मराठी भाषा गौरव दिन - स.न. वि.वि. – सामो

Submitted by सामो on 25 February, 2023 - 09:02

प्रिय सामोस,
स.न.वि.वि,
पत्रास कारण की नुकतच तुला १३ वे लागले. बाई टिनेजर झाल्या. आणि एकदाचे गंगेत घोडे न्हाले. अगं किती तो उतावळेपणा. किती ती मोठे व्हायची घाई. काळ थांबणार आहे का? नाही ना. असो. मुख्य म्हणजे पदोपदी स्वत:ची तुलना अन्य मुलींबरोबर करणे थांबव. काही मुली उंच असतात, काही उफाड्याच्या तर काही उशीरा मोठ्या दिसू लागतात. निसर्ग थांबणार नाहीये. तेव्हा चिंता सोड. आहेस तशीच सुंदर दिसतेस. एक लक्षात ठेव शरीर म्हणजे तुम्हाला दिलेले एक साधन आहे. फक्त साधन. आणि तेवढेच त्याचे महत्व - जास्त नाही की कमी नाही. असो बघ मी सवयीने, परत अध्यात्मात शिरायला लागले. तूही सुंदरच आहेस. तू ही लवकरच मोठी होउन, कीर्तने बाईंसारखे फाडफाड इंग्रजी बोलणार आहेस. त्यांच्यासारखीच परदेशवारी करणर आहेस. आणि हो परदेशात जाऊ की नाही हे पडताळण्याकरता तळहातावरच्या चंद्राच्या उंचवट्यावरच्या रेषा पहाणे थांबव. सगळं काही वेळेवर होणार आहे आणि फक्त अथक परिश्रमांनी होणार आहे. तेव्हा अभ्यास, अन्य गुणसंवर्धन करणार्‍या स्पर्धा यांत भाग घे. या सर्वाचा पुढे उपयोग होइल. पुढे डोंगर आहे, कामाचा व जबाबदार्‍यांचा उपसा आहे पण मला हे सांगून तुला घाबरवायचे नाही कारण त्या कामाबरोबरच तुझ्या प्रिय व्यक्तींची बावनकशी साथही आहे.

परवा आईने तुला रागे भरले. मार्लेकरांच्या मधुराबरोबर मैत्री ठेउ नकोस सुनावले. त्यात काय चुकलं गं तिचं? मधुराच्या संगतीत राहून राहून तू उद्धटपणा शिकते आहेस हे आई नाही ओळखणार तर कोण! पण तू वाद काय घातलास, तणतणाट काय केला शेवटी आजी मधे पडली आणि आई-आजीचेच सुरु झाले. तू काढलास पळ. मेधा आवडते ना तुला? दोघी तासन तास शाळेच्या आवारात फिरत फिरत गप्पा मारता ना. छान आहे ती मेधा. तुमची मैत्री खूप टिकणार आहे. खूप म्हणजे अगदी जन्मभर. तिला अंतर देउ नकोस. मौल्यवान मैत्री आहे तिची. खरं तर सगळ्या मैत्रिणींचे पत्ते व नावे लिहून घे. फोन नंबर घे. कारण पुढे तू त्यांची नावे विसरणार आहेस. पावसकर, पोमण, पांचाळकर, सहस्रबुद्धे, गोडबोले, पटवर्धन, सुराणा अगदी तुला न आवडणाऱ्या शहाचा आणि बंबचाही नंबर घे. बघ पुढे तुला त्यांच्याशी संपर्कात रहाता येइल.

गणित आणि संस्कृत आवडतात ना हे विषय. मग त्यांच्यावर जास्त फोकस कर. हे दोन विषय खूप दान देउन जाणार आहेत पुढे. यश भरभरुन मिळणार आहे तुला. चित्रकलेत गती नाही तर उगाच खिन्न होउ नकोस. काही बिघडणार नाहीये. दातार क्लास कसा चाललाय? दचकायला काय झालं? माझ्यापासून काय लपणार आहे गं तुझं? अगं मी म्हणजे तूच आहेस भविष्यातली. आणि हो थंडीत रोज पहाटे, दातार क्लासच्या बाहेर उभे रहाता ना तुम्ही- वर्ग उघडेपर्यंत. वर्गातला सर्वात गोरागोमटा, हुषार मुलगा,रोज लाल स्वेटर घालून येणारा. प्रत्येक प्रश्नाला हात वर करणारा. तो आयुष्यभरचा चांगला मित्र होणार आहे तुझा. अंहं प्रेमात बिमात नाही पडणार तुम्ही पण 'तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना' अशी मस्त आंबटगोड मैत्री होइल तुमची.

आणखी एक नुसते चिवड्याचे बोकाणे भरुन मासिके आणि दिवाळीअंक, कादंबऱ्या, कथासंग्रह वाचत लोळत असतेस ते! आईला जरा मदत कर. थकते ती. कदाचित इतकी थकून जाते की पुरत नाही गं आयुष्यभर. आत्ता तुला कळणार नाही माझे दु:ख पण एकच सांगते तिला खूप खूप मदत कर. तिला तिच्या बालपणाबद्दल विचार. तिची सुख दु:खे काय आहेत काय नाहीत ते जाणुन घे. तिला तूच विसावा, थंडावा देउ शकतेस. आई म्हणते ना - "तू सासरी गेलीस की मी तुझ्याकडे येइन, तूपरोटी खाईन , लठ्ठ्मुठ्ठ होइन" ती, ही स्वप्ने रंगवत असताना तूही समरसून भाग घे. सांग आईला - पुढे तुझे तिच्याबरोबरचे काय काय प्लॅन्स आहेत ते. बरं, या गंभीर मुद्द्यावरती मला आपले बोलणे थांबवायचे नाहीये.

