२५व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

Submitted by गुरुदिनि on 4 February, 2023 - 02:14

२५ व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

तो ३१ ऑगस्ट २००५ चा दिवस होता. मुंबईत धो धो पाऊस कोसळत होता. नुकताच २६ जुलै चा प्रलय होऊन गेल्याने जरा जरी जोरात पाऊस पडू लागला तरी हल्ली मुंबईकरांना धडकी भरत असे. माहीमला रहाणारा ‘अमित नारकर’ मात्र खुशीत होता कारण आज त्याचा वाढदिवस होता आणि वयाची ‘सिल्व्हर ज्युबिली’ पूर्ण करत होता. त्यामुळे कोसळणाऱ्या पावसाकडे त्याचे विशेष लक्ष्य नव्हते आणि संध्याकाळी ऑफिसमधून लवकर निघून नंतर दोन खास मित्रांबरोबर करायच्या पार्टीची मनोरथे रंगवतच तो घराबाहेर पडला. अमित २००१ जानेवारी पासून ग्रँट रोड पूर्वेच्या राष्ट्रीयकृत ‘नॅशनल’ बँकेत लिपिक म्हणून कार्यरत होता. नेहमीप्रमाणे माहिम ते ग्रँट रोड स्लो ट्रेनने प्रवास करून तो १०.३० च्या ब्रँचला वेळेआधी ५ मिनिटे पोहोचला.

तो आपल्या नेहमीच्या पोटमाळ्यावर असलेल्या FD डिपार्टमेंटच्या जागेवर बसला आणि आपल्या अधिकाऱ्याची व इतर सहकाऱ्यांची वाट बघू लागला. सर्व स्टाफ आल्यावर वाढदिवसानिमित्त बाहेरून वडे, भजी, कॅडबरी, मिठाई मागवून सर्वांना खूश करायचे असा त्याचा प्लॅन चालू होता. पण नंतर थोड्याच वेळात त्याच्या आनंदावर व उत्साहावर विरजण पडले. जोरदार पावसाने सेंट्रल रेल्वे विस्कळीत झाली होती, ज्यामुळे तिकडे राहाणारे काही जण येऊ शकणार नव्हते तर २६ जुलैच्या धसक्याने तिकडच्या काही कर्मचाऱ्यांनी ऑफिसला येणे टाळले. त्यातच बोरीवलीला रहाणारा कॅशियर सदानंद आला पण बायको आजारी असल्याचे सांगून कॅशच्या चाव्या सेकंड इनचार्ज वनिता मॅडमकडे देवून निघून गेला. त्यामुळे जेव्हा ब्रँच मॅनेजर अगरवाल साहेबांनी इन्टरकॉम करून अमितला कॅशचा चार्ज घेण्यास सांगितले तेव्हा तो मनातून खट्टू झाला. अमित जरी कामात हुशार, प्रामाणिक, कामसू म्हणून सहकाऱ्यांमध्ये आणि ग्राहकांमध्येही लोकप्रिय होता तरी कॅश काउंटरला बसणे त्याला आवडत नसे, काहीसे कमीपणाचे वाटे व कधी खिशातील पैसे भरावे लागतील म्हणून भीतीही वाटत असे.

पण आज पर्याय नव्हता कारण १६ पैकी सातच स्टाफ हजर होता ज्यात ३ अधिकारी, तो धरून ३ क्लर्क आणि १ शिपाई होता. आज भरपूर पाऊस असल्याने फार व्यवहार होणार नाहीत अशी मनाशी आशा बाळगत, कॅश घेणे व देणे ही दोन्ही कामे एकाच खिडकीवर त्याने चालू केली. लंच टाइम पर्यन्त सर्व व्यवस्थित चालू होते पण अडीज वाजता एक “राहत फिल्म” नावाचा खातेधारक ५ लाखांची कॅश घेऊन आला. ती बहुतेक सर्व रक्कम १०, २०, ५०, १०० च्या मिक्स नोटांच्या स्वरूपात १०,००० चे एक बंडल याप्रमाणे स्टेपल केलेली होती. यामुळे प्रथम स्टेपल काढणे, मग नोटा वेगळ्या करणे, मग त्यांचे १०० चे बंडल करून त्या मोजणे, त्यावर स्लिप लावून सही करून स्टॅम्प मारणे, १० बंडलची एक रिंग करून ती रस्सीने बांधणे अशी सर्व कामे त्याला एकट्याला करावी लागणार असल्याने तो मनातून चांगलाच वैतागला. पण कस्टमर पार्टी मोठी असल्याने त्याच्याशी वाद घालून वा मॅनेजरकडे तक्रार करून काहीच फायदा होणार नव्हता म्हणून त्याने निमूटपणे काम चालू केले.

इकडे पाऊस कमी झाल्याने बँकेत ग्राहकांची संख्या वाढू लागली व अमितचे कामही वाढले. त्यातच अर्ध्या तासाने नाझ बिल्डिंग मधील दूसरा एक “हिमालय सिनेमा” नावाचा वितरक चार लाख कॅश काढण्यासाठी चेक घेऊन आला. तेव्हा अमितच्या डोक्यात विचार चमकला की “राहत फिल्म” च्या न मोजलेल्या कॅश मधलेच ४ लाख परस्पर “हिमालय सिनेमा”ला देऊन टाकावेत ज्यामुळे आपले काम बरेच कमी होईल. खरे तर हे बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य नव्हते व अमितलाही मनापासून पटत नव्हते पण आजच्या विशेष दिवशी लवकर काम संपवण्यासाठी त्याने तसा विचार केला. “हिमालय”ला त्याने खोटेच सांगितले की बँकेच्या तिजोरीत एवढी रक्कम उपलब्ध नसून त्याला पैसे हवे असतील तर “राहत”च्या मिक्स नोटावाले बंडलच घ्यावे लागतील. “हिमालय”लाही ते पैसे ऑफिसमध्ये एका क्लायंटला देवून तातडीने बाहेर जायचे असल्याने व तोही बँकेचा नेहमीचा ग्राहक असल्याने फार आढेवेढे न घेता तयार झाला. त्याप्रमाणे व्यवहार झाल्यावर यथावकाश ३.३० ला ग्राहकसेवेची वेळ संपल्यावर अमित तातडीने पुढच्या कामाला लागला.

कॅश संबंधित सारी कामे करेपर्यंत ५.३० वाजले तशी अमितची घालमेल चालू झाली. चार वाजता निघण्याचा प्लॅन करून आलेल्या अमितचा अजून अर्धा तास तरी जाणार होता. पण जेव्हा संगणकात सर्व एंट्री करून अंतिम कॅश रिपोर्ट काढला तेव्हा त्याला दरदरून घाम फुटला, कारण त्याला तब्बल २५,००० रुपये कमी येत होते. तो जरी नियमित कॅशियर नव्हता तरी जेव्हा कधी कॅश काउंटरवर बसे तेव्हा नेहमीच त्याचे “स्ट्रोक टॅलि” होत असे. कॅश टॅलि न होणे त्याच्या बाबतीत पहिल्यांदाच घडत होते. त्याने स्ट्रॉंग रूम मधली कॅश पुन्हा चेक केली, आपले बंडल्स पुन्हा मोजले, रिपोर्ट बरोबर रिसीट व पेमेंटच्या एंट्री तपासल्या, एकेक स्लिप व चेकवरील डिनॉमिनेशन ताडून बघितलं पण फरक काही सापडेना. वनिता मॅडमना कळल्यावर त्यांनी पण आपले काम सोडून स्वतंत्रपणे सर्व काही तपासले पण फरक काही सापडेना. आता मात्र अमितच्या पायाखालची वाळू सरकली कारण २५,००० ही त्याच्या २ महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम होती. त्याचे आजारी वडील निवृत्त होते ज्यांना मामुली पेन्शन होती तर आई गृहिणी होती. त्याच्या पगारावरच बराचसा घरखर्च चालत असे त्यामुळे ही रक्कम भरावी लागली असती तर त्याला मोठा आर्थिक फटका बसला असता शिवाय ही घटना हेड ऑफिसला रिपोर्ट झाली असती तर त्याच्या कारकिर्दीलाही डाग लागला असता.

आपल्या 25व्या वाढदिवसालाच असा फटका पडावा या विचाराने आणखीनच हताश व रडवेला झालेला अमित मनोमन देवाचा धावा करत असतानाच, LC व BG च्या कामासाठी आपल्या कंपनीतर्फे रोज बँकेत येणारे व जवळपास दिसवसभर बँकेत थांबणारे नाईक तिथे आले. त्यांनी अमितकडे शंका व्यक्त केली की “राहत-हिमालय” व्यवहारातच काहीतरी गडबड झाली असावी. तो व्यवहार त्यांच्या चांगलाच आठवणीत राहिला होता कारण मगाशी ते कंपनीची कॅश भरायला आले होते तेव्हा ते आधी येऊनही “राहत-हिमालय” व्यवहारासाठी अमितने त्यांना 10 मिनिटे थांबवून ठेवले होते. ते ऐकताच अमितच्या डोक्यातही ट्यूब पेटली आणि त्याने लगेच “हिमालय सिनेमा”ला फोन लावला. त्याच्या सुदैवाने हिमालयचा क्लायंट काही कारणाने न आल्यामुळे ती कॅश तशीच त्यांच्या ऑफिसच्या तिजोरीत पडून होती. लगेच अमित वनिता मॅडमसह ती कॅश मोजण्यासाठी सर्व जरूरी सामान घेऊन ‘हिमालय’च्या ऑफिसकडे निघाला तेव्हा त्यांच्यामागोमाग मॅनेजर अगरवाल साहेब आणि क्लियरिंग देऊन अमितच्या काळजीने मुद्दाम परत आलेला शिपाई काळोखे देखील होते. १५ मिनिटांनी जेव्हा चौघांची हाताने कॅश मोजून झाली तेव्हा ती रक्कम ..........४.२५ लाख भरली आणि सर्वांनीच सुटकेचा व समाधानाचा सुस्कारा टाकला. आतापर्यंत कसाबसा धीर गोळा करून ठेवलेल्या अमितचा बांध फुटला व तो आनंदातिशयाने रडू लागला.

ते शाखेत परतले तेव्हा ७.३० वाजले होते आणि कॅश बंद करून सिस्टिम डे-एन्डचे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत एक तास जाणार होता. आता वाढदिवसाचं सेलिब्रेशन बोंबललं असलं तरी २५,००० रुपयांचं नुकसान वाचलं यातच तो समाधानी होता. आत्तापर्यंत घरून व मित्रांचे येणारे फोन त्याने ‘बिझी आहे’ असा मेसेज करून टाळले होते, त्यांना “हेड ऑफिसच्या ‘सरप्राइज कॅश इन्स्पेक्शन’ मुळे रात्री उशीर होईल, वाट पाहू नये” असे कळवले. तासाभराने जेव्हा सगळे काम आटपून निघणार तेव्हढ्यात अगरवाल साहेबांनी सर्वांना बेल मारून केबिनमध्ये बोलावले. आत जाऊन बघतो तर त्याच्या आनंदाला आणि आश्चर्याला पारावार उरला नाही कारण टेबलावर त्याच्या नावचा बर्थ-डे केक, बटाटेवडे, शितपेये, मिठाई असा सरंजाम होता. पावसामुळे आज कामावर येऊ न शकलेल्या संजीवनी मॅडमना त्याचा वाढदिवस आठवणीत होता व दुपारीच त्यांनी साहेबांना तसे कळवले होते. सर्वांना हेही कळले की प्रायश्चित्त म्हणून बर्थ-डे केक “राहत फिल्म”ने प्रायोजित केला होता.

आत्तापर्यंत ऐकीव माहितीवरून खडूस वाटणाऱ्या अगरवाल साहेबांचे वेगळेच रूप आज त्याला दिसले होते. पैसे भरावे लागले तर सर्व स्टाफ वर्गणी काढेल, हेड ऑफिसकडून त्याच्यासाठी विशेष वैयक्तिक कर्ज संमत करून घेऊ, तसेच ह्या घटनेचे वर रिपोर्टिंग करणार नाही असे त्यांनी मगाशीच अमितला आश्वस्त केले होते. अर्थात वर्गणी व कर्जाचे त्याच्या सदसदविवेकबुद्धीला पटले नव्हतेच कारण त्याची बोच त्याला कायम राहिली असती. आत्तापर्यंतची त्याची कामातली हुशारी व प्रामाणिकपणा, इतरांना मदत करण्याची सवय, शांत मनमिळावू स्वभाव यामुळे त्याच्याबद्दल असलेल्या सद्भावनेमुळेच इतर सहकारी, वरिष्ठ, शिपाई व ग्राहक या सर्वांनीच त्याला आपलेपणाने मदत केली याची त्याला जाणीव होती. ‘राहत’ मुळे आज त्याच्या आयुष्यात ताणतणाव निर्माण झाला होता तर ‘हिमालय’ सर करणे कर्मकठिण असले तरी या ‘हिमालय’ मुळे त्याला दिलासा मिळाला, ही गमतीदार विसंगतीही त्याच्या ध्यानात आल्यावाचून राहिली नाही.

