नावात 'पाय' आहे?

Submitted by मी अश्विनी on 21 March, 2023 - 11:46

'लाईफ ऑफ पाय' ह्या मॅन बुकर पुरस्कार विजेत्या कादंबरीत हीरोचे मूळ नाव असते 'पिसिन मॉलिटोर पटेल' जे पॅरिस मधल्या एका प्रसिद्ध हॉटेलम्धल्या 'पिसिन मॉलिटोर' नावाच्या जलतरण तलावावरून ठेवलेले असते. पिसिनच्या काकांनी ह्या तलावातल्या पाण्याच्या नितळतेबद्दल पिसिनच्या वडिलांना एवढे प्रभावित केलेले असते की पिसिनचे वडील आपल्या मुलाचे मनही ह्या पाण्याप्रमाणे नितळ निर्मळ रहावे म्हणून मुलाचे नाव पिसिन ठेवतात.

पण पिसिनचे शाळेतले मित्र त्याला मुद्दाम 'पिसिंग' (ईंग्रजी युरिनेशन अर्थाने) असे चिडवत राहतात. ह्या रोजच्या त्रासाला कंटाळून पिसिन त्याचे नाव आजपासून 'पाय' असल्याचे सांगतो. आणि त्यासाठी गणितातल्या pi (22/7) ह्या अपूर्णांक आकड्याची कधीही पूर्ण लिहिता न येणारी किंमत फळ्यावर दिवसभर लिहित राहतो. त्यानंतर त्याचे नाव पडते 'पाय पटेल'

ह्याच कादंबरीत पाय पटेलच्या बरोबरीने दुसरे मुख्य पात्र आहे दोनशे किलोचा एक वाघ. तर वाघाचे नाव आहे 'रिचर्ड पार्कर' त्याचे नाव रिचर्ड पार्कर कसे पडते ह्याचीही कथा मजेशीर आहे.

तर आपल्या किंवा आपल्या मित्र परिवारातल्या ओळखीतील्या अनेकांच्या खर्‍या किंवा पडलेल्या/पाडलेल्या नावामागे अशा चमत्कारिक कथा, प्रसंग नक्कीच असतील. अशा प्रसंगांची आठवण काढावी आणि त्याची जंत्री व्हावी म्हणून हा धागा. अशी नावे पडण्याची शाळा, कॉलेज, कार्यालये ही हमखास जागा.

तर ह्या माझ्या ओळखीतल्या 'पडलेल्या' नावांमागचे काही मजेशीर प्रसंग

आमच्या वर्गात एक 'प्रकाश होनपाटील' आडनावाचा मुलगा होता. ईंग्लिशमध्ये त्याचे आडनाव लिहितांना कसा तरी होन (Hon) अक्षरानंतर कागदावर डाग वा स्मज पडला असावा. Hon. patil Prakash असे . तर हजेरी घेतांना वर्गात नव्या शिक्षकांनी त्याचे नाव Honorable Prakash Patil असे वाचले. शिक्षकांसहित कोणाला काहीच कळेना हे नाव कोणाचे आहे. मग कोणी तरी ओरडले 'पक्या होनपाटील का हो सर. पण तो ऑनरेबल वगैरे नाही. रोज कुठल्या ना कुठल्या शिक्षकांच्या हातचा मार खातो' झाले वर्गात जो हशा पिकला तो पिकला पण तेव्हापासून प्रकाशचे नाव 'हॉनरेबल' पडले ते कायमचेच.

वडिलांच्या बँकेत तीन की चार कुलकर्णी होते तर ईतरांनी त्यांची नावे ते ज्या भागात रहात त्यावरून ठेवली.
चकाला कुलकर्णी
सातबंगला कुलकर्णी
एकाला तर चक्क 'नॅन्सी कुलकर्णी' म्हणत. ते बोरिवलीच्या नॅन्सी कॉलनीत रहात.

