सोम्या बाबा.

Submitted by deepak_pawar on 18 February, 2023 - 02:25

संज्याची आई आली तेव्हा मी खाटेवर लोळत पडलो होतो. खरतर पोटात कावळे ओरडत होते. कुणीतरी जबरदस्ती करून जेव म्हणून सांगावं म्हणून मी कितीतरी वेळ वाट पाहत होतो. पण आई सुद्धा लक्ष देत नव्हती.
"हे महाराज लोळत का पडलेत? आज खेळायला गेले नाय?" संज्याच्या आईनं माझ्या आईला विचारलं.
"रुसलाय," आई म्हणाली.
"कशाला?" संज्याच्या आईनं प्रतिप्रश्न केला.
"त्याला गाय हवेय," आई म्हणाली.
"काय बाई आक्रितच?"
"गप शाळेत जाऊन अभ्यास करायचा सोडून गुरं सांभाळायची आहेत," संज्याची आई माझ्याजवळ येत म्हणाली.
मी तोंड दुसऱ्या दिशेला फिरवून तसाच झोपून राहिलो.
"जेवलाय पण नाय," आई म्हणाली.
"काय? ये चल उठ, असं जेवणावर रुसतात व्हय? उठ म्हणते ना? नायतर चांगला झोडून काढीन." माझ्या दंडाला पकडून उठवत संज्याची आई म्हणाली.
खरं तर मी कधीपासून याचीच वाट पाहत होतो. मला काही पाहिजे असेल तर मी रुसायचो आणि जेवायचो नाही. नेहमी आई जबरदस्ती करून जेवायला देयायची. पण कधी वैतागलेली असेल तर "पोटात भूक असेल तर, जेव नाहीतर रहा उपाशी,"असं म्हणून आपल्या कामाला लागायची. असा प्रसंग कधी आलाच तर घरी कुणी नसताना मी गुपचूप जेऊन घ्यायचो. कधी रात्र असेल तर मात्र पंचायत व्हायची.
मी जेवत असताना रडायचं नाटक करत होतो.
"एवढीच गुरं आवडतात तर घ्यायची एखादी गाय, आमच्या संज्या बरोबर जाईल चरवायला," संज्याची आई म्हणाली.
"गेला तर बरा, नाहीतर दोन दिवस जाईल आणि माझ्या गळ्यात पडलं," आई म्हणाली.
"मी संभाळीन म्हणालोय ना," मी रडत रडत म्हणालो.
"बरं, गिळ आधी, बघते बापसाला विचारून,"
मी मनातल्या मनात खूष होऊन जेवण उरकून खेळायला पळालो.
शेवटी बाबांची परवानगी मिळाल्यानंतर जुलै महिन्यात आमच्या घरात गायीचं आगमन झालं. जेव्हा आम्ही तिला घेऊन आलो तेव्हा ती गाभण होती.
आता माझा दिनक्रम बदलणार होता. सकाळी लवकर उठून गाईला चरवायला घेऊन जावं लागणार होत, नऊ पर्यंत घरी येऊन पुन्हा शाळेत. संध्याकाळी साडेतीन चार वाजता परत आई घेऊन जाणार होती, पाच वाजता घरी आल्यावर सहा साडेसहा वाजेपर्यंत मला जावं लागणार होत. पण मला हे सगळं करायला आवडत होतं. गाय येण्यापूर्वी मी बरीच स्वप्न रंगवली होती. म्हणजे गायीला चरवायला नेताना सोबत पुस्तक घेऊन जायचं. गाय चरत राहील आणि मी झाडाखाली बसून पुस्तक वाचेन. पण पहिल्याच दिवशी माझं स्वप्न भंग पावलं. जुलै महिना असल्यानं पावसानं चांगला जोर पकडला होता. गुरांसाठी बऱ्यापैकी चारा वाढला असला तरी पावसामुळे गाय एका ठिकाणी थांबत नव्हती. सारखं सारखं तिच्या पाठीमागें फिरावं लागत होतं आणि पाऊस पुस्तक बाहेर काढू देत नव्हता. पहिल्याच दिवशी कळून चुकलं कि गायीला चरवताना आपला अभ्यास होणार नाही.
बघता बघता आठ दहा दिवस उलटून गेले. एका संध्याकाळी तिला चरवून आणलं आणि मी आंघोळ करायला गेलो. येऊन पाहिलं तर ती सारखी उठबस करत होती. आईला हाक मारून म्हटलं," आई, गाय बघ कशी करते."
आईनं येऊन पाहिलं आणि म्हणाली," जा आजीला बोलावून आण."
आमच्या घराच्या थोडं पुढं चुलत आजीचं घर, मी टॉर्च घेऊन आजीकडे जाऊन आईचा निरोप सांगितला. येताना तिला सोबत घेऊन आलो.
आम्ही येईपर्यंत वासराचं थोडं तोंड बाहेर आलं होतं. आतापर्यंत घरात आजूबाजूची लहान मुलं जमा झालेली.
"पोरांचं काय काम हाय इथं, आधी आत व्हा," आजीनं सगळ्या मुलांना पिटाळलं.