सदगुणी असण्याबरोबरच, कोणत्याही व्यक्तीच्या थोडक्या माहितीने त्याच्याबद्दल ठाम मत बनवू नये, स्वत:च्या क्षमतांबद्दल वृथा अभिमान बाळगू नये, कुठलेही काम कमी प्रतीचे नसते, सहकाऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, कितीही कठीण प्रसंग आला तरी डगमगून न जाता विचारशक्ती शाबूत ठेवावी, स्वत:च्या क्षुल्लक स्वार्थासाठी खोटे बोलून काहीही दीर्घकालीन फायदा होत नाही, कुठच्याही चांगल्या गोष्टीला शॉर्ट-कट नसतो; या सर्व माहित असलेल्या गोष्टी अमितला नव्याने जाणवल्या. त्याचे अनुभवविश्व चांगलेच “वाढ”ले आणि पंचविसावा वाढदिवस – आनंद, उत्साह, राग, निराशा, अस्वस्थता, तणाव, दु:ख, दिलासा, समाधान, कृतज्ञता अशा विविध भावभावनांच्या कल्लोळात अविस्मरणीय पद्धतीने साजरा झाला.
*****************************
आज 15 वर्षांनी ‘नॅशनल’ बँकेत त्याच ग्रँट रोड शाखेत ‘ब्रँच मॅनेजर’च्या खुर्चीत विराजमान होऊन पदाचा कार्यभार स्वीकारताना अमितच्या मन:चक्षूंसमोर तो प्रसंग काल पाहिलेल्या एखाद्या थरारक चित्रपटाप्रमाणे तरळून गेला आणि सर्वप्रथम आपल्या कॅशियरची ओळख करून घ्यायला तो केबिनबाहेर आला!
*****************************************************************************
लेखक : गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर,
माहीम, मुंबई.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला प्रयत्न. गोष्ट आवडली.

<< तेव्हा अमितच्या डोक्यात विचार चमकला की “राहत फिल्म” च्या न मोजलेल्या कॅश मधलेच ४ लाख परस्पर “हिमालय सिनेमा”ला देऊन टाकावेत ज्यामुळे आपले काम बरेच कमी होईल. खरे तर हे बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य नव्हते >>

काही प्रश्न पडले हे वाचून.
१. “राहत फिल्म” चे पैसे न मोजता घेतले?
२. “हिमालय सिनेमा” ला न मोजता २५,००० जास्त दिले?
३. एकाने भरलेले पैसे दुसऱ्याला देता येत नाहीत? हे माहीत न्हवते.

<< प्रायश्चित्त म्हणून बर्थ-डे केक “राहत फिल्म”ने प्रायोजित केला होता. >>
४. स्वतःचे पैसे स्वतः च्या खात्यात, बँकेत भरले तर प्रायश्चित्त घ्यावे लागते? ती ओळ बदलाल का जरा? उगीच रसभंग होतो.

गडबड कशी झाली ते कळलं नाही. दिलेल्या वर्णनानुसार दहा हजारांचं एक बंडल अशी पन्नास बंडलं राहत फिल्म्सने द्यायला हवी होती. त्यातली चाळीस बंडलं हिमालयला दिली की झालं. म्हणजे राहतची बंडलं बरोबर नव्हती ?
सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये पैसे भरताना वेगवेग ळ्या मूल्याच्या किती नोटा ते लिहावं लागतं.
इथे राहत वाल्याने वेग वेगळ्या मूल्याच्या नोटांची एकत्र बंडलं करून दिली ?
बँक कॅशियरने त्या माणसालाच वेगवेगळ्या मूल्याच्या नोटांची वेगवेगळी बंडलं करून द्यायला सांगितलं असतं ना?

माझं खातं आहे त्या खाजगी बँकेत ज्युनियरमोस्ट कर्मचार्‍यालाच कॅशवर बसवलेलं असतं. सहकारी बँकेत मात्र वर्षानुवर्षे एकच सिनियर कर्मचारी कॅशियर आहे.

मला ही गडबड मोजण्यात किंवा वेगवेगळ्या मूल्याच्या नोटांचं एकच बंडल करण्यामुळे झाली असंच वाटलं. तो निव्वळ हलगर्जीपणाच होता ना?

सर्वांना हेही कळले की प्रायश्चित्त म्हणून बर्थ-डे केक “राहत फिल्म”ने प्रायोजित केला होता.
>>> राहत ने का प्रायश्चित घेतले..

कथा छान वाटली...
बाकीच जाऊ द्या, कशाला कथ्याकूट ....
येऊ दे अजून कथा तुमच्या कडून...

धन्यवाद "उपाशी बोका ",
तुमच्या प्रतिसाद, शंका, सूचना यांसाठी आभारी आहे,

“राहत फिल्म” ने जे पैसे भरले त्यात प्रत्येक मिक्स नोटांचे बंडल जरी १०,००० रु. चे म्हणून भरले असले तरी ती बंडले बनवताना चूक झाली होती, काही बंडले रु.१०,००० हून अधिक मूल्याची होती तर काही १०,००० हून कमी मूल्याची. मात्र एकूण रक्कम बरोबर रु.५ लाख भरत होती. त्यामुळेच त्यातली रक्कम न मोजता परस्पर दिल्याने सचिनला शेवटी फरक लागला.

होय, सचिनने - १. “राहत फिल्म” चे पैसे न मोजता घेतले! (“राहत फिल्म” पैसे देवून निघून गेला, तिथे थांबला नव्हता , तो पावती नंतर घेणार होता. ज्यांनी बँकेत काम केले असेल त्यांना माहित असेल की पूर्वी रोख रकमेच्या मोठ्या उलाढाली करणाऱ्या अनेक कंपन्या ज्या बँकेच्या जुन्या ग्राहक आहेत , त्या मोठी रोख रक्कम बँकेत जमा करताना कॅशियरकडे रक्कम विश्वासाने देवून जात आणि पावती नंतर किंवा दुसऱ्या दिवशी घेवून जात, तसेच मोठी रक्कम काढताना न मोजता घेवून जात, जर काही कमी-जास्त झाले तर परस्पर सामंजस्याने व्यवहार नंतर मार्गी लावला जाई. )
होय - २. “हिमालय सिनेमा” ला २५,००० जास्त दिले!
होय - ३. एकाने भरलेले पैसे दुसऱ्याला देता येत नाहीत, हे त्याला माहीत होते.
नाही - ४. स्वतःचे पैसे स्वतःच्या खात्यात बँकेत भरले म्हणून “राहत फिल्म” ने प्रायश्चित्त घेतले नाही तर –
१]बंडले बनवण्यात कंपनीच्या माणसाची चूक झाली होती,
२]मिक्स नोटांची एकत्र बंडले बँका स्विकारत नाहीत, (१०० नोटांचे एक बंडल असते आणि १०/२०/५०/१००/५०० नोटा वेगवेगळ्या केल्या जातात)
३]नोटा स्टेपल करण्यास RBI ने २००२ च्या एका परिपत्रकानुसार मनाई केली होती.
तरी कंपनी कडून झालेल्या ह्या वरील सर्व चुकांमुळे सचिनला मनस्ताप झाला होता म्हणून “राहत फिल्म” ने स्वखुशीने छोटेसे प्रायश्चित्त घेतले.

वेळ वाईट असली, सारासार विवेक राहिला नाही, शॉर्ट-कट मारायला गेले की माणसाकडून अश्या चुका होतात.

** पात्रांची नावे, स्थळ-काळ व इतर तपशील बदलले असले तरी ही कथा सत्य घटनेवर आधारित असून मी स्वत: त्याचा साक्षीदार आहे.

धन्यवाद अमितव
तुमचं निरीक्षण बहुतांशी बरोबर आहे,
वेळ वाईट असली, सारासार विवेक राहिला नाही, शॉर्ट-कट मारायला गेले की माणसाकडून अश्या चुका होतात.

** पात्रांची नावे, स्थळ-काळ व इतर तपशील बदलले असले तरी ही कथा सत्य घटनेवर आधारित असून मी स्वत: त्याचा साक्षीदार आहे.

धन्यवाद च्रप्स
१]बंडले बनवण्यात कंपनीच्या माणसाची चूक झाली होती,
२]मिक्स नोटांची एकत्र बंडले बँका स्विकारत नाहीत, (१०० नोटांचे एक बंडल असते आणि १०/२०/५०/१००/५०० नोटा वेगवेगळ्या केल्या जातात)
३]नोटा स्टेपल करण्यास RBI ने २००२ च्या एका परिपत्रकानुसार मनाई केली होती.
तरी कंपनी कडून झालेल्या ह्या वरील सर्व चुकांमुळे सचिनला मनस्ताप झाला होता म्हणून “राहत फिल्म” ने स्वखुशीने छोटेसे प्रायश्चित्त घेतले.

धन्यवाद भरत.

“राहत फिल्म” ने जे पैसे भरले त्यात प्रत्येक मिक्स नोटांचे बंडल जरी १०,००० रु. चे म्हणून भरले असले तरी ती बंडले बनवताना चूक झाली होती, काही बंडले रु.१०,००० हून अधिक मूल्याची होती तर काही १०,००० हून कमी मूल्याची. मात्र एकूण रक्कम बरोबर रु.५ लाख भरत होती. त्यामुळेच त्यातली रक्कम न मोजता परस्पर दिल्याने सचिनला शेवटी फरक लागला.

सचिनने “राहत फिल्म” चे पैसे न मोजता घेतले! (“राहत फिल्म” पैसे देवून निघून गेला, तिथे थांबला नव्हता , तो पावती नंतर घेणार होता. ज्यांनी बँकेत काम केले असेल त्यांना माहित असेल की पूर्वी रोख रकमेच्या मोठ्या उलाढाली करणाऱ्या अनेक कंपन्या ज्या बँकेच्या जुन्या ग्राहक आहेत , त्या मोठी रोख रक्कम बँकेत जमा करताना कॅशियरकडे रक्कम विश्वासाने देवून जात आणि पावती नंतर किंवा दुसऱ्या दिवशी घेवून जात, तसेच मोठी रक्कम काढताना न मोजता घेवून जात, जर काही कमी-जास्त झाले तर परस्पर सामंजस्याने व्यवहार नंतर मार्गी लावला जाई. )

स्वतःचे पैसे स्वतःच्या खात्यात बँकेत भरले म्हणून “राहत फिल्म” ने प्रायश्चित्त घेतले नाही तर –
१]बंडले बनवण्यात कंपनीच्या माणसाची चूक झाली होती,
२]मिक्स नोटांची एकत्र बंडले बँका स्विकारत नाहीत, (१०० नोटांचे एक बंडल असते आणि १०/२०/५०/१००/५०० नोटा वेगवेगळ्या केल्या जातात)
३]नोटा स्टेपल करण्यास RBI ने २००२ च्या एका परिपत्रकानुसार मनाई केली होती.
तरी कंपनी कडून झालेल्या ह्या वरील सर्व चुकांमुळे सचिनला मनस्ताप झाला होता म्हणून “राहत फिल्म” ने स्वखुशीने छोटेसे प्रायश्चित्त घेतले.

वेळ वाईट असली, सारासार विवेक राहिला नाही, शॉर्ट-कट मारायला गेले की माणसाकडून अश्या चुका होतात.

** पात्रांची नावे, स्थळ-काळ व इतर तपशील बदलले असले तरी ही कथा सत्य घटनेवर आधारित असून मी स्वत: त्याचा साक्षीदार आहे.

वेळ वाईट असली, सारासार विवेक राहिला नाही, शॉर्ट-कट मारायला गेले की माणसाकडून अश्या चुका होतात. >> +१
ही गोष्ट खऱ्या अनुभवावर आधारित आहे, असे वाटलेच होते वाचताना.

शेवटी वाढदिवस गोड झाला हे महत्त्वाचे.

तपशीलवार उत्तराबद्दल आभार.
एकाच वेळी राहत फिल्मने चूक करणे, अमितने नियम का टेकोरपणे न पाळणे व शॉर्टकट अवलंबणे असा दोघांचा गलथानपणा भोवला. हिमालयवाल्याने रक्कम मोजली नाही हे अमितचे कदाचित सुदैव. बँकेतील सिनियर स्टाफने अमितला सांभाळून घेतले हेही कौतुकास्पद. सा डे आठ म्हणजे तसं त्यांचं लवकरच आटोपलं.
माझा अगदी जवळचा मित्र सुरुवातीला कॅशियरच्या डेस्कवर दोन तीन वर्षे होता त्यामुळे या कामातला ताण त्याच्याकडून समजत असे.

कॅश कमी पडली तर ती भरून द्यावी लागते , पण जास्त भरली तर ती काही स्वतःच्या खिशात घालता येत नाही ना?

कथा चांगली आहे. काही जवळच्या अनुभवांमुळे रिलेटही झाली.

“पात्रांची नावे, स्थळ-काळ व इतर तपशील बदलले” - ते लक्षात आलं. कारण कथेतला ‘अमित’, प्रतिसादात ‘सचिन’ झाला Happy

धन्यवाद "फेरफटका ", चूक लक्षात आणून दिल्याबद्दल,
कृपया माझ्या सर्व प्रतिसादांमध्ये 'सचिन' ऐवजी "अमित" असे वाचावे