अजूनही बरीच आहेत हळूहळू लिहित राहीन. तुमचीही येऊद्यात

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> Honorable Prakash Patil
Lol

भारी आहे. Happy
पडलेली (किंवा ठेवलेली) आठवतील तशी लिहीनच, पण इथे काही मुलांची नावं जन्ममहिन्यावरून (एप्रिल, सप्टेंबर वगैरे) ठेवतात याची मला अजूनही का कोण जाणे मजा वाटते. खरंतर आपणही चैत्रा, श्रावण, अश्विन, कार्तिक, फाल्गुनी वगैरे ठेवतोच की नावं. ऋतूवरून ठेवतो, नक्षत्रांवरून ठेवतो, पण तरी कुणा मुलीला 'एप्रिल' अशी हाक मारताना मला चुकल्यासारखं वाटायचं राहात नाही. Happy

रोमन कालखंडात महिन्यांना माणसांची नावे दिली गेली . ती महिन्यांची नावे रोमन राजांच्या नावांवरून आली.
ऊदा. जुलिअस आणि ऑगस्टस वरून जुलै आणि ऑगस्ट येण्यापूर्वी त्यांना Quintilis and Sextilis म्हणत म्हणजे पाच आणि सहा.
सप्टे, ऑक्टो, नोव्हे, डिसे ही त्याकाळची सात, आठ, नऊ, दहा.

Mars, Aprilis, Maius, and Iunius ही रोमन देवतांची नावे महिन्यांना दिली.
रोमन्स हिवाळ्याचे दोन महिने ६१ दिवस कॅलेंडर मध्ये मोजत नसत म्हणून जानेवारी आणि फेब्रुवारी तेव्हा अस्तित्वात नव्हते.
मुळात ती देवतांची नावे असल्याने शंकर, विष्णु सारखी माणसांना दिली जातात. पण आपली त्या नावांची ओळख महिन्यांमुळे झाली म्हणून आपल्याला ती महिन्यांचीच वाटतात.

सप्टे ऑक्टो नोव्हे डिसे
सात आठ नऊ दस
सेव्ह एट नाईन ...
या ईंग्लिश रोमन-हिंदी-मराठी-शब्दांत ईतके साम्य कसे आढळते. कोणाचे शब्द कोणी चोरलेत?

एका दाक्षिणात्य सहकार्‍याचे नाव इतके लांबलचक होते कि त्याला ए टू झेड मूर्ती असे नाव पडले.
शाळेतली चटकन आठवत नाहीत.

ऋन्मेऽऽष, प्रोटो-इंडो-युरोपियन भाषाकुल आणि त्यांपासून जन्मलेल्या पुढच्या भाषा (संस्कृत, लॅटिन, ग्रीक वगैरे) ह्यात असे बरेच साम्य असलेले शब्द आहेत. सर्वांचं मूळ एकच आहे, कुणी चोरलेले वगैरे नाही.

अश्विनी, उत्तम माहिती. मी ही हेच सांगणार होतो. एक वेळ एप्रिल हे कुणाचं नाव आजकाल ठेवलं तर मला वैषम्य वाटणार नाही, पण सप्टेंबर हे नाव ऐकलं तर मात्र वाटेल.

लेख उत्तम आहे. वपुंच्या Statistics मराठ्यांची आठवण झाली.

माझी एक आजी (प्रमिला नाव तिचं) मुंबईला स्थायिक झाली तेव्हा तिचे भाऊ तिला पॉम्बक्का किंवा पॉम्बी म्हणत (प्रमिला from बॉम्बे या अर्थाने). पुढची पिढी पण पॉम्बी आत्या, पॉम्बी काकू वगैरे म्हणायला लागली. पुढे ते लोक पुण्यात राहायला गेले आणि आता कित्येक वर्षे तिथेच राहतात, तरी आजीला अजूनही पॉम्बी हेच नाव चिकटले आहे.

शाळेत असताना एकदा शिक्षक आमच्या वर्गातील मुलांना पुढे जाऊन तु काय शिकणार, कूठे जाणार विचारत होते.
त्यावर एकाने वायदळ (वायुदल) असे सांगितले.

त्यावरून त्याचे नाव वायदळ पडले.

