
नियमित लेखनाचा छंद लागला की कालांतराने एक समस्या जाणवू लागते - लेखनासाठी नित्य नवे विषय सुचणे. आपल्या वाचन, मनन आणि निरीक्षणातून मनात अनेक ठिणग्या पडतात आणि त्यातून अनेक विषय मनात रुंजी घालतात. पण त्यातला लेखनासाठी कुठला विषय गांभीर्याने निवडावा यावर मनात बरेच दिवस द्वन्द्व होते. अशी संभ्रमावस्था बराच काळ चालते आणि मग अचानक एखादा विषय मनात विस्तारू लागतो. तो विषय आळसावर मात करून नेटाने पुढे रेटला तरच त्याचा लेख होतो. लेखकाच्या मनात घोळत असलेल्या अनेक विषयांपैकी किती विषयांचे लेखन पूर्ण होते हा एक उत्सुकतेचा विषय आहे. माझ्या बाबतीत अगदी टक्केवारीत सांगायचे झाल्यास, सुचलेल्या विषयांपैकी जेमतेम पाच टक्के विषय लेखनपूर्णत्वाला पोचतात. मग उरलेल्या 95% चे होते तरी काय ?
त्यापैकी बहुसंख्य विषय हे ठिणगी अवस्थेतच विझून जातात. उरलेले जे काही धुगधुगी धरून ठेवतात त्यातलेही पुढे निम्म्याहून अधिक माझ्याकडूनच नाकारले जातात - यात काही दम नाही असे वाटल्यामुळे. या सगळ्या चाळणीतून जे काही थोडे उरतात त्यांची मात्र मनात व कागदावर नोंद करून ठेवावी लागते. कालांतराने त्यातलाच एखादा विषय जोरदार पुढे सरकतो आणि मग लेखणीतून उतरतो.
मित्रहो,
आजवर मी जे काही लिहिलंय ते इथे तुमच्यासमोर आहे. परंतु या लेखाचा विषय अगदी या उलट आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात मला अनेक विषय सुचले होते परंतु निरनिराळ्या कारणांमुळे ते त्यांच्या गर्भावस्थेतच मरून गेले. त्यांच्यावर काही लिहावे अशी एकेकाळी जोरदार उर्मी होती व अजूनही थोडीफार असते. परंतु प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही. अशा काही लेखनातून हुकलेल्या सामाजिक विषयांसंबंधी आज थोडे लिहितो. या कथनासाठी मनात दडून राहिलेले काही निवडक विषय घेतोय. प्रत्येक विषय कधी आणि कुठे सुचला, त्यावर मनात तयारी कितपत झाली आणि अखेरीस तो का बारगळला याचा हा लेखाजोखा.
…
पहिला विषय आहे माझ्या कॉलेज जीवनातला. आमच्या वर्गात एक ‘खास’ मुलगा होता. त्याचे एक वैशिष्ट्य होते. त्या वयातील सर्वसाधारण मुलांच्या काही आवडीनिवडी समान असायच्या; तारुण्यसुलभ विषयांवर तर नक्कीच ! गप्पा मारताना ठराविक विषयांवर बहुतेकांचे एकमत व्हायचे, पण याचे मात्र कायम वेगळेच. एक उदाहरण देतो. जानेवारी महिन्यातील कडाक्याच्या थंडीतली सकाळ आहे. आम्ही मित्रमंडळी कॅन्टीनमध्ये छान वाफाळता गरम चहा पितोय. आम्हाला पाहून तो आमच्यात येऊन बसतो आणि मग वेटरकडे लांबवर नजर टाकून आणि अंगठा उंचवून “एक थम्सअप” अशी मोठ्या आवाजात ऑर्डर देतो. झालं ! आता याची ही वेगळी पसंती पाहून तो लगेच चर्चेचा विषय व्हायचाच. तो त्याला मनातनं हवाही असायचा. असे अनेक बाबतीत झाल्यानंतर शेवटी मित्रपरिवाराने त्याचे नावच तिरपागड्या ठेवले होते. ते त्यालाही कळले होते आणि त्याने ते कुरकुरत स्वीकारलेही होते. आमच्याशी तुलना करता, तो श्रीमंत घरातून आलेला आणि एका हुच्च तत्ववादी शाळेतून शिकलेला होता. आपण या सगळ्यांपेक्षा काहीतरी ‘वरचे’ आहोत असा त्याला अहंगंड होता आणि तो ते वारंवार जाणवून देई.
