रंग पाण्याचे - भाग ३

Submitted by Abuva on 14 January, 2023 - 02:29
Sail ship in Storm (DALL-E)

महेश्वरनं दुसऱ्या दिवशी ख्रिसच्या मेसेजची वाट पाहिली. पण वीकेन्डही संपला तरी तिचा मेसेज काही आला नाही.
महेश्वरला रविवारी एक इमेल आली सेलिंग क्लबकडून. मुद्दा असा होता - येत्या शनिवारी आपल्याला सगळ्या बोटी हलवायच्या आहेत विंटर करता (विंटरायझिंग). मग ही अशी अशी कामं आहेत, त्यांची एक यादीच होती. या साठी ही स्किल्स असावीत, किंवा अशा गाड्या (म्हणजे तिथल्या भाषेत ट्रक आणि आपल्या भाषेत एसयूव्ही) असाव्यात. महेश्वरकडे ना कुठली स्किल्स होती ना ट्रक. मग त्यानं तातडीनं श्रमदान करणाऱ्या ग्रुपसाठी नाव नोंदवलं! मनात विचार आला - ख्रिस काय करणार आहे? कुठे, आहे कुठे ती? टाकावा का मेसेज? पण नकोच. आजपर्यंत महेश्वरनं स्वतःहून ख्रिसला एसएमएस केला नव्हता!

आता हा आठवडाच राहिला होता या वर्षीच्या सेलिंगचा. सोमवार-मंगळवार महेश्वर गेला होता डॉकवर. पण हीऽ गर्दी होती. त्याला काही सेलिंगची संधी मिळाली नाही. मग बुधवारी एकाबरोबर मिळाली. त्यानं महेश्वरला "होव टू" नावाचा प्रकार शिकवला. म्हणजे असं की वारा कितीही असो, पण एकाच ठिकाणी स्थिर रहायचं! विचार करा. भर समुद्रात, तुफान वादळातसुद्धा सेल बोटी या प्रकाराचा वापर करून आपला बचाव करतात. काय कमाल आहे!
मानवानं अनेक शतकं सेलिंग केलंय. अथांग सागराला, वाहत्या नद्यांना, भल्यामोठ्या सरोवरांना गवसणी घातली आहे. तीही वारा अन् लाटा यांची सांगड घालून! एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत शिडाच्या बोटी किंवा जहाजं या व्यतिरिक्त समुद्रसफरीचा इतर पर्यायच नव्हता. या कालावधीत शिडे उभारून, वादळलेल्या जीवनसागराला वा अवसेच्या राती उधाणलेल्या समुद्राला न दाद देता, त्याच्या अमर्याद विस्ताराला अनंत ध्येयासक्तीने, विजिगिषु वृत्तीने तोंड देऊन सप्तसमुद्र पालथे घातले आहेत, पृथ्वीप्रदक्षिणा केल्या आहेत. याच शिडाच्या जहाजातून प्रवास करत कोलंबसानं अमेरिकेचा शोध लावला आणि वास्को डी गामानं भारतवर्षाचा वेध घेतला. दिग्विजयी दिगंत कीर्ती अन् दारूण अपमृत्यूंच्या किती तरी कथा याच मानवी प्रयासांच्या भोवती विणल्या गेल्या आहेत! असा विचार केला तर वाटतं, पाण्याला रंग लाभतो तो माणसांमुळेच, नाही का? पिढ्यानुपिढ्या ही सेलिंगची कला आणि कौशल्य हस्तांतरित आणि वृद्धिंगत होत आलं आहे. हा सेलिंग क्लबही त्याच हेतूने - पुढची पिढी तयार करणे - चालवला जात होता. महेश्वरसारखा भारतातून आलेला परका इसम, केवळ हौसेखातर ही विद्या फुकट शिकू शकत होता, शिकत होता, तेही अमेरिकेच्या मध्यावरच्या एका मोठ्या सरोवरात!

