भासमान

Submitted by Abuva on 14 February, 2023 - 12:23

निमगाव सोडून गाडी पेडगावच्या रस्त्याला लागली. गावाची शीव ओलांडल्यावर शेती दिसू लागली. वीणा भगवानला म्हणाली, "जरा थांबायचं का? न्याहारी करून घेऊ इथेच कुठे. जागा शांत दिसतेय". भगवाननं त्रासिक नजर ईकडेतिकडे फिरवली आणि ड्रायव्हर बाबूरावांना फर्मावलं, "काका, घ्या त्या वडाच्या झाडाच्या सावलीत. आणि तिकडे मोटेची विहीर दिसते आहे. जरा गाडीवर पाणी मारून आणा. तोवर आम्ही इथे खाऊन घेतो."
"अरे पण त्यांनाही खायचे असेल ना?"
"तिकडे खातील."
गाडी वडाच्या सावलीला थांबली. धुरळा बसायच्या आत बाबूराव उतरले. डिकीतून चटई काढली, जरा बरी जागा पाहून अंथरली. भगवान आळोखेपिळोखे देत उतरला. जवळून वहाणाऱ्या पाटात हात बुडवून तोंडावर पाणी मारले आणि खिश्यातून सिगारेटचे पाकीट काढले. वीणानं उतरण्यापूर्वी जवळचा रुमाल तोंडावरून फिरवला, अन केस थापटून जागच्या जागी बसवले. पण पाटाचं पाणी पाहून एक थंडगार शिपकारा तोंडावर मारल्याविणा तिला रहावलं नाही.
तोवर बाबूरावांनी मागच्या सिटावरून न्याहारीची बास्केट उतरवली होती. पाण्याचा फिरकीचा तांब्या काढून ठेवला होता. पुण्याहून निघून आता दोन तासाच्यावर वेळ झाला होता. उन्हं फार वरती आली नसली तरी जाणवण्या इतपत उकाडा होता.
"साहेब, गाडी धुवून आणतो", बाबूराव म्हणाले.
"हं", लक्ष न देता भगवान म्हणाला.
लगबगीनं वीणानं बास्केट उघडली आणि बाबूरावांना म्हणाली, "बाबूकाका, ही दोन केळी ठेवा तुम्हाला न्याहारीसाठी". बाबूराव नको म्हणण्यापूर्वीच तिनं केळी त्यांच्या हातात कोंबली.

रस्त्यावर वर्दळ आगदीच नव्हती. चटईवर बसलेल्या वीणाला थोड्या अंतरावर असलेली विहीर, त्यावर चालणारी मोट आणि त्याच्यामागचं कुणा शेतकऱ्याचं खोपट दिसत होतं. वडापलीकडूनच बैलगाडीची वाट विहीरीकडे उतरत होती. त्याच रस्त्यानं बाबूराव ड्रायव्हरनं गाडी विहीरीकडेला घेतली. जेवणापर्यंत पुण्याला पोहोचण्याची खात्री होती. त्यामुळे चार केळी, ब्रेड-लोणी, थोडा भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि उकडलेल्या शेंगा असा मोजकाच खाऊ तिनं बरोबर घेतला होता. पेडगावला तर जाऊन यायचं होतं.