हेहेहेहे मस्त लेख, आणि माहिती. मला शाळेतली एक गंमत आठवली
नारखेडे आडनावाच्या मुलाने त्याचं आडनाव लिहिताना इतकं सुटं सुटं लिहीलं कि सगळ्यांनी वाचल नाररवेडे! झालं तेव्हा पासून त्यांचं नाव हेच पडलं

अश्विनी, उत्तम माहिती. मी ही हेच सांगणार होतो. एक वेळ एप्रिल हे कुणाचं नाव आजकाल ठेवलं तर मला वैषम्य वाटणार नाही, पण सप्टेंबर हे नाव ऐकलं तर मात्र वाटेल. >> हो तसेच Thursday (आडनाव ), Friday (नाव) अशी नावे असणार्‍या व्यक्तींबद्दल वाटते.
जॉर्जिया, जॉर्डन, ब्रिटनी, ईंडिया अशी देशांच्या नावांवरून येणारी नावे सुद्धा थोडी विचित्र वाटतात.

नुमा ह्या रोमन राजाने 'हिवाळा' असा ६१ दिवसांचा महिना बदलून जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने कॅलेंडर मध्ये अ‍ॅड केले. जानेवारी हे नाव पुन्हा कुठल्याशा ग्रीक देवतेवरून आले आहे. तर फेब्रुवारी चा त्याकाळचा अर्थ 'जुने सोडून नव्याकडे जाण्यासाठी तयारी करण्याचा महिना' असा होता.
रोमन्स सम संख्येला अशुभ मानत म्हणून त्याकाळी सगळे महिने २९ किंवा ३१ दिवसांचे होते आणि वर्ष ३५५ दिवसांचे. फेब्रुवारी मात्र पुर्वीपासून २८ दिवसांचा होता आणि तो जानेवारीच्या आधी म्हणजे वर्षाच्या शेवटी येत. कारण तो जर ३१ किंव २९ चा असता तर महिन्यातल्या सगळ्या दिवसांची बेरीज सम झाली असती. आणि हा महिनाच सफाई वगैरे सारख्या अशुभ कामांचा महिना म्हणून मानला जात असे त्यामुळे तो ईतर महिन्यांपेक्षा लहानच ठेवला गेला. मग पुढे जेव्हा १० दिवसांच्या पृथ्वीच्या सूर्य प्रदक्षिणेशी लागणार्‍या वेळेतल्या तफावतीमुळे ऋतू पुढे मागे होऊ लागले तेव्हा रोमन्स ही तीन चार वर्षानंतर कॅलेंडर मध्ये अधिक मास पकडू लागले.
रोमन काळापासून ते आजपर्यंत फेब्रुवारी मात्र अजूनही कामागारांचे वर्षाचे पगार, बोनस ठरवण्याचा महिना म्हणून प्रचलित आहे.

रोमन राजे आणि राजकारणी ह्या कॅलेंडरशी एवढे खेळ करीत की 'आले माझ्या मना....' असा कारभार होता. अर्थात सामान्य जनतेला सगळेच दिवस सारखे असल्याने त्यांना काहीच फरक पडत नव्हता. पुढे ज्युलिअस सीझरने ज्युलिअन कॅलेंडर अस्तित्वात आणून कॅलेंडर आम आणि खास असे सगळ्यांसाठीच बर्‍यापैकी स्टँडर्डाईझ केले.

ग्लॅडिएटर सिनेमात जो रोमन राजा दाखवला आहे कमोडस (अर्थात सिनेमात ते पात्र बरेच फिक्शनल होते) त्याने बाराही महिन्यांची नावे बदलून ती स्वतःवरून ठेवली होती. पण ह्या राजाचे कर्तुत्व आणि लोकप्रियता आजिबातच काही नसल्याने लोकांनी महिन्यांच्या ह्या नव्या नावांना आजिबात थारा दिला नाही.

आमच्या परिचयात प्राध्यापक भडकमकर आहेत. हरियाणातून आलेल्या एका विद्यार्थिनीने स्पेलिंगवरुन त्यांचे “भडक मकर” सर असे बारसे केले. त्यांना पुढे कायम हे नवे नाव चिकटले Happy

बरं माणूस फारच सोबर आहे, अजिबात भडक नाही Wink

हा हा... स्पेलिंगवरून तर कायच्या काय उच्चार होतात. 'पदवाड'मॅडम चे पडवड, पाडवड , पादवाद, पादवड असे काय वाट्टेल ते व्हर्जन करायचे विद्यार्थी .
तसेच गोंदियातील एका कलीगने पुण्यातील हडपसरला हड पसर म्हटले होते

