चांदीचा रुपया

Submitted by धनश्री- on 29 January, 2023 - 10:05

प्रिन्सिपल बाईंच्या दारावर टकटक झाली. चष्मा सावरत, हातातील, पेपरांच्या चळतीवरुन नजर न हटवता, गद्रे बाईंनी म्हटले "कम इन." मान वर करुन त्यांनी पाहीले तो स्वच्छ आणि फॉर्मल कपड्यातील २२-२३ वयाचा, एक तरुण दारात उभा होता. हातात पुष्पगुच्छ आणि कसलेसे पुडके. महादूने त्या व्यक्तीला आत सोडले व तो निघून गेला. हा मुलगा कोणाचा पालक नसावा कारण तेवढा वयस्क नव्हता तो. सकारात्मक होती त्याची देहबोली. आल्याआल्या छानसे तोंडभर स्मितहास्य करुन, त्याने नमस्कार केला. आणि बाईना त्याने विचारले - "बाई ओळखलत?" हा कोणी माजी विद्यार्थी होता तर. बाईंनी, त्याला समोर खुर्चीवरती बसण्याची खूण केली. तो स्थानापन्न झाल्यावर, बाई म्हणाल्या, "कोण?" त्यावर हसून तो म्हणाला "बाई, "२००८ बॅचचा उमेश साळुंके मी." बाईच्या हाताखालून इतके विद्यार्थी जात की त्यांना पटकन आठवेना. ते जाणून उमेश म्हणाला "बाई तुम्हाला नाही आठवणार मी कदाचित, मराठी शिकवायचात तुम्ही मला." "तुम्हाला धन्यवाद म्हणायला आलो आहे. माझ्या नशीबाची रेखाच बदलून टाकलीत तुम्ही." असे म्हणून तो पाया पडण्याकरता पुढे झाला आणि बाई म्हणाल्या 'अरे असू दे. काय करता तुम्ही?" यावर उमेश म्हणाला "बाई अरे-तुरे करा मला. मी सातार्‍याला, वाहतूक-नियंत्रण विभागात आहे. माझ्या हाताखाली बरेच अधिकारी आहेत. पण तुमचा आजन्म विद्यार्थीच आहे मी आणि अभिमान आहे मला त्याचा." बाईंना आता चेहरा थोडा थोडा आठवु लागलेला होता, नाव ऐकल्यावरती तर खात्रीच पटली. आणि त्यांना आठवण आली -
शिपाई महाददेव, २ वांड पोरांना, घेउन आलेला होता. बाईंना नेहमीचे 'ड्रिल' माहीत होते. पोरांना, जरब द्यायची - पालकांना चिठ्ठी पाठवून बोलवून घ्यायचे. त्याउपरांत वर्गशिक्षकांकडे त्या मुलांबद्दल चौकशी मुलांची प्रगती, मुलांचे अभ्यासातील लक्ष, वर्तणूक, रेड फ्लॅग्स, समग्र माहीती गोळा करुन, पालकांपुढे खरे चित्र उभे करायचे. ७ वर्षे मुख्याध्यापिका होत्या त्या. मुलांना कसे सुधरवायचे, अतिवांड, वासरांना कसे वठणीवर आणायचे ते त्या पक्के जाणून होत्या. परंतु वरवर काटेरी दिसणार्‍या या फणसाच्या गाभ्यात अतिगोड गरेही होते. बाई वरुन कितीही कठोर भासल्या तरी त्यांचे हृदय लोण्यासारखे मऊ होते. वात्सल्याचा जिवंत झरा त्यांच्या हृदयात होता. बाईं मुलांच्या आयुष्यातील, शिक्षकाचे महत्व जाणून होता. तारु भरकटणारच पण शिक्षकांनी दीपस्तंभ व्हायचे असते.

