वादळला हा जीवनसागर - कथा अभिलाष टोमीची

Submitted by Abuva on 8 February, 2023 - 11:52
GGR tracker for Abhilash Tomy

अभिलाष टोमी, नाव ऐकलंयत?
नसेल तर थोडक्यात ओळख सांगतो:
कमांडर (निवृत्त) अभिलाष टोमी, भारतीय नौसेना, कीर्ति चक्र, नौसेना पदक.
"सिंगलहॅंडेड नॉनस्टॉप सर्कमनॅव्हिगेशन अंडर सेल" करणारा हा पहिला भारतीय. म्हणजे एकहाती विनाथांबा शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला भारतीय. नौसेनेत सेवारत असताना त्यानं हा भीमपराक्रम केला होता. त्यावेळी भारत सरकारने कीर्तीचक्र देऊन त्याचा सन्मान केला होता.

तर हा बहाद्दर अभिलाष आपल्या छत्तीस फुटी शिडाच्या नौकैवर स्वार होऊन एका शर्यतीत भाग घेत आहे.‌ सध्या पॅसिफिक महासागरात आहे, . आत्ता तिथे ताशी ७० किमी वेगानं वादळी वारे वहात आहेत. वाऱ्याचे झोत कधी कधी सुमारे ९० ते १०० किमी वेगाचं असतात. सुमारे नऊ मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. नऊ मीटर म्हणजे साधारणतः तीन मजली इमारतीएवढ्या! क्षणभर डोळ्यासमोर चित्र आणा. दर ९ सेकंदांनंतर येणारी सुमारे तीन मजली‌ लाट बोटीला २०-२५ फूट उंच उचलणार आणि लाटेच्या डोक्यावरून खाली फेकणार. आख्खी बोट थरथरणार. तोपर्यंत पुढची लाट तिला उचलायला तयार. येणारी‌ प्रत्येक लाट जणू नावेचा घास बनवून ग्रहण करण्यासाठीच उसळते आहे. पण नाव अजून शाबूत आहे! येणाऱ्या प्रत्येक लाटेवर स्वार होते आहे. पण लाटेनं उचलली की हापटली. की नऊ सेकंदात पुन्हा उचलून पुन्हा आपटली. पुन्हा वर, पुन्हा खाली, आणि तडाखा! जणू कालिंदीच्या डोहात कृद्ध कालियासर्प फण्यामागून फण्यांचे वार कृष्णावर करतो आहे! हे कालियामर्दनाचं तांडव चालू असताना ताशी शंभर किलोमीटर वेगाने पिसाट वादळवात रोरावत आहे. असा वारा की लाटांवरून उडणारे तुषार हे जणू अर्जुनाने केलेला शरवर्षाव आहे. उघड्या अंगावर बरसला तर शरपंजरी पडण्याचीच वेळ यावी! घोंघावता वारा नौकेला झटतो आहे, लोटतो आहे. अहो शिडं तर केंव्हाच उतरवली आहेत अभिलाषनं. या वाऱ्यात मुख्य शिड फडकत ठेवलं तर बोटीचा कधीच कपाळमोक्ष व्हायचा!
