मराठी भाषा गौरव दिन - स.न. वि.वि. – शर्मिला र.

Submitted by SharmilaR on 25 February, 2023 - 00:39

मराठी भाषा गौरव दिन - स.न. वि.वि. – शर्मिला र.

प्रिय बाबा,
स. न. वि. वि.

किती वर्षांनी मी असं पत्र.., असा मायना लिहितेय! किंबहुना, कुठलंही घरगुती पत्रच किती वर्षांनी लिहितेय मी! आज तुम्ही हे वाचू शकला असतात, तर कित्ती बरं वाटलं असतं तुम्हाला. समाधानाचा निश्वास सोडला असतात तुम्ही. पण मला हे कळून यायला मधे खूप वर्ष जावी लागलीत.

मी जेव्हा कधी तरी तुम्हाला शेवटचं पत्र लिहिलं होतं, तेव्हा त्यात ‘प्रिय’ हा शब्द नव्हता. म्हणजे पत्र लेखनात तेव्हा आई वाडिलां करिता ‘प्रिय’ शब्द वापरायची पद्धतच नव्हती. त्या काळी शाळेत ‘पत्र लेखन’ शिकवल्या जायचं. आताच्या अभ्यासक्रमात ते असेल असं वाटत नाही. मुळात आताच्या जमान्यात अशी पत्र तरी कुठे लिहिल्या जातात? आता ‘ईमेल’ शिकवतात म्हणे शाळेत!

तर, पत्रात कुणाकरिता तीर्थरूप म्हणजे ‘ति.’ वापरायचं.. कुणाकरिता ‘ति. स्व.’ वापरायचं.., कुठे ‘स. न. वि. वि.’ अन् कुठे ‘सा. न. वि. वि.’ वापरायचं.. हे धडे तेव्हा शाळेच्या पत्र लेखनातच मिळत. आणी नसते मिळाले तिथे, तरी घरी रोज येणारी पत्र होतीच की, हे शिकायला अन् शिकवायला!

आपल्याकडे तर पोस्टमन रोज म्हणजे अगदी रोजच यायचा. ठरलेल्या वेळी ‘पोस्टमन..’ अशी त्याची मोठ्ठी हाळी यायची. घरातलं कुणी तरी जवळपास धावतच बाहेर जायचं. कुणाचं तरी पत्र आलेलच असायचं रोज.

मग ते आलेलं पत्र, घरात आईला मोठ्याने वाचून दाखवण्याचा कार्यक्रम व्हायचा. ते ऐकता ऐकता, ‘अगबाई!.. हो.. का..?..हम्म.. ’ अशा तिच्या प्रतिक्रिया चालायच्या. म्हणजे आईला काही लिहिता वाचता येत नव्हतं, असं नाही. पण पत्र मोठ्याने वाचायचा कार्यक्रम असायचाच घरात. तसंही, आईच्या हातात कधीच पेन बघितलं नाही. आलेलं पत्र एकदा तिला वाचून दाखवलं, अन् ते आजोबांचं किंवा दादाचं वैगेरे असलं, तर मग ती ते दिवसभरात परत परत वाचायची. त्या त्या नातेवाईकांबद्दल विचार करणं मग दिवसभर चालायचं तिचं.

तुम्ही मात्र घरी असलात तर ताबडतोब, नाही तर मग संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर, आलेल्या पत्राला लगेच उत्तर लिहायला बसायचात. घरात कार्ड नाही असं कधी व्हायचच नाही. ती बेगमी तुम्ही नेहमी केलेलीच असायची.

बाकी पत्र लेखनाचं काम, जसं आई कधीच करायची नाही, तसंच भरपूर शिकलेल्या असूनही, कुठल्याच आत्या मावश्या पण करायच्या नाहीत. तुम्ही कधी काही दिवसांकरिता गावाला वगैरे गेलेले असलात, तर नातेवाईकांना पत्रोत्तर पाठविण्याचं (माझ्या दृष्टीने अतिशय कंटाळवणं), काम मला करावं लागायचं. ते टाळण्याचे खूप प्रयत्न करून पाहिलेत मी, पण नाही टाळता आलं कधी मला. मग मी कार्ड आणी पेन घेऊन आईसमोर बसायचे, आणी ती सांगेल तेच आणी तेवढंच (धुसफूस करतच) लिहायचे. पण एरवी पत्रसंवाद हा आपल्या सारखा, इतर बहुतांशी घरी पण कुटुंब प्रमुखाच्याच ताब्यात असायचा तेव्हा.

