थोडं नवं, थोडं जुनं…

Submitted by अपूर्व जांभेकर on 8 December, 2022 - 06:27

थोडं नवं ऊन दे, थोडा जुना पाऊस दे
ब्रह्मचारी रानाला, सौभाग्याची हौस दे

आळवून काही जुने सूर, नवं-कोरं गाणं म्हण...
स्वतःच कधी स्वतःला, मन-मोकळी दाद दे!

वेचून आण फुले नवी, गोळा कर जुने गंध...
एकट्या-एकट्या वाऱ्याला, ओंजळभरुन दरवळ दे!

चाल जुन्या वाटांवर, आणि नवे मार्ग शोध...
चालता-चालता मागे वळून बघायचं कारण दे!

खुशाल निवड शब्द जुने, अर्थ मिळवं थोडा नवा...
ज्ञान नाही व्यासंगही, थोडीशी जाणीव दे!

सांभाळून ठेव नाती जुनी, माणसे नवीन नक्की जोड...
साऱ्यांसाठी मनामध्ये, विश्वासचं घर दे!

स्वप्न जुनेच बघताना, रात्र मात्र नवी हवी...
शांतपणे मिटलेली, समाधानी झोप दे!

उजळता जुनी पहाट, दाटती किरण नवे...
जीवनास तू तुझ्या, अंतरीचा सूर्य दे!
थोडं नवं ऊन दे, थोडा नवा पाऊस दे

© अपूर्व संजीव जांभेकर

Group content visibility: 
Use group defaults