तरीही या वाऱ्याच्या आणि लाटांच्या समरात एक भली मोठी लाट रोरावत आली आणि नौकेला एक तडाखा देऊन भुईसपाट करती झाली! महासागरात कुठली भुई काय अन् सपाट कसली, नौकेला आडवं पाडून, पाण्याखालती लोटून गेली. इतर लाटा पश्चिमेकडून येत होत्या पण ही आली उत्तरेकडून. एका नियमीत पश्चिमेकडून येणाऱ्या लाटेवरून नौका खाली घसरत असताना तिला एका बाजूने वेगात येणाऱ्या लाटेनं आपल्या घट्ट पकडीत घेतलं. जबरदस्त ताकदीनं फटका देत कडेवर आडवं केलं. कुशीवर आडव्या झालेल्या नौकेला असं काही ढकलून रेटलं की साठ फुट उंचीची डोलकाठी पूर्ण पाण्याखाली गेली. लाटेचा जोर असा होता की आख्खी लाट बोटीवरून निघून गेली. कित्येक सेकंद, नव्हे मिनिटभर बोट संपूर्णपणे पाण्याखाली होती! पण जशी लाट ओसरली, तशी ही एका कडेवर आडवी झालेली भली बोट, आपसूक हळूहळू पुन्हा सरळ झाली! नशीब बलवत्तर होतं अभिलाषचं. एकदा नाही, हे गेल्या चोवीस तासांत दोनदा घडलंय, दोनदा. छोटं वादळासाठी म्हणून एक शीड लावलं होतं, दिशा देण्यासाठी. त्याच्या या झंझावातात चिंध्या चिंध्या झाल्या आहेत.
गेले छत्तीस तास या निसर्गाच्या प्रलयंकारी अवताराशी झुंज देतोय आपला बहाद्दर अभिलाष. विचार करा, चोवीस तास एका रोलर कोस्टरमध्ये फिरतोय, वर, खाली, वर, खाली, वर...! एकटा आहे, एकदम एकटा. पालथी झाल्यावर बोटीत पाणी घुसलंय. घुसणारंच! सगळं ओलं झालंय, सगळं सामान इतस्ततः परसरलं आहे. बॅटरीचा का फ्यूजचा प्रॉब्लेम आल्यानं लाईट जातायत-येताहेत. तापमान आहे १०च्या आसपास, कडाक्याची थंडी. पायाखाली बोट क्षणभर स्थिर नाही. कुठे तरी धरल्याशिवाय ना बसता येत, ना झोपता येत, ना साधं उभं रहाता येत. झगडून, झगडून थकला असेल आता.
पण बाहेर थैमान चालूच आहे. आणखी दहाबारा तास तरी वादळ चालूच रहाणार आहे. मग निवळेल हे वादळ... आणि मग पुढचा त्रास सुरू होणार. वादळ निघून जातं. वारं कमी होतं पण नुसत्याच लाटा उसळत रहातात. आणि मग त्यांना तोंड द्यायला नौकेला वेग लागतो, पण त्यासाठी पुरेसा वारा नसतो. त्या लाटांचा आवेग कमी होईपर्यंत नौका कमालीची हिंदकळत असते. हताश होऊन पहाण्याव्यतिरिक्त नाविकाच्या हाती काही नसतं. अभिलाष या सगळ्यांशी झुंजतोय, झुंजणार आहे. हजार मैलांच्या परिसरात कुठेही जमीन नाही, कुठेही बेट नाही, कुठल्याही खंडाचा किनारा नाही. आसरा घ्यावा कुणाचा? तिथे काही घडलं तर त्याचं रक्षण करायला कोणीही पोहोचू शकणार नाहीये. कोण आहे तिथे? तर सुमारे शंभर नॉटिकल माईल्सवर (म्हणजे सुमारे २०० किलोमीटरवर) त्याच्याच स्पर्धेत भाग घेतलेली क्रिस्टेन नावाची एक स्पर्धक आहे! या महावादळानं तिला थोडा कमी त्रास दिलाय, पण तिलाही छळलं आहेच. बस, असलाच तर तोच काय तो आधार. दोघांचाही एकमेकांना...
ही कथा नाही कल्पना नाही! तर या क्षणी अभिलाष धैर्याने झुंजतोय, तोंड देतोय सागरी तूफानाला.

