Chatbot : डॉक्टर व रुग्णांचा संवादी यंत्रमित्र ? (१)

Submitted by कुमार१ on 14 February, 2023 - 04:06

गेले काही महिने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या Chatbot या नव्या अवतारामुळे तंत्रजगतात धुमशान चालू आहे. एका संगणक उद्योगाने त्यांची संबंधित प्रणाली बाजारात आणली. त्यानंतर थोड्याच काळात अन्य बलाढ्य उद्योगाने पण या क्षेत्रात उडी घेतली आणि त्याच तोलामोलाचा किंबहुना अधिक सरस नवा अवतार आपण तयार करणार असल्याचे जाहीर केले. सध्या बऱ्याच जणांनी कुतूहलापोटी ही यंत्रणा वापरून पाहिली आहे. त्या अनुभवातून बऱ्याच जणांचे असे मत झाले आहे, की ही यंत्रणा सध्या बाल्यावस्थेत आहे. कालौघात जसा जसा अधिकाधिक अनुभवसंपन्न विदा या यंत्रणेमध्ये भरला जाईल त्यानुसार ती अधिक उपयुक्त आणि विश्वासार्ह ठरेल. या नव्या तंत्रामुळे निव्वळ ‘गुगलशोध’ ही जुनी यंत्रणा लवकरच कालबाह्य होईल असेही भाकीत वर्तवले गेले.

एकंदरीत या विषयावर जोरदार मंथन आणि काथ्याकूट देखील चालू आहे. अशा वातावरणात वैद्यकीय क्षेत्राला मागे राहून कसे चालेल? त्यानुसार डॉक्टरांच्या विविध व्यासपीठांवरून या विषयावर लेखन, वाचन, भाषण आणि चर्चा झडत आहेत. हे नवे तंत्र डॉक्टरांचा विश्वासार्ह मदतनीस ठरेल काय, किंवा रुग्णांचा उत्तम मार्गदर्शक होऊ शकेल काय, असे मुद्दे चर्चेत आहेत. त्याचबरोबर या नव्या तंत्राचे संभाव्य धोकेही चर्चिले जात आहेत. समाजाच्या आजपर्यंतच्या वैज्ञानिक इतिहासात डोकावून पाहिले असता असे दिसेल, की कुठलेही नव्हे तंत्रज्ञान उदयास आले की त्यावर प्रशंसा आणि टीका या दोन्हींचा भडीमार होतो; काहीसा गदारोळही उठतो.

काय करायचंय हे नवं खूळ”, इथपासून ते
“आता यावाचून पर्याय नाही”,
इथपर्यंतची सर्व मते व्यक्त होत असतात.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विविध प्रणाली वैद्यकीय क्षेत्रात या आधीपासून वापरात आहेतच- जसे की, मोबाईल ॲप्स आणि शरीरावर परिधान केलेली छोट्या आकाराची उपकरणे किंवा घड्याळे. या लेखात फक्त Chatbot या नव्या संगणक प्रणालीचा वैद्यकीय क्षेत्रात कसा उपयोग/दुरुपयोग होऊ शकेल याचे विवेचन करतो. या तंत्राची वैद्यकातील उपयुक्तता, त्याच्या मर्यादा, त्यातून उद्भवणारे गोपनीयता आणि नैतिकतेचे प्रश्न अशा मुद्द्यांच्या आधारे या नवतंत्रज्ञानावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

