आमची अमेरिका वारी….. भाग 7 (प्रशांत जयानंद मठकर)

Submitted by Prashant Mathkar on 16 March, 2023 - 08:47

आमची अमेरिका वारी….. भाग 7 (प्रशांत जयानंद मठकर )
ग्रँड कॅनियन-एक अविस्मरणीय अनुभव

अमेरिकेच्या एरीझोना राज्यातला ग्रँड कॅनियन..जगातल्या सात नैसर्गिक आश्चर्यापैकी (Natural Wonders) एक. आतापर्यंत कॅलेंडर्स, मासिक, यू ट्यूब व्हिडीओज मधून पाहिलेल्या निसर्गाची या अलौकिक कलाकृतिला माझ्या अमेरिका बकेट लिस्ट मध्ये जरी वरचं स्थान असल तरी आमच्या अमेरिकेतील वास्तव्याच्या तीनही ठिकाणांपासूनच त्याच अंतर आणि अॅरिझोना वावळवंटातल्या कडक उन्हाळ्याचा विचार करता तिथे जाण्याविषयी मनात थोडी साशंकता होती. पण लॉस एन्जेलस पासून अॅरिझोना साधारण 500 मैलांवर आणि लास व्हेगसला विमानाने जाऊन पुढे कारने गेल्यास अर्ध अंतर आणि वेळ तर वाचेलच आणि व्हेगस पहाण्याचा बोनससुद्धा मिळेल हे कन्या आणि जावयांच्या लक्षात आल्यावर लगेचच ग्रँड कॅनियन व्हाया व्हेगस अशी चार दिवसांची टूर ठरली आणि शुक्रवारी दुपारी चार वाजता आम्ही व्हेगस विमानतळावर उतरलो. तिथून रेंटल कार ताब्यात घेऊन पुढे निघेपर्यंत सहा वाजले. चार साडेचार तासांचा प्रवास होता. रात्रीच्या मुक्कामासाठी ग्रँड कॅनियन गावात एका बंगल्याच ऑनलाइन आरक्षण केल होत. बंगला थोडा गावाबाहेर माळरानावर होता. रात्री दहा वाजता अंधारात दिवे आणि चिटपाखरू नसलेल्या सुनसान रस्त्यावरून थोड्याशा साशंक मनानेच गुगलबाईच्या मदतीने आम्ही बंगल्यावर पोहोचलो. इथे अशा बंगल्यावर कोणी अटेंडन्ट नसतो. बंगल्याच्या दरवाज्यावरच्या डिजिटल कुलुपाच्या नंबर पॅडवर कोड टाकला की खुल जा सिमसिम...बंगल्यात चहा, कॉफीच्या सामग्रीसह किचनमध्ये लागणार मीठ मसाल्यासारखं सामान भरलेल होत. पण त्या माळरानावर दूरवर कुठे तरी मिणमिणणाऱ्या दिव्याशिवाय कसली सोबत दिसत नव्हती आणि जवळपास हॉटेल किंवा दुकान उघडं असण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे बरोबर आणलेली फळं, केक, बिस्किट आणि चहा कॉफी वर डिनर आटोपून सगळे निद्राधिन झालो.
मला पहाटे पाचला जाग आली. खिडकीचा पडदा बाजूला करून पाहिल आणि उगवत्या सूर्याच्या किरणांनी स्वागत केल. बाहेर मस्त थंड वारा सुटला होता..आजूबाजूला नजर पोचेल तिथपर्यंत पसरलेल माळरान आणि मध्येच कुठे तरी दिसणार एखाद घर किंवा आरव्हि..एकंदरीत रात्री आम्ही तिथे किती एकटे होतो याचा अंदाज आला..पण वातावरण एकदम आल्हाददायक होत. सर्व आटोपून गावात एका रेस्टोरंटमध्ये नाश्ता उरकून ग्रँड कॅनियन पार्कमध्ये पोचायला अकरा वाजले. इथून ग्रँड कॅनियनची दक्षिणी कडा (Southern Rim) पहाता येते. ग्रँड कॅनियनल पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा तीन कडा आहेत आणि त्याची दक्षिणी कडा फारच सुंदर आहे अस म्हणतात.
