पारंबी

Submitted by ज्येष्ठागौरी on 22 March, 2023 - 03:18

पारंबी...

And into my field i go to lose my mind and find my soul..काहीतरी वेगळं वाचताना अचानक हे वाक्य डोळ्याखालून गेलं आणि बापू आणि हिंगण्याचे दिवस मनात उभे राहिले.आमचं ते भलं मोठं शेत, आमराई,पेरुची बाग,शिंदीची झाडं, नेहर, भुईमूग ,ज्वारी, ती भली मोठी विहीर, भरपूर पाणी असलेली मुठा आणि समोरच्या काठावर दिसणारी विठ्ठलवाडी, त्या नदीत घट्ट नऊवारी नेसून पोहोणारी आजी,सगळं सगळं आठवलं..हिंगण्याला जायचं म्हणजे सोहळा असायचा. आमची दोन कुळं होती तिथे,पण त्यांच्यावर ताण नको म्हणून आईची बरीच धांदल उडायची.एकदा हुरडा खायला आणि एकदा आंबे खायला दोनदा तरी जायचोच, बापू अधेमधे आणि काका पुण्याला आले की एकदातरी नक्कीच..बरोबर भरपूर मंडळी असली की बापू जास्त खुश असायचे.
आमच्या हिंगण्याच्या शेतावर बापूंनी शेतीचे अनेक प्रयोग केलेले असायचे. कधी झेंडू लावला ,भुईमूग,ज्वारी (बापूंच्या भाषेत जोंधळे)मटार लावला.पार लोण्यासारख्या चिखलात घोट्यापर्यंत पाय बुडवून तांदूळही लावला.काही सफल झाले तर काही सपशेल चुकले.पण त्यांना फार आनंद होता त्यात.हिंगण्याला एक नारळाचं विशेष झाड होतं, विशेष अशासाठी म्हणजे ते जमिनीला जवळजवळ समांतरआडवं वाढलेलं होतं, बापू सगळ्या मुलांना त्यावर बसवायचे आणि झोके द्यायचे.त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद चांदणं अगदी भरभरुन वाहयचं.बापूंचा जन्म हिंगण्याच्या घरातला, प्लेगच्या साथीत संपूर्ण कुटुंब इथे येऊन रहायचं ह्यामुळे इथल्या आठवणींचे खूप मोठे साठे होते.
बरोबर आलेल्याना शेत दाखवणं हे त्यांच्या दृष्टीनं त्यांची समृद्धी किंवा श्रीमंती दाखवणं कधीच नव्हतं तर त्यांच्या घट्टमुट्ट धाग्यांशी नवनवीन माणसांना जोडणं होतं,आनंदात सामील करणं होतं.तसं व्हायचंही! एकदा हिंगण्याला आलेली माणसं तो अनुभव कधीच विसरु शकली नाहीत.माझे काका आणि बापू ह्यांच्या दृष्टीनं हिंगण्याचं शेत हे त्यांच्या आजोबांनी आणि वडिलांनी ठेवलेलं धन होतं, पण त्यापेक्षा काहीतरी जास्त असं त्यात होतं ते म्हणजे त्यांची त्या मातीशी जुळलेली नाळ होती,त्यांच्या भूत आणि वर्तमानला जोडणारी कडी होती..भविष्यात शेती राह्यली नाही,ती विकताना बापूंना झालेला क्लेश फार मोठा होता पण इलाज नव्हता.कोणी कसणारं नव्हतं मग हळुहळू ती आमच्या आयुष्यातून भूतकाळात गेली पण आठवणीतून नाही. मी हिंगण्याची हिरवी श्रीमंती आणि समृद्धी कधीही विसरणार नाही..कुठे ना कुठे येतेच आठवण त्या जमिनीची!