"ह्म्म्म!! काय महादेव, आज काय प्रताप केला आहे पोरांनी?" असे म्हणणार तोच त्या चमकल्या कारण एका पोराच्या कपाळाला मोठी खोक पडून रक्त भळभळत होते तर दुसरा मुलगा मान खाली घालून उभा होता. तो दुसरातीसरा कोणी नसून, आठवी ड मधला, उमेश साळुंके होता. गेल्या ३ महीन्यातील ही ४ थी तक्रार घेऊन, महादू हजर होता. वर्गशिक्षिका बाईंनीदेखील उमेशबद्दल रिपोर्टात हेच सांगीतलेले होते की - उमेश वर्गात मारामार्‍या करतो, इतर मुलांना त्रास देतो, कागदाची विमाने उडविणे, शिक्षकांना उलट उत्तरे देणे हे तर सर्रास होते. या वेळी, चिठ्ठी मिळाल्यावर उमेशची आई शाळेत आली. त्यांची परिस्थिती बरी नसावी असे त्यांच्या कपड्यांवरुन, रहाणीवरुन वाटत होते. उमेशची आई घाबरुन विचारत होती "बाई, माझ्या मुलाला शाळेतून काढणार तर नाही ना? त्याला सुधरायची, एक संधी द्या. बाई याचे वडील वारले ३ वर्षांपूर्वी त्यानंतर हा ऐकत नाही माझं. उमेशला बाहेर जायला सांगून , बाईंनी आईला विचारले बोला - आई ४ घरचा स्वयंपाक करुन पोट भरत होती. एकंदर, संध्याकाळी नाक्यावर टोळकं करुन उभे रहायचे आणि सिगरेट ओढणे, गोट्या, तीन पत्ती खेळणे हा उमेशचा दिनक्रम होता. बाईंनी उमेशच्या आईला दिलासा दिला व सांगीतले -बघते मी काय करायचे ते. समजावते उमेशला. उमेशची आई गेल्यानंतर दुसर्‍या दिवशी बाईंनी उमेशला ऑफिसात, बोलावणे धाडले. तो आल्यावर त्या म्हणाल्या "बस बाळ!" ते ऐकून उमेश चमकला कारण त्याला वाटत होते आजही पट्टी मिळणार हातावर नाहीतर ओरडा. पण बाई त्याला म्हणाल्या "उमेश काल बोलले मी तुझ्या आईशी. आईच्या डोळ्यात पाणी दिसलं मला. तुझे बाबा, ३ वर्षांपूर्वी गेले ना. मग आता घरातील कर्ती व्यक्ती कोण होणार, कोण त्यांची जागा घेणार? तुझ्यावर जास्त जबाबदारी आहे पोरा. आई चार घरी स्वयंपाक करते आणि तू जुगार खेळतोस- तुला तरी बरोबर वाटतं का? मला सांग शाळेकडून तुला काय मदत हवी. हवी ती मदत करायला मी तयार आहे." हळूहळू उमेशचे डोळे पाण्याने भरुन आले आणि बाईंची खात्री पटली - हा निर्ढावलेला गुन्हेगार नाही. लवकर सुधरु शकतो. उमेश म्हणाला - "बाई माझं शाळेत लक्ष लागत नाही. मला शाळा सोडावीशी वाटते. मला पैसे कमवायचेत. बाई म्हणाल्या "तीन पत्तीतून? असे मिळतात का पैसे? जुगाराने कोणाचे भले झालेल आहे का - याचा विचार करावास तू. तू जर शिकलास तर चांगली नोकरी आणि मान मिळेल." बराच वेळ बाईंनी त्याला समजावुन सांगीतले. आईला बोलावुन - आर्थिक मदत देऊ केली. पण त्याच्या आईने ती नाकारली. बाईंनी जातीने लक्ष घालून, शाळेनंतर तासभर त्याला गणिताची विज्ञान विषयाची शिकवणी लावु केली. हळूहळू उमेशला चांगले मार्कं पडू लागले, त्याच्या वागणुकीत, प्रगती दिसू लागली. त्याच्यामधील उर्जेला सकारात्मक दिशा मिळाली.
.
बाईंना, हे सारे आठवत गेले, बाईना आज कृतकॄत्य झाल्याची भावना झाली. एखाद्या विद्यार्थ्याने समोरून येउन, आभार मानणे, त्यांच्या व्यवसायातील हा कृतार्थते, सन्मानाचा क्षण होता. बाई म्हणाल्या " उमेश, चांदीचा रुपया मातीत पडला तरी तो रुपया असतो आणि घाणीत पडाला, म्हणुन कोणी तो टाकुन देत नाही. रुपया उचलून, पुसून घेतो. पण मूळात त्याला रुपया असावे लागते. तसा तू होतास. चांदीचा रुपया. यात मी काही केले नाही." यावर उमेशचे डोळे ओलावले आणि त्याने पुष्पगुच्छ आणि पेढ्याचे पुडके बाईंना देउन, त्यांच्या पाया पडून त्यांचा निरोप घेतला. आज तो ताठ मानेने जगत होता आणि हेही जाणून होता की कधीकधी आपल्याला कोणाच्या तरी नजरेत आपल्या-स्वतःच्या, लायकीचे व्हॅलिडेशन लागते, विश्वासाची पोच लागते आणि त्या क्षणी फक्त तेवढी मिळाली सुद्धा की आयुष्य सावरते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे छोटीशी कथा.. बाल कथा ग्रुप मध्ये का टाकत नाही... लहान मुलांनी वाचावी आणि बोध घ्यावा अशी कथा आहे...

