मोबाईलनामा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 19 December, 2022 - 09:27

अले, अले काय झालं सोनूला
असं रडू नको बाळा
तुला भूक लागली का?
थांब हा आता तुला भरवते
दारातून पुढे जिण्याकडे जाताना एका खोलीतून आलेला आवाज ऐकून पानसे दचकले कारण या खोलीतून असा लहान मुलाचा कुठलाही रडण्याचा आवाज आजवर आला नव्हता. दुसरे असे की या खोलीत राहणारी एकमेव प्रौढा अविवाहित होती आणि तिच्याकडे चाळीतले अथवा बाहेरून लहान मुल येणाची शक्यता धूसर. लोक लहान मुलांना तिथं जावू देत नसत.
ब-याच चाळभैरवांना तिला कुठल्याही वेळी कसलीही मदत करायची इच्छा असायची पण ती अतृप्तच राहयची.
पानसेंना आई सारखे बोबडे बोल ऐकल्यावर त्यांची जिज्ञासा एवढी प्रबळ झाली की हापिसात जायला उशीर झाला होता तरी पानसे लाळ गाळत आत डोकावले.
काय झाले वो प्रेमलता…
प्रेमलता ताई म्हणा पानसे
नाही मी म्हणणारचं होतो पण तेवढ्यात तुम्ही बोलला. आता तुम्ही म्हणालाच आहात ताई…
तर ताई काय मदत हवी का? आणि कोण रडतय? कुणाला भूक लागली? बिस्कीट आणायचे का?
अहो पानसे माझ्याकडं एक बाळ आला रांगत आणता त्यासाठी बिस्कीट ?
नाही म्हणजे बिस्कीट आणतो चांगले चारपाच पुडे हाईड अॅन्ड सीक…हाsss हाsss पण जरा कळूद्या नीट असं मुक्याsssनी कोण रडत होतं ?
पानसे कोण रडणार? मी मोबाईलशी बोलत होते.
ओह! म्हणजे तुम्ही मोबाईलशी बोलत होता…कायतरीच काय. अहो आपलं बोलणं दुस-यापर्यंत पोहचतवतो मोबाईल. त्याला स्वत:ला बोलायला आणि ऐकायला आले तर किती भानगडी साठवून तो कोणा कोणाला सांगेल.
पानसे ते काय ते बोलायचं ते सोडून सोडा हो…माझ्या बरोबर या चाळीच्या भिंतीही बोलतात. तर काय सांगत होते. माझ्या मोबाईलची बॅटरी डाउन झाली.तेव्हा मी त्याला म्हणाले असा टुकss टुकss टुक फुंदू नकोस. तुला भरवते ….
त्यापरीस मला चार्ज करा (मनातल्या मनात)
जा आता तुमच्याशी बोलून दमले . बिस्कीट आणताना. पानसे गुमान निघाले.