या थराराची बातमी वाचायची असेल तर -
करा फॉलो वेबवर: https://goldengloberace.com/
नकाशावर बघा: https://goldengloberace.com/live-tracker/
ट्विटरवर: @ggr2022
द्या त्याच्या पत्नीला शब्दांचा आधार ट्विटरवर: @Urmimala_A
आणि मायबोलीकरांनी उत्साह दाखवला, तर देईन मी आणखी माहिती इथेच!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अभिलाषला शुभेच्छा आणि सलाम....
कोलंबसाचं गर्वगीत आठवलं...
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला.

नुकतंच वाचलं जेसिका वॅटसन Australia वयाच्या 16व्या वर्षी सर्कमनॅव्हिगेशन केलं.
https://en.m.wikipedia.org/wiki/Jessica_Watson#:~:text=Jessica%20Watson%...(born%2018,at%20the%20age%20of%2016.

नुकतंच वाचलं जेसिका वॅटसन Australia वयाच्या 16व्या वर्षी सर्कमनॅव्हिगेशन केलं. >> दत्तात्रय साळुंके होय. नुकताच True Spirit ही या सर्कमनॅव्हिगेशन ची कथा सांगणारा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. अवश्य बघावा!
आणखी एक गंमतदार बाब: पहिले भारतीय सोलो सर्कमनॅव्हिगेटर कमांडर (नि) दिलीप दोंदे आणि जेसिका साधारणतः एकाच सुमारास पॅसिफिक महासागराच्या या भागात होते (केप हॉर्न) जिथे आत्ता अभिलाषला या वादळाचा सामना करावा लागला.
बाय द वे, आता 'दोन' पहिले भारतीय सर्कमनॅव्हिगेटर कसे असा प्रश्न पडला तर: क. दोंदे हे सोलो सर्कमनॅव्हिगेशन अन्डर सेल करणारे पहिले. पण त्यांनी चार ठिकाणी थांबून मुक्काम केला. क. अभिलाष हा नॉनस्टॉप (कुठेही न थांबता) सर्कमनॅव्हिगेशन करणारा पहिला भारतीय.

धनवन्ती , खरं आहे.
हा मेसेज पाठवलाय अभिलाषनं काल -

My birthday party is at the milli=bar. All are welcome. Get knockdown kit along@

परवा त्याचा वाढदिवस होता! 'बार' चा रेफरन्स हा की जेव्हा जोराचे वारे वहात असतात तेव्हा हवेचं प्रेशर कमी होत असतं, जे मिली'बार' या एककात मोजतात.
आणि बोट जेव्हा पाण्याखाली जाते त्याला नाॅकडाऊन अशी संज्ञा आहे.
जीवावर बेतलं असतानाही विनोदबुद्धी जागृत ठेवणं हे कल्पनेपल्याडचं आहे.
माणसं कुठल्या मुशीतून घडली असतील बघा!

Abuva
आभारी आहे...True Spirit जरुर पाहील . तुम्हाला या सर्वांची खडानखडा माहिती आहे...

हे सर्व पूर्वीच वाचलं आहे. दुसऱ्या फेरीसाठीची होडी ( होय.कारण शिडावर चालणारी ) रत्नाकर
दांडेकर यांनी बनवली होती. आणि वादळात सापडली तरीही बुडणार नाही अशी. पण चोवीस तास होडीच्या आत वादळात आपटत राहून त्याच्या पाठीच्या मणक्यांच्या दुखापत झाली होती. मग ही आताची तिसरी फेरी आहे काय?

लहानपणी श्री. म. माटे ह्यांची "जगाचे प्रवासी" नावाची पुस्तके वाचली होती. त्याची आठवण झाली.
त्या "प्रवाश्यात" हा आपला तद्दन भारतीय प्रवासी. अभिमान वाटावी अशी गोष्ट!

मग ही आताची तिसरी फेरी आहे काय? >> Srd, होय. शस्त्रक्रिया करून जोडलेल्या मणक्यांसहित आता अभिलाष पुन्हा सोलो सर्कमनॅव्हिगेशन शर्यतीत भाग घेतो आहे. एका सफल आणि एका अपूर्ण राहिलेल्या प्रयत्नानंतर हा तिसरा प्रयत्न आहे.

शिडाच्या होडीचे नौकानयन कसे असते आणि कोणती उपकरणे वापरू शकतो तसेच नियम काय असतात हे जाणून घ्यायचे आहे. सोलो म्हणजे एकट्यानेच होडीचा मार्ग कसा राखतात,झोप,जेवण कसे केव्हा सांभाळतात हे कळेल का?

_/\_

Srd हे कुतूहल एके काळी मलाही होतं. १९९६ साली‌ इंटरनेट हातात आलं आणि तेंव्हापासून मी सेलिंग या विषयाचा पाठपुरावा करू शकलो आहे.