गुरूवारी सकाळी ख्रिसचा एसएमएस, "येणार आहेस का आज?"
"हो!"
महेश्वर नेहमीप्रमाणे पोचला. ख्रिस आलेलीच होती. डॉकवर बरीच मंडळी होती, पण त्यांना एक नवी बोट मिळायला अडचण आली नाही. महेश्वरनं यावेळी अगदी शीड ओवण्यापासून बोट तयार केली, मग निघाले.
ख्रिस म्हणाली "काय करायचं?"
महेश्वरनं तिला काल शिकलेला "होव टू" प्रकार सांगितला.
ती म्हणाली चल करू, पण जरा लांबवर जाऊन करू. लेकच्या दुसऱ्या टोकाला एक बेट होतं आणि तो जरा उथळ भाग होता. मग तिनं डॅगरबोर्ड जरा उचलून घेतला. लगेच बोट थोडी अस्थिर झाली! तिचा हेतू हाच होता. आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देताना कौशल्य पणाला लागतं. नाचऱ्या बोटीला आपल्या इशाऱ्यावर नाचायला लावता येणे म्हणजे आपल्यात आणि बोटीत एक तादात्मभाव तयार झाला याची पावती. पण मग बोट कंट्रोल करायला महेश्वरला मजा यायला लागली. ख्रिस कौतुकानं महेश्वरच्या या प्रयत्नांकडे बघत होती. गेल्या वेळच्या छोट्या अपघातानंतर त्याची प्रगती बघणं तिच्यासाठी समाधानकारक होतं. बोट हाकता हाकता त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या. हवा जरा बदलली होती. म्हणजे दोन दिवस थंडी अचानक कमी होऊन गरमीच झाली होती. याला इंडियन समर म्हणतात असं ख्रिसनं सांगितलं. इंडियन? महेश्वरला मजा वाटली. पण तिनं सांगितलं ते इंडियन हे "रेड इंडियन" या अर्थानं आहे. दोनचार टॅकींग, जाईबिंग करत त्यांनी बेटाला प्रदक्षिणा घातली. पुन्हा मोकळ्या पाण्यावर आले. ख्रिसनं महेश्वरला डॅगरबोर्ड पुन्हा उतरवायला सांगितलं. सूर्य आता समोर मावळतीला जात होता. आकाशातील रंगपंचमी पाण्यात उमटली होती.
आता वेळ होव टू या मनूव्हरची होती. मग ख्रिसनं ते मेन सेल बॅक करायचं, रडर (सुकाणू) उलट्या दिशेला फिरवायचं हे तोंडी घोटून घेतलं. महेश्वर जपून, हळूहळू ते सगळं करायला लागला. जमलं बरचसं पण वेळ लागला. बोट जागीच उभी राहिली. महेश्वर आनंदला! पण ख्रिस अस्वस्थ झाली. ती म्हणाली "थांब, होव टू मधून बाहेर ये. मी तुला दाखवते झटकन कसं करायचं ते". मग महेश्वरनं रडर वळवून हळूच होव टू स्थितीतून बोट बाहेर काढली. मग त्यांनी जागा बदलल्या. तिनं जरा वेग घेत सांगितलं "बघ आता." आणि अक्षरशः दोन चार सेकंदात बोट होव टू झाली. तिच्या हाताचं आणि त्या कंट्रोल्सचं कोऑर्डिनेशन झकास होतं. एखादा कसलेला कलाकार जेव्हा त्याच्या कलेचा सफाईदार आविष्कार करतो, ती निव्वळ जादूच भासते! मग पुन्हा त्यांनी जागा बदलल्या. यावेळी ख्रिसनं "एक दोन साडे माडे तीन" या धर्तीवर काउंटडाऊन लावला आणि महेश्वरनं ती चपळाई दाखवायचा प्रयत्न केला. जरा धडपड झाली, पण जमलं त्याला. गंमत वाटत होती की आपल्या भोवती वारा वाहतोय पण आपली बोट नांगर टाकावा तशी स्तब्ध आहे! ख्रिसच्या चेहेऱ्यावर एक समाधान विलसत होतं. दोघंही रिलॅक्स झाले. समोर सूर्याचा गोळा ढगाआड गेला होता. आल्हाददायक वारा होता. लाटांचा आवाज होता. मधूनच दुसरी एखादी बोट जवळून जायची. त्यावेळी बोटीवर येऊन धडकणाऱ्या लाटांवर यांची बोट हेलकावे खायची.

