मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … ) भाग -११

Submitted by Sujata Siddha on 8 February, 2023 - 05:55

https://www.maayboli.com/node/82982 -10

मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … )
भाग -११
आईकडे काही दिवसांसाठी आलेली मी महिना होऊन गेला तरी गेले नाही त्यामुळे साहजिकच सासरी सगळ्या नातेवाईकांच्या मध्ये चर्चा सुरू झाली ,माऊ आणि निशी एकाच शाळेत होत्या , त्यामुळे दोघींची भेट होत असे , त्यामुळे निशी जरा आता घरी कधी जायचे असे प्रश्नचिन्ह चेहेऱ्यावर घेऊन येत असे . मानस चे ईतर नातेवाईक म्हणजे काका , चुलत भाऊ वैगेरे नातेवाईक अतिशय सुस्थितीत, उच्चभ्रु आणि समाजात वजन असणारे होते , फक्त आमच्या घरी आमच्या मोठ्या दिरांमुळे थोडं बऱ्यापैकी नाव खराब झालं होतं (वहिनींच्या भाषेत बद्दू झालं होतं ) आता त्यात माझी भर नको असं बहुधा मानस ला वाटलं असावं किंवा मी एकाएकी निघून गेल्यामुळे तो खडबडून जागा झाला असावा , काहीही असेल पण एक दिवस तो ताईच्या घरी गेला ,आणि त्याने पाया पडून तिची माफी मागीतली , अर्थात ताईला याची सवय नसल्यामुळे ती बिचारी गडबडून गेली . उल्का मला परत माझ्याकडे यायला हवी आहे मी काय करू अशा अर्थाच्या त्याच्या गयावया करण्याने तिला काही सुचेना , मी बोलते उल्काशी असे तिने त्याला आश्वासन दिले पण मी एव्हाना कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते , मला आता सासरी परत जायचं नव्हतं ,जिथे मला काहीही किंमत नाही अशा घरात मला परत जायचं नव्हतं . तुझी आई घरातून निघून गेलीये हे ऐकून वहिनींना आणि आईला काय वाटेल , किती विचित्र गोष्ट आहे असे म्हणणारा मानस आता मीच घरातून निघून आल्यावर त्याच्या घरी कसा राहत असेल ? मग मला समजावण्याकरता म्हणून तो स्वतः:च आईकडे रहायला आला , पण एव्हाना त्याची मनस्थिती ईतकी विचित्र झाली होती की , हाच तो तापट मानस असे चुकूनही कोणाला वाटले नसते , ईथे तो पूर्णपणे हतबल होऊन वागत होता , सारखा माझ्या मागे फिरायचा , माझ्याबरोबरच जेवायचा , मी जिथे बसेन तिथेच तो पण येऊन बसायचा , मला ना नोकरीला जाऊन देत असे ना काही करून देत असे , त्याचे स्वतः:चे ऑफिस वैगेरे त्याने सगळं सोडून दिलं होतं , असे पाच सहा दिवस गेले , त्याच्या या प्रकाराला आई ,बाबा , वाहिनी , भाऊ सगळेच वैतागले होते ,आई तर एकदा त्याच्यावर खेकसली देखील (ज्याचा राग नंतर कित्येक वर्ष मानस च्या मनात घर करून होता) , या दिवसात मला एकदाही यु डी शी संपर्क साधता आला नाही मग एका संध्याकाळी मानस निशी ला घेऊन बागेत गेला आहे हे पाहून मी गुपचूप कोपऱ्यावरच्या वाण्याच्या STD बूथ वर गेले , तिथून यु डी ना फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली , मानस कसा सतत मागे मागे असतो हे ही सांगितलं , सारं काही त्यांनी ऐकून घेतलं , आणि म्हणाले बघू मी सांगतो तुला विचार करून काय ते . फोन ठेऊन वळले तर… माझ्या मागे मानस उभा होता !, त्याने बहुधा सर्व काही ऐकले होते . अचानक असे काही घडेल याची मला कल्पना नव्हती पण यावेळी मी घाबरले नाही आणि खरं तर एव्हाना मी सगळ्याच गोष्टींना कंटाळले होते जे काय होईल ते होवो असा विचार करून शेवटी मी मानस ला सांगून टाकले की यु डी वर माझे प्रेम आहे आणि मला आता घटस्फोट हवा आहे . माझ्या या वाक्यासरशी “आई गं SSSS… “ असे ओरडून मानस मट्कन खाली बसला आणि मोठ्याने रडायला लागला . त्याला कसे बसे तिथून उठवून मी घरी आणले , पण तो रडतच होता , मला कळतच नव्हते आता काय करायचे . झाले असे की तो निशी ला बागेत घेऊन जात असताना वाहिनी आली आणि ती दोन्ही मुलींना ग्राउंड वर घेऊन गेली . तितक्यात मानस ला मी पाठमोरी STD पाशी दिसले त्यामुळे तो माझ्या मागे येऊन उभा राहिला आणि त्याने ते सगळे ऐकले . रात्रभर त्याचे रडणे आणि माझे समजावणे चालूच राहिले , त्याच्या या वागण्यावर नेमके काय बोलावे आणि कसे वागावे मला समजेना , खरंच त्याचं माझ्यावर एवढे प्रेम होतं का? मग आजपर्यंत त्याने ते व्यक्त का केले नाही ?, मी त्याच्यासाठी एवढी महत्वाची आहे का ? की केवळ समाजाच्या भीतीपोटी तो असे करतोय ?
दुसऱ्या दिवशी सकाळी आई-बाबा कोणाशीही न बोलता तो निघून गेला . मला घरी थांबण्यापेक्षा ऑफिस बरे असे वाटू लागले त्यामुळे मी दुसऱ्या दिवसापासून ऑफिस ला जायला लागले .
मानसने त्यानंतर माझ्याशी संपर्क साधला नाही ,आणि मी हि त्याला फोन केला नाही , सासरच्या बाकीच्या मंडळींनी मला ऑफिसला बरेच फोन केले असावेत पण ते मंदार आणि जाईने परस्पर वाटेला लावले ,माझ्यापर्यंत कोणचेही फोन आलेच नाहीत ,ना मला त्याबद्दल कोणी काही संगीतले . मी पुर्णपणे यु डी च्या प्रभावाखाली आले होते, मला आजूबाजूला कोणी दिसेनासे झाले आता यु डी आपण एकत्र राहुयात म्हणून माझ्या मागे लागले , यावर बाबांनी पूर्णपणे नकार दिला , घटस्फोट होऊ दे , लग्न करा मग काय करायचे ते करा असे त्यांचे म्हणणे होते जे बरोबर होते ,पण मला यु डी ना दुखवायचे नव्हते , त्यांनी केलेल्या असंख्य उपकरांचे ओझे मी वहात असल्याकारणाने , ते म्हणतील ती पूर्वदिशा असे माझे चालले होते याच वेळेस भाऊ आणि वाहिनी यांनाही घरातून बाहेर पडायचे होते , वाहिनी आणि आईचे पटत नव्हतेच , मध्यंतरी च्या काळात आईने पुन्हा एकदा गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता . तिनेआयुष्य संपविण्याच्या हेतूने कुठल्यातरी पेन किलर व तत्सम गोळ्यांची अख्खी स्ट्रीप खाल्ली होती आणि यु डी नेमके त्याच वेळेस घरी आले , त्यांना पाणी द्यायला जेव्हा ती बाहेर गेली त्याच क्षणी तिच्या अडखळत बोलण्याने त्यांना संशय आला आणि ताबडतोब तिला गाडीतून घेऊन त्यांनी हॉस्पिटलला नेले , तिथे गेल्यावर लगेचच तिला ऍडमिट केले तेव्हाही रात्रभर यु डी माझ्याबरोबर जागले होते , पोलिसांचेही प्रकरण त्यांनीच परस्पर मिटवले होते , त्यांच्या या सर्व उपकाराचे ओझे घेऊन मी दिवसरात्र वावरत असे ,याच एक-दोन वर्षांच्या काळात माझे निशी कडे दुर्लक्ष झाले , म्हणजे तिचे खाणे -पिणे हे मी करत होते पण आता ती साडे चार वर्षांची झाली होती तिला या सर्व गोष्टी कळत होत्याही आणि नव्हत्याही , तिच्याही मनात बरीच आंदोलने चालली असतील याकडे माझे लक्षच नव्हते .
अखेर बऱ्याच चर्चेनंतर यु डी ने एक मोठे घर भाड्याने बघितले ज्यात मी , निशी ,भाऊ ,वाहिनी त्यांची मुलगी ऋचा , यु डी आणि जाई आम्ही सर्व एकत्र राहू शकू . आई-बाबांच्या विरोधाला न जुमानता मी यु डी कडे रहायला गेले . खूप दडपण आलं होतं मला, पण मी पूर्णपणे यु डी वर अवलंबून होते , आता मला कोणीही कितीही समजावलं तरी मी ऐकणारच नव्हते ,सारखं किती समजूतदार पणे राहायचं ? आणि किती प्रत्येकाची काळजी करायची ? जाऊदे होऊन जाऊदे एकदा बेजबाबदार पणा , पाहूया तरी काय होतं ?
नवीन घर लावलं आणि दोन -तीन दिवसांत रुटीन सुरू झालं , जाई , यु डी , भाऊ तिघेही सकाळीच ब्रेकफास्ट करून बाहेर पडत , प्रत्येकाने आपापली जबाबदारी उचलली , माझ्याकडे आपोआपच स्वयंपाकाची जबाबदारी आली , मग मी घरी थांबणे कसे गरजेचे आहे त्याशिवाय गरम जेवण कसे मिळणार हे मला यु डी ने पटवून दिलं , मग ईतके दिवस बाहेरचं खाऊन कंटाळल्यामुळे यु डी दुपारी जाईबरोबर लंच ला घरी येत असे , मग त्यांना गरम गरम जेवण मी वाढायचे, जाई त्यांच्याबरोबरच बसायची त्यामुळे सहाजिकच जाईला ही मी वाढायचे , ती ही विनासंकोच माझ्याकडून सगळी सेवा घेऊ लागली , ती दोघे गेली की थोडा वेळ पडून मग पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी मी आणि वाहिनी करत असू पण वाहिनी चटपटीत नसल्या कारणाने पुन्हा सगळा भार माझ्यावरच . यु डी ला अत्यंत कडक राहायची सवय होती , स्वच्छता टापटीप या गोष्टी बारकाईने लागायच्या , मग काही दिवसातच माझ्या लक्षात आले की त्याला परिपुर्ण गृहिणी हवी होती . जे मी ईमाने -ईतबारे करतच होते , हेच मी सासरीही करत होते आणि आता हेच मी ईकडे ही करत होते , मग फरक कशात आहे ? मी एवढा मोठा बंडखोर निर्णय घेऊन साध्य काय केलं ? पुन्हा तेच ? रांधा वाढा उष्टी काढा ? .. मानस बोलता बोलता म्हणाला होता की तुला त्याच्या पैशांची भुरळ पडली , माझ्या मनाच्या तळागाळात सगळी कडे मी तपासून बघितले की खरंच पैशांचं प्रदर्शन करून त्याने मला भुरळ घातली का ? नाही , निदान ईथे तरी मी १००% म्हणू शकत होते की नाही . मी त्याच्यातल्या वेगळेपणाला भूलले होते ,त्याच्या समरसून प्रेम करण्याला भुलले होते आणि त्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावले होते , मानस चा त्यानंतर एकदाही फोन आला नव्हता , निशीला कधी कधी तो शाळेतून परस्पर घेऊन जाई आणि मग एक-दोन दिवस ठेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत सोडत असे . असेच एक दिवस यु डी ने जाहीर केले की आपण सगळे नॉर्थ ला ट्रिप ला जातोय , त्याने अनय ला ही बरोबर घेतले होते , या पंधरा दिवसांच्या ट्रिप च्या दरम्यान माझ्या लक्षात आले की निशी ची खूप कुचम्बणा होतेय , तिला नीट वागवलेही जात नाहीये . लहान मुलांची मनं टिपकागदा सारखी असतात ती सगळं काही शोषत असतात . याच दरम्यान मला हे ही जाणवले की सगळे बरोबर असले तरी निशीचं संगोपन मला एकटीनेच करावं लागणार , तिच्या बाबतीतल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत मला मानसची आठवण प्रकर्षाने येऊ लागली . मानस ने बाकी कधी काही केलं असेल पण निशीच्या बाबतीत तो सदैव तत्पर असे . तिला जपत असे , मुलांना आई-बाबा दोघेही लागतात , प्रत्येक वेळी फिरताना निशी ला मी एकटी वागवत होते , ती झोपली किंवा काहीही करत असली तरी फक्त आणि फक्त माझे लक्ष असायचे तिच्यावर ,बाकीचे तिच्याकडे चुकूनही बघत नव्हते ,तोपर्यंत माझ्या मनावरची यु डी ची मोहिनी बऱ्यापैकी उतरली होती , त्यातच आता माझ्या मनाला टोचणी लागली की वडील असून सुद्धा निशीला आपण पोरके केले , ट्रिप वरून परत आल्यानंतर मी गप्प गप्प राहू लागले दिवसचे दिवस विचार करत रहायचे .. पुढे काय ? पुढे काय ? ..माझ्या आततायी निर्णयामुळे मी निशी चं भवितव्य धोक्यात आणलं होतं का? आता मी धड नोकरीही करत नव्हते , यु डी ने मला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं नव्हतं , भाऊ आणि वाहिनी त्याच्या उपकाराखाली दबलेले , जाई आणि वाहिनीचं गूळपीठ जमलेलं , मला विलक्षण एकाकी वाटू लागलं . कधी यु डी बरोबर गाडी वर मागे बसून गेले तर मनावर दडपण येई , कुणा ओळखीच्याने पाहिलं तर काय म्हणतील ? ही कोणा परक्या व्यक्तीबरोबर फिरतेय ?मी सतत दडपणाखाली राहू लागले . सासरी माझ्यावर अन्याय होत असला तरी माझी मान ताठ होती कारण मी कोणताही अपराध केला नव्हता , पण ईथे तसं नव्हतं ईथे मीच स्वतः:च्या नजरेत अपराधी होते , विशेषतः: निशी ची मी फार मोठी अपराधी आहे या विचाराने माझं मन मला कुरतडू लागलं . त्या काळातले काढलेले निशी चे फोटो पहिले तरी नंतर कित्येक दिवस मला भडभडून येत असे , तिच्या चेहेऱ्यावर कमालीचं औदासिन्य होतं , चार वर्षाचं मूल त्याला आपल्या भावना शब्दात मांडता येत नव्हत्या पण जे चाललंय ते बरोबर नाही हे तिला नक्की कळत होतं . खूप वैचारिक उलथापालथ चालू होती मनात .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयुष्याला भलतेच वळण लागले की >>>+1111
पण युडीने असे का करावे? त्याच्या आत्तापर्यंतच्या इमेजला सूट नाही होत आहे हे वागणे.

यु डी ने एक मोठे घर भाड्याने बघितले ज्यात मी , निशी , मानस ,वाहिनी त्यांची मुलगी ऋचा , यु डी आणि जाई आम्ही सर्व एकत्र राहू शकू
>>>>>> मानस कि भाऊ

यु डी चं वागण एकदम वेगळच .. !!