ग्रँड कॅनियनची थोडी पार्श्वभूमी... कॅनियन म्हणजे नदीच्या प्रवाहामुळे झालेल्या खडक आणि मातीच्या झिजेपासून बनलेली घळ किंवा दरी. ग्रँड कॅनियन हा अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातिल कोलोरॅडो नदीच्या प्रवाहामुळे गेल्या अब्जावधी वर्षात खडक आणि मातीच्या झीजेमुळे बनलेल्या अशा हजारो घळीचा समुदाय. ग्रँड कॅनियनची लांबी सुमारे 446 किलोमीटर, खोली तब्बल 1.8 किलोमीटर आणि जास्तीत जास्त रुंदी 29 किलोमीटर. यावरून त्याच्या विराट स्वरूपाचा अंदाज येतो. त्याची ही विशालता आणि वय लाखो वर्षांचा भूवैज्ञानिक इतिहास दर्शविणारी. त्याच्या गडद लाल रंगाच्या विविध छटा असलेल्या उंचच उंच भिंतीमधून खडक आणि गाळाच्या स्तरांमधून दिसणारा सुमारे दोन अब्ज वर्षांच्या कालावधीतल्या पृथ्वीच्या कवचाचा छेद म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञांना पृथ्वीच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्याची सुवर्णसंधी. भूगर्भशास्त्रात कोणत्याही कालखंडाला समजून घेण्यासाठी खडकांचे थर आणि त्यांच्या जागेच पृथक्करण केल जात आणि त्यातून कोणताही थर तयार होत असताना त्या काळातली पृथ्वी कशी असेल याचा अंदाज येतो. ग्रँड कॅनियन मधल्या खडकांच्या स्तरांच्या अभ्यासावरूनच भूगर्भशास्त्रज्ञ या निष्कर्षापर्यंत पोचले आहेत की पृथ्वीच्या इतिहासातला एक भलामोठा कालखंड गायब आहे.
पार्कमध्ये प्रवेश करून आम्ही कॅनियनच्या दक्षिणी कडेने चालायला सुरवात केली. दोन एक मिनिट चालल्यावर ग्रँड कॅनियनच नजरेच्या टप्प्यातही न मावणारं, त्याच ‘ग्रँड’ विशेषण अगदी सार्थ करणारं विशाल रूप सामोर आलं…..
DSC_0373~3.jpg
अगदी अविश्वसनीय वाटणार अस ते लँडस्केप....कोलोरॅडो नदीची छिन्नी वापरुन निसर्गाने कोरलेली ती अद्भुत शिल्पकृती, जगातल्या कोणत्याही शिल्पकाराच्या आवाक्यापलिकडची. कोणतही तंत्रज्ञान तिथपर्यंत पोचू न शकणारं.
DSC_0328~2.jpg
अजूनही शास्त्रज्ञांना त्याच्या निर्मितीमागच गूढ पूर्ण उलगडलेल नाही. पुढचा सर्व ट्रेल कॅनियनच्या कडेने जात त्याची विविध रूप उलगडत जाणारा...सूर्याच्या किरणांबरोबर आपल्या बदलत्या छटा दाखविणारा. त्याची ही रूप कॅमेऱ्यात पकडण कठीणच..ते प्रत्यक्षच अनुभवण्यासारख.
DSC_0192~2.jpg
तेरा मैलांचा तो ट्रेल खूपच सुंदर खरा पण वाळवंटातल्या रणरणत्या उन्हात 40 डिग्री तापमानात चालत एका वेळी पुर करण अशक्यच. आम्ही दोन एक मैलांची मजल मारून परत पार्किंग लॉट मध्ये परतलो आणि मग पुढचे स्पॉट्स पहाण्यासाठी गाडीचा आधार घेतला. दिवसभर ग्रँड कॅनियनच्या दक्षिणी कडेवरचे दर्शनीय स्पॉट्स बघून पेज या गावातल्या आमच्या दुसऱ्या रात्रीच्या मुक्कामाच्या हॉटेल मध्ये परतलो.