सिगारेट संपवून परत आलेल्या भगवाननं बसतानाच एक सॅंडविच उचललं. "चहाचा थर्मास घ्यायला काय झालं होतं?", तो करवादला. वीणा काहीच बोलली नाही. एका वर्तमानपत्राच्या कागदात तिनं चिवडा काढून घेतला. सहजच ती बोलून गेली, "शामला फार आवडायचा हा चिवडा!" भगवाननं एक कटाक्ष टाकला तिच्याकडे, "आता येणार आहे तुमचा भाऊ. करा काय कौतुकं करायची ती". त्याचा सूर ऐकून वीणा गप्पच राहिली. "इतके दिवस हाॅस्पिटलमध्ये राहून तशीही त्याची भूक खवळली असेल. खायला काळ अन..."
"भगवान्ता, कशाला दूषणं देतोस त्याला? तुझं काय घोडं मारलंय त्यानं?" वीणा जरा चिडूनच म्हणाली. भगवान यावर काहीच बोलला नाही. दोघंही जरा वेळ शांतच होते. वीणाचं खाऊन झालं. तिनं भगवानला विचारलं, "केळं हवंय का?" यावर भगवान मुद्दाम तिच्याकडे बघत म्हणाला, "नको. राहू दे तुझ्या शामभाऊसाठी!" वीणा न बोलता उठली. पाण्यात हात धुवून आली. लांबवर बाबूराव गाडीवर पाणी मारताना दिसत होते.
"तुझा शामवर एवढा राग का आहे, मला खरंच कळत नाही. तुझा, बाबांचा! काय वाकडं केलय तुमचं त्यानं?" संथपणे वीणा बोलत होती. "नसेल तो नित्सुऱ्यांच्या घराण्याला साजेसा आता. नसेल तो घराण्याच्या वकिली परंपरेला लायक राहिला. पण एवढा काही जडबुद्धी नाहीये तो. अजूनही हातात सुंदर कला आहे त्याच्या."
"निर्बुद्ध नाही तो? अगं मंदमती झाला आहे. आजच्या जगात काय किंमत आहे त्याची? दोन वेळचं कमवून खायची अक्कल राहिली आहे का त्याला?" तिचं बोलणं तोडत भगवान म्हणाला.
"नसे ना का. पण एवढं चांगलं घर आहे. श्रीमंत वडील आहेत, तुझ्यासारखा कर्तबगार भाऊ आहे. तुमच्या आधारानं जगेल तो."
"वीणा, तुझ लग्नाचं काही खरं नाही. आणि आता हा नवा भार आम्हाला आयुष्यभर वागवावा लागणार. काही विचार केलास त्याचा?"
"भावाचा, बहिणीचा भार वाटायला लागला तुला आता" वीणाच्या आवाजात एक हताश खिन्नता होती.
"वीणा, हे बघ, मी काय म्हणतोय ते तुला चांगलं माहिती आहे. एक हुशार मुलगा कुठल्या तरी मुलीच्या नादी काय लागतो, आणि प्रेमभंगाचं फालतू कारणापायी असा वेडगळ होतो? कसा विश्वास ठेवायचा या गोष्टीवर?"
"भगवन्ता, पण हे घडलंय खरं ना?"
"काय खरं अन काय खोटं! या त्याच्या वागण्याचा अर्थच लागत नाही बघ. प्रेमभंग! आणि त्यापायी हा सगळं गमावून बसलाय आता? मी म्हणतो, एक महिना, एक वर्षं तुम्ही करा नं शोक अन काय. पण तीन तीन वर्षं? गुरू झाले, बाबा झाले, स्वामी झाले, अंगारेधुपारे ते झाले. देवदेवस्की तीही‌ झाली. आईनं उपासतापास केले, बाबांनी तीर्थयात्रा केली. आता हॉस्पिटलमधे ठेवलाय. ते ही काही उपयोगाचं नाही! नाही? डाॅक्टरी उपाय करूनही जर उत्तर मिळत नसेल ना तर... तर... नाटकं आहेत ही सगळी. बसून खायचंय त्याला, झालं" भगवानचा आवाज चढला होता.
"भगवान, अरे तू आणि बाबा, का एवढा उतावळेपणा करताय? जरा दम काढा, होईल तो बरा.."
"आणि आता हा आईचा बावळटपणा. म्हणे लग्न करून द्या त्याचं तर तो बरा होईल. पत्रिकेत आहे म्हणे. खुळचटपणा सगळा. का एका मुलीला खड्ड्यात लोटायला सगळे तयार झाले आहेत माहित नाही." भगवानच्या बोलण्यात एक हताश सूर होता.
वीणा काही बोलणार तोंच बाबुराव‌ गाडी घेऊन येताना दिसले. ती साडी झटकत उभी राहिली. विषय अर्धवटच राहीला.

