एवढं पुरेसं आहे

Submitted by संप्रति१ on 28 December, 2022 - 00:21

तेव्हा वीजा फार कडाडत होत्या‌. पावसाची चुळुक येईलसं दिसत होतं. अशावेळी समाधान मिळवण्याचे रुळलेले मार्ग असतात माणसाकडे.
जसे की मी चंद्रमा नावाच्या बारमध्ये शिरलो. तेव्हा तो मला पहिल्यांदा भेटला.

''ओ लेखक इकडं कुठं ?''
अरेच्चा ! अशी कोण हाक मारतंय म्हणून त्या दिशेने वळून बघतो तर एका कोपऱ्यातल्या टेबलला एक मनुष्य बसलेला. लुकडा. चष्मिश. वय तीस पस्तीस. बरीच वर्षे कॉन्टॅक्टमध्ये नसलेला एखादा मित्र अचानक बारमध्ये भेटतो आणि आपलं कसं चांगलं चाललंय याबद्दल फेकायला लागतो. अशा अंगाने ही गोष्ट पुढे नेण्याचा विचार होता. परंतु तो अनुभव आतल्या आत बिघाड पैदा करतो, असा माझा अनुभव आहे. आणि मी काही अनुभवांच्या बाहेर जाऊन लिहिणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे तो विचार पहिल्याच झटक्यात उडवून लावला.
'तुम्ही ओळखता काय मला?'- मी

''होय होय. ओळखलं म्हणूनच तर आवाज दिला ना.. या बसा.. काय घेणार?''

'नाही नाही नको. तुमचं तुमचं चालू द्या.'- मी

''अहो बसा हो...! बसा..! एकटेच आहे ना? मग आज आमच्याबरोबर बसा. बोला काय घेणार ?''

'नाही.. खरंच नको.. मी बसतो तिकडे... मला ओळख लागली नाही अजून.' - मी

''अहो ओळखीचं काय एवढं? माणूस म्हटल्यावर माणसाला ओळखणारच. त्याचं काय एवढं?''

च्यायला. हा असा का कोड्यात बोलतोय. इथं तर कधी बघितल्यासारखं वाटत नाही ह्याला. कोण असेल बरं ?

''अहो बसा हो.. मान ठेवा आमचा.. बसा..''

थोडंसं अवघडलेलं हसत बसलो.

''बोला. काय घेणार.?''

'तुम्ही जी घेताय तीच घेतो.'- मी

''कॅप्टन, ब्लॅक डॉग रिपीट करा. आणि सोडा.''

पिल्यावर माणूस फार बोअर मारतो. पुढच्याला स्कोप देत नाही.
ते तसंच असतं. परंतु कधीकधी विषय हार्ड होतो. जसा यावेळी झाला.

सुरुवातीपासून सुरुवात करू. मी संप्रति. लोक मला "ए संप्या" म्हणून पुकारतात. त्याबद्दल तक्रार करायचं मी आता बंद केलं आहे. आडनाव काही मी सांगणार नाही. शेक्सपिअरनं आडनाव सांगायला काहीच हरकत घेतलेली नाही. परंतु इथं आडनावातून क्षणात विश्वरूप प्रकट होतं, हे त्याला तिकडे बसल्यामुळे समजलं नसणार. तूर्तास त्यात पडायला नको. वर्तमानात राहू.

तर हो. आहे मी एक लेखक. थोडंफार लिहिलंय. थोडंफार प्रकाशितही झालंय. ते बरं की वाईट हे आपण ठरवू शकत नाही. काळ ठरवतो. मी मराठीत लिहितो. तीच एक भाषा मला येते. आत कुठंतरी खोलवर पाळंमुळं पसरली असतील. माहित नाही.
तुम्ही म्हणाल की पोटापाण्याचं काय ? जगण्याचे प्रश्न असतील. त्याचं कसं जमवता? तर त्यासाठी नोकरी आहे. नोकरीची मी इज्जत करतो. जिथे काम करतो तिथल्या सगळ्यांची मी इज्जत करतो. इज्जत करणे हा माझा छंद आहे.

मला फ्रेंच दाढी आहे. माझी दाढी हळूहळू विजय तेंडुलकरांच्या भारदस्त वळणावर चाललीय, ही गोष्ट सहज लक्षात येण्यासारखी आहे. परंतु काही अडाणी लोक माझ्या मागे मला 'अच्युत गोडबोले' म्हणतात. त्याबद्दल आपण बोलण्यासारखं काही नसतं.
ऑफिसात मीटिंगमध्ये फ्रेंच दाढी कुरवाळत शांतपणे बसून राहायला बरं पडतं. उत्सुकतेनं ऐकतोय, समजून घेतोय, असा कांगावा उभा करता येतो.
बाय द वे, फ्रेंच पद्धतीचा कीस सुध्दा असतो, असं मी ऐकून आहे. परंतु तशा स्वरूपाची डांगडींग करण्याची संधी माझ्यापुढे प्रकटत नाही. त्याबाबतीत कुणी माझ्याशी चर्चा करत नाही. कारण मी एक इंटलेक्चुअल आणि जंटलमन स्वरूपाचा माणूस आहे, अशा वावड्या त्याच लोकांनी उठवलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचा सौम्य शब्दात निषेध करतो.
कदाचित मी स्वतःहून त्या डांगडींग क्रियेवर थोडाबहुत प्रकाशझोत टाकावा, त्या अनुषंगाने विस्तारानं लिहावं अशीही काहींची अपेक्षा असते. परंतु मी ते टाळतो. कारण डांगडींग करताना कधीकधी समोरची पार्टी आक्रमक होणार.. मग सगळी सूत्रं समोरचीच्या हातात सोपवावी लागणार... त्यातून मग गळ्यावरती नखांचे छोटेसे दंश निर्माण होणार... आणि नंतर उगाच "मांजरीनं बोचकारलं" म्हणून थापा माराव्या लागणार... तर हे काही मला मंजूर नाही. तत्वनिष्ठ माणूस आहे मी.