पेज गावात मुक्काम करण्यामागच मुख्य कारण होत इथला लोअर अॅंटीलोप कॅनियन आणि आसपासचा भाग. लोअर अॅंटीलोप कॅनियन अगदी चिंचोळा म्हणजे त्याच्या दोन्ही भिंती काही ठिकाणी एका वेळी जेमतेम दोन माणस पास होऊ शकतील एवढया जवळ आणि त्यामधून जाणारा मैलभर लांबीचा ट्रेल खूपच सुंदर..कॅनियनच्या पोटात उतरून चालण्याचा थोडासा साहसी अनुभव देणारा. हा ट्रेल तिथल्या स्थानिक लोकांच्या गाइडेड टूर मधूनच करता येतो. आमच बुकिंग सकाळी दहाच होत. पण आदल्या दिवशी संध्याकाळ पासूनच त्याभागात फ्लॅश फ्लड येण्याच्या शक्यतेच्या सूचना मोबाइलवर वारंवार येत होत्या.. आणि सकाळी उठल्या उठल्या टूर आयोजकाकडून त्यादिवशीच्या सर्व टूर रद्द झाल्याचा मेसेज आला. फ्लॅश फ्लड आल्यास कॅनियनमध्ये उतरलेले पर्यटक अडकण्याची आणि जीवितहानीचीहि शक्यता असल्याने लोअर किंवा अपर कॅनियन भागात पाऊस पडत असेल किंवा तशी शक्यता असेल तर लोअर अॅंटीलोप कॅनियन पर्यटकांसाठी बंद करतात. टूर रद्द झाल्याने आमच्या उत्साहावर पाणी पडल, पण नंतर यू ट्यूबवरचे फ्लॅश फ्लडचे विडियो पाहिल्यावर त्यातली गंभीरता लक्षात आली. कॅनियन बंद असला तरी बाकी वह्यू पॉईंट्स खुले असल्याने मग आम्ही तिकडे मोर्चा वळवला.
DSC_0424~2.jpg
त्यातला ग्लेन कॅनियन भागातला ‘हॉर्स शू बेंड’ हा कोलोरॅडो नदीच्या प्रवाहामुळे बनलेला 1,000 फूट उंच घोड्याच्या नालाच्या आकाराचा खडक, मुख्य आकर्षण. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मात्र मैलभर चालाव लागत. रणरणत्या ऊन्हात चालण्याचा तो अनुभव सुखावह नसला तरी तिथे पोहोचल्यावर समोर दिसणारं ते नैसर्गिक लेण पाहिल्यावर श्रमाच सार्थक झाल.
DSC_0462_1~2.jpg
शिल्पकाराने खडकातून कोरून काढाव अस ते नैसर्गिक कोरीव लेण..पहातच रहाव अस. गुगलवर पाहिलेल्या प्रतिमांपेक्षा प्रत्यक्ष रूप खूपच विशाल आणि सुंदर. इथे फिरताना अशी अनेक निसर्गनिर्मित लेणी पहायला मिळाली..ती पहात..मनातल्या आणि हातातल्या कॅमेऱ्यात साठवत आम्ही लास व्हेगसच्या मार्गाला लागलो.
DSC_0510_1~2.jpgलास व्हेगस
अमेरिकेच्या नेवाडा राज्यातल हे सर्वात मोठ शहर...मोठमोठे कॅसिनो, हॉटेल्स, मॉल्स आणि नाइट लाइफमुळे ‘एंटरटेनमेंट कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ म्हणून जगभर ओळखल जात. इथे उपलब्ध असलेल्या अनिर्बंध Adult Entertainment पर्यायांमुळे "सिन सिटी" म्हणूनही प्रसिद्ध. या शहराची आर्थिक नाडी कॅसिनोज आणि तिथे अहोरात्र चाललेले जुगार. जगभरातून कित्येक लोक फक्त जुगार खेळण्यासाठीच इथे येतात. इथल्या कॅसिनोमध्ये प्रत्येक रात्री कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल होते. आम्ही रात्री दहाच्या सुमाराला या झगमगत्या शहरात प्रवेश केला आणि प्रसिद्ध फ्रेमोंट स्ट्रीटकडे मोर्चा वळवला.
DSC_0563_1~2.jpg
दोन्ही बाजूला कॅसिनोज, हॉटेल्स आणि असंख्य दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला हा रस्ता..गाणी बजावणी, जादू, कसरत यासारखे शो इथे रात्रभर चालतात. त्याची मजा लुटणाऱ्या आणि आमच्यासारख्या नुसत पाहण्यात आनंद मानणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीने हा रस्ता रात्रभर ओसंडून वहात असतो. DSC_0600_1.jpgपांढऱ्या स्क्रीनने पूर्ण आच्छादित अशा या रस्त्यावर उंचावरून जाणारी झिप लाइन हे एक आकर्षण. त्यात आपण बसलेल्या किंवा झोपलेल्या स्थितीत अतिशय वेगाने रस्त्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो. आमच्यासाठी हे फक्त पहाण्यापूरतच. त्या रात्री थोडस रात्रीच व्हेगस पाहून आम्ही हॉटेलवर परतलो.