पुण्याच्या बाबासाहेब नित्सुरे वकिलांची ही मुलं. वीणा सगळ्यात मोठी आणि भगवान दुसऱ्या क्रमांकाचा. शाम, ज्याच्याविषयी सगळी चर्चा चालली होती ते शेंडेफळ. वकील साहेबांचा दरारा मोठा, पसारा मोठा. वडिलोपार्जित वकिलीचा व्यवसाय. सुप्रीम कोर्टात नाव गाजवलेले वकील. बाबासाहेबांच्या वडीलांनी ब्रिटिशांच्या जमान्यात स्वातंत्र्यसैनिकांचे खटले विनामूल्य लढवलेले. अशी परंपरा. आता स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांची नवउद्योजकांचे कैवारी अशी ख्याती होती. पैशाला कमी नाही, मानमरातब कुठेच कमी नाही, सोन्यासारखी मुलं. असं असताना ही माशी शिंकली होती. हातातोंडाशी आलेला नुकतंच नाव काढू पहाणारा मुलगा अचानक हाताबाहेर गेला होता.

बाबुरावांनी भली मोठी ब्यूक गाडी समोर आणून लावली. नुकतीच धुतल्यामुळे तिचा काळा रंग सकाळच्या उन्हात चमकत होता. बाबासाहेबांच्या तोलामोलाला साजेशी गाडी होती. बाबूराव गाडीचे पंचवीस वर्षं विश्वासू चालक होते. ही सगळी मुलं त्यांच्यासमोर लहानाची मोठी झाली होती. उतरून त्यांनी सामान गाडीत चढवलं. भगवाननं चटई गुंडाळली आणि गाडीत टाकली. त्याचा चेहरा आता उतरला होता, विचारमग्न झाला होता. गाडी पेडगावच्या रस्त्याला लागली. मागे वळून भगवान वीणाशी बोलायला लागला. "खरं तर मी वकील. बुद्धीचा कस काढून समोरच्याचं विधान खोडून काढायचं हे माझं तत्त्व. कधी सरशी तर कधी पडशी. मनाला लावून घ्यायचं नाही हे महत्त्वाचं. आज जो आपला प्रतिपक्ष असतो तो आपला अशिल होईल हे गृहित धरून वागायचं. उगा भावनिक गुंतवणूक वगैरे भानगड नाही. एका अर्थानं कोरडे, रोकडे व्यवहार. पण.. पण.. या शामचं वागणं मला सलतंय, जिव्हारी लागतंय. कुठे तरी खोलवर वाटतंय की तो नाटक करतोय. त्याचं ते बरळणं, ती मेलेली नजर... हे सगळं खूप भीषण आहे गं. हे कसलं आलंय प्रेम अन् कसला बोडख्याचा भंग!"
वीणा खिडकीतून बाहेर बघत होती. तिच्या डोक्यात विचार चालले होते. शामच्या वागण्याचा थांग लागत नाही हे खरं. कसा काय इतका परिणाम होऊ शकतो प्रेमात नकार मिळण्याचा एखाद्यावर? पण आपल्या सगळ्या भावंडात शाम वेगळा. प्रत्येक सणाला रांगोळी काढायची तर कुणी? शामनं! फुलांची आरास करायची तर ती कुणी? शामनं! खेळायला जाण्याऐवजी माणसांची चित्र काढणं हा त्याचा आवडता छंद. तसा हुशार. हां हां म्हणता वकील झाला. पण तो त्याचा पिंड होता का? कुणास ठावूक. कुठल्याशा अशिलाच्या नातेवाईक मुलीत गुंतला आणि धडपडला. कोलमडलाच खरं तर! भगवान म्हणतो ना ते खरं आहे. हे वर्तन अतर्क्य आहे. पण प्रेमाला तर्काच्या कोष्टकात बसवायचेच का? आता माझंच घ्या...