बाकी मिटींगमधले काही मुद्दे मिस झाले तर जगात खंड पडतो, असा काही माझा समज नाही. त्यामुळे डोक्यातल्या डोक्यात समांतर काही सुरू असतं. एकदा असंच मकरंद साठयांनी पूर्वी कुठेतरी लिहिलेली झोंबरी टिप्पणी आठवली. भर मिटींगमध्ये अचानक हसू आलं. बेकार ठसका लागला. प्रोटोकॉलचा भंग झाला. साहेबांनी तोंड घाण केलं. ते ताडकन उठले. शर्ट काढून बायसेप्स, ट्रायसेप्स दाखवू लागले. चारी बाजूंनी सहकाऱ्यांचा जल्लोष. ''वा.! वा.! क्या बात.! क्या बात.!'' च्या आरोळ्या, चीत्कार..! तेव्हा कुठे मी भानावर आलो. तेव्हापासून मी साठयांना कडीकुलुपात बंद करून टाकलं.

आताशा मी फक्त मंद मंद हसत राहतो. अधूनमधून कुणीतरी विचारतं की बरोबराय ना ? मी मंद हसत सहमत होतो. सगळ्यांशी सहमत होतो. परंतु वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी.
मीटिंगमध्ये कधीकधी असं होतं की काहीतरी जास्तीचं काम आपल्या गळ्यात पडतंय, असं जाणवतं. तशा व्हाईब्स यायला लागतात. मग मुरलेले सहकारी सरसावून बसतात आणि टोलवाटोलवी करण्यासंबंधी वेगवान हालचाली सुरू करतात. उच्च दर्जाची भाषा वापरून समोरच्याला जेरीस आणतात. नाव न घेता घालून पाडून बोलतात. समोरच्यास रडकुंडीला आणतात..! हीपण एकप्रकारची कलात्मक उत्पादकताच आहे, असं मी मानतो. मला त्या सहकाऱ्यांचा हेवा वाटतो. कारण मला ते जमत नाही.

जेव्हा मिटींगमध्ये जोरदार भांडणं लागतात, तेव्हा माझी पहिली रिॲक्शन म्हणजे छातीत धडधड धडधड..! मग थोड्या वेळानं लक्षात येतं की सदर भांडणाचा आपल्याशी दुरून दुरूनही संबंध नाही.
मग मी रिलॅक्स होऊन ते भांडण ऐकू शकतो. एंजॉयही करतो. झालंच तर मनातल्या मनात व्यक्तही होतो, की किती नादान लोक आहेत हे..! उगाच क्षुद्र भौतिक गोष्टींसाठी भांडतात..! तसा मी अध्यात्मिक माणूस आहे.

मी एकटा राहतो. नाही, काही ट्रॅजेडी इत्यादी नाही. लग्न होता होता थोडक्यात हुकलं. जाताजाता ती मला म्हणाली की तुझ्यात कसलाच स्पार्क नाही. माझ्यात स्पार्क आहे, असा माझाही दावा नाही. किंबहुना माझा कसलाच दावा नाही. दावे करता आले नाहीत, म्हणून तर लिहायला लागलो. मला वाटतं, एवढं पुरेसं आहे, माझ्याबद्दल.

दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याच फ्लॅटमध्ये जागा झालो. डोळे उघडल्या उघडल्या पहिली रिॲक्शन अशी की साला दारू कमी करायला पायजे. कारण सगळ्या भोवतालावर एक चिकट जडपणा साकळून राहिलेला. अशा वेळी काही सुधरत नाही. संध्याकाळ उजाडते डोकं क्लिअर व्हायला. सकाळी लवकर उठणं तत्वात बसत नाही.
परंतु उठावं लागलं. फोन वाजत होता. त्याचाच होता.
“नीट ऐक संप्या. हापण एक विचारच आहे. फक्त एक भुक्कड विचार. रिॲलिटी नाही.
नीट ऐकलं की आपण एका झटक्यात विचारांच्या जंजाळातून बाहेर पडतो. एक छलांग, एक झेप घेतो.
आतल्या आत छत्री उघडल्यासारखं, मणक्यातून डोक्यापर्यंत काहीतरी सळसळत जातं.. विस्तारतं..! ”
हे असलं कायतरी हाय लेव्हलचं बोलणं ऐकू आलं. मी फोन ठेवला.
मग आम्ही भेटत राहिलो. भेटलो की बसत राहिलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाचपाटील??
असे वाटतेय खरं

लिखाण एकदम खमके आहे बरे

हे फार उच्च कोटीतल आहे.
संप्रति
क्रिवि. सांप्रत; सध्यां. [सं.]
दाते शब्दकोश
संप्रति विचार न करता मजे ले लो.

ह्या संदर्भात चचा गालिबना उद्धृत करावं म्हणतो.. Happy

हैं और भी दुनिया में सुख़न-वर बहुत अच्छे
कहते हैं कि ग़ालिब का है अंदाज़-ए-बयाँ और

बहोत खूब, बहोत खूब. हे घ्या... Wink झब्बू.
हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है

Lol छान लिहिले आहे.
एवढं पुरेसं नाही आहे. अजून हवं. आपल्याच प्रतिमेतूनही मुक्तं व्हावं लागतं , कारण....
हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मिरे अरमान लेकिन फिर भी कम निकले