खेळसारीचा खेळिया

Submitted by केशवकूल on 25 December, 2022 - 10:54

खेळसारीचा खेळ

खेळसारी तुम्हाला थंड हवेचे ठिकाण म्हणून माहित असणार. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव. त्याला गाव म्हणणे बरोबर नाही.
जून महिन्यात पाउस सुरु होतो. त्या पावसाला लोक मान्सून म्हणतात. पेपरात तुम्ही वाचलं असणारच, “खेळसारीला मान्सूनचे आगमन!” खेळसारीला मान्सूनची पहिली चाहूल लागते. तिथे पाउस सुरु झाला कि समजायचं कि अजून ठीक चार दिवसांनी मुंबईला पाउस सुरु होणार. आणिक सात दिवसांनी पुण्याला पावसाची पहिली सर येणार! कमाल आहे ना. ढगांना ही बुद्धी कुणी दिली? त्यांना कसं समजत कुठं केव्हा जायचं, किती पडायचं?
खेळसारीला एकदा का पाउस सुरु झाला कि तो मग चार महिने नॉनस्टॉप चालूच राहतो. मे महिन्यात प्रवाश्यांनी खचाखच भरलेलं खेळसारी पावसाची पहिली सर आली कि रिकामे व्हायला लागते. प्रवाश्यांची लगबग सुरु होते. मिळेल त्या वाहनांनी घरी परतण्याची घाई. काही जण तर पायी पायीच डोंगर उतरायला लागतात. सपाटीला एक रेल्वेचं स्टेशन आहे. एकदा तिथं पोचलं कि हायसं वाटतं.
दोन तीन दिवसात पाउस उग्र स्वरूप धारण करतो. तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, मे महिन्यात प्रवाश्यांनी गजबजलेलं खेळसारी हळूहळू आकसायाला लागतं. ती थ्री स्टार हॉटेलं, ते शॉपिंग माल, त्या घोड्यांच्या बग्ग्या... हळूहळू दिसेनाश्या होतात. शेवटी तिठ्यावरचा चहाचा ठेला तो पण बंद झाला कि हि अदृश्य होण्याची किमया पूर्ण होते. खेळसारी शंभरएक वर्षापूर्वी जसं होतं तसं पूर्ववत होतं. चार पाच वनवासी लोकांच्या झोपड्या! फक्त.
भर पावसाळ्यात तुम्ही गुगल मॅपवर खेळसारीचा शोध घ्यायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला उमगेल कि खेळसारी जगाच्या नकाशावरून नाहीसे झाले आहे. ते आता दिवाळीच्या सुमारास उमटेल. राजापूरची गंगा आली कि जशी पेपरात बातमी येते अगदी तशीच बातमी ऑक्टोबर नोव्हेंबरला केव्हातरी “खेळसारी आलं” म्हणून येते. तिकडे ट्रेकिंग करायला गेलेल्या मुलांना खेळसारी प्रथम दिसते. त्यांनी बातमी आणली कि लोक खेळसारीला जायचा प्रोग्राम बनवायला लागतात. असं होत होत मार्च पर्यंत खेळसारी पूर्ण फुलते.
लोकांना एक गोष्ट कधीच समजणार नाही कि खेळसारी हे जादूचे गाव आहे. डोंगरातला देव हा जादूचा खेळ वर्षानुवर्षे खेळत आहे. अहो म्हणून तर गावाच नाव खेळसारी आहे. नाही विश्वास बसत ना. नको बसू देत.
जेव्हा खेळसारी फुल ब्लूम होत तेव्हा आदिवासींच्या चार पाच झोपड्या ज्या होत्या त्या देखील नाहीश्या होतात. कशाला पाहिजेत त्या डोळ्यात खुपसणाऱ्या झोपड्या? तोडो सालोंको. कितना पैसा मंगता है? घाबरू नका. पाउस सुरु झाला कि त्या पुन्हा अवतीर्ण होतील.
सगळ्या हिल स्टेशनमध्ये सनसेट पॉइंट असतोच असतो. तसा तो खेळसारीला पण आहे. पण इथं जरा वेगळी गंमत आहे. सनसेट पॉइंट हाच सूर्योदय पॉइंट आहे. पश्चिमेला तोंड करा. सूर्यास्त पहा. दिवसाची पहिली दिशाफांक होत असते त्या धुंदूकमुंदूक वेळी इथे या, पूर्वेकडे अरुणोदय पहा!
तर अशा ह्या जादूच्या गावात एक गोष्ट अविनाशी आहे. ती म्हणजे ते “डॉल्स हाउस.”