GGR 2022 चा विचार करू या. (https://goldengloberace.com/ या साईटवर मी खाली देत असलेली बहुतेक माहिती उपलब्ध आहे)
ही स्पर्धा १९६८ साली झालेल्या अशाच नॉनस्टॉप पृथ्वीप्रदक्षिणेची पुनरावृत्ती आहे. या स्पर्धेचे नियम फारच वेगळे आहेत. १९६८ साली उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान वापरूनच ही सेलिंची प्रदक्षिणा करायची आहे! म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा घटक - जी.पी.एस. हा वापरायला बंदी आहे! त्यांना सेक्स्टांट (https://en.m.wikipedia.org/wiki/Sextant) वापरून खगोलिय ग्रह-ताऱ्यांच्या आधारानं नॅव्हिगेशन करावं लागतं. इंटरनेट नाही, ट्विटर नाही, साधी इमेल करता येत नाही! फारच वेगळ्या विचारानं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. माझ्यामते या स्पर्धेचा रिस्क इंडेक्स फारच जास्त आहे. ज्या नकाशाचा फोटो काल मी लेखाबरोबर टाकला, ती वेदर इन्फॉर्मेशन अभिलाष वा‌ इतर स्पर्धकांना मिळत नाही. तुम्हीआम्ही गादीगिर्द्यांवर लोळत ते नकाशे बघू शकतो. पण जे स्पर्धक त्या वादळाचा सामना करत असतात त्यांना मात्र त्रोटक माहितीवर गुजराण करावी लागते. पण- या बोटींवर एक लाईफराफ्ट असतो. जो अनिवार्य परिस्थितीत वापरता येतो - म्हणजे जेव्हा बोट सोडून त्याचा आश्रय घ्यावा लागतो त्यावेळी वापरण्यासाठी इमर्जन्सी जी.पी.एस. आणि सॅटेलाईट फोन/कॉम्स असतात.

आता त्यांची दिनचर्या: एकल स्पर्धा असल्यानं सगळीच नौकानयनाची जबाबदारी या एकाच स्पर्धकावर असते. तर त्यांना सलग झोप घेता येत नाही. त्यातही जेव्हा किनाऱ्याजवळ असतात, किंवा शिपिंग लेन मध्ये असतात तेव्हा तर फारच काळजी घ्यावी लागते. पण स्पर्धेचा मार्ग हे लक्षात घेऊन आखला जातो. तरीही साधारणतः वीस मिनिटे ते एक तासाची एका वेळी झोप घेतली जाते - पॉवर नॅप. पण हे सगळं त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. सेल बोटीवर असंख्य व्यवधानं बाळगावी लागतात, त्यामुळे हे स्पर्धक सतत कार्यमग्न असतात. आता यात त्यांना सगळ्यांत जास्त मदत होते ती विंडव्हेन या ऑटोपायलट सदृश उपकरणाची. हवेची दिशा आणि आखलेला मार्ग या दोन्हींच्या मेळ या उपकरणातून साधला जातो. त्यामुळे स्पर्धकाला हातात सुकाणू घेऊन मार्गक्रमणा करावी लागत नाही. पण याला निश्चितच मर्यादा आहेत. सगळ्या मुख्य दिशा बदलणं काम सेलरलाच करावं लागतं. या विंडव्हेनचे अनेक प्रकार आहेत. पण GGR मध्ये परत १९६८चं तंत्रज्ञान वापरण्याची सक्ती आहे!
जेवणाची सोय बोटीवर असते. त्याला गॅली असं म्हणतात. वेळ असतो, तेव्हा ही लोकं व्यवस्थित स्वयंपाक करू शकतात. ताज्या पदार्थांची अर्थातच वानवा असते! पण मुख्यत्वेकरुन फ्रीझड्राईड प्रकारचं अन्न हे स्पर्धक खातात. थोडक्यात फक्त गरम पाणी मिसळायचं आणि खायचं. काही काही रेसेस मध्ये सेलरचं वजन तीस-एक किलोने कमी झाल्याची उदाहरणं आहेत. पिण्याचे पाणी हा आणखी एक त्रासदायक प्रकार आहे. त्यांच्याकडे ड्रिंकिंग वॉटर जनरेटर असतो. पण मी हा खराब होण्याची अनेक उदाहरणं ऐकली आहेत. त्यामुळे पावसाचं पाणी साठवून ठेवावं लागतं! किंवा त्यावर अवलंबून रहावं लागतं.

सांगण्यासारखं खूप आहे! फार वेगळं फार आगळं जग आहे या पृथ्वीप्रदक्षिणा करणाऱ्या नाविकांचं!