आजी गायीच्या पाठीवरून हात फिरवत म्हणत होती,
"बाय माझी ती जरा जोर लाव, आता मोकळी होशील," पण गाय नुसती उठ बस करत होती. कधी पाय लांब करून झोपल्या सारखं करायची तर कधी लगेच उठून उभी राहायची. काही मुलं पुन्हा पुन्हा यायची आणि आजी त्यांना पुन्हा पिटाळायची.
आजी जरा काळजीत पडल्यासारखी दिसली, ती आईला म्हणाली,
"गाय जर लवकर सुटली नाय तर वासरू गुदमरल, जरा सोम्या भाऊंना बोलावून आणायला पाठव."
"जा रे जरा सोम्या बाबाना बोलावून आण," आई म्हणाली.
बाबाच वय पासष्ट सत्तरच्या आसपास असावं. कंबरेत वाकलेला, एकदा का खाली बसला कि उठायला खूप त्रास व्हायचा तरी सुद्धा शेतात राब राब राबायचा. आता जरी हा माणूस खंगला असला तरी त्याच्या शरीरयष्टी वरून वाटायचं हा जवानीत खूपच दांडगा असणार.
मी पुन्हा टॉर्च घेऊन सोम्या बाबाकडं निघालो. त्याच घर आमच्या घरापासून थोडं लांब होत. मी त्याच्याकडं गेलो तेव्हा तो नुकताच जेऊन उठला होता. बाबाच घर केंबलारू असल्यानं वीज नव्हती त्यामुळे त्याच्या घरी संध्याकाळी सात-साडेसातला जेवण उरकून झोपायचे. मी पोहचलो तेव्हा तो नुकताच जेऊन उठला होता. मी आईचा निरोप सांगितला तसा तो माझ्या सोबत निघाला. आम्ही घरी आलो तरी गाय सुटली नव्हती. अजून तिची उठबस चालूच होती. ती खाली बसल्यावर बाबा वासराचं तोंड पकडून हळूहळू बाहेर ओढू लागला. थोड्याच वेळात गाय मोकळी झाली. वासराला हातानं साफ करून गायीसमोर ठेवलं. वासराला गाय चाटू लागली तो पर्यंत बाबा हात पाय धुऊन आला. आता वासरू उठायचं प्रयत्न करू लागलं. पण अजून त्याला उभं राहता येत नव्हतं म्हणून मी त्याला पकडायला निघालो, तसं बाबानं मला अडवलं आणि म्हणाला,
"तू नको पकडू आपलं आपण उभं ऱ्हावदे, तं माणसाचं पोरं थोडंच हाय सा महीन झोपून ऱ्हायाला"
शेवटी एकदाचं ते उभं राहिलं.
त्या दिवशी दूध काढून उद्या येतो म्हणून बाबा निघून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्याची वाट पाहत बसलो होतो. पावसाचे दिवस असल्यानं बाहेर चांगलाच अंधार होता. पावसाळ्यात आम्ही मुलं सुद्धा संध्याकाळ नंतर सहसा बाहेर पडत नसू. कारण आता वाटांच्या बाजूला चांगलं गवत माजलेलं असल्यानं जनावरांची भीती असायची कधी पाऊस कोसळेल याचा नेम नसायचा आणि एकदा का पाऊस पडायला लागला कि थांबायचा नेम नसायचा, त्यामुळे भिजत घरी येण्यापेक्षा बाहेर न गेलेलं बरं.
थोड्या वेळानं बाबाचा आवाज कानावर पडला, तो मधल्या घरातल्या म्हातारीशी काहीतरी बोलत होता. त्याचा आवाज ऐकून गाय सुद्धा हंबरायला लागली. सतत कानावर पडल्यानं वाडीतील सर्वांचे आवाज मी ओळखू शकत होतो. पण गायीनं तर त्याचा आवाज कालच ऐकला होता, तरीसुद्धा तिच्या लक्षात तो कसा राहिला? त्यानं येऊन गायीच्या पाठीवर थाप मारली, तशी ती त्याला चाटू लागली. मी इतके दिवस तिला चरायला घेऊन जात होतो, तिच्यासाठी चारा कापून आणत होतो. पण अजून पर्यंत हिनं मला कधी चाटलं नाही. अन एका दिवसात यानं काय जादू केली? मला प्रश्न पडला.
बाबा दूध काढून घरी गेल्यावर मी आईला म्हणालो,
"आई, बाबाचा आवाज ऐकून गाय हंबरली आणि आल्याआल्या त्याला चाटू लागली, एका दिवसात त्याचा आवाज कसा काय ग तिच्या लक्षात राहिला?"
"अरे, मुकी जनावरं कधी त्यांच्यावर केलेले उपकार विसरत नसतात, काल तिला त्रास होत होता त्यातून त्यांनी तिची सुटका केली ना!"