“डॉल्स हाउस” मध्ये बाहुल्यांचे खेळ चालतात. त्याच त्या कथा. राजा, राणी, राजकन्या, राजकुमार, राक्षस, जादुगार...
तर त्या सनसेट पॉइंटच्या शेजारीच दोन तीन दुकाने लावलेली आहेत. चहाचे, वडापावचे, पेप्सी कोकाकोलाचे, भाजक्या शेंगाचे अशी सटर फटर दुकाने.
आणि एक झोपडी आहे. त्यावर पाटी होती. “लिटल थिएटर. दहा रुपयात पहा. पहा लिटल राजपुत्राची नि अमरीश पुरीची बेफाम तलवारबाजी. प्यार किया तो डरणा क्या. अनारकली मधुबालाचा आयटेम! मायकेल जॅकसनच्या गुरुदेवाचा डान्स...”
मी जेव्हा जेव्हा तिथे जातो तेव्हा तेव्हा त्या झोपडीच्या बाजूची जागा पकडतो. सूर्यास्त बघायला येणाऱ्या लोकांची झुंबड लागलेली असते. लोक पाच वाजल्यापासूनच जागा पकडून ठेवतात. नगर पालिकेने सिमेंट कॉन्क्रीटचे बाक लावलेले आहेत. म्हातारे कोतारे त्यावर टेकतात. तरुण मंडळी जरा उंच जागी खडकावर क्यामेरे सज्ज करून गप्पा मारत बसलेले असतात.
मी काय सूर्यास्त बघायला जात नाही तिथं. असे सूर्यास्त कैक बघितले आहेत. मला काय त्याचे अप्रूप! मी नेहमी खेळसारीला चक्कर टाकतो ते काही तिथला डोंगर दऱ्यात खेळणारा निसर्ग बघण्यासाठी नाही. मला त्या भावल्या खेळवणाऱ्या जादुगाराशी बोलायचे आहे. इतके दिवस पाठलाग करून अजून देखील त्याचे नखही माझ्या नजरेस पडलेले नाही.
एकदा मी असाच खेळसारीच्या “श्री सागर” हॉटेलात चहा पीत बसलो होतो. बाहेर रस्त्यावरून बॅंड बाजा लावून जाहिरात चालली होती. एक वेटर दुसऱ्या वेटरला विचारत होता, “काय जात होतं रे?’
“काही नाहीरे. तो सनसेट पॉइंटचा म्हातारा आहे ना भावल्या खेळवणारा त्याची जाहीरात.”
ऐकून मी ताडकन उठलो. वेटरच्या ताटलीत हाती लागली ती नोट ठेवली. आणि त्या बॅंडच्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली. काही फायदा झाला नाही. आजही मी त्याला ब्युटिफुली मिस केलं. असं नेहमी होतं पहा. आपण ज्याच्यामागे धावत असतो त्याची नि आपली हमखास चुकामुक होत असते. आणि जेव्हा तो आपल्या समोरच्या टेबलावर चहा पीत असतो तेव्हा आपण त्याला ओळखत नाही. अशी आहे गंमत.
असाच सनसेटला बसलो असता त्या झोपडीत लावलेल्या स्पीकर मधून गाण्याचे सूर पाझरू लागले. मी स्वतःशी विचार केला आज सरळ खेळच बघुया की. दहा रुपये खिडकीत सरकवले, म्हटलं द्या एक. एक म्हातारा हात खिडकीतन बाहेर आला. “तुम्हाला एन्ट्री नाही.” का? का की तुम्ही बापे आहात. आणिक वर कथा पण लिहिता. चला हटा. पाठीमागून मुलांची चुळबुळ सुरु झाली. “अहो काका, आम्हाला तिकीट घेऊ द्याकी.” काय करणार बाजूला झालो.
मुलं आत जात होती. दहा पंधरा मिनिटांनी खुश होऊन हसत हसत बाहेर पडत होती.
हाऊ लकी! मला त्या मुलांचा हेवा वाटायचा. चायला आपण काय पाप केलं नि बापे झालो? लहानाचे लहान राहिलो असतो तर?
त्या दिवशी पण मी असाच बसलो होतो.
समोरच्या खडकावर दोन मुलं बसली होती. असतील सहा सात वर्षांची.
“आज मी त्याला बघितलं.”
“कुठे?”
“खाल्ल्या अंगाला मोहाच्या झाडांची दाटी आहे ना तिकडे? चेहरा नाही दिसला मागून बघितला. झपाझप चालत गेला नि मग एकदम नाहीसा झाला.”
“लोक म्हणतात कि तो कुणाला दिसत नाही म्हणून.”
मोठासा दिसणारा मुलगा उठला आणि लिटल थिएटरच्या झोपडीकडे गेला. त्याने झोपडीची कनात उचलून आत डोकावले.