या प्रकारच्या प्रवृत्तीवर एक व्यक्तिचित्र रेखाटावे असे तेव्हा मला प्रकर्षाने वाटे. तेव्हा मी लेखनात नवखा होतो. मनातल्या मनात मुद्द्यांची जुळवाजुळव करत होतो. ‘त्या’ला समोर ठेवून तर लिहायचे परंतु लेखनातून अगदी जसाच्या तसा ‘तो’च उमटता कामा नये याची पण काळजी घ्यावी लागणार होती. याची दोन-चार पाने खरडूनही झाली होती. मग शांतपणे विचार केला. समजा, आपण हा लेख पूर्ण केलाच तर तेव्हा तो प्रकाशित करण्यासाठी आपला जास्तीत जास्त आधार म्हणजे कॉलेजचे वार्षिक. तिथं जर तो स्वीकारला गेला तर संपूर्ण वर्गाला तो त्याच्यावरच लिहिलेला आहे हे कळणे अवघड नव्हते. त्यातूनच मनात द्वंद्व झाले आणि अखेर तो विषय बारगळला. आपल्या नित्य संपर्कातील व्यक्तिबदल लिहायचे आणि पुढे त्याचे जे काही बरेवाईट परिणाम होतील त्यांना तोंड देण्याचा निर्भीडपणा तेव्हा अंगात नव्हता हे खरे.
साधारण याच काळात एक थरकाप उडवणारा विषय मनावर बिंबलेला होता. वैद्यकीय अभ्यासक्रमात काही विद्यार्थी वार्षिक परीक्षांमध्ये वारंवार नापास व्हायचे. त्यांच्याबरोबर प्रवेश घेतलेल्या मुलांच्या तुलनेत त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करायला दुप्पट कालावधी लागायचा. त्यांना ‘chronic’ म्हणून ओळखले जाई. त्यातले काहीजण शेवटच्या वर्षाला अनेक वेळा बसूनही अपयशी ठरायचे. अखेर यातल्याच काही जणांनी पुढे आत्महत्या केल्या होत्या. या विषयाच्या मुळाशी गेल्यास बरेच काही विचार करण्याजोगे असते.
कित्येक मुलांच्या बाबतीत त्यांचा कल आणि त्यांची क्षमता लक्षात न घेता केवळ पालकांच्या अतीव इच्छेमुळे त्यांना वैद्यकीय शाखेत घातले जाते. पुढे पहिल्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेत ती मुले अनेकदा आपटी खात असलेली पाहून सुद्धा त्यांना अभ्यासक्रमातून काढण्याचा विचार केला जात नाही. अशापैकी काही जण दीर्घकाळ शिक्षण करून मारून मुटकून डॉक्टर व्हायचे देखील, परंतु काहींच्या बाबतीत मात्र आत्महत्येने दुर्दैवी अंत व्हायचा. मग या घटना विद्यार्थीवर्गात दीर्घकाळ घबराट पसरवत असत.
खरे तर मनावर खोलवर परिणाम केलेला हा विषय होता. परंतु त्याच्या दुःखद बाजूमुळे तो लेखणीतून सविस्तर काही उतरू शकला नाही. एकदा मात्र राहवले नाही तेव्हा त्यावर एक वृत्तपत्रीय स्फुट तेवढे लिहिले होते.
1980 च्या दशकात माझा एका जोडप्याशी अगदी जवळून परिचय झाला होता. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली होती आणि त्यांना मूलबाळ होत नव्हते. एखादे तरी मूल असावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्या दृष्टीने त्याकाळी जे काही वैद्यकीय उपाय करता येणे शक्य होते ते त्यांनी सर्व केलेले होते परंतु त्याला यश आले नव्हते. दत्तक मुलाचा विचार त्यांना मंजूर नव्हता. सारखा हाच विचार करून त्यांची एकंदरीत घुसमट व्हायची आणि तसे त्यांच्या बोलण्यात येई. आज आपल्या अवतीभवती जाणीवपूर्वक अपत्यहीन राहिलेली अनेक जोडपी आहेत. किंबहुना शहरी जीवनात या मुद्द्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. निदान कुठल्याही व्यक्तीला प्रथमदर्शनीच याबद्दलचा प्रश्न विचारू नये हे भान काही जणांना तरी आहे. परंतु तो काळ तसा नव्हता. एकंदरीतच मूल नसलेल्या जोडप्याकडे आणि विशेषता त्यातल्या स्त्रीकडे पाहण्याचा आजूबाजूच्या लोकांचा दृष्टिकोन तसा मागासच होता. बऱ्याचदा त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्याबद्दल बोलताना लोक त्या जोडप्याची ओळख सांगताना, “ते नाही का, ते मूलबाळ नसलेले” असा अवमानकारक उल्लेख करून देताना मी ऐकले होते. हा अत्यंत चुकीचा दृष्टिकोन होता. परंतु आपल्या आसपासच्या कुजबुज समाजाच्या तोंडावर बोट कोण ठेवणार ?
त्या जोडप्याकडे पाहून या विषयावरील काही लेखन करावे असे खूप मनात येई. मूल नसणे हा काही गुन्हा नाही परंतु आजूबाजूच्या लोकांची त्यावरील कुजबुज हा तिडीक आणणारा विषय. या अनुषंगाने अशा कुजबुजी लोकांवर कोरडे ओढणारे काही लेखन करण्याची बऱ्याचदा इच्छा झाली. तसेच त्या जोडप्याची कुचंबणा हा देखील लेखनपोषक मुद्दा होता. पण का कोण जाणे, तोही विषय लेखणीत काही उतरला नाही. तसं पाहिलं तर हा विषय सनातन आहे. तो अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक व चित्रपट यासारख्या अनेक माध्यमांतून दाखवला गेला आहे. त्यामुळे त्यावर नव्याने आपण तरी काय वेगळे लिहिणार असे वाटल्याने तो बेत स्थगित झाला.
परगावी जाण्याच्या निरनिराळ्या प्रवास-साधनांमध्ये माझे सर्वात आवडते साधन म्हणजे रेल्वे. बसच्या प्रवासात मळमळ होण्याचा त्रास असल्यामुळे शक्यतो तो टाळला जातो. रेल्वे प्रवासाची अन्य सुद्धा बरीच सुखे आहेत. खरंतर बस आणि विमानाशी तुलना करता बर्थवाल्या गाडीमध्ये दिवसा समोरासमोर बसून उत्तम गप्पा मारता येतात. त्या संदर्भात ‘प्रवास आणि संवाद’ हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या मनात घोळतो आहे. स्वतःच्या विद्यार्थीदशेतील जीवनापासून ते आजपर्यंतच्या माझ्या रेल्वे प्रवासावर एक नजर टाकतो. विद्यार्थीदशेत आणि पुढे आयुष्यातील झगडण्याच्या काळात एक्सप्रेसचे जनरल तिकीट आणि पॅसेंजरचा प्रवास या गोष्टी केल्यात. पुढे जसजशी आर्थिक स्थिती सुधारत गेली तसे तसे वातानुकूलित वर्गांची चढती श्रेणी, शताब्दी, राजधानी वगैरे असे सगळे प्रवासही बऱ्यापैकी केले. प्रवासातील संवादाबाबत दोन कारणांमुळे झालेला फरक मला अगदी प्रकर्षाने जाणवतो. 30-40 वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये अतिशय मोजके तरुण जवळ वॉकमन बाळगत आणि मग त्याच्या इअरफोन्सने गाणी ऐकत. त्याकाळी स्लीपरचे साधे डबे अधिक आणि (काही गाड्यांनाच) वातानुकूलितचे अगदी मोजके असायचे. तेव्हा अनोळखी प्रवाशांच्याही गप्पा भरपूर व्हायच्या. जसे वातानुकूलित डब्यांचे प्रमाण वाढत गेले आणि आलिशान प्रकारच्या गाड्या धावू लागल्या तसे या संवादाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होत गेलेले जाणवते. ट्रेनच्या आरक्षित तिकीट-वर्गाची चढती श्रेणी आणि तिथल्या गप्पाटप्पांचे प्रमाण या दोन गोष्टी अगदी गणिताप्रमाणे व्यस्त प्रमाणात दिसतात. (इथे डब्यातील प्रवासीसंख्येचे प्रमाण हा मुद्दाही बाजूला काढून वरील विधान रास्त वाटते. संख्येपेक्षा ‘प्रवृत्ती’ वरचढ ठरते; अपवाद सोडून देऊ).