भगवान परत बोलू लागला, "सुधारणा होणं कठीण नाही म्हणतात नं डॉक्टर, तर दाखवा म्हणावं. आणि मी म्हणतो ते ऐकून वाईट वाटेल तुला. पण एक सांग मला. या अशा अवस्थेत किती काळ जगणार शाम? एक वर्ष? दहा वर्षं? चाळीस? दोन वेळा जेवायला घालायचं काय म्हणतेस? आज आपल्या‌ घरी किती तरी विद्यार्थी वारावर जेवतात. कधी काही म्हणतो मी? कारण त्यांना भवितव्य आहे. त्यांच्या हातून काही तरी घडणार आहे, किंवा घडू शकेल! पण.. बोलवत नाही गं, आपल्याच भावाविषयी असं, पण बोलल्याशिवाय रहावतही नाही. शेंदूर फासून एखाद्या दगडाचा म्हसोबा तरी करता येतो. याला तेवढं तरी करता येणार आहे का? एका उदबत्तीचा तरी लायक होणार का हा?" भगवान ताड ताड बोलत होता. त्याच्या मनाला जणू बुद्धीनं चिणलं होतं. भावनेचा लवलेश त्याच्या विधानांत नव्हता.

वीणा अजूनही बाहेरच बघत होती. माझंच घ्या. पद्मनाभ नाही म्हणाला आणि मनाचा कोंभच जणू जळून गेला. कुणी प्रेमभंगानं वेडं होतं, तर कोणी दगड. दगड झालाय माझ्या मनाचा. आता शाळामास्तरीण म्हणून आयुष्य काढायचं. वरवर हसायचं पण आत कुढत जगायचं. काय राहिलं आहे तरी माझ्या आयुष्यात? ना संसार, ना मुलंबाळं. मी, मी घेऊ का शामची जबाबदारी? मी? झेपेल मला? इथे मला स्वतःची खात्री नाही, तर मी शामची जबाबदारी घेऊ का? कशी घेऊ?
या विचारांनी वीणा बावचळली. अस्वस्थ झाली. नाही म्हटलं तरी शामवर जीव होता तिचा. दोघांमध्ये सहा-सात वर्षांचं अंतर होतं. ताई ताई करत मागे मागे धावणारा शाम तिला आठवत होता. परिक्षेत बक्षिस मिळाल्यावर धावत आधी तिला येऊन सांगणारा शाम. तिची अनेक पोर्ट्रेट्स काढणारा शाम. समुद्राकाठी मावळणाऱ्या सूर्यबिंबात हरवून गेलेला शाम... किती रूपं, किती आठवणी!

भगवान पुन्हा बोलू लागला. "आता तुझ्याच कडे बघ. चांगली युनिव्हर्सिटी प्लेयर तू, डबल ग्रॅज्युएट. पण भर तारूण्यात तू पांढऱ्या साड्या नेसतेस, शाळामास्तरणीचा पेशा पत्करला आहेस, विधवेसारखं रहातेस, वागतेस. का? सगळे विचारून, विचार करून थकले. आईबाबांनी तर तुझ्यासमोर डोकं फोडायचंच फक्त बाकी ठेवलंय. पण तुला ढिम्म फरक नाही. तुझाही प्रेमभंग झालाय अशी आम्ही सर्वांनी समजूत करून घेतली आहे. तेवढंच मनाचे समाधान! पण तू दिवाभितासारखी चार भिंतीत कोंडून नाही पडलीस. तर तू कार्यकर्ती झालीस, एक शिक्षिका झालीस. म्हणून तुझ्याविषयी आदर वाटतो. पण या शामविषयी का वाटावा? अगदी भूतदया तरी का वाटावी? जर त्याच्याकडे जगाला देण्यासारखं काही उरलं नसेल, तर त्यानं या जगातलं का घ्यावं?"
वीणा अक्षरश ओरडलीच, "भगवान, गप्प हो आता."