“आत कोणीही नाही. भावल्या सुद्धा नाहीत.”
“तू रस्त्यावर लक्ष ठेव. वेळ झाली आहे. आता येईलच तो. तवर मी भाजक्या शेंगा घेऊन येतो. आज त्याला पकडायचच.”
तो शेंगा घेऊन परत आला. एक रुपयाच्या कितीश्या शेंगा येणार? जेवढ्या आल्या तेवढ्या एक तुझी, एक माझी अस करून वाटून घेतल्या. खायला सुरवात करणार तोच लिटल थिएटरचा लाऊड स्पीकर सुरु झाला.
“छ्या, ह्या शेंगाच्या आयच्यान, आज पण चुकामुक झाली.” म्हणजे भावल्यांचा जादुगार कोणाच्या नकळत आला देखील.
मी ऐकत होतो.
“काय नाव रे तुमचं? तुम्हाला खेळ बघायचाय? हे घ्या पैसे. जा. खेळ बघा. मजा करा.” मी उगाच अघावगिरी करायला गेलो.
दोघांपैकी मोठा दिसणारा माझ्या कडे वळून म्हणाला, “मी चंबा आणि हा बारकू. आम्हाला खेळ नाय बघायचाय. खूप खेळ बघितलाय. खेळ नाही बघायचा, खेळ करणारा बघायचा आहे. नाही समजलं?”
हा संवाद फिल्मी होता. आणि त्यांची केस माझ्यासारखीच होती.
“का?”
“आमचे काही प्रश्न आहेत. फक्त तोच त्याची उत्तरे देणार. त्याला कौल लावायचा आहे.”
“हे कुणी सांगितले?”
“कुणी नाही. आमचं आम्हालाच माहित झालं.”
“तुम्ही खेळ बघितला तेव्हाच त्याला पकडायचं?”
“भावल्या खेळवतो तेव्हा पण तो दिसत नाही ना. त्याचा फक्त हात दिसतो. आम्ही काय हाताशी बोलणार?”
सूर्यास्त झाला. रंगांची उधळण करत सूर्य असतास गेला. बघे लोक बघता बघता पांगले. सूर्य मावल्यावर काय बघायचे. सनसेट पॉइंटने अंधाराची चादर ओढून घेतली.
फक्त मी आणि ती दोन मुले दटून बसली होती. लिटल थिएटरच्या स्पीकरचा आवाज बंद झाला होता. लिटल थिएटरच्या झोपडीत मंद प्रकाश होता. बहुतेक भावलीवाला आवराआवर करत असणार.
“अरे तो बघ,” चंबा हलक्या आवाजात बारकूला म्हणाला, “श्श, अगदी आवाज करू नकोस.”
आमच्या पुढच्या बेंचवर अंधारात एक आकृती बसली होती.
चंबा आणि बारकू दबकत दबकत त्या आकृतीकडे गेले. मी पण उत्सुकतेने बघत होतो.
तो जो कोणी होता तो क्षितिजाच्या पल्याड तारकासमुहांच्याही पलीकडे शून्यात नजर लावून बसला होता. मुलांची चाहूल लागताच त्याची समाधी भंग झाली.
“ओहो, चंबा आणि तू बारक्या ना? तुम्हाला खेळ बघायचा का? नाही? मग इतक्या अंधारात तुम्ही काय करत आहात ह्या सुनशान जागी? घरचे लोक काळजी करत असतील. चला पळा घराकडे.”
“मला घर बीर कायपण नाही.” चंबा बोलला.
“मला घरपण नसलेलं घर आहे. बाप दारुच्या अड्ड्यावर पीत बसला असेल. आई चुलीत स्वतःची हाडं जाळत असेल.” तो सुकाट बारकू हसत हसत बोलत होता. त्याचे बोलणे ऐकून मोहाची झाड, हात पाय पसरून बसलेले डोंगर, ठाव नसलेल्या दऱ्या, अडखळलेली नदी सगळे ह्या ह्या करून खदाखदा हसायला लागले.
“चूप बसा.” जादुगारानं आवाज चढवून सगळ्यांना दटावलं.
थंडी वाढत होती.
“चला माझ्या झोपडीत जाऊ. तिथेच गप्पागोष्टी करू.”
मी पण हळूच त्यांच्या पाठोपाठ निघालो. झोपडीत हळूच डोकावलो.
आत खेळातल्या भावल्या ऐस पैस गप्पा मारत बसल्या होत्या. राजा मांडी ठोकून बसला होता. शेजारी राणी होती.
मधुबाला आरामात बसली होती. “ब्बाई ग. आज पुरी दमछाक झाली माझी.” तिने एक लांब उसासा सोडला.
राजकुमार आणि अमरीश बिडी पीत गप्पा मारत होते.
“सॉरी राज, आज चुकून माझ्या तलवारीचा घाव तुला लागला.”