दुसरा मुद्दा - जेव्हापासून मोबाईल आणि पुढे इंटरनेटसह स्मार्टफोन्स मुबलक झाले तसा हा संवाद झपाट्याने कमी झालेला दिसतो, अगदी एकत्र प्रवास करणाऱ्या कुटुंबा- अंतर्गत देखील. सध्याच्या प्रवासावर एक नजर टाकली तर असे दिसेल, की साधारणपणे बहुतेक तरुण व मध्यमवयीन लोक प्रवासाचा बहुसंख्या वेळ स्वतःच्या मोबाईलवरील करमणुकीत रमून गेलेले दिसतात. त्यासाठी इअरफोन्सचा वापर करणारे अल्पसंख्य हे सुजाणच म्हणायचे. बाकीचे बहुसंख्य भारतीय, जे खुशाल मोठ्या आवाजात मोबाईल लावतात ते तर भयंकर कटकटीचे. एकूणच प्रवासातला हा अत्यंत त्रासदायक विषय ! गप्पा मारण्यास उत्सुक असलेल्या एखाद्याने मोबाईलमग्न व्यक्तीशी संवादाचा प्रयत्न केल्यास त्याला थंड किंवा तुटक प्रतिसाद मिळतो.
समाजाची सुधारती आर्थिक स्थिती आणि करमणुकीच्या विविध इ-उपकरणांची सहज उपलब्धता यांचा सहज (प्रवास) संवादावर झालेला परिणाम या विषयाने मनात अनेक वर्षे धुमाकूळ घातलेला आहे. पण अद्याप तरी तो विषय डोक्यातच राहिला आहे. कालौघात समाजाच्या आचारविचारांमध्ये बदल होणारच. मग ते स्वीकारण्याऐवजी, उगाचच पूर्वी कसे होते आणि आता कसे आहे, हे दळण दळायला नको म्हणून एक मन या विषयाला बाद करून टाकतेय !
गेली अनेक वर्षे मी आमच्या परिसरातील एका एकत्र कुटुंबाला ओळखतोय. यांच्या घरात तीन पिढ्या नांदतात. एकंदरीत गुण्यागोविंदाने राहणारी माणसं आहेत परंतु जेष्ठ पिढीचा कर्मठपणा अगदी डोळ्यात भरण्यासारखा आहे. इथे कर्मकांडाचा तर अतिरेक आहेच आणि त्याचबरोबर विविध प्रकारच्या विटाळाच्या कल्पना त्यांच्या हाडीमासी खिळल्यात. एकविसाव्या शतकात जगताना विचारसरणी मात्र अठराव्या शतकातली, असा काहीसा तो प्रकार आहे. असे वैशिष्ट्य असणारे ते आमच्या आसपासचे एकमेव घर आहे. मी त्या कुटुंबातल्या मधल्या आणि तरुण पिढीचे बारकाईने निरीक्षण करत असतो. त्यांच्यातल्या तरुणींनी आता विशी ओलांडली आहे. त्यांना घरात चालणाऱ्या वरीलपैकी कित्येक गोष्टी पटत नाहीत. एवढेच नाही तर त्यांची त्यावरून खूप चिडचिड होते. मग येऊन जाऊन त्या मधल्या पिढीकडे त्यांचा निषेध नोंदवत राहतात. त्यांच्या मित्रपरिवारात या विषयांवरून वारंवार टिंगलबाजी होते. मधल्या पिढीची तर अजूनच गोची. घरात ज्येष्ठ पिढीचे वर्चस्व असल्याने मधल्यांना त्यांचे गुमान ऐकावे लागते आणि त्याचबरोबर आपल्याच मुलांच्या पिढीकडून सतत टोमणे ऐकावे लागतात. या दोन पिढ्यांची होणारी घुसमट आणि चिडचिड मला लेखनासाठी अधूनमधून आकर्षित करते. यानिमित्ताने कुटुंब व्यवस्थांबाबत काहीतरी अधिकउणे लिहावे असे अगदी राहून राहून वाटते. पण अजून तरी ते मंथन फक्त विचारांमध्येच अडकून पडलेले आहे.
सरतेशेवटी या लेखाच्या शीर्षकाला एक पुस्ती जोडतो – सुचलेला विषय, केलेले लेखन पण हरवलेले हस्तलिखित !
ही घटना आहे 15 वर्षांपूर्वीची. तेव्हा परदेशात वास्तव्य होते. साप्ताहिक सुट्टीच्या एका सकाळी सलग अडीच तास बसून मनात घोळत असलेल्या एका विषयावर एकटाकी हस्तलेखन केले होते. तो विषय म्हणजे,
“माझे शिक्षक - असेही आणि तसेही !”