"बाबूकाका, किती वेळ लागेल आणखी, तिथे पोचायला?" वीणानं काही वेळानं विचारलं. "ताई, येईलच आता. गाव समोरच आहे." बाबूराव म्हणाले. जरा कचरतच ते पुढे बोलत राहिले. "भगवन्ता राजा, मी बोलू का थोडं? नाही म्हंजे, मी तुमच्या जल्मापासून तुम्हाला बघतोय. या खांद्यांवर खेळलात तुम्ही सम्दे. बाबासायबांची चाकरी करण्यात हयात गेली. त्यांचे उपकार मानावेत तेवढे कमी हैत. पण भगवन्ता, शामला येवडं तोडून नको रे टाकू, राजा. आमच्या घरी आता आईदादा हैती. म्हातारीचे आयुष्यभर चूल फूकून फूकून डोळं गेली. दादांना वयापरमानं जागचं उठवत नाही. मग तुझ्या मतानं आमी त्यांना काशीला सोडून याचं काय? असं नसतं राजा."
"काका, खरं आहे, तुम्ही म्हणता ते. पण तुमच्या आईदादांनी आयुष्यभर खस्ता खाल्या नं तुमच्यासाठी, नातवंडांसाठी? आता होतं नाही तर ते उपकार स्मरायचे, काका"
"राजा, तेच म्हणतोया मी. शामभाऊंच्या उपकाराचा हिशोब कोन करनार? ते देवाघरचे हिशेब. आपन देवानं फकस्त समोर मांडलया ते निभावायचं असतं."
"हं"

पेडगावच्या मनोरुग्णालयासमोर गाडी उभी राहिली होती. वीणाला भगवान म्हणाला, "चला, पोहोचलो एकदाचे. आणतो आता बांधून तुमच्या लाडक्या शामरावांना. फार प्रेम ऊतू चाललंय तुमचं. चला घरी घेऊन आणि करा त्यांचं कल्याण..." गाडीतून उतरून दोघंही दगडी पायऱ्या चढून आत गेले. समोरच्या काॅरीडाॅरला लोखंडी जाळीचा दरवाजा होता. तो बंद होता. शेजारच्या ऑफिसमध्ये नाव सांगून ते दोघे बसले. थोड्या वेळानं आतून एक खाकी कपड्यातला शिपाई आला. "निस्तुरे कोनहैत? हां चला, वीचारे डाॅक्टरांली बलावलय"
"बसा, डाॅक्टर येताल आता"
सरकारी ऑफिसमधल्या एखाद्या कारकूनाचं असावं तशा फायली अन कागदपत्रांनी ओसंडून वहाणाऱ्या टेबलासमोर भगवान आणि वीणा बसले होते. खोलीत वेताची बैठक असलेल्या सरळ पाठीच्या अशा चार-पाच लाकडी खुर्च्या होत्या. पाठीमागच्या भिंतीलगत एक बाकडं होतं. बाकी सगळ्या भिंतींना लाकडी वा लोखंडी बंद कपाटं होती. ही खोली डाॅक्टरची आहे, हे दाखवणारी एकही गोष्ट तिथे नव्हती. काही वेळातच पांढरा डगला चढवलेले डाॅ. विचारे खोलीत आले. सुमारे सहा फुटी, दणकट बांध्याचे डाॅ. विचारे त्या खोलीत अगदीच विसंगत दिसत होते.