अजून पर्यंत तरी सोम्याबाबाला आम्ही मुलं खूप घाबरायचो. कधी संध्याकाळ पर्यंत आम्हाला खेळताना बघितलं तर,
"तुम्हांला मास्तरांनी अभ्यास नाय दिला, काळोख झाला तरी खेळत बसलात, जाताय का तोडू एकेकाची तंगडी,"
म्हणत पिटाळून लावायचा. तसं तो येताना आम्हाला दुरूनच कळायचं, कारण त्याच्या कोयती अडकावायच्या आकडीला घुंगरू लावलेले होते. घुंगरांचा आवाज आला की समजायचं बाबा आला मग आम्ही लगेच पळायचो.
आता रोज संध्याकाळी सोम्याबाबा दूध काढायला येऊ लागला आणि त्याच्याविषयी मनात असणारी भीती हळूहळू कमी होऊ लागली. पावसाचे दिवस असल्यानं जिकडे तिकडे शेतीची कामं सुरु होती. सुट्टीच्या दिवशी नागर धरायला मिळावा म्हणून आम्ही मुलं वाडीतील सगळ्याच्या शेतावर जायचो. काहीजण पाच एक मिनिटं नांगर हातात द्यायचे, तर काहीजण पोरांच्या नादानं कामाचा खोळंबा नको म्हणून पिटाळून लावायचे. तरी वाडीतील सगळ्या शेतकऱ्यांकडे आम्ही कधी ना कधी नागर धरलेला, पण सोम्या बाबानं आपल्या नांगराची लूमणी कधीच कुणाच्या हातात दिलेली नाही. न्याहारीच्या वेळेस नांगर उभा असताना म्हटलं,
"अरे, आता बैल उभेच आहेत ना, थोडा वेळ धरतो ना! तर तो म्हणणार,
"आता अजिबात लूमनीला हात लावायचा नाय, बैलांना थोडा आराम करू दे."
कधी जास्तच विनवणी केली तर म्हणायचा,
"बघ, बैल चालले तर,"
त्याचे बैल जरा अडेलच होते, कुणा तिराहिताचा आवाज आला तर एका डोळ्यानं मागे वळून बघायचे आणि परत रवंथ करत ढिम्म पणे उभे राहायचे. जागचे हलायचे नाहीत, जर त्यांना काठीनं मारलं तर लाथ मारायचे आणि तिकडून बाबा ओरडायचं,
"खबरदार बैलांना काटी लावली तर, तंगड्या तोडून टाकीन."
त्यामुळे आम्हाला कळून चुकलेलं याचा नागर आपण धरू शकणार नाही.
सकाळी गायीला चरवयाला न्यायचं, त्यानंतर शाळा… शाळेतून आल्यावर सहा साडेसहा पर्यंत पुन्हा तिच्या पाठी. त्यामुळे माझी चांगलीच तारांबळ उडायची. एके दिवशी बाबा म्हणाला,
" एका गायीच्या पाठी एक माणूस लागतो त्यापेक्षा आमच्या गुरासंग जाऊ दे. सुट्टीच्या दिवशी माझ्या पोरासंग दीपक जात जाईल."
दुसऱ्या दिवसापासून गाय सोम्या बाबाच्या गुरासंग जाऊ लागली.
गुरांचे गोठे आमच्या वडीपासून थोडे दूर होते, म्हणजे वाडीच्या उत्तरेला थोडं चालत गेलं कि एक पऱ्या लागतो, पऱ्या ओलांडून अजून पाच दहा मिनिटावर सर्वांचे गोठे. जास्त पाऊस झाला की पऱ्याला उतार होत नाही त्यामुळे पावसाळ्यापूर्वी वाडीतील सर्वजण पऱ्याला लाकडी साकव बनवतात. सगळ्याचे गोठे एकाच रस्त्याला जोडून घेण्यात आले आहेत. रस्त्याच्या बाजूला दगडांचा बांध तयार करून आजूबाजूला करवंदाच्या काट्या टाकून रस्ता बंद करून घेण्यात आलेला तेव्हा गुरं कुणाच्या शेतात जाऊ शकत नव्हती. ह्या रस्त्याला गोवंड म्हणतात. गोवंडातून गुरं बाहेर पडली म्हणजे सगळा कातळ लागतो. अधे मध्ये कुठेतरी जमीन आहे पण तिथे थोडं खोदलं की खाली कातळच.
जिथे जिथे मातीचे चोंडे होते तिथे भाताची शेती केली जायची. कधी कधी मला वाटायचं हा संपूर्ण भाग कधी काळी समुद्राचा तळ असावा. कारण नदीच्या तळाशी असणाऱ्या दगड धोंड्या प्रमाणे हा कातळ नुसता दगड धोंड्यानी भरला होता. कातळावरून आजूबाजूच्या डोंगरावर वसलेली गावं स्पष्ट दिसायची. उन्हाळ्यात काळा दिसणारा कातळ पावसाळ्यात हिरव्या रंगानं भरून जायचा. अन एकदा का जुलै महिना संपला कि एका गवताला निळ्या रंगाचं डोळ्यासारखं दिसणारं फुल यायचं. त्याला सीतेचे डोळे म्हणत. या गवताची सुद्धा एक कथा होती. जेव्हा रावण सीतेला पळवून नेत होता तेव्हा ती रडत होती तिचे अश्रू या कातळावर पडले आणि हे गवत रुजलं. एकदा का हे फुल फुललं कि सगळा कातळ हिरव्या निळ्या रंगानं भरून जायचा. उन्हाळ्यात काळाकुट्ट असणारा कातळ एवढा सुंदर दिसायचा कि ते दृश्य डोळ्यात साठवून घ्यावंसं वाटायचं.