chatbot.jpgपूर्वपिठीका
Chatbot ही ताजी घटना असल्यामुळे तिच्यावरील चर्चा जोरात आहे. परंतु त्या आधीची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला बरेच मागे जावे लागेल. काही दशकांपूर्वी सर्व प्रकारची वैद्यकीय माहिती आंतरजालावर व्यापक प्रमाणावर उपलब्ध झाली. त्याचे तसे सामाजिक सुपरिणाम दिसले त्याचबरोबर बरेच दुष्परिणाम देखील जाणवलेले आहेत. आपले आरोग्य आणि औषधे यासंबंधीचे सामान्यज्ञान सर्वांसाठी सहज उपलब्ध झाले खरे, परंतु त्याचबरोबर नको इतकी माहिती सर्वांसाठी उपलब्ध झाल्याने काही समस्याही निर्माण झाल्या. जीवशास्त्राची शैक्षणिक पार्श्वभूमी सुद्धा नसलेले अनेक जण जालावरील ही माहिती वाचून (डॉकटरांच्या सल्ल्याविना) स्व-उपचारांच्या नादी लागलेले दिसतात. आपल्याला झालेल्या एखाद्या आजारासंबंधी जालावर सहज उपलब्ध असलेली जुजबी किंवा अर्धवट माहिती वाचून डॉक्टरांना नाना तऱ्हेचे प्रश्न विचारून भंडावून सोडणारे लोकही खूप वाढले. अशा लोकांना ‘गुगल डॉक्टर’ ही उपाधी चिकटली. असे गुगल डॉक्टर स्वतःच्या आजारासंबंधी फक्त सामान्यज्ञान मिळवूनच थांबले असते तर बरे झाले असते. परंतु, त्यांनी याही पुढे जाऊन नियमानुसार डॉक्टरांच्या चिट्ठीविना मिळू न शकणारी औषधे एकतर दुकानांमध्ये जाऊन सरळ विकत घेतली किंवा ऑनलाईन पद्धतीने मिळवली. हा प्रकार नक्कीच धोकादायक ठरला. कायदेपालन न करणाऱ्या देशांमध्ये ही अनिष्ट प्रवृत्ती फोफावलेली दिसते.

आता Chatbot या नव्या सुविधेमुळे प्रश्नकर्त्याचा जालशोध घेण्याचा त्रास वाचणार आहे आणि हवे तसे आडवेतिडवे प्रश्न विचारल्यानंतर देखील एक निबंधस्वरूप तयार उत्तर एका फटक्यात मिळणार आहे. त्याचा उपयोग स्वतःसाठी करताना तारतम्य बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

उपयुक्तता
एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. एखाद्या व्यक्तीस झालेले सर्दी-पडसे-अंगदुखी यासारखे किरकोळ त्रास वगळता, कुठल्याही मध्यम स्वरूपाच्या आजारासाठी रुग्णाने प्रत्यक्ष डॉक्टरांची भेट घेणे अत्यावश्यक आहे. रोजच्या जीवनातील व्यग्रतेमुळे काही वेळेस डॉक्टरांची भेट घेणे लांबणीवर पडते. अशा प्रसंगी एक तात्पुरती मदत म्हणून या जालतंत्राकडे पाहता येईल. गरजेनुसार या तंत्राचा रुग्ण आणि डॉक्टर या दोघांनाही मर्यादित उपयोग करून घेता येईल. त्याचा आता स्वतंत्रपणे विचार करू :

१. रुग्णांच्या दृष्टिकोनातून उपयोग
एखाद्या व्यक्तीस जेव्हा काही शारीरिक त्रास होऊ लागतो तेव्हा सर्वप्रथम ती घरगुती उपायांचा अवलंब करते. त्यानंतरही काही फरक न पडल्यास डॉक्टरांना दाखवणे क्रमप्राप्त असते. आपल्याला जी काही लक्षणे उद्भवली आहेत ती जर सुसूत्रपणे आपण Chatbot सुविधेमध्ये विचारली तर त्यातून एक प्राथमिक स्वरूपाचा उपयुक्त सल्ला मिळू शकतो. आता आपल्या संस्थळावर घडलेले एक जुने उदाहरण देतो.

“चांगले युरोलॉजिस्ट सुचवा”

या शीर्षकाचा एक धागा मागे निघाला होता. तिथली चर्चा वाचतानाच मला असे जाणवले, की लघवीचा ‘काहीतरी’ त्रास होतोय म्हटल्यानंतर सामान्य माणूस एकदम युरोलॉजिस्ट अशी पटकन उडी मारतो. ( urine problem ? >>>>> urologist !) ते योग्य नाही. लघवीच्या त्रासासंदर्भात चिकित्सा करणारे तज्ञ डॉक्टर मूलतः दोन प्रकारचे असतात. त्यापैकी नेफ्रॉलॉजिस्ट हे फिजिशियन असतात तर युरॉलॉजिस्ट हे सर्जन. निरनिराळ्या मूत्र आजारांमध्ये अनेक प्रकारची लक्षणे उद्भवतात. त्यामध्ये लघवीला जळजळ होणे, लघवी करताना दुखणे, लघवी वारंवार आणि खूप प्रमाणात होणे किंवा अजिबात न होणे, कंबरेच्या बाजूच्या भागात किंवा ओटीपोटात दुखणे.. इत्यादी, इत्यादी. इथे संबंधित रुग्णाला या लक्षणांच्या आधारावरून तज्ञशोधाची प्राथमिक दिशा समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल :

A. लघवी करताना थोडीशी आग होती आहे आणि अंगात किंचित कसकस वाटते आहे : अशा प्रसंगी नेहमीच्या कुटुंबवैद्यांना दाखवणे इष्ट.
B . कंबरेच्या बाजूच्या भागांमध्ये वेदना आहे, थंडी वाजून मोठा ताप आलेला आहे आणि पायावर/तोंडावर सूज आहे : हा प्रांत नेफ्रॉलॉजिस्टचा असतो.
C . लघवीची धार बाहेर पडताना अडथळा होत आहे किंवा साठी नंतरच्या वयात लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते आहे : हा प्रांत युरोलॉजिस्टचा असतो.

आपल्याला होणाऱ्या विशिष्ट त्रासावरून आपल्याला कोणत्या प्रकारच्या डॉक्टरांची गरज आहे, हे मार्गदर्शन या संवादी यंत्रांमुळे चांगल्या प्रकारे होईल.

आता काही अन्य पातळींवरील उपयुक्तता पाहू. शारीरिक त्रासांपैकी काही त्रास असे असतात की ज्याबद्दल आपल्याला थेट डॉक्टरांशी बोलताना अवघडल्यासारखे होते. डॉक्टरांचे वय, लिंग, बोलायला कडक आहेत की मवाळ आहेत, अशा अनेक गोष्टींमुळे काही वेळेस रुग्णांना डॉक्टरांशी नीट मनमोकळा संवाद साधता येत नाही. जेव्हा रुग्णाला होणारा एखादा त्रास सौम्य ते मध्यम स्वरूपाचा परंतु सुसह्य असतो, तेव्हा थेट डॉक्टरांकडे जाण्याऐवजी जर या संवादी यंत्राचा प्राथमिक उपयोग केला तर तो काही प्रमाणात फायदेशीर होतो. कधी कधी जिवंत व्यक्ती एखाद्या समस्येवरील उत्तर जणू एकमेव असल्यासारखे फाडकन देताना दिसते. परंतु bot यंत्रणेमध्ये असे न होता विविध पर्याय सुचवले जातील.

जननेंद्रियांसंबंधीचे प्रश्न, मूलभूत लैंगिक सुख किंवा असुरक्षित संभोगानंतर असणारी संभाव्य गुप्तरोगाची भीती, यासारखे प्रश्न या यंत्राला आपण मनमोकळेपणाने विचारू शकतो. वैद्यकीय व्यवसायात (पुरुष डॉक्टरांना) महिला रुग्णांसंबंधी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. बाह्य जननेंद्रियांच्या भागात जर काही त्रास होत असेल तर त्यामध्ये दोन मूलभूत शक्यता असतात. एक तर तो त्रास मूत्रमार्गाचा असतो किंवा योनीमार्गाचा. परंतु यासंबंधीची लक्षणे स्पष्टपणे सांगायला बऱ्याच महिला कचरतात. लग्नानंतर बराच काळ प्रयत्न करूनही मूल होत नाही ही समस्या थेट सांगायला सुद्धा बरीच जोडपी अडखळतात. स्त्रीच्या जननेंद्रियाच्या भागातील त्वचेवरील काही समस्या असेल, तर तो स्त्रीरोगतज्ञाचा प्रांत नसून त्वचा व गुप्तरोगतज्ञाचा असतो, ही प्राथमिक समज देखील अनेकांना नसते. अशा प्रसंगी डॉक्टरांकडे जाण्यापूर्वीच जर यंत्रसंवादातून काही प्राथमिक मार्गदर्शन मिळाले तर ते रुग्णाचा आत्मविश्वास वाढवते.

सामाजिक आरोग्याच्या स्तरावर या नव्या तंत्राचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. समाजात विविध प्रसंगी संचारबंदी, टाळेबंदी किंवा मर्यादित संचार यासारख्या परिस्थिती उद्भवतात. नुकतीच आपण महासाथीच्या निमित्ताने काही काळ अशी परिस्थिती अनुभवली. अशा प्रसंगी सर्वांसाठीची मार्गदर्शक आरोग्यतत्वे किंवा महत्वाच्या सूचना bot यंत्रणेच्या माध्यमातून सर्वांना सहज उपलब्ध होतात. ज्या रुग्णांच्या बाबतीत दीर्घकाळ औषधोपचार चालू आहेत त्यांना येणाऱ्या किरकोळ समस्यांचे निवारण घरबसल्या होऊ शकते.