“इटस ऑल राईट. होत असं कधीकधी.”
“ए ओ राजू, मला एक झुरका दे.” राणी कडे विडी पास झाली. एकच विडी सगळीकडे पास होत होती.
“अरे चूप बसा रे. खामोश जादुगार पधार रहे है.” भालदार चोपदारचा डबल रोल करणारा गण्या ओरडला.
“त्यात काय. येऊ दे. येऊ दे.”
“आर तस नाय. त्याच्या संगट दोन लहान मुलं बी आहेत.”
हे ऐकल्यावर सगळ्यांची दाणादाण उडाली. सगळे चुडी चूप होऊन आपापल्या जागी लाकडी भावल्या होऊन गप्प झाले.
जादूवाला मुलांना घेऊन आत झोपडीत आला, “मंडळी हो, गप का झालात. हे आपले नव्वे दोस्त. आज पर्यंत मला कुणीही प्रश्न केला नाही. हे असेच का आणि हे तसेच का म्हणून. आज हे मला विचारताहेत. हा चंबा मला विचारतोय कि “माझे आई बाबा कुठे गेले. मोहाच्या जंगलात गेले ते परत आलेच नाहीत.” आणि हा बारक्या मला काय म्हणतो कि “मी रोज देवापाशी एकच मागणे मागतो, देवा माझ्या बापाची दारू सोडव. ह्या मोहाच्या दारूत बुडालेल्या बापाला वाचव. तू सांगशील ते करेन.” पण देव ऐकेल तर शपथ. सांगा ह्यांना मी काय सांगू? काय उत्तर देऊ?”
प्रश्न अनेक उत्तर मात्र काय एक पण नाय.
“चला मी तुम्हाला तुमच्या थकेल्या, उतलेल्या, मातलेल्या जीवनातून मुक्त करतो.
तुम्हाला हीरो करतो. बोला आहे तयारी. मी तुम्हाला एक खलनायक देतो. करा त्याच्याशी लढाई. आयुष्यभर. त्या लढाईच्या जोशात तुम्हाला असले फालतू प्रश्न पडणार नाहीत. पडलेच तर उत्तरे पण सापडतील. तुमचे आई बाबा ते लढाई सुरु व्हायच्या आधीच हरले.”
“तुम्ही आम्हाला तलवारी द्याल?” बारकूनं विचारलं.
“हो हो. आणिक वर ढाल, चिलखत, बसायला घोडा देखील देईन.”
अरेरे. हे पण फसले. सगळेच फसतात. थोड्याश्या आमिषावर विकले जातात.
मी बाहेर ऐकत उभा होतो.
“अरे राजाभाऊ,- हा आमचा लेखक बरका. – ह्यांच्यासाठी जुळ्या भावांची एक फक्कड स्क्रिप्ट लिही. जुळे भाऊ, राजकन्या आणि तिची सहेली, राक्षस, राजकन्येची सुटका, शेवटी लग्न. हा चंबा म्हणजे विक्रमसिंह आणि हा बारक्या म्हणजे शार्दुलसिंह ठाकूर! ह्यांचा ड्रेस बनवा. त्यांना पगडी, सुरवार, भरजरी पायघोळ झब्बा आणि तघडक् तघडक् करायला घोडा द्या. उद्याची रीलीझिंगची डेट टाका. दाही दिशांना डंका पिटवा,
“जुळ्यांचा डबल धमाका.””
मी बाहेर उभा राहून ऐकत होतो. सगळे खुश होऊन आरडाओरडा करत होते.
“बास बास. चला झोपा आता. उद्या बरीच काम करायची आहेत.”
नीरव शांतता पसरली.
मी बराच वेळ वाट पाहत बाहेर थांबलो होतो, पण चंबा आणि बारकू झोपडीच्या बाहेर आले नाहीत. माझी खात्री झाली की त्या लिटल थिएटरच्या झोपाड्याने त्यांना आपल्यात सामावून घेतले असणार. सुटले बिचारे जीवघेण्या जीवनातून.
टाऊन हॉलच्या टॉवरवरच्या घड्याल्याने रात्रीच्या बाराचे ठोके दिले. सनसेट पॉइंट वर वेताळाची पालखी यायची वेळ झाली. जसा “तो” खेळ करतो तसा वेताळ पण आपले खेळ दाखवणार असतो. त्याच्या तोडीस तोड.
चला आता इथे थांबण्यात अर्थ नव्हता.
तर मला काय सांगायचे आहे ते हे कि ह्या मे महिन्यात तुम्ही सुट्टीसाठी खेळसारीला गेलात तर सनसेट पोइंट जाणारच. तर मग न चुकता लिटल थिएटरच्या झोपडीत पहा,
“जुळ्यांचा डबल धमाका.”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे , जबरदस्त आहे.