या लेखनापूर्वी काही दिवस मनात माझ्या अनेक शिक्षकांच्या आठवणींची उजळणी करत होतो. बालवाडीपासून ते अगदी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ज्या शिक्षकांचा मला लाभ झाला त्यातले काहीजण त्यांच्या वैशिष्ट्यामुळे कायमचे लक्षात राहिले. यामध्ये जसे उत्तम शिकवणारे शिक्षक होते तसेच गमतीजमती आणि वेळप्रसंगी आचरटपणा करणारेही शिक्षक होते. मग या दोन प्रकारांपैकी प्रत्येकी चार शिक्षक निवडले आणि झपाटल्यासारखे ते हस्तलेखन केले (तेव्हा मी संगणकावर मराठी दीर्घलेखन करत नव्हतो आणि त्या सुविधाही बाल्यावस्थेत होत्या). तेव्हा असा विचार केला की हा लेख सप्टेंबरमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशी प्रकाशित करणे उचित होईल. मग तो तसाच कुठेतरी ठेवून दिला. दरम्यान त्यावर्षी काही कारणामुळे त्या लेखाकडे पुन्हा फिरकायला जमलेच नाही. पुढच्या वर्षी माझा परदेशातील मुक्काम संपवून मी भारतात यायला निघालो. भारतात पोचल्यानंतर काही दिवसांनी त्या लेखाची आठवण झाली. तेव्हा मात्र आणलेल्या सामानात तो काही जाम सापडत नव्हता. जंग-जंग पछाडले परंतु आजपर्यंत तो लेख मिळालेला नाही. आता मनाची गंमत कशी असते पहा. हस्तलिखित जरी हरवलेले असले तरी लेखाचा साचा तेव्हा डोक्यात चांगल्यापैकी बसलेला होता. मनात आणले असते तर पुन्हा एकदा लेखनाला बसायला काही हरकत नव्हती. परंतु मन काही मानेना. आपण एकदा भरपूर कष्ट घेऊन ते लेखन केले आहे ना, मग आता पुन्हा लिहिणे नाही बुवा ! कदाचित त्या उर्मीत झालेले लेखन आता पुन्हा होईल का नाही याची शंका वाटली आणि ती प्रबळ होत गेली. एखाद्या आळशी शालेय विद्यार्थ्याप्रमाणे मी तो विषय अक्षरशः दाबून टाकलेला आहे. असे हे प्रकाशनातून हुकलेले माझे तयार लेखन.
...
मनात असलेल्या परंतु मनापासून मी लेखन करू न शकलेल्या काही विषयांची ही होती झलक. रोजच्या जीवनात असे अनेक विषय अगदी समुद्राच्या लाटांसारखे मनात उचंबळून येतात परंतु तितक्याच वेगाने ते विरूनही जातात. कालांतराने त्यातले काही पुन्हा डोके वर काढू शकतात आणि मनात चलबिचल चालू राहते. विषय आणि आपले विचार यांच्यात एक प्रकारे शिवाशिवीचा खेळ चालतो. त्यात खूपसे विषय निसटूनच जातात. जे मोजकेच हाती लागतात त्यांच्यावर पुढे कधीतरी शिक्कामोर्तब होते.
सुचलेल्या विषयावर एखादे लेखन पूर्णत्वाला न जाण्याच्या संदर्भात अनेक लेखकांची विविध कारणे असतील. मला जी कारणे सर्वसाधारण वाटतात ती सारांशरूपाने लिहितो:
१. आळस
२. सुचलेला (किंवा सुचवलेला) विषय आकर्षक किंवा महत्त्वाचा, पण तो लेखकाच्या क्षमतेबाहेरचा असणे.
३. तो विषय वर्षानुवर्षे अनेक माध्यमांमधून भरपूर चघळून व चावून झालेला असणे.
४. ज्या ठराविक माध्यमात लेखन करायचे आहे तिथे नुकतेच काहींनी त्या विषयावरील लेखन केलेले असणे.
५. सुचणे आणि लिहिणे या दोन प्रक्रियांमधला कालावधी जेवढा जास्त असेल तेवढा चांगला असे म्हणतात. लेखकाला एखादा विषय सुचल्यानंतर तो वर्षानुवर्षे मनात मुरवत ठेवणे, हे सुद्धा ‘हुकलेल्या’ लेखनामागचे महत्त्वाचे कारण असेल काय?