तुमच्या माहितीसाठी: दी ओशन रेस नावाची अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात येणारी एक पृथ्वीप्रदक्षिणा घालणारी सेलिंग ची स्पर्धा आत्ता चालू आहे. भूमध्य समुद्रातील स्पेनच्या किनाऱ्यावरील अलिकांटी नामक बंदरातून सुरू झालेली ही रेस, आज उद्यात केप टाऊन, साऊथ आफ्रिका इथे मुक्कामासाठी पोहोचेल. ही मात्र सोलो रेस नसून क्रूड, म्हणजे ५-६ सेलर्सची टीम घेऊन करण्याची रेस आहे. खरं तर सामान्य माणसांसाठी ही रेस खूपच रोमांचकारी आहे. कारण या रेसचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. या टीम मध्ये एक मेंबर हा फक्त रिपोर्टर म्हणून असतो. म्हणजे विचार करा! त्यामुळे प्रत्येक बोटीचं, प्रत्येक महत्त्वाच्या घटनेचं सर्वांगाने चित्रिकरण होतं. फोटो, व्हिडिओ, ड्रोनने काढलेले व्हिडिओ, काही विचारू नका!
https://www.theoceanrace.com/

तुम्हाला जर खरी कथा वाचायची असेल तर कॅ. दिलीप दोंदे यांचं The First Indian (https://www.thefirstindian.com/) नावाचं पुस्तक आहे. त्यात दोंदे सरांनी उत्तम वर्णन केलं आहे.

धन्यवाद @Abuva .
यात साहस अधिक आहे. आपण वाचतो की अरब व्यापारी इसनापूर्वीही केरळच्या किनाऱ्याला येत होते मसाले, लाकूड,बांबू,काथ्याचे दोर न्यायला. तेव्हा त्यांची जहाजं वेताची बांधलेली असत. रात्री ताऱ्यांच्या मार्गदर्शनाने प्रवास करत. वाळवंट आणि समुद्राचे राजे होते ते.

@Srd खरं आहे. हिंदुस्थानचा सागर सफरींचा, नाविक इतिहास (maritime history) हा आपल्या समाजमनातून, सामुहीक आठवणीतून हद्दपार झालेला विषय आहे. अरब आणि आफ्रिका खंडाशी जो व्यापार होत होता, रोमन व इजिप्शियन साम्राज्याशी जो समुद्रमार्गे संपर्क होता त्याच्या आठवणी का जतन झाल्या नाहीत हे उमगत नाही.
या नौकानयनाच्या बळावर कोलंबसानं अमेरिका शोधली, वास्को डी गामा भारतात पोहोचला. या नाविकबळावर मूठभर युरोपियनांनी शतकानुशतके जगावर आधिपत्य भोगलं.
त्याच आपल्या पूर्वजांच्या नाविककौशल्याची पावती म्हणून वेगवेगळ्या कालखंडांत पश्चिम किनाऱ्यावर मुझिरिस, नालासोपारा, लोथल, धोलवीरा इथे बंदराचे उल्लेख आणि अवशेष सापडतात. याच बळावर दक्षिणेतल्या राजांनी आग्नेय आशियात साम्राज्ये स्थापन केली होती. पण मग ही सागराला गवसणी घालणारी परंपरा कधी आणि कशी नष्ट झाली? आणि आपण हा विषय पूर्णपणे विसरलो कसा? गौडबंगाल आहे!

अभिलाषला शुभेच्छा आणि सलाम..

सांगण्यासारखं खूप आहे! फार वेगळं फार आगळं जग आहे या पृथ्वीप्रदक्षिणा करणाऱ्या नाविकांचं! >>> धन्यवाद Abuva अनोख्या स्पर्धेच्या माहिती बद्दल..

तुम्हाला जर खरी कथा वाचायची असेल तर कॅ. दिलीप दोंदे यांचं The First Indian (https://www.thefirstindian.com/) नावाचं पुस्तक आहे. त्यात दोंदे सरांनी उत्तम वर्णन केलं आहे. <<<<>>>>>> खूप छान पुस्तक आहे हे.
the spirit नक्की बघणार. साईटही फॉलो करणार. थॅन्क्स माहितीबद्दल.

अतिशय रोमांचकारी आणि आनंदमयी उपक्रम! शुभेच्छा !

YouTube वर "sailboat life" search केले की अशी सफरच काय, पूर्ण आयुष्यच शिडाच्या बोटीमधून सफर करणाऱ्या मंडळींचे विडिओ पहायला मिळतात.
पण एकट्यानेच हे करणे फारच खडतर आहे!

खतरनाक आहे हे
या वेडेपणावर पिक्चर बनायला हवा..

