस्टॅम ची विधवा Nadezhda Mandelstam हिने तिचा नवरा मॅन्डलस्टॅम मेल्यानंतर बऱ्याच वर्षांनी लिहिलेल्या, अप्रतिम आत्मचरित्राविषयी ब्रॅाडस्कीने एक लेख लिहिला. त्या लेखात तो म्हणतो , “जर प्रेमाला पर्याय असेलच तर स्मृति, आठवणी हाच असेल.” कवितेला तो भाषेचे अंतिम परिपक्व फळ.” म्हणतो. “भाषेची अभिव्यक्ति कविताच होय !” असे म्हणताना पुढे तो लिहितो की “कविता ही जीवनाचीच अभिव्यक्ति आहे !”

“जे न देखे रवि ते देखे कवि” ह्या वचनाने आपणही कवितेचे श्रेष्ठत्व आणि वेगळेपण मान्य करतो. केशवसुत ,” आम्ही कोण म्हणुनि काय पुससी?” असे विचारत कवीचा आणि पर्यायाने कवितेचे मोठेपण सांगतात. त्यांची थोरवी ही त्यांच्या कवितेमुळेच आहे. कविता नसेल तर आकाशातील तारांगणेही निष्प्रभ वाटू लागतील असे ते म्हणतात.क्रौचवध झालेला पाहताच कवि वाल्मिकींच्या मुखातून “ मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वतौ समा: ….” हा काव्याचा श्लोकच बाहेर पडला. सांगायचे इतकेच ब्रॅाडस्की कवितेला इतके मानतो ते योग्यच वाटते. कवितेचे सर्वांना माहित असलेले वैशिष्ठ्य म्हणजे ती थोडक्या शब्दांत मोठा आशय सांगून जाते.

ब्रॅाडस्की हा श्रेष्ठ समीक्षकही होता. तसेच प्रतिभावान लेखकही होता. त्याने व त्याच्या दोन कविमित्रांनी (वर उल्लेख केलेले डेरेक वॅालकॅाट , Seamus Heaney) मिळून अमेरिकन कवि रॅाबर्ट फ्रॅास्टला आदरांजली वाहिली त्या पुस्तकात( Homage to Robert Frost) रॅाबर्ट फ्रॅास्टची व्यक्ति आणि कवि व त्याची कविता ह्या विषयी तिघांनीही लिहिले आहे. तिघांचेही लेख वाचनीय आहेतच. त्यांमधून ब्रॅाडस्कीचे वाचन, अभ्यास, चिंतन ह्याचे दर्शन होते. ज्या ब्रॅाडस्कीवर प्रभाव पडला त्या रॅाबर्ट फ्रॅास्टविषयी त्याने सखोल चिंतनात्मक व वाचनीय लेख लिहिला आहे.

हे तिघेही नामवंत लेखक आणि तिघेही वाड•मयाचे नोबेल पारितोषिक विजेते ! साहित्यातील तीन दिग्गजांनी वाचकांना रॅाबर्ट फ्रॅास्टची पुन्हा नव्याने ओळख करून दिली ! फ्रॅास्टला हा मान मिळाला तसा फार थोड्यांना असा ‘त्रिवेणी’ सन्मान मिळतो!

ब्रॅाडस्कीचा अमेरिकेतील रशियन समाजाशी निकटचा संबंध होता. रशियातून येणाऱ्या लोकांना तो बरीच मदत करीत असे. त्याला अमेरिका आणि युरोपियन साहित्य क्षेत्रांत सर्व सन्मान मिळाले. त्याचे सभा वश करणारे वक्तृत्व, परिणामकारक कविता वाचन, आणि त्याचा वाड•मयाचा , त्यातही अभिजात वाड•मयाचा सखोल अभ्यास ह्यामुळे तो प्रख्यात झाला.

अनेक समीक्षकांनी ब्रॅाडस्कीने कवितेला नवीन भाषा दिली असे म्हटले आहे. कवितेचे रुप रंग बदलले. आपल्याकडेही असे कवि झाले आहेत. केशवसुतांनी जसे मराठी कवितेचे स्वरूप आमुलाग्र बदलले तसेच त्यांच्या नंतरच्या काळात, ज्यांचा ‘ दुसरे केशवसुत.’ असा यथार्थ गौरव होतो ते बा. सी. मर्ढेकर, त्याही नंतरच्या काळातील कवि ग्रेस, कवि आरती प्रभु (चिं.त्र्यं . खानोलकर), ‘ माझे विद्यापीठ’ लिहिणारे कविवर्य नारायण सुर्वे , आपल्या मातीत रुजलेल्या कविता लिहिणारे लोककवि अण्णाभाऊ साठे, आपल्या कवितेतून मग ती प्रेमगीत असो की ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली…’ हे सांगत आपल्या गझल आणि कवितेच्या मशाली पेटवून मराठी कवितेला वेगळाच रंग देणारे कविवर्य सुरेश भट; अशी काही नावे सांगता येतील.

