" जू "

Submitted by देवू१५ on 5 March, 2023 - 15:12

प्रसंग १

सोसायटीतील एका वयस्कर सदस्याचे निधन झाले होते.
पुरुष मंडळी अंत्यसंस्काराची तयारी करत असताना महिलांनी
त्याच्या पत्नीला बाहेर आणले. तिची वेणी घातली, त्यात गजरा माळवला, हातात हिरवा चुडा भरून, कुंकू लावले. पतीच्या पार्थिवाच्या पाया पडल्यावर तिला पाटावर बसवले. बायकांमध्ये कुजबूज सुरु झाली. कोणीतरी शेजारील सोसायटीतील " नानींचे " नाव सुचवले. नानी आपले स्थूल शरीर सांभाळत गर्दीतून वाट काढत येत होत्या. त्यांना वाट करून दिली जात होती. नानींना आधार द्यायला दोघी तिघी पुढे सरसावल्या. त्यांना पुढे घेऊन येताना त्यातील एकजण नानींच्या कानात काहीतरी कुजबुजली . नानींनी मान डोलावली. अंतिम विधीचा " मान " त्यांना मिळाला होता. नांनींनी प्रथम त्या बाईच्या केसातील गजरा काढून वेणी सैल केली, तिच्या हातातील बांगड्या फोडल्या आणि शेवटी तिचे कुंकू पुसले.

प्रसंग. २

होळीची तयारी पूर्ण झाली होती. सोसायटीतील महिला नटूनथटून नैवद्याची ताटे घेऊन होळीभोवती उभ्या होत्या. इतक्यात नानी नैवद्याचे ताट घेऊन होळीच्या जवळ गेल्या. सोसायटीतील मुलांनी एकच गलका केला, " नानी मागे व्हा, १० मिनिटे बाकी आहेत मुहूर्ताला. " फक्त निरंजन पेटवून ताट तयार ठेवते " असे म्हणून नानींनी काडेपेटीतून काडी काढून निरंजन पेटवले आणि जळती काडी टिचकीने उडवली. काडी थेट होळीच्या पेंढ्यात पडली आणि काही समजायच्या आत पेंढ्याने पेट घेतला. सोसायटीतील बायकांमध्ये कुजबूज सुरु झाली. होळी मुहूर्तावर न लागण्यापेक्षा एका विधवेकडून होळी पेटवली गेल्याने नैवद्य न दाखवता त्या माघारी गेल्या.

प्रसंग. ३

हळदी कुंकवाला आईने सोसायटीतील मैत्रिणींना बोलावल्याने सगळ्या आमच्या घरी हजर होत्या. सर्वात शेवटी नानी आल्या. आईने नानींना मैत्रिणींबरोबर सतरंजीवर बसायला सांगितले. मैत्रिणींमध्ये चुळबुळ सुरु झाली. ते नानींच्या लक्षात आले, " गुढग्यांमुळे मला खाली बसायला त्रास होतो, मी खुर्चीत बसते " असे म्हणून त्या कोपऱ्यातील खुर्चीवर बसल्या. खरं म्हणजे मी ह्या कार्यक्रमाला येणारच नव्हते, परंतु हिने ( आईने ) खूप आग्रह केल्याने माझा नाईलाज झाला.

आई हळदी कुंकवाचे ताट घेऊन नानींकडे गेली. " अगं हळदी कुंकावाचा मान हा सवाष्णीचा, माझा नाही " असं म्हणून त्यांनी हळदीकुंकू लावून घेण्यास नकार दिला. अहो तुम्ही सवाष्णीच आहात, तुमचे पती युद्धात शहीद झाले, ते अमर झाले. अशा अमर पतीची पत्नी कायम सवाष्णीच असते , हो कि नाही? असे आईने मैत्रिणींकडे बघून विचारले. हे सर्व कथा कादंबऱ्यांमध्ये वाचायला ठीक आहे पण ... असे एका मैत्रिणीने विरोध दर्शविला. आणि थोड्याच वेळात सगळ्या मैत्रिणींनी तिला सहमती दर्शवली. नानींनाही ते मान्य होते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults