दुरतिक्रम

Submitted by Abuva on 28 December, 2022 - 11:30
वळचणीला बसलेली स्त्री

सन‌ १९८४(असावं):
आठवणीतली पहिली कोकण सहल. गणपतीपुळे, रत्नागिरी असं करत आमच्या गावाला पोहोचलो होतो. ते दिवस असे होते की पुण्यात राहूनही कोकणातली नातेवाईक वा गावकरी मंडळी फारशी परिचित नव्हती. खरं तर, माझ्या वडिलांचा जन्म कोकणातला! पण आजोबा व्यापारउद्योगासाठी गाव सोडून घाटावर आले आणि पार दूर तिकडे मध्य भारतात वस्ती करून राहिले. त्यामुळे अंतरं वाढलेली, वर्षावर्षांत भेटीगाठी नाहीत. शिक्षण-नोकरीसाठी माझे वडील पुण्यात आले खरे. पण त्यावेळी सगळ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची. ट्रीपा काढणं सोपंही नाही, आणि परवडणारंही नव्हतं. तर सांगायचं काय की... कोकणात मला सगळंच नवीन!
गावी आलो. सगळ्यांच्या गाठीभेटी चालल्या होत्या. एका परिचितांच्या घरी चाललो होतो. इतर घरांपासून हे जरा अलग, थोडं वरच्या अंगाला, दोन शेतं पार करून. ते झोपडीवजा घर बेताचंच होतं. कौलारू, बसकं, अवकळा आलेलं. समोर छोटं सारवलेलं अंगण. चढण चढताना पहिला नजरेस आला तो गोठा. गाईंचं हंबरणं कानी आलं. त्या गोठ्याच्या वळचणीला दोन बायका बसल्या होत्या. एक मध्यम वयाची बाई होती, दुसरी नुकतीच लग्न झालेली असावी. पण काही काम करत होत्या असं वाटलं नाही. 'काय म्हणताय वहिनी?' असा वडिलांनी प्रश्न विचारला खरा, पण त्यात एक अवघडलेपणा होता. वहिनी? म्हणजे घरधनीण? मग अशी बाहेर का? मला खूप काही आठवतंय असं नाही. चहा त्या काकांनीच केला (हे लक्षात आहे). पण मग घरातल्या बायका बाहेर का?
एकदम वीज चमकावी तसा माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या 'बाहेरच्या होत्या'! म्हणजे त्यांची मासिक पाळी चालू असावी. माय गॉड! मी नववी-दहावीत होतो, अगदीच काही लहान नव्हतो. मी हे बाहेरचं होणं ऐकलेलं, म्हणजे खरं तर वाचलेलं होतं. पण आयुष्यभर कनिष्ठ मध्यमवर्गीय, पुणेरी, दोन वा तीन खोल्यांच्या फ्लॅट संस्कृतीतील विभक्त कुटुंब पद्धतीत राहिल्याने हे, हे असलं दृष्य कधीच नजरेस पडले नव्हते. आमच्या घरात अपवादानेच या गोष्टीचा उल्लेख व्हायचा. तोही उडत-उडत, अप्रत्यक्ष. असली वागणूक कधी कोणाला - आई, बहिण, काकू, शेजारी - दिली गेलेली बघितली नव्हती.
त्यावेळी मनात काय काय विचार आले असतील आज सांगता येत नाही. पण ते दृष्य, ते पडकं घर, त्या गोठ्याच्या बाहेर बसलेल्या बायका आजही माझ्या आठवणीत फिट्ट आहे. म्हणजे त्याचा परिणाम निश्चित खोलवर झाला आहे.

सन २०२२:
तेच गाव, तोच मी. अशीच एक धावती भेट. तेच कुटुंब. आता सधन. त्या पडक्या घराच्या जागी दोन मजली, सर्व सुविधांनी सुसज्ज मोठ्ठं घर. आता ते काका नाहीत. त्यांची मुलं आहेत. गोठा, गुरं हे सगळं भूतकाळजमा! अंगणापलिकडे काही बांधकाम चाललं होतं. जोतं बांधून तयार होतं. भिंतींसाठी फाडे येऊन पडले होते. घरातल्या कर्त्या पुरुषानं सांगितलं, "साठवणीची खोली बांधतोय. आणि ती बाजूला लहान खोली आहे ना, त्यात बाथरूम आहे. घरातल्या बायकांना चार दिवस बाजूला बसायला लागते ना, त्यांची सोय नको?"
मी हतबुद्ध झालो. आजही, आजच्या दिवसांत, आजच्या युगात?