कधीतरी एक मुंबईची मैत्रीण 'जमिनीवरचे घर'घ्यायचं म्हणली आणि अंगावर सर्रकन काटा उभा राहिला.मुंबईत वरच्या मजल्यावर सुंदर समुद्र आणि मायानगरी दिसत असतानाही तिला मातीची ओढ वाटत होती हे खूप हृद्य होतं.आमचा वाडा जमिनीवरचा नंतर बापूंनी घर घेतलं तेही तळमजल्यावरचं, काकांनी हिंगण्याच्या जागेवर घर बांधलं,नवऱ्यालापण जमिनीवरच्या घराची जास्त ओढ आहे हे लक्षात आलं.पुढे एका हिलींग सेशनमध्ये ऐकलं की खूप ताण वाढला की मातीत हात घालायचे,ताण कमी होतो.ह्या सगळ्यांचे अन्वयार्थ सापडताहेत आताशा!मातीचा संपर्क सोडावासा वाटत नाही आपल्याला.
पणजोबा,आजोबा, वडिल काका ह्यांची मातीशी बांधून घ्यायची ती असोशी आता कुठं उलगडते आहे.त्या मातीच्या ढेकळांना फोडताना,ओल्या मातीत पाय घालताना, मुठेत पाय घालून बसताना, वेगवेगळे प्रयोग करताना, व्यस्त जीवनातही हिंगण्याला सारखं जाताना तेच काहीतरी होतं. काहीतरी घट्ट धरुन ठेवलेलं होतं बापूंनी..किंवा बापूंना कशानीतरी! पण काय होतं, आता उमजतंय बहुतेक हळुहळू!
परवा अगदी जुनी जवळची मैत्रीण म्हणाली तू अगदी तुझ्या आईसारखी दिसते आहेस,तुझा वावरही आईसारखा आहे.खरंतर पूर्वी आम्ही अगदी भिन्न व्यक्तिमत्व होतो.पण तिच्या ह्या शब्दांनी आत कुठंतरी शांतवलं.आईचा पदर हातात आल्यासारखं वाटलं.मग खूप वेळ शांत शांत बसल्यावर जाणवलं.आपण नेहमी कोणासारखे असतो, दिसतो, वागतो, विचार करतो हे अगदी पूर्ण खरं नसलं तरी पूर्ण खोटंही नसतं.काहीतरी असतं जे आपल्यात असतं पण ते आलेलं असतं आपल्या पूर्वजांकडून, आपल्या भूतकाळातून,ते आपल्याला घडवत असतं, आपल्याला धरुन ठेवत असतं.
आपण नेहमीच हर दिवशी कुठल्याश्या अनोळखी निबिड अरण्यात पाऊल ठेवत असतो आणि त्याच वेळी अनामिक पण ओळखीच्या वृक्षाच्या पारंब्या घट्ट धरुन असतो, चक्क लटकलेले असतो म्हणा की.तो वृक्ष,त्या पारंब्या म्हणजे कधी रक्ताची माणसं असतात कधी नाती,कधी माती ,कधी घर,झाडं एखादा दागिना, वस्तू,वस्त्रं,प्राणी किंवा कागदाचा चिटोरा असतो.कधी एखादा विचार असतो तर कधी कृती,कधी तत्त्व.पण ते काहीतरी धरुन ठेवलेलं असतं ,आपलं मूळ असतं,एक आर्त धागा असतो आत.तो कोणासाठीही , कशासाठीही बदलत नाही ,वरकरणी दाखवला नाही तरी आत जपून ठेवलेला असतो ..मुळं जशी खोलवर जाऊन झाडाला घट्ट धरुन ठेवतात तसं काहीसं!आपापल्या कुवतीनुसार त्याची जपणूक करत राहतो आपण.कित्येकदा गाडूनही टाकतो रोजच्या लढायांमध्ये ,जाणवतही नाही पण अचानक एकदम ती फांदी ,ती पारंबी ,पूर्वसूरींचं
ते नातं, सामोरं येतं.. जेंव्हा त्याची गरज असते तेंव्हा येतं, जेंव्हा गलबलत असतं तेंव्हा येतं, जेंव्हा खूप खूप आनंदात असतो तेंव्हा ते आपल्या डोळ्यांच्या कक्षेत नकळत उभं असतं, वेदनेतून जाताना अगदी जाणवून देऊन उभं राहतं,पाठवणीचा गहिवर आवरतानाही आपल्या पाठीशी येतं.कधी ते आपला हात अलगद सोडवून गुपचूप निघूनही जातं,कधी हातावर तुरी देऊन निघून जातं, आपण शोधत राहतो त्याच्या अस्तित्व खुणा. त्याला घट्ट पकडून ठेवलेल्या हाताला रग लागत नाही,मनात त्याचं ओझं होत नाही.पण हे काय असतं जे आपल्याला एवढं बांधून घालतं.