ख्रिस म्हणाली "असंच मी आणि माझा नवरा लेक एरीमध्ये समरमध्ये सेलिंगला जायचो. रात्री एखाद्या बेटाच्या आडोश्याला होव टू व्हायचं आणि रात्र तारे निरखत घालवायची! काय ते दिवस होते!"
पर्सनल स्वरूपाचं असं ती पहिल्यांदाच बोलत होती.
"काय सांगतेस! तुझा नवराही सेलर आहे?"
"हो, होता. आम्ही दोघांनी मिळून दोनदा शिकागो-मॅकिनॅक रेसमध्ये भाग घेतला होता." तिनं आणि नवऱ्यानं मिळून शिकागो-मॅकिनॅक स्पर्धेत भाग घेतला होता हे ऐकून महेश्वर थक्क झाला. तरीच तिला हे सेलिंग इतकं सहजसाध्य होतं! कसलेली सेलर आहे ही! पण, पण ती 'होता' म्हणाली. म्हणजे काय? मग तो कुठाय? पण मी हे विचारू कसं? एकीकडे महेश्वरला त्या रेसबद्दल कुतुहल होतं. पण ख्रिसच्या वाक्याच्या गर्भितार्थामुळे तो द्विधामनस्क झाला.
थोडा वेळ शांततेत गेल्यावर ती म्हणाली, "त्या दिवशी मी तुझ्या इन्शुरन्स कंपनी विषयी वाईट बोलले. पण मनावर घेऊ नकोस. आय ॲम सॉरी फॉर दॅट. तू आयटी मधे काम करणारा आहेस. त्या कंपनीच्या पॉलिसीज आणि त्यांची क्लेम सेटलमेंट ह्याचा तुझ्याशी काय संबंध. पण मला तो सगळा अन्याय असह्य होतोय. नुसत्या विचारानेच अंगाचा तिळपापड होतो!" तिचा तळतळाट शब्दांतून, आवाजातून व्यक्त होत होता.
महेश्वरनं समजुतीने मान हलवली. गप्प रहा असं एक मन बजावून सांगत असताना दुसऱ्या मनाला रहावलं नाही. त्यानं पटकन विचारलं, "पण असं काय झालं, सांगशील का?"
क्षणात त्यानं जीभ चावली आणि घाईघाईत म्हणाला "सॉरी, मी जरा पर्सनल प्रश्न विचारला. प्लीज पार्डन मी."
ख्रिस विचारमग्न झाली होती, शून्यात बघत होती. तिनं कदाचित महेश्वरचा प्रश्न वा त्याची सारवासारव ऐकलीही नसावी. बोटीच्या तळावर गढलेली नजर सावकाश उचलून महेश्वरकडे बघत ती पुढे म्हणाली, "चार वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला. त्याचं बोटयार्ड होतं. पण या भानगडीत आम्हाला तुमच्या इन्शुरन्सवाल्यांनी खूप छळलं. शेवटी विकावं लागलं आम्हाला ते बोटयार्ड. आजही तो विकलांग अवस्थेत घरी बसून आहे. आता चांगले दिवस आठवायचे आणि हेही दिवस जातील अशी आशा करायची." तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती.
महेश्वर न बोलता मास्टपलिकडे दिसणाऱ्या झाडांच्या शेंड्याला टेकलेल्या लाल सूर्यगोलाकडे बघत होता. काही क्षण गेल्यावर तो म्हणाला, "सॉरी टू हिअर अबाऊट युवर हजबंड, ख्रिस. मला कल्पनाही करवत नाहीये". या वेळी तिनं मान डोलावली. "आता फक्त मीच सेलिंग करते. ते ही रहावत नाही म्हणून. ह्या पाण्याची, या वाऱ्याची अनावर ओढ आहे. ती... ती घरी बसू देत नाही. इथे येणं ही एक साधनाच आहे." एक क्षण थांबली. एक स्मित लकेर तिच्या मुखावर उमटली, "आणि मग तुझ्यासारखे भेटतात. तुझी सेलिंग शिकण्याची तीव्र इच्छा मला जाणवते. त्यातून तुला मिळणारा आनंद मला भावतो. एखाद्या लहान मुलाला नवं खेळणं मिळावं तसा तुझा उत्साह मला खूप आवडतो." ती थांबली. महेश्वर गुंग होऊन ऐकत होता.
"हा खेळ काय शिकवतो मला माहित आहे? सांगते. पण अगोदर तिकडे बघत जरा. ती स्पीडबोट पाहिलीस? वेग, वेग, नुस्त्या वेगाचं वेड आहे त्यांना. जीवनाकडे एकांगी बघतात ते. नुसतं मनोरंजन पाहिजे त्यांना. आणि ते सुद्धा ओरबाडून घेणं हेच कळतं त्यांना. पण सेलिंग तुम्हाला जगायला शिकवते. आपल्या हातात सुकाणू असतं खरं. पण वारं? पाण्याचे प्रवाह? तळ्याची खोली? हे काही आपल्या हातात नसतं! सुकाणूनं तुम्ही दिशा द्यायचा प्रयत्न कराल, पण वाऱ्याची जोड असेल तरच तुमचं ध्येय साध्य होतं. तेही साध्य करायला नागमोडी वळणं घेत चालावं लागतं. आणि तोच वारा जर मदमत्त झाला तर? वादळ येतं, जे जीवघेणं पण ठरू शकतं! पेशन्स शिकवतं सेलिंग. आपल्या परिस्थितीशी जुळवून घेत मार्गक्रमणा करायला शिकवतं हे सेलिंग. पण त्याबरोबरच परिस्थितीशी लढायला, परिस्थितीवर मात करायला जे कौशल्य लागतं ना तेही देतं." तिनं एक दीर्घ श्वास सोडला अन् घेतला. "हे सेलिंग माझ्यासाठी एक नुसतं मन रमवण्याचं, वेळ घालवायचं साधन नाहिये. प्रत्येक रपेट ही जीवनाचे धडे पुनःपुन्हा गिरवण्याची शाळा आहे." ती थांबली. महेश्वर निस्तब्ध होऊन ऐकत होता. वाहणारा वारा आणि पाण्यातल्या लाटा यांचाच आवाज आता कानी पडत होता. अचानक कुठलासा चुकार पक्षी कर्णकर्कश शिट्टी वाजवत इकडून तिकडे गेला.
ख्रिस भानावर आली. पाण्यात हात घालून तोंडावर एक शिपका मारून ती म्हणाली "चला, परत जायची‌ वेळ झालीये. उशीर नको व्हायला. तो जिम आज डॉकमास्टर आहे. उशीर झाला तर आपली थट्टा करून जीव काढेल!" वातावरण थोडं निवळलं.
परतताना ती म्हणाली, "भारतात गेले होते ना तेव्हा तिथे मेडिटेशन शिकले होते. त्याचा खूप उपयोग झाला या क्रायसिस मध्ये. ॲक्सिडेंटनंतर सुरुवातीला नवरा खूप वैतागायचा. पण आता त्यालाही शिकवलंय. तोही शांत झालाय जरा." हलकेच हसून ती म्हणाली, "तशा बऱ्याच गिफ्ट्स घेऊन आले आहे मी भारतातून. तिथे खूप फिरले, खूप भोगलंही, पण खूप, खूप शिकले".
महेश्वरला वाटलं, आठवणींचा डोह डहुळला तर काय काय निघेल याचा काय भरोसा? एक वेळ या तळ्याचा तळ गाठता येईल, निळ्या आकाशाचा विस्तार मापता येईल, पण मानवी मनाचा थांग लागणं कठीण आहे.