इथल्या लेखकांचे मनोगत जाणून घेण्यास उत्सुक !
………………………………………………………………………………………
छान लिहिलंय! आणि पटलंही. नीट
छान लिहिलंय! आणि पटलंही. नीट लक्षात नाही, पण वि.वा. शिरवाडकरांनी कुठेतरी याबद्दल लिहिलं आहे. त्यांनी पूर्वी अतिशय सुंदर कथा लिहिल्या आहेत. पण काही कथा अर्धवट लिहून सोडून दिलेल्या त्यांना खूप वर्षांनी जुने कागद चाळताना सापडल्या. पण आता त्या कथा पूर्ण होणं शक्य नाही, कारण ती वेळ निघून गेली, असं काहीसं.
पण हुकलेले विषय का म्हणता? लिहाल की. निदान आळस म्हणून बाजूला ठेवलेल्या विषयांवर तरी अजून लिहिता येईलच तुम्हाला.
वावे यांना मम!
वावे यांना मम!
धन्यवाद !
धन्यवाद !
आळस म्हणून बाजूला ठेवलेल्या विषयांवर तरी अजून लिहिता येईलच>>>
खरंय, आळस झटकला पाहिजे
छान लिहिलंय. हुकलेल्या
छान लिहिलंय. हुकलेल्या विषयांवरील तुमच्या लिखाणामुळे आम्हाला जर इतके छान लेख वाचायला मिळतात, तर अवगुंठित लेखांनी किती मोठी भर पडेल त्यात..
तुम्ही सवडीनुसार जरूर लिहावं आणि विषयांवरील अवगुंठन दूर करावं असं वाटतं.
छान मांडलेत विचार. लेखनाकरता
छान मांडलेत विचार. लेखनाकरता सतत नवीन विषय सुचणं अवघड असत.
लिहिलेलं काही जवळच्या कुणावर असेल तर ते प्रकाशित करायला नको वाटतं.
लिहिण्याचा आळस हे तर महत्वाचं कारण आहेच. मोठमोठी पुस्तकं लिहिणाऱ्यांबद्दल प्रचंड आदर वाटतो मला.
धन्यवाद !
धन्यवाद !
१. अवगुंठन >>> छान शब्द आहे. आवडलाच !
....
२. मोठमोठी पुस्तकं लिहिणाऱ्यांबद्दल प्रचंड आदर वाटतो मला.>>>
+११
विशेषता कादंबरी लेखन.
आळस झटकावा व नक्की या सर्व
आळस झटकावा व नक्की या सर्व विषयांवरती लिहावे.
विचारप्रवर्तक लेख !
विचारप्रवर्तक लेख !
निरंतर चांगले लिहू शकणाऱ्या लोकांबद्दल आदर, कौतुक आणि थोडी ईर्षा वाटते
अर्धवट राहिलेले काहीच नीट पूर्ण होत नाही नंतर, त्यामुळे जे काही थोडेफार खरडतो ते एकटाकीच.
माझे स्वतःचे असे, बसून
माझे स्वतःचे असे, बसून केलेले , कुठल्याही भाषेतले लेखन फारच क्वचित होत असे . फार फार तर सहा महिन्यातून एकदा .
पण गेली १-२ वर्षे, उभ्या उभ्या विनोद करायला करायला लागल्यापासून आठवड्यात थोडेफार लेखन होते. कारण सारखे नवीन विषय, नवीन विनोद ही त्या छंदाची गरज आहे. बर्याचदा हे लेखन १, २ आणि ५ या कारणांमुळे पूर्ण होत नाही. पण नवीन तंत्रज्ञानामुळे एक खूप छान सोय झाली आहे. मला त्याचा खूप फायदा झाला आहे कदाचित तुम्हालाही होईल.
१. डोक्यात कल्पना आली की लगेच पुढच्या काही मिनिटात मी मोबाईलवर नोटपॅडवर एका वाक्यात ती कल्पना लिहून ठेवतो. नोटपॅडचे अॅप आपोआप त्याचा बॅककप घेऊन ठेवते. त्यामुळे मोबाईल बदलला तरी त्या कल्पना हरवत नाही.