लेक मोठी होताना आपल्या उंचीला बगल देऊन ती थेट आपल्या आईसारखी किंवा सासूबाईंसारखी उंचनींच होते आणि त्या दोघी नसल्या तरी त्यांचा तो भास होत राहतो.तिचं अक्षर तर थेट आईच्या वळणावर जातं. तर आवडीनिवडी नवऱ्याच्या आईसारख्या, धाकटा अगदी आपल्यासारखा, विचारांची धाटणी तशीच..हा तोच धागा आहे का..आई सांगायची की आजोबा म्हणायचे माझ्या रुपानं त्यांची दिवंगत बहीण आलीये जन्माला त्यांच्याकडे रहायला,पहिल्यांदा मला भीतीच वाटली ऐकून ,नंतर कळलं ते काहीतरी मुठीत पकडून ठेवत होते,मग ती भीतीची भावना गेली.मुलगी आत्यासारखी आणि मुलगा मामासारखा असतो असं म्हणतात.अंगावर असणारी तुळशीची पानं बघून उगाच काही हरवलेल्या कड्या जोडत जाणारी माणसं.काय शोधत असतात.हल्ली वाटायला लागलंय की आपणही त्यात सामील व्हायला लागलो की काय! वाढत्या वयाबरोबर निबरपणा आणि हळवेपणा फारच हातात हात घालून यायला लागलेत..पण आता बापूंच्या जमिनीशी बांधलेला हा कंगोरा जास्त भावतोय.ते त्यांच्या पूर्वसूरींशी असलेली गाठ पक्की करत होते की काय..मातीत हात घालायची ओढ हीच खरी माणसाची ओळख असते बहुतेक ! तीच ही पारंबी..अनोळखी निबिड अरण्यातली ओळखीची तीच ही एक पारंबी..
रुमी म्हणतो तसं
Maybe you are searching amongst the branches, for what only appears in the roots. असणार!
ते पिढ्यानपिढ्या जपलेलं काही, की आपल्यातच होतं कळत नाही खरंच!
आमच्या घराण्याचा कुलवृत्तांत म्हणजे एक जाडजूड पुस्तक! किलोच्या वर वजन असणारं. कधीतरी मी ते वाचत बसते,खूप मजा वाटते.ह्या पारंब्या कशा पसरल्यात बघायला.माझ्या आजोबांना एक सावत्र भाऊ होता ,त्यांच्या पत्नी सवित्रीकाकू यायच्या आमच्याकडे पण पुढे त्यांचं कोणी आहे की नाही,ह्याचा शोध घेता घेता त्या कुलवृत्तांत कळलं हा वटवृक्ष इतका पसरला आहे हे जाणवलं.त्याच्या फांद्या शाखा किती वेगवेगळ्या दिशेत वळल्यात. पण पूर्वसूरींचा धांडोळा घेताना खूप काहीतरी सापडतं.नवऱ्याच्या आजोबांची एकच बहीण होती आणि बाकी कुटुंबाची माहिती कमी .त्याला नेहमी असं वाटतं की कोण होते त्यांचे पूर्वज, कुठून आले.तो माहिती असेल अशी शक्यता असणाऱ्यांना प्रेमापोटी विचारात राहतो. पूर्वजांच्या अस्तित्वाचा हा शोध त्यालाही घ्यावासा वाटतो.कधीतरी.आपल्यासारखाच मुळं आणि फांद्या शोधाव्या वाटतात.