ब्रॅाडस्कीच्या जातिवंत दर्जेदार कवितांचीच नव्हे तर साहित्य समीक्षेची, लेख, निबंधासहित -( उदाः- Less Than One ; —हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. ) — त्याच्या संपूर्ण वाड•मयाची नोबेल पारितोषिक समितीने दखल घेतली; आणि १९८७ सालचे वाड•मयाचे नोबेल पारितोषिक देऊन ब्रॅाडस्कीचा सन्मान केला. त्यामुळे ब्रॅाडस्की जगविख्यात झाला. कवितेला निराळी भाषा, निराळा रंग आणि रूप देणारा कवि ब्रॅाडस्की, केवळ शब्दांचा कसबी, कुशल कारागीर नव्हता तर भाषाप्रभु होता. त्यावेळी,साहित्याचे नोबेल पारितोषक मिळालेल्यांमध्ये ब्रॅाडस्की हा वयाने सर्वात लहान होता. वयाच्या ४७ वर्षी त्याला नोबेल पारितोषिक मिळाले.

ब्रॅाडस्की हा संभाषणपटू होता. चर्चा असो वाद असो,नेहमीच्या काव्यशास्त्रविनोदांची गप्पाष्टके असोत, तो आला की बैठकीत रंग भरत असे. चैतन्य सळसळत असे. असे त्याचा कविमित्र लेखक व नोबेल विजेता मित्र शिमस हेनी याने म्हटले आहे.

त्याच्या ठिकाणी पूर्व आणि पश्चिम ( पुर्व युरोप व पश्चिम युरोप व अमेरिका ) संस्कृतीचा, विचारांचा, परिस्थितीचा सुरेख संगम झाला होता . श्रेष्ठ रशियन कवि Osip Mandelstam आणिAnna Akhmatova हे दोघे त्याची प्रेरणास्थाने होती. डान्टे, जॅान डन, ॲाडेन, रॅाबर्ट फ्रॅास्ट ह्या इंग्लंड अमेरिकेतील कवींचा त्याच्यावर प्रभाव होता.

कवि ॲाडेन हा ब्रॅाडस्कीपेक्षा निःसंशय श्रेष्ठ होता. तो खरा नोबेल पारितोषकाचा मानकरी होता. त्याला नोबेल पारितोषिक मिळायला हवे होते. पण मिळाले नाही. ब्रॅाड्स्कीला ह्या गोष्टीची खंत वाटत असे. आणि नोबेल पारितोषिक स्वीकारताना केलेल्या भाषणात त्याने ती बोलून दाखवली. आपल्यापेक्षा नोबेल पारितोषकावर माझ्यापेक्षा इतर अनेक साहित्यिकांचा कवींचा हक्क आहे हे सांगतांना त्याने प्रामुख्याने डब्ल्यु एच. ॲाडेनचा गौरवाने उल्लेख केला.

पण कोणीही शंभर टक्के पूर्ण नसतो. सर्वांमध्ये चांगल्या वाईटाचे थोडेफार मिश्रण असते. ब्रॅाडस्कीही अपवाद नव्हता . तो अहंवृत्तीचा होता असे म्हटले जाते. ‘मीच बरोबर’, ‘ माझेच खरे’ अशा अहं पद्धतीने बोलायचा . मग त्या मित्रमंडळीच्या बरोबर चाललेल्या गप्पा, चर्चा असोत. त्याच्या मित्रमंडळात कवि, लेखक प्राध्यापक अशी विद्वान मंडळी असत. तो म्हणे इंग्लिश कवींपेक्षा मला त्यांच्या कवितेतील यमक वृत्त छंदोरचना यांचे जास्त ज्ञान आहे. पण इतरांना हे माहित होते की हे फक्त त्याला वाटते ! तो त्याचा स्वकेंद्रित स्वभावाचा दोष होता.

