सोन चाफा

Submitted by रानभुली on 9 December, 2022 - 00:41

संध्याकाळी रानाच्या ओसरीवर
सावली धरण्याचा अतोनात प्रयत्न करणारे
जांभळाचे झाड
आपलीच पिकलेली पाने
गळून पडताना मोजत बसते
विरळ झालेल्या पर्णसंभारातून
उघडी पडते निळाई
काही खोडं बसतात ओसरीवर
आठवणींचा पसारा मांडून
काही पुटं राखाडी
गळून पडतात
काही घट्ट काळी पुटं
दुपारच्या ढणढणत्या आगीत
तावून सुलाखून रापलेली
निघता निघत नाहीत
कढईच्या बुडासारखी
काथ्या, साबण, माती, राख
सगळंच निरर्थक
कधी रगडली रेती तरी
तेल निघत नाही
कधी रेतीने रंग जातो
अवगुंठीत अंतरंग
दर्शन देतं ..
सायंकाळच्या सावल्या कलतात
ओसरीवर जमा होणारे
निळे कावळे कावकावतात
कोणसा शुभ्र मानसपक्षी
घिरट्या घालून शीळ घालत
हाळी देतो..
सायंकाळचा प्रकाश सोनेरी होत जातो
आणि
सोन चाफ्याचा मंद सुगंध
दरवळत जातो..
गोड उमलताना
देवाला वाहिल्यावरही
आणि सुकल्यावर देखील
मागे ठेवून जातो
काही काळ
सुगंधी भास
सोनेरी स्मृतींचे !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साद, अस्मिता, कुमार सर, मनिम्याऊ, दत्तात्रय साळुंके सर, वीरु आपल्या सर्वांचे मनापासून आभार! __/\__

कविता सुंदरच लिहिलीयं..
बाकी सोनचाफ्याचे फूल आणि सुगंध दोन्ही मला अतिशय आवडतात.