कातळ सोडून पुढं गेलं कि पायऱ्या पायऱ्या सारखा डोंगर लागायचा तिथं गुरांना मुबलक चारा असायचा. जो पर्यंत गुरं कातळावर असायची आम्हा मुलांची चांगलीच तारांबळ उडायची. कातळावर चारा तुरळक त्यामुळं गुरं एका जागी थांबायची नाहीत. ती सारखी आजूबाजूला असणाऱ्या भात शेतीकडं धाव घ्यायची. त्यामुळं गुरांना पिटाळतच आम्ही डोंगर गाठायचो. एकदा का डोंगरांच्या चोंड्याना गुरं लागली कि आम्ही काहीतरी खेळ खेळत बसायचो. तसा हा खेळ सुद्धा जास्त वेळ चालायचा नाही. एखादं गुरु आपला कळप सोडून जात असे मग त्याला आणायला जावं लागायचं. त्यामुळे खेळ बंद करून आम्ही चारी दिशांना उभे राहायचो.
गुरं वाड्यात आणताना पाऊस असेल तर वाड्यात नुसता चिखल व्हायचा. गुरांना रात्रभर त्यातच बसावं लागायचं.त्यामुळे पाऊस नसेल तेव्हाच त्यांना आम्ही गोठ्यात आणू पाहायचो. तसं पाऊस येणार हे आम्हाला आधीच कळायचं. एकतर अंधारून यायचं, आणि पश्चिमेला असणाऱ्या डोंगरावरून पावसाच्या सरी पुढं पुढं सरकताना दिसायच्या. पडदा टाकून एखादी वस्तू झाकावी तसा डोंगर पावसाच्या धारांनी झाकला जायचा. त्यामुळे पाऊस येणार हे कळलं कि गुरांना आम्ही पिटाळतच गोठयात आणायचो. पाऊस नसेल तर आरामात गुरांना घेऊन यायचो आणि गोवंडा जवळ आल्यावर दोघे तिघे गोवंडाच्या तोंडाजवळ उभे राहायचो. थोडावेळ गुरांना उभे करायचो आणि एका सुरात हगा-मुता हगा-मुता म्हणून ओरडायचो. गुरं सुद्धा शहाण्यासारखी उभी राहून शेण टाकून घ्यायची. त्यामुळे गोठा सुका राहायचा.
पण एकदा का शेतीची काम उरकली कि आमचं गुराकडं जाणं बंद व्हायचं आणि गुरांचा ताबा सोम्याबाबाकडं जायचा. मी एकदा त्याच्यासोबत गुराकडं गेलो. आता प्रत्येक जण आपआपल्या जमिनीत राखलेल्या कुरणात गुरांना घेऊन जाऊ लागलेले. त्यादिवशी मला गुरांमध्ये विलक्षण बदल जाणवला. आम्हा मुलांना दमवून काढणारी गुरं चांगलीच शांत झाली होती. या पंधरा दिवसात बाबानं त्यांना चांगलच वळण लावलं होतं. कुठलंच गुरु आपला कळप सोडून धावत नव्हतं. बाबानं गुरांना कुरणात नेलं आणि झाडाखाली जाऊन बसला. उगाच कुठलं गुरु धावत नव्हतं, सर वर्गात आल्यावर विद्यार्थी जसे खाली मान खालून पुस्तकात पाहत राहतात त्याप्रमाणे सगळी गुरं गप्पपणे चरत होती. एखादी गाय किंवा बैल जरा जास्त पुढं गेला तर फक्त त्याला वळवायला जावं लागायच. जेव्हा गुरांना गोठ्यात आणत होतो तेव्हा मी बाबाला म्हाणालो,
"मी गोवंडा जवळ जाऊन उभा राहतो."
"कशाला?" बाबानं विचारलं.
गोठ्यात घाण होऊ नये म्हणून आम्ही काय युक्ती करायचो ते त्याला सांगितलं.
"त्याची काय गरज नाय, तू नुसता बघत रहा,"बाबा म्हणाला.
गोवंडाच्या जवळ आल्यावर बाबानं नुसतं “हो रे” म्हणून आपली काठी कातळावर आपटली. सगळी गुरं जिथल्या तिथं उभी राहिली, सगळी गुरं शेण वैगेरे टाकून गोठयाकडं निघाली. बाबानं माझ्याकडं पाहिलं आणि गालातल्या गालात हसला. सोम्याबाबाचं गुरांवर असणारं प्रेम मी अनेक वेळा पाहिलेलं, पण आज मात्र अचंबित झालो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह मस्त!