एखादा डॉक्टर स्वतः आजारी पडू शकतो किंवा काही अपरिहार्य कारणामुळे रजेवरही जाऊ शकतो. यंत्राच्या बाबतीत या शक्यता उद्भवत नसल्याने ते एक चांगला २४ X ७ चालू असणारा घरगुती आधार ठरेल. गेल्या दोन वर्षांत यासंबंधीचे अनेक चांगले प्रयोग प्रगत देशांमध्ये झाले आणि तिथले अनुभव आशादायक आहेत. किंबहुना त्यामुळे वैद्यकीय bot प्रकारच्या संशोधनाला चांगली चालना मिळाली. अर्थात रुग्णांनी या आभासी संवादी मार्गदर्शनाचा लाभ घेताना एक गोष्ट मनाशी पक्की ठसवली पाहिजे. BOT यंत्रणा म्हणजे प्रत्यक्ष डॉक्टरला पर्याय नव्हे; डॉक्टरांकडे जाण्यापूर्वीचे ते एक प्राथमिक मार्गदर्शन आहे; आपण आणि डॉक्टर यांच्यामधली ती केवळ तात्पुरती मध्यस्थ आहे.
..

बॉटची डॉक्टरांसाठीची उपयुक्तता आणि अन्य मुद्द्यांचा परामर्श लेखाच्या उत्तरार्धात.
*****************************************************************************************************************************
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान गोषवारा...
Garbage in garbage out हा धोकाही आहे.
Asymptotic आजारांसाठी वैद्यकीय सल्लाच घ्यावा.
सुचवलेल्या औषधांची अॅलर्जी असेल तर समस्या.
सध्या व्हायरल झालेला एक मेसेज
ChatGpt tell me 5+2=?
Ans 7
User:- but my wife says 8 and she is good in math. She is always right.
ChatGpt:- May be. I am not aware of human accuracy. I have limited data upto 2021.
Happy

ही बातमी.
AIs as doctors? ChatGPT clears US medical exam
ChatGPT could score at or around the approximately 60 per cent passing threshold for the United States Medical Licensing Exam (USMLE), with responses that made coherent, internal sense and contained frequent insights, according to a new study.
पूर्ण बातमी
https://news.rediff.com/commentary/2023/feb/11/ais-as-doctors-chatgpt-cl...

धन्यवाद !
* I am not aware of human accuracy.
>>> हा हा हाच !
..
केकू
तो दुवा उघडत नाही. एरर येते.

केकू
तो दुवा आता उघडला . वाचतो.
धन्यवाद !

ChatGpt:- May be. I am not aware of human accuracy. I have limited data upto 2021.>.>
बायकोचे नाव घेतल्यानंतर घाबरला असणार, डीफेनसीव्ह वर गेला.
खर तर त्याने ठामपणे पटवून द्यायला पाहिजे की ५+२=७

(गंमतीने हं)
पुणेरी पाट्यांत भर पडणार.
डॉ.च्या दवाखान्यात
फी तक्ता-
१)आजार सांगून औषध घेणे - ......रु
२) गूगलशोधातून मिळालेली माहिती यांची चिकित्सा आणि औषध . .‌.‌ रु
३)चटगपट'मधून मिळालेली माहिती यावर कन्सल्टींग आणि औषध . . . रु

तो दुवा आता उघडला>>>
खरंय. विद्यार्थ्यांच्या मूलभूत "शिकण्याच्या" प्रक्रियेवर देखील या तंत्रज्ञानाचा परिणाम होणार हे उघड आहे. त्यासाठी काय वेगळे प्रयत्न करावे लागतील हे आता पहावे लागेल.
नामवंत शिक्षण तज्ञांनी देखील कठोर मत व्यक्त केले आहे :

https://www.openculture.com/2023/02/noam-chomsky-on-chatgpt.html

इथ पर्यंत ठीक आहे.
पण डॉक्टर नी दिलेला सल्ला योग्य की अयोग्य हे ठरवण्यासाठी ह्या आधुनिक यंत्र डॉक्टर मित्राचा वापर लोक करणार.
आता पण गूगल वर ची माहिती खरी समजून निर्णय घेणारी लोक आहेत

धन्यवाद !
* पुणेरी पाट्यांत भर पडणार. >>> खरंय ! त्यासाठी एक आधुनिक विषय मिळाला
.....
*गूगल वर ची माहिती खरी समजून निर्णय घेणारी लोक आहेत >>>
होय, तो एकंदरीतच जालावरील व्यापक माहितीचा झालेला दुष्परिणाम आहे.
म्हणूनच तारतम्य महत्त्वाचे.

