टीव्हीवर बातम्या पाहात होतो. मध्ये मोटारीची जाहिरातही आली. तिच्यातल्या सुंदर मोटारी पाहून मी मुलाला म्हणालो, “काय सुंदर चकचकीत दिसतात ह्या मोटारी.! “ नव्या मोटारीच असतात जाहिरातीत बाबा.” तो म्हणाला.
त्यावर मी माझी एक आठवण सांगत म्हणालो,” आमचा एक दोस्त होता. त्याचे नाव मधु. मधु त्याच्या सायकलची अशीच, इतकी देखभाल करायचा! हा कंटाळत कसा नाही वाटण्या इतकी तो रोज घासून घासून पुसायचा. तेलाची धार एकाच ठिकाणी पण चेन गरगर फिरवित सगळ्या चेनला व्यवस्थित तेल पाजायचा. मग लहान बाळाचे तोंड पुसावे तितक्याच काळजीने चेन वरच्यावर पुसुन घ्यायचा.
दोन्ही चाकांची मडगार्डस तर बाहेरून कुणीही चकाचक करेल. मधुच्या सायकलची मडगार्डस आतूनही स्वच्छच नव्हे तर चमकतही असत! रात्री खाली रस्त्यावर त्या मडगार्डसचा प्रकाशच चाकाबरोबर फिरत येई. सीटही तो मेण लावून चमकवत असे. मग सायकलचा साचा -मधला त्रिकोणही-स्वच्छ का नसणार? चाकांची प्रत्येक तार व रिमही चमचम चांदीची वाटत असे. प्रत्येक स्पोक तो एकदा कोरड्या फडक्याने मग किंचित ओल्या फडक्याने व ते झाल्यावर रुमालावर अत्तराचा थेंब टाकावा तसा तेलाचा प्रत्येक थेंब फडक्यावर टाकत तो प्रत्येक तार (स्पोक) पुसायचा. ही फडकी काही शमॅायची किंवा पिवळी मऊ फ्लॅनेलची नसत. जुन्या गंजीफ्राकाची चार फडकी असत. हे घासून पुसून झाले की तो चाकांच्या हबकडे वळे. तिथेही तो हीच किमया करू लागे.
आम्ही, बिरबलाने बहुरुप्याच्या नंदीबैलाची परीक्षा घ्यावी तसे, एकदा त्याच्या सायकलच्या ब्रेक्सचे रबरी मोजे किंवा शूज स्वच्छ आहेत की नाही ते पाहू लागलो. ब्रेकसची रबरे राहू द्या दोन्ही टायर्सवरही धुळीचा एक कण नव्हता! आमच्याच बोटानी ती घाणेरडी झाली असतील!
मधुला सायकलची देखभल करताना कुठे,किती जोर लावून घासावे, खरारा कितपत आणि कुठे करावा हे माहित होते.काही भागांना, लहान बाळाचे नॅपकिनने स्पंज करावे तितक्या हळुवारपणे तो करायचा! उपजत म्हणतात ते ज्ञान मधुचेच असावे !
पूर्वी सायकललाही दिवे लावणे बंधनकारक होते. ते दिवे लहान असले तरी कंदीलासारख्या वातीचे असत. त्यांचीही तो निगा राखत असे. त्याच्या दिव्याची भिंगासारखी काच स्वच्छ असे.यामुळे त्याच्या दिव्याच्या प्रकाशाला कधीही काविळ होत नसे! नंतर तर डायनॅमोचे किंवा बॅटरीचे दिवे आले. त्यामुळे मधुच्या उत्साहाला आणखीच भरती येत असे. नशीब आपले म्हणायचे! मधु, दिव्यातून पडणारा प्रकाशही घासून पुसून स्वच्छ करत नव्हता!
आम्हा सगळ्यांनाच संशय असे की मधु त्याची सायकल रस्त्यावर चालवत नसणार. आवडत्या कुत्र्याला फिरवून आणावे तशी तिला तो घरातच सतरंजीवरून फिरवून आणत असावा !
सायकलच्या बाबतीत मधूची कुणीही परीक्षा घेऊ शकत नसे. तरीही आम्ही एका रात्री मधुच्या घरी गेलो. मधुची देखणी सायकल अधिकच सौदर्यवान दिसत होती ! फरशीवर जुन्या वर्तमानपत्राच्या अंथरुणावर भिंतीला टेकून मधुची सायकल डुलकी घेत होती. हॅडल गालावर खळी सारखे डौलात टेकले होते. अंधारात, घड्याळातील रेडियमचे काटे चमकावेत तशी,त्याची सायकल चकचकत होती !
मधुच्या सायकलमुळेच, त्यांच्या वाड्यापुरती तरी अमावस्याही पौर्णिमा होत असे!
काळाबरोबर मधुही पुढे जात होता. सायकलच्या जागी ल्युना आली. मधु तिलाही चकचकीत ठेवायचा. कुठुनही मधुची ल्युना ओळखू येत असे.
त्यानंतर स्कुटी आली. तिचीही देखभाल मधु त्याच्या सायकलप्रमाणेच मन लावून करायचा. पुढे स्कूटर आणि नंतर मर्दानी मोटरसायकलचे सुवर्णयुग आले. मधुला तीही ऐपत आली. मधु रोज रुबाबात मोटरबाईकवरून कामावर जात असे. इतरत्रही फिरत असे. पण मधुची मोटरसायकल शोकेसमधल्या बाईकपेक्षाही नेहमी नवी कोरी दिसत असे!
सर्व मध्यमवर्गीयांच्या प्रमाणे मधुच्या चढत्या कमानीलाही मोटरबाईक लक्ष्मणरेषा होती.
मधुची सायकल जशी चकाचक तसाच मधुही नेहमी एकदम नीटनेटका कडक असे. पायजमा शर्ट असला तरी परीट घडीचा. खळ लावून कडक केलेला! साधा हातरुमाल तो काय? पण मधुचा हातरुमालही व्यवस्थित घडी घातलेला. कधी गळ्याभोवती बांधला तरीही तो आकारातच बांधलेला असे. नेकटायही फिका पडायचा. मधु वर्णाने आम्हा बहुसंख्यांप्रमाणे काळा होता. तरी त्याच्या काळेपणाकडे कुणाचे लक्षही जात नसे. उलट परीटघडीचा चकाचक मधू म्हणूनही ओळखत असत.
मधुची मोटरबाईक पर्यंत प्रगती झाली. तरीही त्याने सायकल सोडली नव्हती! तो रोज निदान एक चक्कर तरी तिच्याबरोबर मारत असे. आमच्या हळू हळू लक्षात आले मधुसाठी त्याची सायकल, सायकल नव्हती तर त्याची प्रेयसी होती! मग ती सायकलही “मधुची सायकल” म्हणूनच का ओळखली जाणार नाही? हो, ती “मधुची सायकल “ म्हणूनच ओळखली जायची!
प्रत्येक गोष्टीला शेवट असतो मग ती कितीही चांगली असो अथवा चमचमणारी असो.
आमचा मित्र, परीटघडीचा मधु गेला. ‘मधुची सायकल’ही अस्तंगत झाली.
[You can read this blog and additional blogs at: https://sadashiv.kamatkar.com/blog ]