DSC_0618_1~2.jpg
दुसऱ्या दिवशी सकाळी व्हेगस दर्शनासाठी बाहेर पडलो. आसपास सगळीकडे कॅसिनोच दिसत होते. काही कॅसिनोज रोम, व्हेनीस, पॅरिस सारख्या प्रसिद्ध शहरांच्या थीमवर आधारलेले..काहींचा आवाका तर रस्त्याच्या दोन्ही टोकांपर्यंत पसरलेला. कॅसिनोमध्ये शिरायला आणि पहायला प्रवेश फी नसते.
DSC_0667_1~2.jpg
आम्ही पूर्वी इटलीमधल व्हेनीस पाहिलेल त्यामुळे व्हेनेशिया या व्हेनीस शहरावर आधारलेल्या कॅसिनोमध्ये शिरलो.....आतमध्ये व्हेनीसची प्रतिकृतिच अवतरली होती.. अगदी गंडोला राईडसह जागोजागी प्रदर्शित केलेल्या व्हेनीस आणि रोममधल्या प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृतींमुळे आपण व्हेनीसमध्येच असल्याचा भास होत होता.
IMG_20220822_141934g .jpg
बेलाजिओ, व्हेनेशिया सीजर्स पॅलेस, गोल्डन नगेट, रेड रॉक, हे इथले काही जगप्रसिद्ध कॅसिनो. या कॅसिनोमधल समान आणि मुख्य आकर्षण म्हणजे तिथले विशाल गॅम्बलिंग हॉल. या हॉलमध्ये जिकडे पहाव तिकडे राउलेट, पोकरची टेबलं आणि गॅम्बलिंग गेम्सची असंख्य प्ले स्टेशन्स...आपल्या खिशाच्या आवाक्याप्रमाणे निवडीची संधी. हे सर्व कॅसिनो आणि गॅम्बलिंग हॉल दिवसरात्र गजबजलेले असतात. यावरून इथल्या उलाढालीचा अंदाज येतो. इथे एका रात्रीत कित्येकांच नशीब घडतं.. बिघडत..अर्थात बिघडणारेच जास्त..पण जुगारात आपल नशीब आजमावून पहाणाऱ्यांच्या गर्दीचा इथला महापूर काही कमी होत नाही. तिथल वातावरणच मोहवणार.
DSC_0613_1.jpg
मग ‘When in Rome, Do as the Romans Do' म्हणत आम्हीही एका गेमिंग स्टेशनवर हात चालवून पहिला आणि थोडे थोडके नाही तर तब्बल सहा डॉलर! गमावून काढता पाय घेतला. हे कॅसिनो खरच पहाण्याजोगे..जुगाराबरोबरच शॉपिंगसाठी सर्व टॉप ब्रॅंडची दुकान, हॉटेल्स, थीम पार्कस्, महाकाय रोलर कोस्टर, म्युझिकल फाऊंटन, वॉटर गेम्स सारख्या आम पर्यटकांच्या मनोरंजनाच्या साधनांनी संपन्न. निव्वळ जुगारावर उभारलेल, ‘Entertainment Capital of the World’ या प्रसिद्धीला जागणारं व्हेगस म्हणजे नेवाडाच्या वाळवंटातल ओएसिसच.
IMG_20220822_140909B.jpg

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

ग्रँड कॅनियनल पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा तीन कडा आहेत आणि त्याची दक्षिणी कडा फारच सुंदर आहे अस म्हणतात. >> दक्षिणी कडा बघायला सहज पणे जाता येते नि साऊथ कडा उत्तरेपेक्षा कमी उंचीचा असल्यामूळे कॅनिओयन "बघता" येते म्हणून ती अधिक प्रसिद्ध आहे. उत्तर कडा त्यापेक्षा खूपच वेगळी आहे - ट्रेक्किंग नि कँपिन्ग साठी उत्तम आहे.

मी तर ग्रँड कॅनियानच ग्रँड रूपं पाहून थक्कच झालो..उत्तर कडही सुंदर आहे असं म्हणतात.. पुढच्या फेरीत तिकडे जायचा विचार आहे..