नेहमी जमतंच असं नाही किंवा जमलं तर साध्य सिद्ध होतं असंही नाही पण तरीही.तो घ्यावासा वाटतो,आपलं वर्तमान भविष्य बदलत नसलं तरी भूतकाळ खूप काहीतरी देऊन जातो..पण ज्यांना भूतकाळ ठाऊक नाही त्यांना हे गवसत नसेल का,त्यांचा वर्तमान आणि भविष्य ह्या दोन्हीवर परिणाम होत असेल का?किंवा वर्तमानात मिळणाऱ्या प्रेमानं, मायेनं भूतकाळ सपशेल विसरला जात असेल का? वर्तमानात आणि भविष्यात भेटणारी माणसं ही आधी कुठे जोडलेली असतील का!
आगापिछा नसलेलं माणूस सहजपणे म्हणतो आपण, पण खरंतर ही कल्पना तर काटा आणते म्हणजे नुसतं माणसं नसल्यानं माणूस पोरका होत नाही तर ही पारंबी नसेल किंवा कायमची सुटली तर पोरकं वाटत असेल असं वाटतं.."कोई होता जिसको अपना, हम अपना कह लेते यारों ,पास नहीं तो दूर भी होता लेकीन कोई मेरा अपना! अगदी भरल्या घरात आणि भरभरुन मिळालेल्या आयुष्यातही माणसाला असं वाटत असेल तर काय ह्या कल्पनेनं हैराण होतं.
हे बंध बांधून ठेवणारे नसतात खरंतर, म्हणजे नसायला हवेत,त्या पारंबीला धरुन ठेवता ठेवता तितकं मुक्त मोकळं सुरक्षित वाटायला हवं.something to fall upon असं म्हणून जबाबदाऱ्यांपासून पळ काढणं नव्हे पण आपलाकडे घणसर काहीतरी आहे ,ज्याकडे आपण वळून बघू शकतो हे वाटणं फार चांगलं आहे..learn to let things go च्या बरोबरच काहीतरी "ते" धरुन ठेवलेलं तसंच ठेवायला हवं.आपणही हळुहळू पारंबी होत जाणार हे नक्की.
खूप वर्षांपूर्वी मद्रासमध्ये अडयार बघितलं.सुमारे साडे चारशे वर्षं जुना वटवृक्ष तिथं आहे,काय सुंदर वाटतं तिथे..पारंब्या तिथेच रुजून रुजून प्रचंड मोठ्या परिसरात पसरलेला हा महा वृक्ष!ह्याच्या सान्निध्यात जे कृष्णमूर्तीसारख्या महान लोकांची प्रवचने झाली आहेत, त्या वटवृक्षानी जवळ जवळ चाळीस हजार चौरस फूट जमीन धरुन ठेवलेली आहे आणि त्याबरोबरच विचारांचं,संस्कारांचं,भारलेल्या वातावरणाचं केवढं थोरलं धनसुद्धा.. शरदिनी डहाणूकरांनी पुस्तकात लिहिलं आहे की गोरखचिंचेची झाडं, शेकडो लिटर पाणी त्याच्या मुळांत आणि खोडात साठवून ठेवतात.पोटात माया असली की चांगल्या अर्थानं काहीतरी बांधून, धरुन ठेवलं जातं..असं सगळं मनात आलं की बापूंची मातीशी जवळीक साधायची धडपड आठवते..ती थोडीफार उमजते.माझ्या मनात आणखी एक पारंबी खोल रुजते..
©ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users