तुम्ही फक्त आलेल्या पत्रांना उत्तरच द्यायचात असं नाही, तर गेल्या काही दिवसात ज्या कुणाकडून काही खबरबात आली नसेल, त्यांची विचारपूस करायलाही पत्र लिहायचातच. त्यामुळे तुमचं पत्र लेखन हे जवळपास रोजच व्हायचं. नातेवाईकच तेवढे होते आपल्याला! पाच काका.. चार आत्या.. अन् तेवढेच मामा मावश्या! अन् नातेवाईक कुणाचेही असोत, सगळ्यांना पत्र पाठवणं हे तुमचंच काम होतं. तुमचा तर छंदच होता तो. नुसता छंदच नाही, तर व्यसनच होतं जणू ते. पण व्यसन तरी कसं म्हणू..? काळजीही होतीच त्या मागे!

आपल्याकडे जवळपास सगळ्यांची पत्र अगदी नियमित यायची, पण बाळकाका सारखे एखाद दुसरे नातेवाईक होते.., ज्यांना नियमित लिखाणाचा कंटाळा होता. (माझ्यात त्यांचेच जीन्स आलेत का?) मग त्या लोकांशी भेट झाली की तुम्ही तुमची नेहमीची तक्रार करायचात.

‘अरे, सारखं सारखं काय लिहायचं? नवीन काहीच नसतं सांगण्या सारखं..’ बाळकाका म्हणायचे.

‘काही नसलं, तरी खुशाली कळवावी चार ओळींची.. तेवढच बरं वाटतं..’ तुम्ही म्हणायचात.

‘अरे.., पत्र नाही आलं ना, तर सर्व खुशाल आहे असं समजावं.. काही घडलं तर माणूस कळवतोच.. ’ बाळकाकांच ठरलेलं उत्तर असायचं.

तुम्हाला ते कधीच पटायचं नाही. आणी नं कंटाळता तुम्ही मात्र त्यांनाही नियमित पत्र पाठवतच रहायचात आणी उत्तराचीही अपेक्षा करत रहायचात.

सगळ्यांची ख्याली खुशाली कळण्याचा, पत्र हा एकमेव मार्ग होता तेव्हा. आणी फार मोठं नाही, चार ओळींच कार्ड पुरायचं तुम्हाला. आणी इतरांनाही. तुम्ही स्वत: तर नेहमीच पोस्टकार्डच वापरत आलात. इनलॅंड, पाकीटं.. ह्या भानगडीत तुम्ही कधीच पडला नाहीत. तुम्हाला भरभरून लिहिता आलं नसतं, असं नाही, पण कार्ड सोडून इतर काही नं वापरायला त्यांच्या, वीस/पंचवीस पैसे (म्हणजे महाग) किमती असणं हेच कारण असावं. पोस्टकार्ड दहा पैशात मिळायचं तेव्हा. बारीक अक्षर काढलं तर बराच माजकून मावल्या जायचा त्यावर, मग त्याकरता उगाच दहा पंधरा पैसे जास्तीचे का खर्च करायचे, हा तुमचा सरळसाधा हिशेब!

पोस्ट ग्रॅजुएशन करता मला पुढे हॉस्टेलला रहायला लागलं. तेव्हा लिहिण्याचा कितीही कंटाळा आला, तरी आठवड्यातून (किमान) दोनदा तरी घरी कार्ड पाठवणं माझ्या वाट्याला आलं. त्याबाबत आळशीपणा करून चालणार नव्हतं. तुमची शिस्तच होती तशी. जवळ पुरेशी पोस्टकार्डस तुम्ही दिलेलीच असायची.

पुढे माझ्या लग्नानंतर मात्र तुमची ही शिस्त झुगारून देणं जमलं मला. (माझ्या मते तेव्हा मी स्वतंत्र झाले होते ना..). आता फक्त घरातल्या पुरुषाने पत्र लिहायची पद्धत संपली होती. आणी पूर्वी जबरदस्तीने पत्र लिहायला लागायचं, ह्याचा जणू वचपाच काढत होते म्हणा ना मी! तुम्ही मला नियमित पाठवत असलात, तरी मी मात्र पत्रोत्तर द्यायचा कंटाळा करायचे. (बाळकाकांची परंपरा!) तरी बरं.., मला सोईचं व्हावं, म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात की डझनभर पोस्टकार्ड आणून ठेवायचात. (आणी त्यावर स्वत:चा पत्ता पण घालून ठेवायचात). मी तुम्हाला पत्र लिहीत तर नव्हतेच, पण प्रत्यक्ष भेटीत तुम्ही तसा आग्रह करायचात, तेव्हा माझी चिडचिडच व्हायची.