बाबाच घर केंबलारू असल्यानं वीज नव्हती >>> केंबलारू म्हणजे?

छान. इतके दिवस मी तुमच्याकडून अशा लेखांचीच वाट पाहत होतो.
ऋन्मेऽऽष
सर तुम्हाला केंबलारू हा शब्द अडला.?
हद हो गयी .

ओके धन्यवाद

केशवकूल, गूगल केले. शून्य रिझल्ट दाखवला. म्हणून विचारले.

छान

… मुकी जनावरं कधी त्यांच्यावर केलेले उपकार विसरत नसतात ….

हे अनुभवले आहे

नेहमीप्रमाणे खुप छान लिहिलय.

खाली बसल्यावर बाबा वासराचं तोंड पकडून हळूहळू बाहेर ओढू लागला.
>>>> मागील वर्षी मामाच्या गावी गेलेलो तर, मामाचा मुलाने आणि मी, असच वासराच तोंड आणि नंतर पाय ओढून वासरू बाहेर काढले होते.
त्याला यातील माहिती होती आणि त्याच्या सूचनेप्रमाणे मी ओढताना जोर लावत होतो.

मस्तच!
माझ्या लहानपणी आमच्या गावातही गाईगुरं भरपूर होती. ते दिवस आठवले. आमच्या घरी गाईचं दूध काढायला गावातला एक मामा यायचा, तो एरवी कधी सहज दुसऱ्या कामासाठी आला असेल तरी त्याचा आवाज ऐकून गाय हंबरायची हेही आठवलं!

छान लिहिलयं..
माझे आजोबा बैलांना बंडया, सोन्या नावाने हाकारायचे तेव्हा लहानपणी मला हसायला यायचं.. पण आता कळतंय की त्यांची त्या मुक्या प्राण्यांवर किती माया होती ती.!!

माझे काका प्राण्यांचे डॉक्टर असल्यामुळे घरातल्या अडलेल्या गायींची सुटका नेहमीच पाहिली आहे. एरव्ही कलकलाट करणाऱ्या कोंबड्या इंजेक्शन देत असताना बिचाऱ्या शहाण्या बाळासारख्या वागायच्या.. मुके प्राणी सोशिक असतात खरे..!!

मस्त लिहिलंय.

कातळाचं वर्णन खूप छान आहे.