माझी अमेरिका डायरी - मनोगत!

Submitted by छन्दिफन्दि on 2 February, 2023 - 17:08
Blue Beach @Lake Tahoe

गेली सात-आठ वर्ष आम्ही इकडे, सॅन होजे , कॅलिफोर्निया मध्ये राहतोय. या काळात जरी पूर्ण अमेरिका बघितली नसली तरी बरेच आंबटगोड अनुभव घेतलेत. कौतुक वाटणाऱ्या गोष्टीत आहेत तर काही तितक्याच खटकणाऱ्याही. जगाच्या दोन टोकांना असणाऱ्या ह्या देशांमध्ये भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बरीच भिन्नता आहे. पण कुठेतरी एक समाज म्हणून, माणूस म्हणून एखादा समान धागाही सापडतो.

आजकाल जवळ जवळ बऱ्याच घरांमध्ये कुटुंबातील, मित्र मंडळींमध्ये, ओळखींमध्ये कोणीना कोणी काही कारणाने अमेरिकेत किंवा इतर कुठल्या देशांमध्ये स्थलांतरित झालेले असतात. त्यामुळे बऱ्याच जणांनी ह्यातले काही अनुभव घेतले असतील. पण मला खूप वेळा माझे भारतातले नातेवाईक वेगवेगळे प्रश्न विचारतात, त्यातून त्यांना इकडची शिक्षण पद्धती , खाद्य संस्कृती, हवामान जाणून घ्यायची उत्सुकता दिसली. काहींना अमेरिका म्हणजे अगदी स्वर्गसुख असं वाटत तर काहींना आपला देश सोडून परदेशात गेले म्हणून क्वचित रागही येतो.
पण गेल्या काही वर्षतल्या माझ्या अनुभवावरून मला असं वाटत इथे काही गोष्टी खरच खूप चांगल्या आहेत. समृद्धी आहे, तंत्रज्ञान आहे, पण स्वर्गसुख वगैरे काही नाही, इथेही प्रश्न आहेत, समस्या आहेत ज्या भारतात ( अजूनतरी )अत्यल्प प्रमाणात भेडसावतात.

मी २०१५ साली इकडे आले तेव्हा त्याआधी फक्त अमेरिकेचं वारेमाप कौतुक ऐकून, Grey's Anatomy सारख्या सिरिअल्स बघून एक छानसा लोभस दिसणारा चष्मा घालून पण हळू हळू इकडचं चांगलं-वाईट वास्तव कळू लागलं.
"माझी अमेरिका डायरी" हा एक छोटासा प्रयत्न, माझे इकडचे अनुभव , त्या अनुषंगाने मला देता येईल ती माहिती आणि इकडच्या आवडणाऱ्या, खटकणाऱ्या, मजेशीर वाटणाऱ्या गोष्टी सांगण्याचा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users