----------------------------------------------------------------------
पानसे आज संध्याकाळी कामावरून आले. बघतात तर बारक्यानं भोकाड पसरलंय. थांबायचं नाव नाही.
पानसे
काय झालं बारक्या भोकाड पसरायला?
आईस मेली बिली की काय?
माझ्या मरणाचीच वाट बघा. पण ध्यानात ठेवा ती प्रेमलता नावाची प्रेमलता हाय पण करणीची लवंगलता हाय . खायला जाल तर जीभ जळल.
अग दमून भागून आल्याव असं बोलली तर कसं वाटल. माझ्या मनात कोण लवंगी फिवंगी काॅन बी नाय.
व्हय का म्हून तिच्या मढ्याव सकाळी सकाळी बिस्कीट घातली…म्या बघतलं . दारातच उभी होती तव्हा.
बरं बरं तिला पाणी भरायचं होतं म्हणून मला पैसे देत म्हणाली दोन बिस्कीट पुडे आणाल का? त्यात तसलं काय बी न्हाई.
एवढ्यात बारक्या केकाटला आई, बाबा आजचा दिवस नका ना भांडू. मला डाक्टरकडं न्या चार दीस हागायला झाली नाय. पोट फुगलय माझं आन तुम्ही कशाला भांडताय.
तशी दोघं भानावर आली.
बारक्याला घेऊन डाक्टर कडं गेली…
बायक्याला तपासणी टेबलावर झोपवला. तसा त्याच्या हाताला आधीच्या पेशंटचा मोबाईल पडला होता तो लागला. त्याला पोटात जोराची कळ आली. बारक्याला त्याच्या आईने संडासात नेले. बारक्या कमोडवर बसून मोबाईलवर गेम शोधू लागला. त्याला त्याच्या आवडीचा पॅरानॉईड गेम मिळाला. बारक्याच पोट साफ झालं तरी उठायचं नाव नाही.
आई
बारक्या बाळ बस झालं उठ आता. बारक्यानं मोबाईल शर्टाच्या खिशात ठेवला. ढुंगण धुतले. बाहेर आला.
आय कसं मोकळं मोकळं वाटलं आताशा. बारक्याच्या शर्टाच्या खिशातला मोबाईल पाहिल्यावर
आईच्या ध्यानात सारा प्रकार आला.
चार दिवस झालं बारक्याला संडासला जाताना मोबाईल दिला नाही. कारण लोकांनी तक्रार केली की
बारक्या संडासात गेम खेळत बसतो त्यामुळे आमचा गेम होतो सकाळी सकाळी. एवढं नवसाचं कार्ट असल तर खाजगी संडास बांधा.
आता पानसे एवढे श्रीमंत असते तर चाळीत कशाला राहिले असते.
बारक्याला पुन्हा डाक्टरच्या टेबलवर झोपवलं. डाक्टरांनी बारक्याला तपासलं. कुठेच दोष आढळला नाही.
डॉक्टरची खात्री पटली की हा सारा मोबाईलनामा….
बारक्याच्या आईनं झाला प्रकार डॉक्टरला सांगितला.
डॉक्टर म्हणाला अहो मोबाईल संडासात नेणं चांगलं नाही. त्यानं तो आजारी पडेल. पानसे म्हणाले मग उपाय काय? परत पोट फुगलं तर ?
गोळ्या देतो त्यानं होईल पोट साफ.
बारक्याच्या गोळ्या घेऊन सारे घरी आले.

----------------------------------------------------------------------
पानसेंच्या बस मध्ये आज भयंकर प्रकार घडला. बसमध्ये खचाखच गर्दी होती. एका तरुणीसमोर पानसे उभे होते. ती दिसायला बरी होती त्यामुळे पानसेंची चुळबुळ चालू होती.
तेवढ्यात आवाज आला….
ए बघ बघ माझ्या डोळ्यात बघ….
असे दोन तीनदा झाले.
आता त्या तरुणीला वाटले हा पानसेंचा चावटपणा.
तिने पानसेंच्या गालावर खळ्ळंsssखट्याक केले.
पाणसेंना काय होतयं हे कळायच्या आत आजूबाजूच्या संस्कृती रक्षकांनी हात धुवून घेतला.
पानसें जेमतेम कसेबसे उठले आणि म्हणाले अहो मी नाही काय म्हणालो. माझ्या बाजूला एक टपोरी उभा होता बहुतेक त्याच्या फोनचा रींगटोन होता. तो उतरला मागच्या स्टॉपवर तुम्ही मला मारत असताना.
पानसे बस स्टॉपवर उतरुन घरी जायला निघाले. त्यांचे कपडे मळले होते. अंगाला खरचटले होते. कॉलर चुरगळली होती. कुणी तरी कॉलर पकडूनच त्याच्या थोबाडीत मारली होती. त्याची साक्ष सुजलेले थोबाड देत होते.
दारात पाय टाकताच मिसेस पानसे
सापडलं का घर बरोबर. कुठल्या कुलीन बाईची छेड काढली आज…आता हापिसातही येऊ का बरोबर.
कानफाटे पानसे बिचारे…खाया पिया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आणा.
( मंडळी हा फक्त मासला….पानसेंच्या घरी अजून काय धमाल होऊ शकते हे तुम्ही प्रतिसादात लिहायचं. बघू किती गमती असू शकतात. )

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users