(संबंध नाही पण यावरून मला 'अहल्या'ही राधिका आपटेची शॉर्ट फिल्म आठवली. बघा वेळ मिळाल्यास कदाचित आवडेल. Happy )

कथा एकदम मस्त आहे. आवडली.

संबंध नाही पण यावरून मला 'अहल्या'ही राधिका आपटेची शॉर्ट फिल्म आठवली >>> अगदी अगदी. मलाही Happy

deepak_pawar, अस्मिता, वंदना , rmd
आपणा सर्वांचे आभार.
अहल्या बघितली आणि आवडली पण.

अज्ञातवासी
थॅॅन्क्स
.आणि यावर पुढचे भागही लिहिता येतील!!
एव्हढी भागम भाग!

संबंध नाही पण यावरून मला 'अहल्या'ही राधिका आपटेची शॉर्ट फिल्म आठवली. बघा वेळ मिळाल्यास कदाचित आवडेल>> खूप छान आहे फिल्म

ही कथा पण मस्त

@अज्ञातवासी
सध्या दुसऱ्या कथांमध्ये गुंतलो आहे. त्यातून सुटलो कि लिहीण्याचा प्रयत्न करेन.

आवडली....

दत्तात्रय साळुंके, @गौरी, Abuva, ऋन्मेऽऽष
प्रतिसादा बद्दल अनेक धन्यवाद!
@Abuva
हे मोहमायेच जंगल आहे. ज्याने "मोहाची" चव घेतली तो फसला.
त्याचा "खेला होबे!"