विचारे डॉक्टरांनी ओळखदेख करून घेतली. हातात केस पेपर घेतले. "शाम नित्सुऱ्यांना घरी घेऊन जाताय? ठीक आहे. पेशंट इथे आता किती‌ चार महिने झाले का? हं. केस जरा वेगळी आहे. तसं बघितलं तर काही त्रास नाही त्यांचा. पण थेरपीचा फार परिणाम झाला नाहीये हे खरं. घेऊन जा घरी. कदाचित घरच्या वातावरणात काही संवेदना जागृत होतील."
"डॉक्टर, तुमचं काय मत आहे? लॉंग टर्म प्रोग्रेसची‌ शक्यता आहे का?" भगवाननं विचारलं.
"हो, निश्चित आहे. पण ते थेरपीने घडेल असं नसून, ती एक नैसर्गिक प्रक्रिया असण्याचीच शक्यता जास्त आहे. कारण हा एक शॉक आहे. खरं तर तीन-एक महिन्यात शॉकचे इफेक्ट नाहिसे झाले पाहिजेत. इथे तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय. आपण त्यांना हिप्नॉटिक ट्रीटमेंटही दिली आहे." इथे डॉक्टर थांबले. त्यांनी चष्मा उतरवला, आणि डोळे चोळले.
"मला एक शक्यता अशी‌ वाटते की पेशंटची विलपॉवर जबरदस्त आहे. आणि त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाहीयोत. तुम्हाला म्हणून सांगतो. त्यांचं वागणं आमच्या दृष्टीनं फ्लाईट रिस्क या कॅटॅगरीत मोडत होतं. त्यांना घराची ओढ आहे असं सुरूवातीला आम्हाला वाटायचं. पण काल त्यांना घरी जायचं आहे हे सांगितल्यावर त्यांची रिॲक्शन निगेटीव्ह होती." भगवान आणि वीणा एकमेकांकडे बघू लागले.
"असो. तुम्हाला सांगून ठेवलं आहे. आम्ही डिस्चार्ज देतोय त्यांना आत्ता. पण पुन्हा काही‌ वाटलं तर निश्चित फोन करा."
डॉक्टरांनी टेबलावरची बेल मारली. आता आलेल्या शिपायाला, "झाला का नित्सुरे पेशंट तयार?"
"हो डॉक्टर"
"पेशंटचा नाश्ता झालाय. सगळं सामान तयार आहे. तुम्ही चेक करून घ्या. आणि बिल पण तिथेच भरा. आणा त्याला बाहेर." शेवटचं वाक्य शिपायाला उद्देशून होतं.
भगवान वीणाला म्हणाला, "तू शामला घेऊन बाहेर जा. मी सामानाचं बघतो. बाबूकाकांना पाठवून दे आत."
वीणा बाहेर आली तेव्हा लोखंडी दाराच्या आत एका वॉर्डबॉयबरोबर शाम उभा होता. वीणाने आवेगाने "शाम!"अशी हाक मारली. धुवट पांढरे कपडे घातलेला शाम आपल्याच पायांत नजर गुंतवून उभा होता. त्यानं हलकेच तिरक्या नजरेनं बघितलं. "ताई" असा अस्पष्ट उच्चार केला. आणि पुन्हा मान खाली घातली. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वीणाला कळलेच नाहीत. तो आनंद नव्हताच. पण तिरस्कार होता का? का भिती?
तो पर्यंत दरवाजा उघडला गेला होता, आणि शामला हाताला धरून वॉर्डबॉय बाहेर आला होता. तिनं झटकन पुढे होऊन शामचा दंड पकडला. ती वॉर्डबॉयला म्हणाली, "मी नेते आता ह्याला बाहेर. चल, शाम". कुठलीही प्रतिक्रिया न देता शाम तिच्याबरोबर मुकाट्यानं चालू लागला. वॉर्डबॉय परत गेला आणि लोखंडी दरवाजा खण्णखण्ण आवाज करत बंद झाला. आवाराबाहेर गाडी उभी होती. या दोघांना पायऱ्या उतरताना पाहून बाबूराव धावतच आले. "शाम भाऊ, कसं बरं है ना?!"
शामनं वर पाहिलं. "बाबूकाका" एवढंच म्हणाला पण चेहरा मात्र निर्विकार होता.
"काका, भगवान आत आहे त्याला मदत करा." वीणा म्हणाली.
बाबूरावांचा चेहरा पडला होता. शामची परिस्थिती पाहून त्यांना काळजी वाटली असावी असा वीणाला अंदाज आला. "होय" म्हणून बाबूराव आत गेले.
गाडीजवळ पोहोचल्यावर मात्र शामनं गाडीच्या बॉनेटवरून घरच्या कुत्र्याच्या अंगावरून फिरवावा तसा हात फिरवला. मान फिरवून गाडीचं निरिक्षण केलं. हे बघून वीणाला जरा हुरूप आला. "शाम, बरं वाटतंय नं बाहेर पडल्यावर! किती वाळला आहेस रे. कसा दिसतो आहेस तू. घरी गेल्यावर पहिल्यांदा हे कपडे बदलून टाकू या". आता शामनं वीणाकडे बघितलं. त्याच्या चेहेऱ्यावर एक प्रश्नचिन्ह उमटलं होतं, "घरी?"
"हो शाम, आपण घरीच चाललो आहोत. तुला आनंद झालाय ना?" उत्तरादाखल शामनं फक्त मान खाली वळवली.
"हे बघ, घरी जाऊ या म्हणजे तुला पुन्हा बरं वाटू लागेल. आणि मी आहे ना तुझी काळजी घ्यायला! तू खूप चित्र काढ. आपण पिक्चर बघायला जाऊ या. देव आनंदचा नवीन पिक्चर आलंय, नौ दो ग्यारह. गाणी खूप फेमस झाली आहेत. तुलाही आवडतील!"
"नौ दो ग्यारह?"
"हो, नौ दो ग्यारह"
मग शाम स्वतःशीच "नौ दो ग्यारह, नौ दो ग्यारह.." असं पुटपुटू लागला.
"एका तरूण मुलीनं तिच्या घरून पळून जाऊन मजा केलेली दाखवली आहे!"
हे वीणाचं बोलणं संपेपर्यंत बाबूराव सामानाची ट्रंक आणि एक वळकटी घेऊन आले. त्यांनी सामान डिकीत भरलं. तोपर्यंत वीणाने हात धरून शामला मागच्या सीटवर बसवलं आणि स्वतः बसली. भगवान येऊन पुढच्या सीटवर बसला. उसनं हसू तोंडावर आणत मागे वळून तो शामला म्हणाला, "दादा, कसं काय बरं वाटतंय नं?" शामनं तिरक्या नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहेऱ्यावर एक क्षणभरच हास्याची लकेर चमकली! आणि तो म्हणाला, "नौ दो ग्यारह!" भगवाननं वैतागून मान फिरवली आणि तो बाबूरावांना उद्देशून म्हणाला "चला."