छान...
मी कदाचित परिसस्पर्श शीर्षक दिले असते...

आवडली कथा.

मोठ्यांनीही (बिघडण्याच्या मार्गावर चालू पडलेल्या मुलांशी कसे वागावे ह्याबाबत) बोध घेण्याजोगी आहे.

कथा आवडली. विशेषतः शेवटचे मनोगत जास्त आवडले.
उगाच अवांतर ः सामो, तो उमेश कर्केचा होता की काय..संदर्भ - व्हॅलिडेशन मुद्दा Wink

सर्वांचे आभार.
प्राचि तू कर्क राशीचा मुद्दा काढल्यावर बरेच विस्कळीत विचार मनात येउन गेले.
- कर्क जातकांना लोकांच्या नजरेत व्हॅलिडेशन लागते असे नाही
- हां सूर्य जर ७ व्या घरात असेल तर परप्रकाशी असल्याने, म्हणजे 'स्व (१ ले घर)' घरात तळपत नसून, ७ व्या (नॅचरली तूळेचे घर) तळपतो त्या जातकांना व्हॅलिडेशन लागते.
- पण वडील(सूर्य) अचानक गेल्यानेस, सूर्य १२ व्या (क्षिती, लॉस) घरात असण्याचा सुद्धा संभव आहे. तेव्हा उमेशचा सूर्य कोठे टाकावा याबाबत संभ्रम.
- तरी सेल्फमेड असून, करीयरमध्ये धडाडीने पुढे आल्याबद्दल, आपण मेष रास १० व्या घरावर टाकू यात म्हणजे लग्न आले कर्क (डोळ्यात टचकन पाणी येणे) व सूर्य जर ७ व्यात असेल तर सूर्य मकरेचा. मकरेचा सूर्य मला पटतो ( लहानपणीची मनी ड्राइव्ह - पैसे मिळवुन घराला स्थैर्य आणण्याची इच्छा.).
---------
असो पण सर्वात सुंदर आणि अभ्यास करायला योग्य मला गद्रे बाई व उमेशचा synastry चार्ट वाटतो. एकमेकांवर कसा प्रभाव टाकला. गद्रे बाईंचा गुरु, उमेशच्या चार्टवरती कसा प्रभाव टाकतो.

Happy शरदजी (srd) मुद्दे बरोबर वाटतात का?

डिस्क्लेमर - १२ व्या घरात सू म्हणजे सरसकट वडील परागंदा अथवा त्यांचा मृत्यु नसते.

बालविभागाची कथा नाही ही.
__________
(अवांतर - कुंडली आणि ग्रह शक्यता
मुख्य शिक्षकांबद्दल बोलायचं तर त्यांना अशा प्रसंगांची, उदाहरणांची सवय झालेली असते. कडक उपाय,शाळेतून काढणे वगैरे करत नाहीत. त्यांचा गुरू २/५/१० मध्ये असण्याची शक्यता अधिक.
उमेशचा रवि अकराव्या स्थानात असेल. )

छान

ही खरं तर बालकथा नसून पालक कथा आहे. ह्यात त्या बिचाऱ्या आईने मुलाला व्यवस्थित वाढवले नाही असेही आपण म्हणू शकत नाही. इथला विलन म्हणजे मायलेकाचं दुर्दैव, कमनशिब . सतत मानहानी, उपासमार, आईचे न बघवणारे कष्ट आणि मुलगा आपण आईसाठी काही करू शकत नाही म्हणून हतबल आणि निराश. कदाचित त्यामुळे मनोरुग्ण. आक्रमक हिंसक वागणारा.
योग्य समुपदेशन आणि सहसंवेदना वेळेवर मिळाल्यामुळे तरून गेला.

छान आहे कथा. माझ्या मते विध्यार्थी नाही तर बाईच कर्क राशीच्या असाव्यात, कारण त्या समजून वागतात. बाई जर मेष, सिंह किंवा वृश्चिक राशीच्या असत्या ( त्यातल्या त्यात वृश्चिक हळवी रास आहे ) तर आधी दोन धपाटे दिले असते, मग बोलल्या असत्या. पित्याचे छत्र हरपणे या साठी एकटा तुळ राशीतला रवी नाही तर कधी कधी गुरु सुद्धा कारणीभूत ठरतो. तुळेतला नीचेचा रवी तर कारणीभूत असतोच. ( जवळची दोन उदाहरणे आहेत )

कथा आवडली छान आहे! Happy

हर्पेन, Proud

तो मुलगा वर्गात जर कर्कटक घेऊन मारामारी करीत असेल तर नक्कीच कर्केचा असणार. Proud

Pages