उंच मनोरे कोसळताना

Submitted by द्वैत on 14 March, 2023 - 13:27

उंच मनोरे कोसळताना
क्षितिज सरकते सावध मागे
लाट उसळते काठावरती
अन खडकांना करते जागे

निळ्याजांभळ्या कल्लोळातून
प्रवासपक्षी परतून येतो
पिवळ्या पानांचा पाचोळा
वाऱ्यावरती उडू पाहतो

वाट पुसटशी दुरून बघते
ओल्या वाळूचे हळवेपण
आणि किनारा मिटून डोळे
कसा मुक्याने खचतो कणकण

सूत्र कोणते सांगत नाही
दुःख कुणाचे कुणास सलते
गिळून अश्रूंच्या पागोळ्या
दंवभाराने पाते हलते

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा! सुंदर!!

(तेवढं 'दंवभाराने' करता का?)

वाह!! एक खिन्न मूड मस्त पकडलाय.

>>>>>>>>>आणि किनारा मिटून डोळे
कसा मुक्याने खचतो कणकण

Sad वाह वाह!!

अप्रतिम!
This will make a really great painting. >> So true
कवितेतून चितारलेले पेंटिंग पण केवळ अप्रतिम.

खरं आहे अमा. इन फॅक्ट, कविता वाचताना मनात जे एक चित्र आणि माहौल तयार होतो, त्याची क्लॅरिटी आणि डेप्थ किती आहे त्यावरुनच कविच्या शब्दांची ताकद जाणवते. शब्द चित्र उभं करतात आणि उपमा, शब्दखेळ त्यात रंग भरत माहौल उभा करतात.

माझ्या डोळ्यासमोर उंचावरून पडणारा धबधबा, गर्द झाडी व उडणारे सुंदर रंगीत पक्षी आले. सगळीकडे तुषार उडताहेत, निस्तब्ध रमणीय शांतता. औदासिन्य अजिबात नाही, फक्त एक ठहराव, निस्तब्धाचा अवकाश!

बुवा, छान कमेंट. Happy