यथावकाश महेश्वरनं बोट धक्क्याला लावली. सोपस्कार आटोपले. आजचं सेलिंग शेवटचं सत्र होतं. उद्या दुपारपासून त्या बारा नौकांची शिडं आणि डोलकाठ्या (मास्ट) उतरवायला सुरुवात होणार होती. महेश्वरची मनोवस्था थोडी नाजूक झाली होती. आयुष्यात निर्मळ आनंद देणारा ह्या एका नवख्या खेळप्रकाराचा आज कदाचित शेवटचाच अनुभव! त्या अठरा-वीस फुटी बोटी, त्यांची पंचवीस-तीस फुटी ती शिडं, ते सुकाणू यांची आता भिती राहिली नव्हती. त्यांच्या माध्यमातून काय किमया घडवता येते याचा आता त्याला अंदाज आला होता. पुन्हा ही संधी कधी मिळेल याचा नेम नव्हता. कुठलीही अपेक्षा न ठेवता या क्लबनं, या मेंबर्सनी त्याला आपलं मानलं होतं. हातचं न राखता शिकवलं होतं. शब्दशः वाऱ्यावर स्वार व्हायचा आनंद दिला होता! आणि आत्ता ख्रिसनं त्याला सेलिंगची सांगड जीवनाशी, जगण्याच्या तत्त्वज्ञानाशी घालून एक नवीच नजर दिली होती. तिन्हीसांजेची वेळ तशीही गहिरी, पण आज ती वेगळंच गारूड घेऊन आली होती.