इतके असूनही शिमस हेनी ब्रॅाडस्कीच्या गुण दोषांसह त्याचा चाहता आणि मित्र राहिला. वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी ब्रॅाडस्कीचे निधन झाले. हेनीने त्याच्यावर न्युयॅार्क टाईम्समध्ये लेख लिहिला. दोन ठिकाणी भाषणेही दिली. त्या लेखात ब्रॅाडस्कीचे गुण गाताना तो लिहितो, “कालपरवा आपल्यात असणाऱ्या ब्रॅाडस्कीविषयी बोलता-लिहिताना भूतकाळाळाची क्रियापदे वापरावी लागतात ह्यापरते दुःख नाही. पण तो (हेनी) “होता, ‘म्हणत असे,’ ‘तो हसायचा,’ ‘कवितेची ओळ अशा तऱ्हेने म्हणायचा की लोक काही वेळ स्तब्ध होत) -तो पुढे म्हणतो, असे भूतकाळ वापरून लिहिणे म्हणजे आपण व्याकरणाचा उपमर्द करतो असे वाटते.”

कविता,काव्यावर प्रेम करणारा, कविता वाचताना श्रोत्यांना आपल्यासमोर प्रत्यक्ष कविताच उभी आहे, असे वाटावयास लावणारा , स्टालिनच्या काळात, कवि आणि त्याच्या कविता हा समाजाला मोठा धोका आहे. तो लोकांचा शत्रु आहे ह्या विचारसरणीमुळे वारंवार पोलिसी चौकशीला सामोरे जावे लागून , तुरुंगवास भोगावा लागलेला, बर्फाळ प्रदेशात छळ-छावणीत सक्त मजुरीची शिक्षा भोगणारा, आणि आपली प्रेयसी, मुलगा, आणि थकत आलेल्या आई वडिलांपासून तोडला गेलेला, तिशीतील तरूण प्रतिभावान कवि जोसेफ ब्रॅाडस्कीला अखेर हद्दपार होऊन अमेरिकेत जावे लागले! तिथे त्याच्या प्रतिभेचे, बुद्धिमत्तेचे,आणि विचारांचे स्वागत झाले. मोठे मान सन्मानही प्राप्त झाले. आणि ह्या सर्वांवर मानाचा शिरपेच असलेले साहित्याचे नोबेल पारितोषिकही त्याला मिळाले.

जगाच्या उघड्या विद्यापीठात आयुष्याचा अर्थ समजून घेतलेल्या ब्रॅाडस्कीचे १९९६ साली निधन झाले.

ब्रॅाडस्कीचे दैवत,हिरो असलेला,जुलमी राजवटीविरुद्ध आपल्या कवितेतून आवाज उठवणारा कवि मॅन्डलस्टॅम खोचकपणे पण विषादाने म्हणतो,” रशियामध्ये कवितेचा जेव्हढा सन्मान होतो तितका इतरत्र कुठेही होत नाही….. म्हणूनच त्यासाठी अनेकांचे प्राणही घेतले जातात !” रशियातून हद्दपार झालेला, जगाच्या उघड्या विद्यापीठात आयुष्याचा अर्थ समजून घेतलेल्या जोसेफ ब्रॅाडस्कीचे १९९६ साली अमेरिकेत निधन झाले.

सतराव्या शतकाचील फ्रेंच तत्वज्ञानी डेकार्टचे “ I think therefore I am “ हे वचन प्रख्यात आहे . त्याच्या पावलावर पाउल ठेवत विसाव्या शतकात साहित्यप्रेमी ब्रॅाडस्कीने माणसाचे मुल्यांकन करताना डेकार्टच्या वचनाला जणू आणखी विचारसमृद्ध केले आहे. ते वाचण्यासारखे आहे. तो म्हणतो “Man is what he reads !”

फॅहरनहाईट ४५१ कादंबरीतील, जिथे कुठे पुस्तके असतील ती शोधून जाळून टाकण्याच्या ‘अग्निवर्धक’ दलातील एक ‘आगलावा’ त्याला आपण हे काय करतोय ह्याची जाणीव झाल्यावर पश्चात्तापाने म्हणतो , “एकेक पुस्तक जाळताना मी एकेका माणसालाच जाळत होतो ! “ त्याही पुढे जाऊन ब्रॅाडस्की म्हणतो, “ पुस्तके जाळणे हा गुन्हा आहेच पण त्यापेक्षाही पुस्तके न वाचणे हा मोठा गुन्हा आहे.”

जॅार्ज ब्रॅाडस्की असो किंवा त्याच्या आधी होऊन गेलेले तसेच त्याच्या काळातील अनेक थोर साहित्यिकांचे ग्रंथ हेच त्यांचे अमरत्व आहे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users