तुला पुस्तकवाचनाची जी आवड आहे ती अशीच जप. खूप समृद्ध करतं साहित्य आपल्याला. निखळ मनोरंजन तर करतच पण घडवतं आपलं मन. सध्या गडकर्‍यांची वाग्वैजयंती वाचते आहेस बरोबर. कुसुमाग्रजांचा 'जीवनलहरी' काव्यसंग्रह वाचताना, पाणी येतं डोळ्यात तुझ्या. त्या कवितांचे सौंदर्य मनभर मावत नाही. , आवरत नाही. ऊर फुटुन ते बाहेर येइल असे वाटते. हाच हळवेपणा कदाचित तुझे वरदान असेल कदाचित शाप. पण प्रत्येक शापाला उ:शाप हा असतोच असतो तेव्हा रडूबाई मुळूमुळू व्हायचं नाही. स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना जपायचं. सेल्फ-प्रिझर्व्हेशन हा मंत्र आतापासून पाठ कर. ज्या ज्या म्हणुन सुंदर कविता वाचशील, सुविचार व शेरो शायरी वाचशील ते टिपून ठेव. पुढे हुरहूर लागते. अर्धवट आठवतात कविता आणि सापडता सापडत नाहीत. मुख्य म्हणजे आनंदी रहा. सावध रहा. सुरक्षित रहा. स्वत:ला जप. आईबाबांचे ऐक.

तुझीच,
सामो (२०२३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुद से खुद की बातें हा फ़ॉर्मेट आवडला. उपदेश मात्र जास्त केलेत, नाही ऐकणार ती मुलगी Wink

आवडलं पत्र. स्वतः ला लिहिणं अवघड असतं.
परदेशात जाऊ की नाही हे पडताळण्याकरता तळहातावरच्या चंद्राच्या उंचवट्यावरच्या रेषा पहाणे थांबव. >> एकेकाळी ही रेषा हमखास पहिली जायची.

आवडलं पत्र. स्वतः ला लिहिणं अवघड असतं.
परदेशात जाऊ की नाही हे पडताळण्याकरता तळहातावरच्या चंद्राच्या उंचवट्यावरच्या रेषा पहाणे थांबव. >> एकेकाळी ही रेषा हमखास पहिली जायची.

होय आम्ही कॉलेजमध्ये नेहमी पहात असू ही रेषा. आणि म्हणे जितक्या आडव्या रेषा असतात तितकी परदेशवारी असते. आहेत खर्‍या आडव्या रेषा.

कल्पना एकदम वेगळी आहे आणि आवडली. आजी सामोने माजी सामोला लिहिलेले पत्र. रागवू नका हां, आजी म्हणजे आजच्या. Wink

हर्पा Lol Lol
अस्मिता, शर्मिला, सुनिधी, प्राचि, कुमार, स्वाती आणि अनिंद्य खूप खूप आभार.

अगं किती छान लिहीलंयस! आधी मला वाटतं की माबोवर तुला १३ वर्ष झाली, अशा अर्थाने लिहितेस पण मग लक्षात आलं की माबोवर १३ वर्ष म्हणजे जुने जाणते मेंबर, ना की टीनएजर, मग आला अंदाज की तू खरंच तुझ्या तरूण वर्जनला लिहिलेलं पत्र आहे. खूप आवडलं.
मला १३ वर्षांची सामोपण आवडली. तिची किती स्वप्न पूर्ण झाली? किती जणांशी मैत्री अजूनही आहे ( वरच्या पत्रात उल्लेख केलाय ते) ते वाचायला आवडेल.

वर्णिता, अनंत-यात्री, धनुडी धन्यवाद.
अनंतयात्री तेव्हा वेगळे नाव होते पण होते मीच ना? का आता अध्यात्मात नेऊ, अनंत रुपे बदलतात पण त्यांत ओवलेला "मी' तो एकच असतो व तो कधीच गोंधळून जात नाही. तुम्हाला मी काय अध्यात्मात घेउन जाणार, विराटतेचे पूजक आहात आपण Happy तुम्हीच सहजपणे शिकवाल मला चार दोन गोष्टी. Happy
धनुडी, नाही विशेष संबंध कोणाशीच नाही. मैत्रिणी सुद्धा कवितांसारख्याच हरवल्या. ज्यांच्याशी मैत्री होती ती ही फेसबुकपुरती राहीली व मला त्यात 'राम' न आढळल्याने, मी ती ठेवली नाही. पण जेव्हा फेसबुकवर सक्रिय होते तेव्हा एक जाणवले ते म्हणजे सगळ्याजणी सुस्थळी (अगदी जाती पासून ते आर्थिक स्तरापर्यंत तोलून-मापून) पडलेल्या होत्या. आणि ग्रेसफुली एज झालेल्या होत्या.
दातार क्लासमधल्या हुषार मुलाशी मैत्री आहे मात्र. वेळ मिळत नाही भेटायला, पण वाढदिवसाला ईमेलमधुन, विश करतोच. आमचे रस्ते सतत सतत एकमेकांना कापत राहीले, गोंधळ राहीला, रायव्हलरी राहीली पण मैत्री टिकली.

Happy सुंदर!
आणि इतकी नावं लिहिली आहेस....!! किती फास्ट मेमरी!!!
चिवड्याचे बोकाणे भरून लोळत वाचणे...हे वाचून तर अगदी माझेच लहानपण आठवले.....!!! Ditto !!

छान कल्पना

एकदम back to the future चित्रपट आठवला.

सुरेख कल्पना! इतकी सुसाट सुटलीस(चांगल्या अर्थी लिहितेय) की वाचतानाही दम लागला.छान लिहिलंय.