माझ्या पहिल्या आठवणीला सुमारे चाळीस वर्षं झाली आहेत. या कुटुंबाची सर्व अंगांनी परिस्थिती - आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक - बदलेली आहे. नावलौकिक मिळाला आहे. दारात गाड्याघोडे उभे आहेत. तरीही मानसिकता बदलली नाही? इतक्या कठीण, दुर्जय असतात या परंपरा मोडायला?
या घरातल्या, शेजारपाजारच्या सुना-लेकी आज नोकरी करतात, शाळेत शिकवतात, दुकानं चालवतात. त्या चार दिवसांत त्यांना कामाच्या ठिकाणी सुट्टी नाही, आणि घरी मात्र वेगळ्या बसतात? त्या ही असली वागणूक खपवून घेतात? मान्य करतात? का? का गोठ्यातून वेगळ्या बाथरूमची सोय असलेल्या खोलीपर्यंत झालेल्या 'प्रगती'वरच समाधानी आहेत? सुमारे चाळीस वर्षांपूर्वी जी विशीतली नवी सून होती, ती आता साठीतली सासू आहे. तिला या प्रकाराची चीड नाही येत? बरं, या अशा अन्याय्य, कालबाह्य रूढी मान्य करणाऱ्या स्त्रीचा नवरा? हा कुठे तरी, स्त्रीला पडदानशीन ठेवणाऱ्या तसल्या नवऱ्यांचीच एक सुधारुन वाढवलेली (वा कमी केलेली) आवृत्तीच वाटतो, नाही? कोण आहेत घरातले पुराणाभिमानी या वर्तनाला कारणीभूत? ही मानसिकता सुधारणार कधी? मला हे बोलण्याची, विचारण्याची हिंमत झाली नाही.
माझा या बाबतीत अभ्यास नाही. हा माझा एक, आणि एकच, असा अनुभव. निव्वळ विलक्षण धक्कादायक अनुभव. पण गैरसमज करून घ्यायला पुरेसा आहे, नाही?! विषय मोठा आहे, बहुचर्चित आहे, माझ्या नागर, आधुनिक तरी बाळबोध संवेदनांना न जुमानणारा आहे याची जाणीव आहे. तरीही मनातला कोलाहल मला स्वस्थ बसू देईना. मग मध्यमवर्गीय, पांढरपेशा, सुजाण, सुशिक्षित नागरिक काय करतो? तेच मी पण केलं आहे. 'वाचकांची पत्रे', वा त्यांचे नवे रूप: 'वेबवर अनामिक लेख'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

गावी आजही ही प्रथा सुरु आहे. पण त्याची अंमलबजावणी आता बरीचशी बोथट झालेली आहे. तरुण मुली घरात मोकळेपणे फिरतात पण देवाच्या खोलीत किंवा त्याच्या आजुबाजुला जात नाहीत. आधी जशी अस्पृश्यता पाळली जायची तशी आता पाळली जात नाहीये, त्यामुळे तेव्हा जो एक अवघडलेपणा येत होता तो आता येत नसावा. बाकी गावच्या लोकांसाठी ही एक सामान्य घटना आहे, याचे कोणाला विशेष काही वाटत नाही. मुली या दिवसात शाळा, कॉलेजला जातात, तिथे कोणी विचारत नाहीत. ही प्रथा आता देवकार्यापुरतीच उरलीय. अर्थात काही (ज्यांना इतर कामे नसतात) आहेत जे आजही असल्या बाबतीत कट्टरपंथीय असल्याचे दाखवतात.

पााळी पुढे ढकलायच्या गोळ्या घेणे चुक आहे हे आता सर्बत्र कळले आहे ही चांगली गोष्ट. मुलींना दिल्या जात नाहीत, अगदीच तसे कारण असेल तर आया घेतात पण त्रास होतो हे माहीत असल्यामुळे आधीसारख्या सर्रास घेतल्या जात नाहीत.

लेखनशैली चांगली आहे, जरी लेखाच्या विषयाचा चावून चोथा झालेला असला तरी.
पौगंडावस्थेतल्या आणि ह्या प्रथेविषयी अनभिज्ञ असलेल्या मुलाच्या मनावर उमटलेले ओरखडे छान चितारले आहेत. पण पुढे त्याच आता पन्नाशी ओलांडलेल्या माणसाचे आक्रंदन आणि त्याचे बंडखोर विचार मात्र अतिरंजित वाटतात. शिवाय त्यात हतबलताही जाणवते.