‘बाबांना कळतं का काही..? कुठून वेळ काढू मी ती पत्र बीत्र लिहायला..? घरकाम.. नोकरी.. सासू सासरे.. मला सगळं बघायला लागतं.. इथे श्वास घ्यायला वेळ मिळत नाही..’ माझी फुसफूस चालायची.

माझं कारण पूर्ण बरोबर असलं, तरी काढायचाच असता वेळ माझ्या कामातून, तर काढता आला असता. पण थोडा हट्टीपणा अन् बराचसा कंटाळा वेळ मिळू देत नव्हता. शिवाय रोजच्या कामात सांगण्यासारखं काय असतं..? हा विचार असायचाच. पण तुम्ही कधी हरला नाहीत. तुम्हाला माझी बरेच दिवसात काही खबरबात कळली नाही, की शेवटी तुम्ही जोडकार्ड पाठवायचात!

आता ह्या गोष्टीला तीस वर्षांहून अधिक काळ लोटलाय. मधल्या काळात लँडलाइन.., एस.टी. . डी.., आधी एकतर्फी फोन.., मग फोनचं पसरलेलं जाळं.. आणी आता तर ‘दुनिया मूठ्ठी मे..’ करत मोबाइल.. असा आपला संवादाचा प्रवास झाला. माझ्याकडून तर पत्रांची गरज ‘ऑफीशीअली’ केव्हाच संपली होती. तुम्ही कधी दादाकडे तर कधी भाऊ कडे रहायचात. पूर्वी तुम्हाला नियमित पत्र लिहिणारे लोकं एकेक संपत गेले. पण कुठेही असलात तरी तुमच्या (अजून तरी) असलेल्या मित्रांना मात्र पोस्टकार्ड पाठवायचातच (आत्ताआत्ता पर्यंत!)

आता माझा अज्जू परदेशात रहातो. ‘काही बातमी नाही म्हणजे सर्व आलबेल आहे..’ असं (बाळकाका सारखं) म्हणणारी मी, मात्र आता त्याच्याकडून काहीतरी संवाद व्हावा म्हणून वाट पहात असते. प्रवाह वरून खालीच वाहतो नं! ह्या संवादा करता पहिला मोबाइल तर तुम्हीच दिला होता त्याला! तो तिकडे गेल्यावर पहिले काही महीने अगदी नियमित फोन व्हायचे आमचे. एकटं पडल्यावर कुठला तरी दोर पक्क धरून ठेवायचे प्रयत्न होते त्याचे. हळूहळू रोजचे फोन आठवड्यावर गेले आणी मग कधी कधी आठवडेही निसटायला लागले.

आता माझ्या फोनचं व्हाटसअॅप्प सतत चालू राहू लागलं. माझे अज्जूला नियमित मेसेज चालू झाले. (कामात असेल.. झोपला असेल.. असं वाटून केव्हाही फोन नाही करता येत नं!). मग त्याच्या रीप्लाय ची वाट पहाणे आले. लवकर नाही रीप्लाय आला तर, अस्वस्थ होणे आले... (आता जोडकार्ड आठवतात) हल्लीची मुलं! ‘सीन मेसेज’ ऑफ असतं. त्यांना त्यांची स्पेस जपायची असते.

‘सारखं सारखं कळवायला काही नसतं गं.. आणी मी जनरली करतो रीप्लाय.. पण कधी कामात राहून जातं.. मग विसरायला होतं. मी काही फोन, मेसेज नाही केला म्हणजे कामात आहे, आणी खुशाल आहे.. असं समजत जा. अज्जूचं म्हणणं. त्याच्यात माझेच जीन्स आलेत ना!

‘कळवण्या सारखं काही नसेल, तरी एखादी स्माईली टाकत जा रे.. बरं वाटतं खुशाल आहेस हे कळल्यावर.. ’ मी बोलून जाते (शेवटी मी मुलगी तुमचीच ना!).

शेवटी काय.. तुमची काळजी मी वहात ठेवलीय..

आता पत्राच्या शेवटी मो. न. ल. आ. हे लिहिणे नाही. कळावे, असं म्हणू शकत नाही, कारण उलट टपाली काही कळणारच नाहीय. तसं तर हे पत्रही मी पोस्ट करणार नाही.. कारण आता ते वाचायला तुम्ही नाहीत.

लोभ असावा..?

तुमचीच,
..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच भावनिक आणि हृदयस्पर्शी पत्रलेखन..!
माझ्या आईला तिच्या वडीलांनी पाठवलेली पत्र तिने अजून जपून ठेवलीत.. एकदा मी ती सगळी पत्र वाचून काढली होती... त्यांच्या पत्रातून आपल्या मुलीबद्दल त्यांना किती माया, काळजी वाटत होती ते पाहून माझं मन हळवं झालं होतं.

Pages