जीवशास्त्राची शैक्षणिक पार्श्वभूमी सुद्धा नसलेले अनेक जण जालावरील ही माहिती वाचून (डॉकटरांच्या सल्ल्याविना) स्व-उपचारांच्या नादी लागलेले दिसतात

हे लेखातील वाक्य खूप खूप महत्वाचे आहे.
मी असे अनेक नमुने बघितले आहेत आणि मृत्यू समोर दिसल्यावर च त्यांचे डोळे उघडले आहेत.चूक कळून आलेली आहे.
पण वेळ कोणासाठी थांबत नाही.आणि रिव्हर्स पण होत नाही
किमान एका डॉक्टर वर तरी नितांत विश्वास ठेवणे गरजेचे आहे.
आणि त्यांच्या मतावर बिलकुल अविश्वास नको

चाट.
एकच उत्तर देते तुमच्या प्रश्नांचे.
गुगल सर्च मध्ये अनेक उत्तर असतात.
हा मुख्य फरक आहे.
चाट .
नी दिलेले उत्तर खरेच आहे हे ठरवण्यासाठी परत गूगल सर्च करून बाकी अपेक्षित उत्तर पण शोधावी च लागतात.

बरोबर.
सध्या आपण गुगलशोधाला सरावलो असल्याने आपल्याला तसे वाटणे साहजिक आहे. कालांतराने chatbot मध्ये सुधारणा झाल्यावर अजून काही वेगळे पाहायला मिळू शकेल.

एका लेखात असे वाचले की गुगलशोध ही कल्पना पूर्णपणे रद्द होणार नाही.
शोधपर्याय अधिक विश्लेषण केलेले सर्वोत्तम उत्तर असे एकत्रित देणारे एक प्रारूप तयार होऊ शकेल.

लोकांचा फायदा पण होईल.
हळू हळू हे तंत्र प्रगत होणार.
लक्षण datail wise, गरज असेल तिथे फोटो अपलोड करावे लागतील.
X Ray, MRI, Citi स्कॅन ह्यांचे रिपोर्ट.
अशी सविस्तर माहीत घेवून.
Chat gpt जवळ जवळ अचूक निदान करू शकेल.
कारण त्याच्या मदतीला अतिशय तज्ञ डॉक्टर ची टीम असेल.
डॉक्टरी व्यवसाय वर अतिशय गंभीर परिणाम नक्कीच भविष्यात होणार आहे

अवांतर लिहितोय: माझ्या एका मित्राने ChatGPT द्वारे PhD साठी Literature Review केलाय आणि कुणी स्वतः केल्यासारखा उत्तम झाल्याचे सांगितले.

१. Chat gpt जवळ जवळ अचूक निदान करू शकेल. >>> याबद्दल मी उत्तरार्धात अधिक लिहीन
...

२. PhD साठी Literature Review >>>अच्छा ! चांगला अनुभव.

मी ही गेल्या महिन्याभरापासून चॅटजीपीटी वापरून पहातोय. वैद्यकीय गोष्टींसाठी नाही, तर माझ्या नोकरीतल्या मला माहित नसलेल्या गोष्टी / प्रसंगांबद्दल जाणून घेण्यासाठी / शिकण्यासाठी. पण प्रत्येक प्रश्नाचं एकाच एका ठोकळेबाज पद्धतीनं उत्तर येतं (अर्थात ते यांत्रिक आहे म्हणुनच), त्यातून नवं काही सापडलं नाहीये. त्यामुळे जालावर उपलब्ध असलेली माहिती एका ठिकाणी, निबंधानुसार वाचून आपल्या प्रश्नांची उत्तरं न मिळता, केवळ अजुन एक डेटासेट तयार होतोय, एवढंच मला जाणवलं. ती वाचून त्यानुसार आपल्या प्रश्नाचं प्रॅक्टीकल उत्तर आपल्यालाच मिळवावं लागतं असा माझा अनुभव (जे की आपण आजही करतोच की!)
चॅटजीपीटी गोष्टींचं निदान करू शकेल इतकी प्रगती व्हायला, अजून खूप वेळ लागेल. कारण त्यासाठी त्याला प्रत्येक केसचे वेगवेगळे पॅरामीटर्स उपलब्ध असतील, तरच तो तितक्या अचुकतेपर्यंत पोचेल. त्याला इव्हेंट्स् माहिती असतील, पण त्यातले वेरिएशन्स माहिती झाल्याशिवाय (हिस्टॉरिकल डेटा अचुक माहिती असल्याशिवाय) तो अचुक उत्तर देऊ शकणार नाही हा माझा अंदाज.