ख्रिस अचानक म्हणाली, "येतोस माझ्या घरी?"
महेश्वरसाठी तो धक्काच होता.
"तुझ्या घरापासून फार लांब नाहीये आमचं घर. वेदर इज ऑल्सो नाईस टुडे".
हा जरा वेगळाच प्रसंग होता. अमेरिकनांकडे, कोणा कलीगच्या घरी महेश्वर एक दोन वेळा गेला होता. पण...
महेश्वर विचार करतोय म्हटल्यावर ख्रिसनं त्याला खेचला, "चल, चल. तुझ्यासारख्या बॅचलरला काय उद्योग आहेत दुसरे!"
"पण मी व्हेज आहे."
"येस! मला शंका आलीच होती की तू शाकाहारी असशील. डोन्ट वरी, जाताना मी तुझ्यासाठी काही तरी व्हेज पिकप करते चायनीज प्लेसमधून. आमच्याबरोबर डिनर कर आणि पुढे जा.", ख्रिस म्हणाली.
मग काय, पर्याय नव्हता. तिनं पत्ता दिला. रस्ता सांगितला, आणि ती गेली पुढे. तिथल्या वॉशरूममध्ये जाऊन महेश्वरनं परत एकदा ऑफिसचे कपडे चढवले. जरा प्रेझेंटेबल झाला. आणि निघाला ख्रिसनं सांगितलेल्या पत्त्यावर!
(क्रमशः)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आतापर्यंत चे भाग अगदी अप्रतिम
सेलिंग वैगरे वाचताना एकदम भारी वाटतंय, तुम्ही स्वतः सेलिंग करता का? अभ्यास छान आहे विषयाचा.
सेलिंग आणि जीवनाची सांगड घातली ते तर अतिशय सुंदर
एकंदरीत अशा थोड्या संथ पण गुंतवून ठेवणाऱ्या आणि पत्रांशी जवळीक साधणाऱ्या (जस बॅकपॅक इंडिया ट्रीप करणारी ख्रिस, नोकरी बरोबर छंद जोपासण्यासाठी धडपणारा महेश्वरनं ह्याना कुठेतरी प्रत्यक्ष भेटलो आहे) कथा मला खूप आवडतात
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतोय

manya >> तुम्ही स्वतः सेलिंग करता का? अभ्यास छान आहे विषयाचा. >> हो, थोडे शिकलो आहे.
कथेतील बारकाव्यांबद्दल केलेल्या टिप्पणी आणि उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल आभार!

मी तेच विचारणार होते सेलिंगचे इतके डिटेल्स माहित आहेत म्हणजे शिकला असाल.
वेगळा विषय आहे त्यामुळे वाचायला आवडतंय.
हा ही भाग मस्त. आता पुढचा वाचते.