वडिलांचा एक मित्र आहे, त्याचे नाव मित्रांनी मन्या पाडले होते, कारण डोळे मंजरासारखे घारे आहेत म्हणून.
काही लोकांना ह्या मन्याचे मूळ नाव पण माहीत नव्हते आणि मन्या नावामागची गोष्ट पण माहीत नव्हती. एक नवीन मित्र एक दिवस मन्याच्या घरी गेला आणि "मनोज आहे का" असे विचारू लागला. घरातले बुचकळ्यात पडले. इथे कोणी मनोज राहत नाही असे त्याला सांगितले. नंतर त्या मित्राला समजले की मन्याचे नाव "चंद्रशेखर" आहे म्हणून.

तसेच गोंदियातील एका कलीगने पुण्यातील हडपसरला हड पसर म्हटले होते >> आम्हाला खरेच हडप नावाचे सर होते बेळगावच्या माध्यमिक शाळेत. पण त्यावेळी पुण्याबद्द्लची काही माहिती नव्हती.

नंतर त्या मित्राला समजले की मन्याचे नाव "चंद्रशेखर" आहे म्हणून. > Lol

ईथे अवघड भारतीय नावांचा ईंग्रजाळलेला शॉर्ट फॉर्म करणारे सुद्धा बरेच असतात. पुर्वीच्या ऑफीसात एक सुबशिस ठाकोर होता तर तो call me Sub म्हणायचा. पण त्याला ऊच्चार सब नव्हे तर सुब हवा असायचा. बिचारा दिवसातून किमान डझनवेळा तरी 'सब नाही सुब' असे करेक्ट करत रहायचा.

हे मजेशीर नावाचं नाही, पण संबोधनाचं उदाहरण म्हणून आठवलं. शाळेतल्या एका मैत्रिणीला (बहुधा वर्गात तीनचार वैशाल्या असल्यामुळे) आम्ही आडनावाने हाक मारायचो. एकदा तिच्या घरी गेलं असताना गॅलरीत पेपर वाचत बसलेल्या तिच्या बाबांना मी सवयीने 'केतकर आहे?' असं विचारल्याचं आठवतं. त्यांनी चश्म्यावरून मिश्किलपणे बघत 'या घरात सगळे केतकरच आहेत, तुम्हाला कुठले हवेत?' असा प्रतिप्रश्न केला होता. Happy

संजय हे नाव खूप कॉमन असायचं. आता आदित्य असतं तसं.
आमच्या कॉलनीत दहा पंधरा संजय होते. त्यातले चार पाच हिरो होते. पण आडनाव लक्षात ठेवण्यापेक्षा त्यांना नावं पडली होती.

एक संजय कविता करायचा. त्याला कवी संज्या.
दुसर्‍याचा हात गळ्यात महिनाभर होता तेव्हां तो सोंडेसारखा दिसायचा म्हणून (वक्र) तुंड्या संज्या.

तिसरा तेलगू होता. त्याच्या वडलांचं नाव लिंगाण्णा पोचाण्णा आहे असा शोध मुलांना लागला होता. त्यावरून त्यांना मुलं एलपी रेकॉर्ड म्हणायचे आणि या संजूला एलपी संज्या.

Lol धागा होणार हा.
आमच्या कंपनीत विकास नावाच्या व्यक्तिला वायकस म्हणायचे. Lol

अकरावीला गेल्यावर फिजिक्स शिकवायला एक कर्नाटकातील कुलकर्णी मास्तर होते. त्यांनी पहिला महिनाभर किरचॉफ्स लॉ नी आम्हा पोरांचं डोकंच उठवलं. अगदी प्रेमाने शिकवायचे पण सदानकदा एकदम रंगात येऊन 'किरचॉफ्स लॉ'. त्यांचं नाव 'किरचॉफ कुलकर्णी' पाडलेलं मग.

अकरावीत आम्हाला एक सर होते ते नोट्स डीक्टेट करायचे. त्यांना 'पुट इट इडी' नाव पाडलं होतं कारण ते नोट्स सांगताना व्हर्ब आलं की ते पास्ट टेन्स मध्ये आहे हे सांगायला दर वेळी पुट इट इडी म्हणत असत.