उत्सव

Submitted by -शर्वरी- on 14 March, 2023 - 02:49

दरवर्षीप्रमाणे, लिंबावर कळ्या येऊ लागल्या. नारंगीला पालवी फुटली आहे. मोहरीची फुले फुलली आहेत. निसर्गाच्या सृजनाचा सोहळा सुरु झाला. आता आपण फक्त पहायचे, अनुभवायचे. परमेश्वराची सगुण सुंदर अनुभुती कोणा भाग्यवंताला होत असेल. आम्हीही कमी भाग्यवान नाही.

मागील वर्षी मायबोलीवर काही लिहीले होते. https://www.maayboli.com/node/81408
त्याचेच हे extension म्हणु शकतो. Happy

***

सगुण रुपात उभा श्रीपती,
अंगाखांद्यावर पालवी मिरवतो
चांदणफुलांवर पाखरांच्या मांदियाळी
कर कटेवर ठेऊनि निरखतो

सृजनाचे चमत्कार करी नानाविध परी
साऱ्या निर्सगाचे चक्र चालवितो चक्रधारी
रुपातुन रुप तुझे स्वरुप निरूप*
अरूप तू जरी, धरी साकार निजरूप

तिन्ही लोकी, दश दिशा, गंध भरला उरी
बरा सापडला हाती, पायी घालते मिठी.
शोधला देऊळी, मंदिरी, घरी-दारी
ईथे येऊन राहतो सावत्याचा श्रीहरि.

निरूप bright, unequalled
अरूप : रुपरहित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारएण्ड, प्रतिसादासाठी धन्यवाद!
(माझ्या माहितीप्रमाणे) निरुप म्हणजे निराकार, उज्वल. निरुपम् म्हणजे अतुलनीय.

सृष्टीसौंदर्यात सगुणरूपी श्रीहरीला पाहणे ही कल्पना छान जमली आहे. वर्णन आवडले. पण कविता, त्यातली शब्दयोजना तितकीशी भावली नाही हे प्रांजळपणे सांगू इच्छितो.

निरूप - अरूप
"निरूप म्हणजे उज्ज्वल किंवा bright" याला फारसा काही शास्त्रीय आधार नसावा, असल्यास कृपया सांगा. एकवेळ निराकार हा अर्थ पटू शकेल (जो विकीवरही सापडतो). एक लक्षात घेण्यासारखे आहे, की निरूप या शब्दात उपसर्ग नि आहे (निरूपण, नियम वगैरे शब्दांप्रमाणे), तर निराकार शब्दात उपसर्ग निर् आहे (निरामय, निरीक्षण वगैरेंप्रमाणे). दोन्हींचा अर्थ सहसा वेगळा असतो. असो. निरूप म्हणजे निराकार (इथे आकार हा रूप ह्या अर्थाने घ्यावा लागेल) असा अर्थ असेल तर अरूप म्हणजे काय? अरूप = रूपरहित म्हणजेच रूप/आकार नसलेला, म्हणजेच निराकार = निरूप ना? जर अ = ब आणि ब = क असेल, तर अ = क व्हायला हवं.

हरचंद पालव, तुमच्या प्रतिक्रियेसाठी मनापासून आभारी आहे. निरुप म्हणजे निरुपम् (अतुलनीय) किंवा उज्वल अशा अर्थाने मी वापरला आहे. तसा काही शास्त्रीय आधार मला देता येणार नाही. अरुप चा अर्थ निराकार याबद्दल खात्री होती.
‘निरुपम् स्वरुप’ असे म्हंटले तर मला पाहिजे तो अर्थ स्पष्ट होईल का?

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कवितेच्या रचनेवर मी पुर्ण समाधानी नव्हते. पण जे मनापासून वाटत होतं तोच भाव कवितेत उतरल्याने लिहीलेलं इथेही पोस्ट करावे वाटले. मला तुमचा प्रतिसाद आवडला.

साद, कुमार१ खुप धन्यवाद!

नि म्हटलं की निरूप = निर्गतः रूपं यस्यः सः किंवा सा असते ना, हर्पा ? Happy इथे आपण विलीन झाले आहे या अर्थाने तो 'नि' वापरु शकतो. पहिल्या कडव्यात शब्दसंख्या कमी आहे, नंतर जास्त आहे.
कविता आवडली. Happy

अस्मिता, धन्यवाद!
तुम्ही सांगितल्याप्रमाणे बदल केले आहेत. माझ्याकडून बऱ्याचदा शुद्धलेखनाच्या चुका होतात. शब्दसंख्येबद्दल म्हणताय ते खरे आहे. मुक्तछंदात लिहायची सवय आहे. सुचलं ते लिहले, इथे टाकायची गडबड केली जरा. पण तुमच्या सर्वांच्या सूचनांची मदतच होते आहे. परत एकदा धन्यवाद. Happy

अस्मिता, निर्गतः रूपं यस्यः सः किंवा सा बद्दल धन्यवाद. आता तिथे काय म्हणायचं आहे ते लक्षात आलं. निर्गत मध्येही निर् आहे, नि नाही. पण भावार्थ तो असू शकेल.

शर्वरी, तुमच्या प्रतिसादाबद्दलही आभार.

अवांतर - निर्गतम् रूपम् यस्या: सा असेल तर ती निरूपा रॉय होईल हा साक्षात्कार या निमित्ताने झाला. Happy