मी चंचल चिकारी, तू धीरगंभीर खर्ज

Submitted by डी मृणालिनी on 7 January, 2023 - 22:27

मी चंचल चिकारी
तू धीरगंभीर खर्ज
तू शांत सुंदर यमन
तुझ्यात काहीच नाही वर्ज्य !

मी नवशिक्याचे 'अलंकार'
तू अप्रतिम 'रागदारी'
मी शांत सरळ 'भूप'
तू करुणेचा 'आसावरी'

तुझ्या प्रसन्न मुखावर
'बागेश्री'चा थाट
संथ वाहणाऱ्या नदीचा
मी गजबजलेला घाट

स्वरांच्या अथांग सागरात
तुझा स्वच्छंद आहे विहार
माझ्या कोवळ्या रचनेचा
अजून फुलतो आहे 'बहार'

-मृणालिनी-

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही कविता काहीच्या काही सुंदर आहे.
मला संगीतातला ओ का ठो कळत नाही, पण हे असलं काही वाचायला, किंवा ऐकायला खूप मस्त वाटतं!

मृणाल, खूप सुंदर आहे कविता.
काहीच वर्ज्य नसणारा यमन ( ऐमन?) आणि सरळ शांत भूप ह्या दोन्ही उपमा आवडल्या.
तुझ्या कल्पनाशक्तीला असाच बहर ( बहार) येऊ दे. तुला धनश्री मिळो, तू जयजयवंती होऊन तुझे अगदी शुद्ध असे कल्याण होवो.
Bw

ही कविता काहीच्या काही सुंदर आहे.
मला संगीतातला ओ का ठो कळत नाही, पण हे असलं काही वाचायला, किंवा ऐकायला खूप मस्त वाटतं! >>+ 111

ही कविता काहीच्या काही सुंदर आहे.>>

काहीच्या काही आहे की सुंदर आहे नक्की काय? Happy

छान आहे कविता. संगीतातील रागांच्या उपमांचा अनुपम उपयोग!

सुरेख कविता!

संगीतातलं फारसं समजत नसूनही आवडली. >>> +१११

हीरांचा प्रतिसादही आवडला! हिरा, असं कुठलं क्षेत्र आहे का हो की त्याची तुम्हाला माहिती नाही! तुमचे प्रतिसाद नेहमीच वाचनीय असतात.

काहीच्या काही सुंदर'सारखाच हा विरोधाभास अलंकार>>>>>>
हा प्रतिसाद आवडला गेला आहे.
हिरा यांचा प्रतिसादसुद्धा काहीच्या काही सुंदर आहे. प्रत्येक संगीताची उपासना करणाऱ्या शिष्याला त्याच्या गुरूने द्यावा असा.