उन्हं वाढली होती. रस्ता मोकळा होता. गाडीनं वेग पकडला. न बोलता तिघेही आपापल्या विचारांत गुंग होते. एका बाजूला रेल्वे लाईन आणि दुसऱ्या बाजूला शेतं. "भुस्स.." आवाज करत पुढच्या चाकातली हवा गेली. बाबूरावांनी पटकन गाडी बाजूला घेतली. "पंक्चर झाली का, बोंबला" असा उद्गार भगवानने काढला. "मी बदलतो दादा पटकन" बाबुराव म्हणाले.
गाडी जिथे थांबली होती तो एक उंचवटा होता. आणि कुठलंस आडगावचं रेल्वे स्टेशन लागूनच होतं. वीणा आणि शाम तिकडच्या बाजूला झाडाची सावली होती तिथे गेले. भगवान बाबुरावांना मदत करू लागला.

भपभपभप करत एक कोळशाचं इंजिन कुठल्याशा पॅसेंजरला खेचत स्टेशनात शिरलं आणि दूरच्या टोकाला विसावलं. प्लॅटफॉर्मवर जरा हालचाल झाली. तेवढ्यात इकडच्या दिशेनेही एक आगगाडी शिट्टी देत आली. ते इंजिन अगदीच जवळ उंचवट्याखाली येऊन उभं राहिलं. इकडे शामची चुळबूळ सुरू झाली. वीणाने त्याला विचारलं, "शाम, काय रे?" शामनं अवघडून तिला करंगळी दाखवली. "बरं, जास्त लांब जाऊ नकोस" असं सांगून वीणा गाडीच्या दिशेने जाऊ लागली. शाम उंचवटा उतरत असनाच समोरच्या इंजिनानं निघण्याची शिट्टी दिली, ढीगभर धूर सोडला. भगभगभग करत इंजिनाची चाकं फिरू लागली. तसा शामही पळू लागला. धावतच उतार पार करून त्यानं एक डबा गाठला आणि एका उडीत दरवाजाची दांडी पकडली. बघताबघता आत शिरला, दिसेनासा झाला. आगगाडीही वेग पकडत आपल्या दिशेने धावू लागली.

वीणा मागे वळून पहाते तो शामचा पत्ता नाही! "शाम, शाम" अशा तिच्या हाका ऐकल्यावर बाबूराव आणि भगवान दोघेही बघायला लागले. वीणा धावत सुटली होती त्या उंचवट्याकडे. तिच्या कानात शामचे शब्द घुमत होते, "नौ दो ग्यारह, नौ दो ग्यारह..."

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults