वारसदार घाट, अनघाई घाट आणि अनघाई किल्ला.

Submitted by योगेश आहिरराव on 2 February, 2023 - 00:39

वारसदार घाट, अनघाई घाट आणि अनघाई किल्ला.

भैरवगडाच्या ट्रेक नंतर महिना होत आला तरी खासा ट्रेक जमून येत नव्हता, नाही म्हणायला गाडी गाडी फिरणं सुरू होतं. २६ जानेवारी आसपास टारगेट सेट होतं. नेहमी प्रमाणे एक दोघांना विचारलं तर अपेक्षेप्रमाणे नकारच मिळाला. हे असं हल्ली झालं ना तर आणखी कुणाला विचारायची इच्छाच होत नाही, काय ते नाट लागून नकारात्मता वाढू लागते. मग ट्रेक होईल की नाही हिच शंका येऊ लागते. त्यात आपली वेव्ह लेंथ खुप कमी जणांसोबत जुळते त्यामुळे असेल कदाचित हल्ली ट्रेकला चांगली भक्कम साथ देणारं तसे दुर्मिळच. तसेच आपण नेहमीच हागणदारीच्या दुकानदार पासून चार हात दूरच. सहजासहजी ट्यूनिंग मॅच न होण्याचं कारण प्रत्येकाचा ट्रेकींगचा दृष्टिकोन, आवड निवड, शारिरिक मानसिक, इतिहास भूगोल हे सारं व्यक्तिसापेक्ष असतं. हे सारं जमून थोडफार कमीजास्त जुळूवून जे एकत्र चमूत बसतात, मला तरी त्यांचा हेवा वाटतो. कधीकाळी आमचा पण असा चमू होता पण आता त्यातील कुणीही ट्रेक करत नाहीत हे दुर्दैव. त्यामुळे होतं काय नवनवीन दमदार खेची प्लान बरेच असतात, निव्वळ सोबत नाही म्हणून गप्प बसावं लागतं तरी फारच सह्य मोह अनावर झाला आणि तो होतोच. मग एकटं दुकटं बाहेर पडावं लागतं. असो.... पुरे झाली सद्यस्थितीची कहाणी.
या वेळेस फोकस होता तो लोणावळा ते तैलबैला भागातील वारसदार घाट आणि अनघाई घाट. तळेगावचा मित्रवर्य अमेय जोशी सोबत जुजबी बोलणं झालं होतं. आता फक्त अमलात आणायचे होते. दोन दिवसाच्या तयारीने पाठीवर लवाजमा घेऊन शनिवारी पहाटे पहिली खोपोली लोकल पकडली.
एकटाच होतो त्यामुळे प्लस पण माझे व मायनस पण माझेच..
खोपोलीत उतरलो तेव्हा साडेसात वाजताची पाली एसटी लागलीच होती. पाऊण तासात परळी. माझ्या प्लान नुसार, चढाई वारसदार घाटाने करून उतराई अनघाई घाट व मुक्काम कळंब ठाकुरवाडी. दुसरे दिवशी अनघाई किल्ला पाहून परतीचा प्रवास.
कसंबसं परळीतून कोंडगाव गाठले. पण घाटाच्या पायथ्याला असणारी कोंडगाव ठाकुरवाडी धरणाच्या पलीकडे. तिथवर जाणं तर पायगाडीला पर्याय नाही. धरणाच्या जलाशयाला वळसा घालून वाडीत पोहचेपर्यंत सव्वा दहा वाजले. वातावरण ढगाळ असल्याने थंडी कमी होऊन उष्मा जाणवू लागला. वारसदार घाट आणि अनघाई घाट हे तसे दुर्लक्षित, फारच कमी ट्रेकर या वाटांवर जातात. त्यात आणखी एक महत्वाची बाब अशी की वारसदार घाटाने कोंडगाव भागातील लोकांना काही कारणास्तव वर माजगाव वा तैलबैला जायचे असेल तर ते वारसदार पेक्षा त्यापुढचा वाघजाई घाट जास्त वापरतात कारण त्या तुलनेत तो ओझी अथवा जनावरं नेण्यास सोपा. अगदी असेच अनघाई बाबतीत वर माजगाव सालटर भागात जायचे असेल तर तिथली मंडळी अनघाई घाटापेक्षा काठी/ कोराई घाटाने जाणं पसंत करतात. पण एक खरंय, कमीत कमी वेळेत जर येजा करायची असेल तर अजूनही ही ठाकरं आदिवासी कातकरी या वाटेने येजा करतात. किंबहुना घाटावाटेवर वाट असल्याचा खुणा यांनीच जपून ठेवल्या आहेत. नाहीतर गाड्या आहेतच बहुतेक वाड्या वस्तीवर..
वाडीत मला एकट्याला बघून बहुतेक जणं आश्चर्यचकित अवस्थेत त्यात मला वारसदार घाटानं वर जायचं हे सांगितल्यावर अजूनच हैराण. बुढी म्हातारी सांगू लागली आलाच आहेस तर वाघजाईने जा. वाघजाई सोबत सवाष्णी घाट माझा अनेक वर्षांपूर्वीच झाला असल्याने मला ते नको होते. तसेही माझं नियोजन / प्लान वारसदार अनघाई होते. मी फारच विनंती आग्रह केल्यावर एक जण तयार झाला. पण तो फक्त वारसदार घाट चढवून, मला वर सोडून परत खाली येणार. हे जरा विचित्रच होतं मग त्याला समजावले आपण दोघे मिळून अनघाई ची वाट शोधत जाऊ. कसबसं राजी करून निघालो. धरणाच्या पाठीमागून लहानसे टेपाड पार करून वर आलो. पुढचा चढ मात्र घामटा काढणारा निघाला. अगदी झाडी भरल्या दांडावर येईस्तोवर. काहिसं तिरक्या रेषेत उजवीकडे झुकत वाट वर जाऊ लागली. या भागातले जंगल चांगलेच बहरलेले मोठ मोठ्ठाली झाडे तसेच वेली आणि करवंदाची जाळी यांना तोटा नाही. धापा टाकत एके ठिकाणी दम खात बसलो आणि अवचित सुरू झाली ती बहारदार निसर्गाची शाळा.
पक्ष्यांची सभा भरावी तसेच काहिसे घडले.
पहिलं दर्शन झालं ते स्वर्गीय नर्तक लांब पांढरा शेपूट वाला, कोतवाल व बुलबुल तर होतेच. पण दयाळ, शिळकरी कस्तुर आणि माझा आवडता तांबट.. कुटूर कुटरक्या यांच घडलेलं मुक्त दर्शन. दोघेच होतो त्यामुळे आमचा काही आवाज नाही शांत निवांत पक्ष्यांचे सुरताल ऐकत बराच वेळ रेंगाळलो. वाटेत पुढे जात डाव्या बाजूला लहानश्या धबधब्यात उंबराच्या झाडांच्या गोतावळ्यात बारमाही पाण्याची जागा, अर्थात तिथे जाण्यासाठी अतिरिक्त पंधरा ते वीस मिनिट.बारीक पायवाट मुख्य वाट सोडून गेलेली खाली उतरून मोठे धोंडे लगत कातळावर विसावलो. पाण्याची बारीक पण चांगलीच वाहती धार. जेवणासाठी या पेक्षा चांगली नसावी. जेवण करून पाणी पिऊन रिकाम्या बाटल्या भरून घेत चालू पडलो. जेवणानंतर तो चढ आणखीन जीवावर येऊ लागला. दाट रान संपून कारवी सुरू झाली, वाटेवर अनेक ठिकाणी नुकतीच काटछाट केलेली कुणीतरी येजा करतयं याचा तो पुरावा. पुढे वाट कातळातून आडवी जात ओढ्यात बाहेर आली आता खाली सरळ रेषेत कोंडगाव व धरण, उजवीकडे आम्ही आलो ती ठाकूरवाडी कडील भाग तर डावीकडे पालीचा सरसगड डोकावला. वाट ओढ्यातून वरच्या भागात चढू लागली नंतर आला तो झाडीमिश्रित घसाराचा टप्पा तो पार करून नाळेतली चढाई सुरू झाली. घाटवाटेत चढाई करताना शेवटच्या टप्प्यात खडी नाळ चढणं सोपं काम नक्कीच नाही. नाळेतले दगड धोंडे चढत तर काही ठिकाणी अगल बगल देत कातळातून वाट काढत वर जाऊ लागलो. नाळ अरूंद होत झाडोरा लागला शेवटचा भुसभुशीत माती व घसारा पार करत माथ्यावर मावळात म्हणजेच पुणे जिल्ह्यात दाखल झालो. साधारण पाच सहाशे फूट नाळ चढायला अर्धा तास, तर कोंडगाव सोडल्यापासून घाटमाथ्यावर यायला आम्हाला साडेतीन तास लागले. कारवीच्या रानातून बाहेर येत उजवीकडील तैलबैला जाणारी वाट सोडून डावीकडे वळालो आमची दिशा माजगाव सालटर. कुठे जंगल पट्टा तर कुठे मोकळवन. भोज्याचा डोंगराला उजवीकडे ठेवत अस्तेकदम चालत मोठ्या माळरानावर आलो. गवताचे सोनसळी रूप एकदम भारी सारा मामला एकदम गोल्डन ग्रास. वाटेवर फॉरेस्ट वाल्यांनी बहुतेक ठिकाणी खुणा करून ठेवल्या आहेत तर रानात ओढे आहे त्या भागात बंधारे तर कुठे चर खणून ठेवलेले. मजल दरमजल करत माजगाव कातकरी वस्ती कडे जाणारी पायवाट सोडून दिशेप्रमाणे सालटर कडे निघालो. नकाशा पाहून थोडाफार अभ्यास केला होता पण आता अनघाई घाटाची ओपनिंग शोधणं हे मोठं काम. सुमारे तासभर शोधाशोध केल्यावर एक अचूक मावळतीकडे जाणारी वाट मिळाली. कारवी मग झाडी टप्पा पार करून मोकळवनात आली परत रानात जात खालच्या बाजूस बाहेर आली. खरंतर घाटाच्या याच भागात वरती पण अनघाई देवीचे ठाणं आहे जे वेळेअभावी आणि चुकामूक मुळे आम्हाला नाही पाहता आले. आता खाली कळंब खोरं तर उजवीकडे सह्यशिरोधार नागफणी पर्यंत गेलेली. घड्याळात पाहिलं तर चार वाजलेले थोडक्यात वारसदार टाॅप ते अनघाई टाॅप वाट शोधत यायला आम्हाला दोन तास लागले. असो...
जख्ख मळलेली वाट टप्पा टप्प्यात उतरू लागली. डावीकडे कड्याला बिलगून तिरक्या रेषेत लहान मोठे कातळटप्पे पार करत भराभर खाली आलो. काही ठिकाणी कातळात पावठ्या सदृश्य कामं केलेल दिसलं. पुढे जात ट्रेव्हर्स घेत वाट उजवीकडे वळली. आता होती ती बोडक्या मुरमाड सोंडेवरील उतराई. प्रचंड तीव्र उतार, मुरमाड माती म्हणजे भयानक स्क्री, क्वचितच काठ्या काडक्यांचा काय तो आधार बराच वेळेनंतर तो गुडघ्यावर येणारा ताण असह्य होऊ लागला. त्यात समोर सुर्यदेव उन्हाचा तडाखा दाखवत होते. साधारण पाऊण तास तो घसरणीचा शो संपवून पदरात आलो. हा मुरमाड घसरडा टप्पा सांगायचे झाले तर अगदी गुयरीच्या दाराच्या घसरडा सारखा. फक्त गुयरीत काहिसं एक्स्पोजर आहे इथे तेवढं मात्र नाही.
पदरातून कोंडगावचा वाटाड्या परत फिरला तो आता कोंडगाव व कळंब खोरं या मध्ये एक लहानशी डोंगररांग आहे ती पार करून त्याच्या घरी जाणार. वेळ पाहिली तर सव्वापाच झालेले, आभार मानून त्याचा निरोप घेतला. तो गेल्यावर सुरू झाली माझी पुढची उतराई. मोकळवनात मळलेली वाट पुढे रानात शिरल्यावर नाहिशी होई मग पुन्हा दिशेचा वाटेचा अंदाज घेत सरकत रहायचं. अनघाई किल्ला आता उजव्या बाजूला होता. मला काहीही करून किमान किल्ल्याच्या वाटेपर्यंत पोहचायचे हेच टारगेट. या संपूर्ण घाटवाटेवर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कुठेही डावीकडे वळायचे नाही सतत उजवी मारत फार तर क्वचित सरळ जात रहायचे. खालच्या पातळीवर येत रानातून मोकळवनात आलो. समोर ढोरवाटेतून किल्ल्याची वाट अचूक पकडली. पुढे वर न जाता त्याच वाटेने खाली उतरू लागलो. एक दांड उतरून खाली तुरळक झाडीत शिरलो एकटाच होतो मग भराभर पावलं टाकत होतो. एक दोन ठिकाणी झाडांवर खूण म्हणून लाल रिबिन्स लावलेल्या पण या भागात बघतोय तर वाटच गुडूप आता काय करणार ? वेळ आणि माझी अचूक वाट शोधून काढणं यात द्वंद्व सुरू झाले. तसाच वाट काढत खाली उतरू लागलो, अनेक बारीक ढोर वाटा चकवा द्यायला होत्याच. उघडीप मिळाल्यावर खाली पाहिलं तर चक्रावलो, नदी व पलीकडील फार्म हाऊस तर उजव्या बाजूला पुल. त्यापलीकडे दूरवर कळंब गाव. गडबडीत माझी दिशाभूल झालेली. तसाच काही मिनिटं शांत बसून राहिलो. दोन गोठ पाणी पिऊन परत माघारी वरच्या बाजूस फिरलो. मोकळवनात आल्यावर समोर सरळ रेषेत अनघाई किल्ला. मोबाईल वर मॅप पाहू तर रेंज ची मारामारी. जरा ताण देऊन विचार केला मागच्या खेपेला जेव्हा कळंब ठाकुरवाडीतून फिरून ढाके धनगर पाड्या मार्गे काठी / कोराई व गवळण घाटाचा ट्रेक केला होता तेव्हा हा अनघाई किल्ला पूर्ण उजवीकडे होता. थोडक्यात अनघाई किल्ल्याच्या साधारण वायव्य दिशेला ठाकुरवाडी असणार हेच डोक्यात ठेवून किल्ल्याला वळसा घालत निघालो. सुर्यास्त होत आला होता. मोठा ओढा पार करून वरच्या माळावर आलो. उजवीकडे फॉरेस्ट ने बांधलेले दगडी बंधारे. खाणाखुणा पाहत मळलेली मोठी वाट पकडून परत काहिसं खालच्या बाजूस उतरलो. आता समोर ढाके धनगर पाडाचा पदर त्यामागे उजव्या हाताला कोराई घाटाची रांग. मागच्या ट्रेक वेळेस हीच बाजू समोरून पाहिली होती. गवळण घाट उतरून जेव्हा ढाके वाडीत आलो तेव्हा अनघाई किल्ला नैऋत्य दिशेला. थोडक्यात आता मी दिशेनुसार बरोबर होतो ज्या माळावर मी होतो त्याचाच खाली कळंब ठाकुरवाडी आणि पल्याड विरूद्ध दिशेला आखाडे घनगरांची घरं. वाटेतलं तारांच मोडलेलं कुंपण पार करून एका मोठ्या खडकावर निवांत सुर्यास्त पाहत बसलो. मागे भला मोठा सह्यपहाड तर समोर आकाशात रंगाची उधळण करत अस्ताला जाणारा दिनकर. सारं डोळ्यात साठवून फोटो घेत निघालो. उतारावर आल्यावर खाली ठाकुरवाडीतली घरं दिसली. संधीप्रकाशात कुत्र्यांनी ओरडत स्वागत केले. वाडीत पाच सात टाळकी जमली कहाणी ऐकवून झाल्यावर एका भल्या माणसाच्या घरी गेलो. कोरा चहा व अंघोळीला गरम पाणी. दिवसभरात १५ किमी हून अधिक चाल तर आठशे मीटर आसपासची चढाई उतराई झाली होती. फ्रेश झालो फारसं कुठे न जाता जेवण करून पावने नऊ वाजता झोपून गेलो. थेट सकाळी सात वाजता उठलो. आरामशीर चहा व पोटभर नाश्ता करून मामांसोबत अनघाई किल्ल्यावर निघालो. लहानसा चढ पार करत माळावर आलो. मी काल शेवटच्या टप्प्यात ज्या वाटेने आलो त्याच वाटेने जाऊ लागलो. काही अंतर जात ती आडवी वाट सोडून डावीकडे वर चढणारी वाट घेतली. वाटेत मामांनी एक मोठा खडक दाखवला ज्याची आसपासच्या वाड्या वस्तीतील मंडळी चैत्रात खणं नारळाची ओटी भरून पाया पडतात. जे वर गडावर जाऊ शकत नाही त्यांची हि अनघाई देवता. पुढे वर जात एकच मुख्य नाळेत जाणारी वाट. किल्ल व त्याला लागून असलेला डोंगर या मध्येच असलेल्या नाळेतून खडी चढाई. लहान मोठे कातळटप्पे आहेत पण काही ठिकाणी पावठ्या आहेत त्यामुळे अवघड असं काही नाही. अर्ध्या तासात नाळ चढून खिंडीत पोहचलो. इथे किल्ल्याच्या सरळसोट कड्यावर खोबण्या आहेत. हाताने होल्ड घेत पाय वर टाकत सावकाश नीट निरखून बघत जायचं. पुढे बहुतेक ठिकाणी कोरीव पावठ्या आहेत. वाटेत एक वर्तुळाकार भुयारी पाण्याचं टाकं. गडमाथा समीप छोटी गुहा/ लेणी. वरच्या अंगाला पाण्याचे टाके. त्यामागे चढून गेल्यावर अनघाई देवीचे ठाणं. देवीला नमस्कार करून माथ्यावर गेलो. ओळीत खोदलेली तीन पाण्याची टाकी. जरा आणखी एका ठिकाणी नुकतेच साफ केलेले कोरडे टाके. कळंब गावातील तरूण मुलं व सह्याद्री प्रतिष्ठान इथे श्रमदान करत आहेत. गड तसा फार ऊंच नाही पण कळंब खोर्यातील वाटांवर लक्ष ठेवण्यास टेहळणीसाठी उपयुक्त. पावठ्या, पाण्याची टाकी, कातळातील पाॅट होल्स जेणेकरून पूर्वी लहान मोठं बांधकाम असावं. गडावरून चौफेर नजर फिरवल्यावर, एकीकडे लागूनच असलेली सह्याद्रीची मुख्य रांग तर समोर कळंब खोरं. गडाबद्दल बरीच माहीती पुस्तकात व इंटरनेट वर उपलब्ध आहे. त्यामुळे फार काही लिहीत नाही. आल्या वाटेने सावकाश खाली उतरलो. नाळेतून उतरत एके ठिकाणी नैसर्गिक कपार लागते तिथवर आलो. याच कपारीवर वरील बाजूस पावठ्या कोरलेल्या आहेत. सांगायचा मुद्दा हा तर याच कपारीच्या डावीकडे कड्याला चिकटून गवताळ घसरडी आडवी वाट जाते याच वाटेने मामांनी पुढे नेत आणखी एक मोठी कपार दाखवली. कुर्डुगडाच्या कपारी सारखीच. निरीक्षण केल्यावर असे वाटते पूर्वी कधीकाळी खोदकाम केले गेले असावे. पण कातळ मुरूम ठिसूळ लागल्यामुळे प्रयत्न सोडून दिले असणार काही ठिकाणी कोरीव खोदीव खुणा दिसतात. मामांनी या अर्धवट कामाचा लगेच पांडव मग रात्रीत काम केले मग सकाळ झाली मग ते तसेच निघून गेले असा टिपिकल संदर्भ सांगितला.. एक मात्र आहे भरपूर गावात अर्धवट राहिलेल्या अशा पुरातन खोदकामाचा गावकरी सरळ पाडंवांशी सबंध लावून मोकळे होतात..असो.
तसेच पुढे जात कारवीतून वाट मोकळी करत माळावर उतरलो पुढे वीस मिनिटात वाडीत परत. चार तासात आम्ही निवांत किल्ला पाहून परतलो सुध्दा.
मामांची मजुरी देऊन, मला आसरा दिलेल्या भल्या माणसाचा निरोप घेऊन निघालो. कळंबला आलो पाच दहा मिनिटांत गाडी मिळाली थेट परळी. उतरून पैसे देतोच तोच पाली ठाणे खोपट भरून आली तरी आत शिरलोच. रविवार व पालीला माघी गणेशोत्सव असल्यामुळेच कदाचित एसटीला गर्दी असावी. ड्रायव्हर काकाने आरामात गाडी चालवल्यामुळे २:५० ची सीएसटी लोकल हुकली. नंतरची साडेचार ला मिळाली. घरी पोहचेपर्यंत सहा वाजले..
दिड दिवस सह्याद्रीत मनसोक्त हिंडलो काही दिवसांसाठी तरी तन मनाची मरगळ दूर झाली. दोन दमदार वाटा व छोटेखानी किल्ला एक शुद्ध परिपूर्ण ट्रेक.
सात आठशे मीटर ऊंचीच्या सह्याद्रीत लोणावळा तैलबैला ते सुधागड भोरप्या पर्यंत भागात अनेक अशा या छान वाटा दडल्या आहेत. पहिला टप्पा सांगायचं झाले तर लोणावळा कुरवंडा नागफणी भवानी धार उर्फ कुरवंडा, आंबेनळी, सावरदांड, ढोलकणा, गेटवाडी, वाघमरा, घोटवडे, कोथळदरा.. मग येतं ते माणगाव खोरं घाटावर आतवण, आयएनएस शिवाजी व लायन्स पॉईंट चा भाग तर कोकणात माणगाव मधील फल्याण व भेलीव अनुक्रमे करवंदीची नाळ व पायमोडी घाट इथला पहारेकरी मृगगड. वासुंडे तून निसणीची वाट व भैरीचा घाट मावळात पेठ शहापुर ला जोडतो. तर कळंब खोर्यातील कोराई घाट व गवळण घाट वर आंबवणे भागात जायला सोयीस्कर. अनघाई घाट कळंब ते सालटर माजगाव ला जोडतो. घाटावर कोराईगड तर कोकणात अनघाई हे पहारेकरी. कोंडगाव मधून वारसदार घाट वर माजगाव तैलबैला ला जोडतो. अजून दक्षिणेकडे सरकले की वाघजाई व सवाष्णी घाट आहेच कोकणातील सुधागड भागातून घाटावर तैलबैला जाण्यासाठी. घाटवाटेचे प्राथमिक धडे घ्यायला आदर्श असा भाग...यादी पुढे शेपटासारखी वाढतच जाईल तूर्तास आवरते घेतो...

अधिक फोटोसाठी हे पहा : http://ahireyogesh.blogspot.com/2023/01/warasdar-anghai.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा माझा आवडता भाग.
सहजासहजी ट्यूनिंग मॅच न होण्याचं कारण प्रत्येकाचा ट्रेकींगचा दृष्टिकोन, आवड निवड, शारिरिक मानसिक, इतिहास भूगोल हे सारं व्यक्तिसापेक्ष असतं.
.
होय.

रूट ट्रेसींग करता का? पुढच्या लोकांना उपयोगी होईल.
एक नवीन app सापडले आहे android वर
Wikiloc (https://play.google.com/store/apps/details?id=com.wikiloc.wikilocandroid ) यावर ट्रेक दिसतात. अजून वापरले नाही. पण नवीन ठिकाणी उपयोगी ठरावे.

तैलबैलावरून एक गाववाला पेडली'कडे गेला. वाटेत एक धरण ओलांडावे लागते म्हणाला. तेच कोंडगाव असावे. मला ठाणाळे लेणीची वाट दाखवून पुढे गेला. पण नंतर वाटले की
त्याच्याबरोबरच गेलो असतो तर बरे झाले असते.

धन्यवाद .....

तैलबैलावरून एक गाववाला पेडली'कडे गेला. वाटेत एक धरण ओलांडावे लागते म्हणाला. >>> हाच वारसदार घाट

जबरी

तुझी सोलो भटकंती मस्त झाली, ब्लॉग वर फोटो बघितले, अनघाई राहिला आहे माझा.... बघूया केव्हा योग येतो

Sorry, somehow I am unable to type in Marathi from my mobile.

How much do you generally pay to a ‘vatadya’ guide? Do people try to get higher from an individual or a new trekker? I avoid exploring Sahyadri for this fear though I love the forts.

वा छान वर्णन ! घाटवाटांची माहिती नव्यानेच कळाली. तुमच्या अगदी डोळ्या समोर सगळे रस्ते आहेत असे वाटते.

खूप छान. एकट्याने गिर्यारोहण करायचे किंवा घाट वाटा धुंडाळायाच्या म्हणजे धाडस, जिद्द, चिकाटी, शारीरिक क्षमता आणि इच्छाशक्ती ह्या सगळ्याचा कस लागतो.

धन्यवाद..... मध्यलोक, तिता, निकु, वावे, हिरा आणि कुमार

अनघाई राहिला आहे माझा.... बघूया केव्हा योग येतो >>> अरे विराग जाउन ये मस्त किल्ला आहे.
How much do you generally pay to a ‘vatadya’ guide? >>> साधारण एक दिवसाची मजुरी तसेच परिस्थिती पाहून ठरवता येते.
धाडस, जिद्द, चिकाटी, शारीरिक क्षमता आणि इच्छाशक्ती ह्या सगळ्याचा कस लागतो. >>> अगदी खरे आहे तुमचे हिरा .. .. ट्रेकचे हेच पैलू तर आवडतात