True spirit कालच पहिली...फारच छान...फक्त १६ वर्षाच्या मुलीचं धाडस फारच कमालीच...तिला सपोर्ट करणारी तिची फॅमिली विशेषतः तिचे आई वडील..hats of to them..
आपण मुलांना फार आणि फारच protective वातावरणात वाढवतो हे फार प्रकर्षानं जाणवलं....

@Ashwini_९९९:
जेसिकाचं धैर्य अतुलनीय आहेच. पण ते घडवून आणण्यासाठी एका वेड्या ॲडव्हेंचररची कशी मदत झाली ते वाचा:
https://mcintyreadventure.com/why-i-gave-pink-lady-to-jessica-watson/
आणि त्या इसमानं किती सहजतेनं हे घडवून आणलं बघा!
हाच डॉन गोल्डन ग्लोब रेसचाही प्रवर्तक आहे.

अभिलाष नवनव्या आव्हानांचा सामना करतोच आहे.
त्या वादळाला यशस्वीरित्या तोंड दिल्यानंतर त्याची केप हाॅर्नच्या दिशेने प्रगती चालू होती. पण वेगाने वहाणारे वारे असल्याने तो दक्षिण अमेरिकेतील चिली या देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने ढकलला जात होता. त्या रेट्यामुळे अतिवापर होऊन त्याच्या नावेच्या ऑटोपायलटचा (सुकाणूचा) एक भाग तुटला! त्यातच त्याचं डोकं कशावर तरी आपटलं असा सेफ्टी म्हणून स्पर्धेच्या आयोजकांना त्यानं फोन केला. काळजीचं कारण नाही असंही सांगितलं आहे. पण त्या सगळ्या भानगडींत त्याला सोसाट्याच्या वाऱ्यांत आपली दिशा बदलता येत नव्हती.
आता त्यानं सुकाणूची काही जुजबी दुरूस्ती केली आहे. आणि आताच बघितलेल्या नकाशात त्याची दिशा बदललेली दिसते आहे. अपेक्षित दिशेच्या विरुद्ध दिशेने जरी त्याचा प्रवास चालू असल्याचे दिसत असले तरी, चिलीच्या धोकादायक किनाऱ्यापासून दूर जाणे त्याला हितावह आहे. त्याच्या या प्रगतीमुळे जाणकारांनी जरा समाधान व्यक्त केले आहे.

संकटांमागून येणाऱ्या संकटांना तोंड देणाऱ्या अभिलाषची मानसिक तयारी, कणखरता, आणि दृढ निश्चय याचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. निसर्गाने मांडलेल्या मयसभेसम प्रमेयांना, यंत्राच्या मोडतोडीतून उभ्या ठाकणाऱ्या राक्षसी आव्हानांना थोकड्या मानवी मती-शक्ती-बुद्धीच्या बळावर तोंड देणाऱ्या अभिलाषची ही दिसांमाजी घडणारी, उलगडणारी कथा अत्यंत रोमहर्षक आणि तितकीच प्रेरणादायी आहे.

त्याच बरोबर, त्याची स्पर्धक क्रिस्टेन हिनं केप हाॅर्न हे, एकल सेलिंग मधलं एव्हरेस्ट समजले जाणारे, दक्षिण अमेरिकेच्या भूमीचे दक्षिणतम टोक आता पार केले आहे. तिचंही करावं तेवढं कौतुक कमीच आहे.

काल मध्यरात्री अभिलाष टोमी याने केप हॉर्न पार केले! अनेक आघातांतून, अपघातातून सावरत, आपल्या क्षतिग्रस्त नौकेला तात्पुरती मलमपट्टी करत अभिलाषनं ही कामगिरी केली आहे. गिर्यारोहणात एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणे या कामगिरी इतकीच नौकानयनात अवघड मानले गेले आहे केप हॉर्न ला वळसा घालणे!
आता यानंतर सुमारे सात हजार नॉटिकल माईल्स पार करून फ्रान्सच्या पश्चिम किनाऱ्यावरील ल साब्ल दोलों या बंदरात पोहोचणे हा या युद्धसम स्पर्धेचा पुढचा आणि शेवटचा टप्पा. सर्वसाधारणपणे केप हॉर्न पार केल्याच्या उभारी वर हा टप्पा पार करणं सोपं मानलं जातं. अर्थात, असीम सागराच्या लहरींपुढे सोपं काहीच नाही!

Pages