२. दर ८-१० दिवसांनी बसून गुगल डॉक मधे त्या त्या कल्पनेचा विस्तार करुन एका पानाची सुरुवात करतो. एका वाक्याची कल्पना एका/दुसर्या परिच्छेदापर्यंत विस्तार करून लिहून ठेवतो. आता असे अर्धवट लिहिलेली अनेक पाने गुगल डॉक मधे पडून आहेत . पण तंत्रज्ञानामुळे ती मोबाईल, लॅपटॉप सगळीकडे उपलब्ध आहेत. गुगल डॉक मुळे हवे तितके वेळा कॉपी पेस्ट करणे, नवीन प्रत सुरु करुन ती संपादित करणे , एकाच पानाची वर्गवारी वेगवेगळ्या विषयांप्रमाणे करणे , शब्दखुणा ठेवणे आणि गरज लागेल तसे शोध घेणे खूप सोपे झाले आहे.
३. मधूनच वेळ मिळेल तसे हवे ते पान उघडून त्याचा अधिक विस्तार करतो. कधी कधी नवीन कल्पना आली की लक्षात येते की आधीच यावर काम सुरु केले आहे त्यामुळे मोबाईल नोटपॅडमधे लिहिता थेट मोबाईल गुगल डॉकवरून त्या त्या पानावर नवीन कल्पना लिहिली जाते. कधी २-३ अर्धवट लिहिलेली पाने एकत्र करून १ मोठे विस्तारित पान तयार होते.
मी पूर्वी "आळस" हे लेखन कमी होण्यासाठीचे सगळ्यात मोठे कारण समजत होतो. कारण सुरुवातीला गुगल डॉक वापरले तरी मुद्दाम लॅपटॉप उघडून , टेबल खूर्चीवर बसून टाईप करणे होत नसे.
अ) पण माझ्यासाठी गुगल डॉक मोबाईलवर इन्स्टॉल केल्यापासून वेळ मिळाला तर कुठुनही लिहिणे सोपे झाल्यापासून , मी स्वत:ला आश्चर्य वाटावे इतके लिहू शकलो. अजूनही लेखनाला पूर्णत्व येण्यासाठी कधीतरी वेळ काढून लॅपटॉप घेऊन बसावे लागते. पण अनेक वेळा थोडे थोडे लिहून बराच मजकूर तयार असल्यामुळे , बहुतेक काम हे संपादनाचे होते.
ब) मी कुठेतरी असे वाचले की आपण लेखन करतो तेंव्हा ते दोन टप्प्यात विभागले तर खूप सोपे जाते .आणि अनुभवाने मला ते पटले आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी अंतर्दृष्टी ठरली. पहिल्या टप्प्यात तुमच्या सृजनशीलतेकडे लक्ष देउन ज्या काही कल्पना येतील त्या पटकन लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा. लेखनाचा साचा, शुद्धलेखन , व्याकरण , सोपेपणा या कशाकडेही लक्ष देऊ नका. हे लेखन फक्त तुमच्यासाठी आहे. दुसर्या टप्प्यात लेखन संपादीत करून लेखनाचा साचा, शुद्धलेखन , व्याकरण , सोपेपणा या गोष्टींकडे लक्ष द्या. पहिल्या आणि दुसर्या टप्प्यांच्या मधे काही दिवस्/महिने/वर्षे जाऊ शकतात. नवीन विषय , नवीन कल्पना लिहण्याचे दिवस (मूड) वेगळे , लेखन संपादीत करण्याचे दिवस वेगळे हे लक्षात ठेवले तर त्या त्या दिवशी मेंदूकडून ते ते काम करणे जास्त सोपे जाते.
आता मधेच एकदम हसू आल्यावर आणि मोबाईलवर टाईप करायला लागल्यावर आजुबाजुचे हा काय वेडपट माणूस म्हणून आपल्याकडे पाहतात. त्यांच्या चेहर्यावरचे भाव पहायला मिळणे , ही दुधात साखर. पण हे करताना तुम्ही एखाद्या शोकसभेत किंवा स्मशानात नाही याची काळजी घ्या.
आळस झटकावा कसं म्हणू....लोका
आळस झटकावा कसं म्हणू....लोका सांगे ब्रह्मज्ञान वगैरे वगैरे....
माझंही बरंच अर्धवट लिखाण आहे ते जर बोलायला लागलं तर म्हणेल तुला उलटा टांगायला हवा वगैरे वगैरे. आम्हाला लटकावतोस.
तुमचे वरचे विषय छानच आहेत . खट्टू प्रतिभेला साद घाला....जमेल.
अजय, सविस्तर प्रतिसाद आवडला.