Chatgpt वरच्या काही कविता पहिल्या त्या मात्र अस्सल वाटाव्या एवढया चांगल्या आहे. (अर्थात माझा अनुभव फारच मर्यादित आहे) पण तरीही काही क्षणात दिलेल्या विषयावर एखादी नवीन कविता पाडणं, ती सुद्धा विशेष शैली , आकर्षक मांडणी, रोचक शब्द असणारी..भावनाप्रधान वगैरे...! हे प्रोसेसिंग कसं होतं समजलं नाही...

आपल्या प्रश्नाचं प्रॅक्टीकल उत्तर आपल्यालाच मिळवावं लागतं असा माझा अनुभव (जे की आपण आजही करतोच की!) >> +११

>>> यात प्रगती होऊन पुढची आवृत्ती आली की बघूया अजून काय मिळतेय ..

हे प्रोसेसिंग कसं होतं समजलं नाही...
>>> ते यातले तंत्रज्ञच सांगू शकतील. माझ्या अल्पवाचनानुसार (https://www.aksharnama.com/client/article_detail/6576)

हे असे काहीतरी दिसतेय :
मेंदूत असलेल्या मज्जातंतूंसारखे कृत्रिम मज्जातंतूंचे जाळे (artificial neural network) वापरून माहितीसाठ्यामधून (data) उच्च प्रतीचे (एखादा माणूस देईल तसे) उत्तर मिळवले जाते.

चाट gpt ही प्रथम अवस्था आहे.
शिक्षण मधील नर्सरी च समजा.
हा एक मोठा उद्योग होवू शकतो.
हक्काचे ग्राहक बौद्धिक सुरक्षा कायद्याने.
नो प्रतिस्पर्धी.
पहिले आकलन,नंतर विश्लेषण,नंतर त्या माहितीचे अचूक पण.
हे सर्व प्रोसेस होवून सत्य ती माहिती चाट gpt देणार.
माहिती ती पण खरी मिळणे ही जगभरात मोठी समस्या आहे.
.माहिती लपवणे,दिशाभूल करणे हा मानवी स्वार्थी स्वभाव आहे.
साधे जातीचा दाखला कसा मिळवावा ह्याची पण अचूक माहिती आज उपलब्ध होत नाही..
खरी आणि अचूक माहीत हा मोठा व्यवसाय आहे..
सल्ले देणे ते पण अचूक हा पण मोठा व्यवसाय आहे.
अनेक रोजगार ह्या मुळे जातील हे नक्की.
आणि ते त्या संबंधित लोकांच्या कर्माची फळ असतील
वाईट वाटण्याचे काही कारण नाही
स्किल चे काम करणारे त्यांच्या वर काही फरक पडणार नाही.
आणि स्किल work करणारे यंत्र निर्माण करणं खूप खर्चिक आहे .साधा गाडी चा ड्रायव्हर निर्माण कारणे पण किती तरी कठीण आहे,खर्चिक आहे..
त्यांना भीती नाही

>>>स्किल चे काम करणारे त्यांच्या वर काही फरक पडणार नाही.>>> नवी स्किल्स शिकावी लागतील.

वाक् चातुर्य ही एक कला च आहे.
मार्केटिंग साठी माणसचं लागणार.
विमा एजंट असतील किंवा बाकी तिथे माणूस च लागणार.
ते काम चाट gpt नाही करू शकणार.
कस्टमर केअर हे क्षेत्र मात्र माणसाच्या हातून गेले समजा.
वकिली सल्ला, डॉक्टरी सल्ला ह्या वर पण परिणाम होणार.

, refuses to pay surgeon
>>>
या प्रकारचे किस्से आता वाढत्या प्रमाणात ऐकायला मिळतील. वृत्तपत्रीय बातम्यांची शहानिशा पण करावी लागेल.
या विषयाच्या डॉक्टरांच्या बाजूचा
ऊहापोह लेखाच्या उत्तरार्धात करणार आहे.

Pages