माझी अमेरिका डायरी - १ - आगमन !

Submitted by छन्दिफन्दि on 2 February, 2023 - 17:27

एप्रिल २०१५

बरीच वर्षे फिल्डिंग लावल्यावर आज अखेर सॅनफ्रान्सिस्कोच्या विमानतळावर उतरले. अमेरिकेला एकदातरी जायचं हे मला वाटत कॉलेज संपल्यासंपल्याच नकळत ठरवले गेले होते. पण प्रत्यक्ष अमेरिकेच्या भूमीला पदस्पर्श व्हायला एका तपाहून अधिक कालावधी गेला होता. ते का आणि कसं ह्याचे पण रंगतदार किस्से आहेत ते नंतर कधीतरी सांगेन. तर आत्ता त्यावेळचा सगळा फोकस एकदाचे पोहचलो बाई व्यवस्थित, बघू या तरी कशी आहे ही अमेरिका वगैरे वगैरे हाच होता.
चार माणसांच्या दहा बॅगा घेऊन म्हणजे ट्रॉली वर टाकून, दोन अवखळ पोरांना हाकत आम्ही विमानतळा बाहेर आलो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. एप्रिल महिना होता त्यामुळे साधारण त्यावेळी सूर्य मावळतीला आला होता, पण तरी दूर वर सोनेरी किरणे जाणवत होती. चांगलाच गार वारा होता.
नवऱ्याचा ऑफिसमधील एक सहकारी एक तास ड्राईव्ह करून त्याची मोठी गाडी घेऊन आम्हाला घ्यायला येणार होता. तो गोरा अमेरिकन होता त्या मुळे आमच्याकडचे सामान बघून तो बावचळूनच गेला. त्याला काय कल्पना गोगलगायी सारखे आम्ही जरी अक्खे घर नाही तरी अवघा संसार बॅगांमध्ये घेऊन आलोय. काय नव्हतं बॅगेत ? मीठा पासून पुरण पोळी आणि चमचापासून ते कुकर पर्यंत चार माणस सहा महिने खाऊ पिऊ राहू शकतील ते सर्व होत.
त्याच्या त्या मोठ्या आठ सीटर SUVमध्ये त्याने पहिले सगळ्या बॅगा ठेवल्या, म्हणजे मागची जागा भरल्यावर मधली जागा मग पुढंची जागा. तरी तिकडे रूल्स असल्यामुळे आम्हाला प्रत्येकाला एका सीटवर बसून , मुलाला बेबीसिट वर बसवून (तोच ती प्रवासभर कॅरी पण करत होता) त्याला ड्रायविंग करताना मागच्या खिडकितून दिसेल अशा बेताने कसबसं सगळं सामान त्यात कोंबलं. गाडी फ्री वे वरून गेल्यामुळे जास्त काही शहराचं दर्शन घडलं नाही.
हॉटेल वर पोहचलो, नवरा चेकिन करायला गेला तशी मी वाट बघत बसले, कोणी माणूस येईल सामान उतरवून घ्यायला. पण सगळीकडे सामसूम.
थोड्या वेळाने नवराच आला एक भली मोठी ट्रॉली घेऊन.
तो आणि त्याचा सहकारी बॅग काढायला लागले तास मी पटकन विचारलं, "अरे, त्याच कोणी माणूस येईल ना ?"
माझा नवरा हसून म्हणाला , " बाई ही अमेरिका आहे. इकडे कोणी दुसरी तिसरी माणसं मिळत नाहीत, आपलाच आपल्याला सगळं करावं लागतं . "
दोन चार फेऱ्यांमध्ये आम्ही त्या सगळ्या बॅगा कशाबशा पोहचवल्या.
जेटलॅग , प्रवासाचा थकवा ह्यामुळे लगेच झोप लागली आणि जागही कधी नव्हे ते भल्या पहाटे आली.
खिडकीतून हायवे दिसत होता, आणि हि मोठीच्या मोठी गाड्यांची लाईन.
मला इतकं आश्चर्य वाटलं "एव्हढ्या पहाटे एवढे सारे लोकं कुठे जातायत ? आता कुठली सुट्टी पण नाहीये ."
"ऑफिसला," नवरा म्हणाला.
"एवढ्या लवकर ?"
"ट्रॅफिक टाळायला बरेच लोकं दिवस लवकर सुरु करतात आणि मग घरी पण लवकर जातात. तीन सडेतीनला. "
नवऱ्याने आधीच एक जागा भाडयाने बघून ठेवली होती. ती साधारण (गाडीने )अर्ध्या तासाच्या अंतरावर होती. तिकडे गेलो. पत्ता माहित असल्यामुळे मी गुगल मॅप वरून आधीच पाहून ठेवलं होत. ह्या नवीन जागेच्या जवळच मॉल होता. त्यात खाऊ ची बरीच दुकान दिसत होती. ओळखीचं म्हणाल तर एक mcdonalds, डॉमिनोस हि दुकानं , जवळचं असणारं veggie ग्रिल माझं मन तर अगदीच हुरळून गेलं होत. रोज नाही तर आठवड्यतून एकदा तरी ह्या veggie ग्रिल मध्ये जाऊन मस्त ग्रिल सँडविच चापायच असे अनेक बेत ठरवून ठेवले होते.
त्या अर्ध्या तासाच्या रस्त्यात बघितलं तर अतिशय आखलेले, रुंद आणि गुळगुळीत रस्ते, (मुंबई ठाण्याच्या गर्दीची सवय असल्याने ) तूरळक असणारी वाहने , मोठे मोठे सिग्नल्स सगळंच छान वाटत होत. अजून जाणवलं ते म्हणजे अजिबात धूर नव्हता, धूळ नव्हती, हॉर्न चे आवाज नव्हते . गाड्या ठराविक स्पीड ने आणि व्यवस्थित लेन मधून चालल्या होत्या. रस्त्याला कुठेही कचरा दिसत नव्हता. थोड्य थोड्या अंतरावर रस्त्याच्या कडेनी लावलेली झाडे, छोटी फुझाडे व्यवस्थित मेन्टेन केलेली दिसत होती.
पण चक्क कुठेही मला उंच इमारती दिसत नव्हत्या. जास्तीत जास्त उंच म्हणजे २ मजल्याच्या इमारती हे म्हणजे picture मध्ये किंवा सिरीयल मध्ये बघितलेलं त्याच्या एकदम उलट.
मॅप वरची सगळी दुकानं पण मला वाटलेली तशी अगदी जवळ, बिल्डिंगच्या खालीच वाटेवरती नव्हती. नंतर कळलं कि छोट्या बैठ्या दुकानांचा समूह असतो आणि त्याला स्ट्रीट मॉल म्हणतात. मुबलक पार्किंग असतं.
असो! तर आम्ही आमच्या भाड्याच्या अपार्टमेंट मध्ये गेलो. बऱ्यापैकी विस्तृत बिल्डिंग होती. एन्ट्रीला काचेचा दरवाजा. बाजूला कीपॅड . त्याच्यावर passcode टाकला, मगच दरवाजा उघडला. security गार्ड , वॉचमन वगैरे काही नाही. दोन मजल्याची असली तरी तिला लिफ्ट होती. नशीब नाहीतर आठ बॅगा उचलून नेताना पाठीच धिरडं झालं असत. बिल्डिंग सगळीकडून पॅक अँड एअर कंडिशन्ड . गॅरेज ला जायचा , स्विमिन्ग पूल ला जायचा सगळ्या दरवाजांना locks.

IMG_20150424_032436667.jpg

बिल्डिंगच AC म्हंटल्यावर अपार्टमेंटला पण सेंट्रलाइज्ड AC , बऱ्याचशा घरांना असा असतो. थन्डित अक्खे घर गरम करायचेही काम तोच करतो.
घरात प्रवेश केला तो हि भली मोठी लिविंग रूम, त्याला लागून मोठी बाल्कनी . प्रत्येक खोलीला भिंतीत सामावून जाणारी मोठी कपाट / closets. ती जागा पूर्ण रिकामी असते फक्त बाहेरून सरकवायचे दरवाजे. ती closets मला खूपच आवडली. पण स्वयंपाक घर अगदी छोटंसं. ओटा लाकडी . आणि ओट्याच्या मध्यभागी cooking range. त्यात खाली ओव्हन आणि वरती कॉइल्स . आपल्या सारख्या शेगड्या तिथे सर्वत्र कॉमन नाहीत. त्या कॉइल्स ची एक वेगळी गंमत असते ती पुढे कधीतरी सांगेनच. ओट्याच्या बाजूला एक अगडबंब फ्रिज. आणि ओट्याला लागून सिंक. सिंकच्या जवळ ओट्यात चपखल बसवलेलं भांडी धुण्याचं मशीन , डिशवॉशर. तिकडे घराबरोबरच फ्रिज , डिशवॉशर आणि कूकिंग रेंज मिळतो.
त्या अपार्टमेंट ला एक कॉमन वॉशिंग रूम होती त्यात दोन वॉशर्स आणि दोन ड्रायर्स . वॉशर्स मध्ये आपले कपडे, साबण टाकायचे . पैसे टाकायचे आणि मगच ते वापरता यायचे.
तर पूर्ण रिकामं असलेलं हे घर. तिकडे सोडून आलेला सगळा संसार इकडे काय कामाचा? आता इस्त्रीपासून सगळं परत नव्याने घेऊन परत सगळा संसार उभा करायचा, ते हि परक्या देशात . मला भयंकर थ्रिल आलेलं. कारण, उघड आहे परत मनसोक्त शॉपिंग करायची , नवीन घर सजवायची आयती चालून आलेली संधी !

आता इकडची दुकानं, शॉपिंग पुढच्या लेखात त्या गमती बघुयात.
क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग! आमचेही सुरूवातीचे दिवस आठवले Happy बरेचसे अनुभव असेच होते. विशेषतः बे एरियातील फक्त २-३ मजली इमारती, "चकाचक" पणाचा अभाव वगैरे मुळे एकदम underwhelming व्हायला झाले होते सुरूवातीला. तेव्हा सॅन फ्रान्सिस्को विमानतळही जुने होते. तेथेही फार भारी वगैरे वाटत नसे. नंतर एक दोन वर्षांत मग चांगले केले.

अमित एकदम "माहितीवरून अपार्टमेण्ट ओळखून देनार" मोड मधे? Happy माहिती तशी बरीच जेनेरिक आहे. दोन च्या ऐवजी तीन मजले असते तर फेअर ओक्स असले असते. १९९९ मधे सनीवेल मधे ओकरिज, फेअर ओक्स आणि ओक पॉइण्ट या तिन्ही कॉम्प्लेक्सेस मधे तेव्हा तुडुंब मराठी लोक असल्याने त्यांना ओकवाड्या म्हणत. (बिल्डर) परांजप्यांनी आमच्या बिल्डिंग मधे मराठी पॅंफ्लेट लावले होते त्यांच्या नवीन डेव्हलपमेण्ट च्या जाहिरातीचे.

तरी इथे नव्याने येणार्‍यांना एप्रिल चांगला टाइम आहे. मी थँक्सगिव्हिंगच्या दिवशी रात्री आलो (तेव्हा त्या दिवसाची, त्या वीकेण्डची काहीही माहिती नव्हती). दुसर्‍या दिवशी एक दोन मित्रांबरोबर बाहेर चक्कर मारू म्हणून बाहेर पडलो तर सर्वत्र सामसूम आणि थंडी. पुण्या-मुंबईतून इथे आल्यावर हे आपण कोठे येउन पडलो असे फीलिंग आले होते.

तेथून मग नंतर पुढे हे सगळे आवडू लागल्याचा प्रत्येकाचा प्रवास रोचक असेल. आवडेल वाचायला.

अपार्टमेंट नाही रे, एरिया फक्त. वेस्टगेट मॉल व्हेजी ग्रिलमध्येच बारक्या लहानाचा मोठा झाला त्यामुळे तिकडच्या बऱ्याच आठवणी आहेत. Proud

ओकवाड्या <<< शब्द ऐकलाय

बिल्डिंग मधे मराठी पॅंफ्लेट लावले होते त्यांच्या नवीन डेव्हलपमेण्ट च्या जाहिरातीचे <<< Lol Lol Lol interesting
थँक्सगिव्हिंगला ला सगल बन्द असत

मी आधी वाचल्याचे आठव्तय<< रेव्यु FB var vachla asel. Thank you

वेस्टगेट मॉल व्हेजी ग्रिलमध्येच बारक्या लहानाचा मोठा झाला त्यामुळे तिकडच्या बऱ्याच आठवणी आहेत. << veggie grill & nearby dominos varun perfectly area olkhala Happy

छान लिहिला आहे लेख. नॉन प्रिटेंशियस. पुढचे यायची वाट बघतो.

अमित भन्नाट आहे. नुसत्या फोटोवरून जागा ओळखली. ते भूमिगत अतिरेक्यांचे धमक्यांचे व्हिडिओ येतात ते अमितला दाखवायला पाहिजेत. लगेच पकडले जातील (म्हणजे अतिरेकी पकडले जातील, अमित नाही.) Wink

छन्दिफन्दि , कृपया हा धागा पहा.
https://www.maayboli.com/node/82958

नवीन Submitted by भरत. on 7 February, 2023 - 09:06>>>>

हे पान पहायची परवानगी नाही.
Submitted by webmaster on 19 July, 2010 - 05:15
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.

असं येतय.... Sad