अजय, सविस्तर प्रतिसाद आवडला. शर्मिला, अनिंद्य व साळुंके - लिहा लिहा.
अभिप्राय व सूचनांबद्दल
अभिप्राय व सूचनांबद्दल सर्वांना धन्यवाद !
आपल्या सर्वांचे लेखनातले अनुभव नक्कीच मार्गदर्शक आहेत.
**"मोबाईलवर टाईप करायला
**"मोबाईलवर टाईप करायला लागल्यावर आजुबाजुचे हा काय वेडपट माणूस म्हणून
>> अगदी!
मी तर आता दीर्घलेखन बोलूनच टंकतो. त्यामुळे आपल्याला एकदम लहर येते आणि आपण मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये बोलायला लागतो तेव्हा आजूबाजूला माणूस नाही ना, हे पाहिलेले बरे असते.
नाहीतर त्याला आपण चक्करच वाटतो
छान मांडलेत विचार.
छान मांडलेत विचार.
प्रतिसाद पण छान आहेत.
कुमार सर, खूप सुंदर विषय, आणि
कुमार सर, खूप सुंदर विषय, आणि प्रतिसादही छान.
हा धागा वाचून मलाही अनेक विषय आठवले, जे अर्धवट लिहून सोडून दिले, किंवा पुढे नेऊ शकलो नाही.
यावर स्वतंत्र धागा काढणं जास्त सयुक्तिक होईन असं वाटतं.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
***स्वतंत्र धागा काढणं जास्त सयुक्तिक होईल असं वाटतं.>>> जरूर काढा.
शुभेच्छा !
छान मांडलेत विचार. पु ले शु
छान मांडलेत विचार.
पु ले शु
सर्वानी खूप माहितीपूर्ण
सर्वानी खूप माहितीपूर्ण लिहिले आहे.
)
पावसाळा सुरू झाल्यानंतर सायकल बंद झाली. त्यातच डी3 आणि अन्य vitamins च्या कमतरतेमुळे खूप वेळ बसणे, टाईप करणे बद पडले.
डाव्या हाताची हालचाल करता येईना. महिनाभर फिजिओथेरपी घेतली. अजून पूर्ण बरा झाला नाही हात.
त्यामुळे एक सुचलेली कथा अद्याप पूर्ण करता आली नाही. हुकलीच. (मायबोलीकरांवरचे संकट टळले
पण नाही. दिलीप प्रभावळकर यांच्या एका सिनेमाच ट्रेलर पाहिलं आणि धसका घेतला. हाच विषय सिनेमात असेल तर मग हे संकट पूर्ण टळलं. पण नसेल तर? मग माबोकरांची खैर नाही.
अजून एक कथा पूर्ण सुचली आहे. ती कदाचित पूर्ण होईल.
व्हॉइस टायपींग पर्याय अजून नीट जमत नाही .
खूप उशीर झाला तर मग हे सर्व हुकलेले लेखन होऊन जाईल.
सध्या रोज मायबोली उघडून एकटाकी पूर्ण करता येतं का म्हणून बसते. पण दहा मिनिटे झाली कि सोडून द्यावे लागते. एका पानात कथा सांगता न येण्याचा शाप आहे.
कुमार सरांकडे बोलतं करण्याची जादू आहे. हटके विषय असतत. जेव्हा आपण त्या स्थितीत जाऊ त्या वेळी विलक्षण रिलेट होतात.
ताक : सरांच्या अचूक शब्दयोजनेच्या भयाने भयानक ऐवजी विलक्षण हा शब्द वापरला आहे.
(कधी कधी जड शब्द वापरायला गंमत वाटते. बोलताना उच्चार सदोष असतात माझे.)
*अजून पूर्ण बरा झाला नाही हात
*अजून पूर्ण बरा झाला नाही हात.
>> काळजी घ्या. शुभेच्छा आहेतच आणि नंतर तुमची कथा हुकणार नाही याची खात्री पण आहे
आभारी आहे सर.
आभारी आहे सर. __/\__
तुमचे हुकलेले विषय फार रोचक
तुमचे हुकलेले विषय फार रोचक आहेत. खूप खूप आवडेल ह्यांच्या वरचे लेखन वाचायला.
धन्यवाद!
धन्यवाद!
त्यातल्या काही विषयांवर लिहायची इच्छा असली तरी अजून मनाची हाक त्या विषयांपर्यंत पोहोचत नाहीये
पाहू पुढे कधीतरी