आमची अमेरिका वारी….. भाग 3 (प्रशांत मठकर) सीएटल - ऑलिम्पिक नॅशनल पार्क

Submitted by Prashant Mathkar on 6 December, 2022 - 07:36

आमची अमेरिका वारी….. भाग 3 (प्रशांत मठकर)

सीएटल - ऑलिम्पिक नॅशनल पार्क

वॉशिंग्टन राज्याच्या वायव्येकडील ऑलिम्पिक द्वीपकल्पावरच ऑलिम्पिक नॅशनल पार्क सिएटलपासून कारने तीन तासांवर. इथे आल्यापासूनच लेक आणि तिच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपच आमची या पार्कची सैर घडवून आणायच प्लानिंग सुरू होत. पार्क खूप मोठ आणि पहाण्यालायक खूप ठिकाणं असल्याने जवळच्या शहरात एक रात्र मुक्काम करायच ठरल. तरीही पार्कमधली सर्वच प्रेक्षणीय ठिकाण एकाच फेरीत पहाण शक्य नसल्याने बर्फाच्छादित पर्वतरांगामधली हरिकेन रिज, क्रिसेन्ट लेक आणि हो रेन फॉरेस्ट ही तीन मुख्य ठिकाण पहायच नक्की झाल. मुक्कामासाठी पार्क पासून जवळच्याच फॉर्क या लहानशा गावातल्या सुंदर मॉटेलमध्ये रूम्सच बुकिंग झाल. थंडीच्या कपड्यांचाही पुरा इंतजाम झाला. सीएटलहून दोन गाड्यानी फेरीमार्गे पार्कपासून 90 मैलांवरच्या बेनब्रिज आयलंडपर्यन्त आणि त्यापुढे गाड्यांनी असा प्लान ठरला. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता समोरच्या हार्बरच्या एका धक्क्यावरून (Pier) सुटणाऱ्या क्रुझसदृश्य महाकाय फेरीमध्ये गाड्यांसह आरोहण करून आमच्या प्रवासाला सुरवात झाली आणि अर्ध्या तासातच बेनब्रिज आयलंडच्या धक्क्यावर उतरून गाड्यांमधुन आम्ही पुढे मार्गस्थ झालो. मुलांनी सर्व प्लानिंग अगदी चोख केल होत. आंटी आणि अंकलनी फक्त गाडीत बसायच, पहायच आणि मजा करायची. आंटीच्या बॅगमध्ये लाडू, चकली सारख्या घरी बनवलेल्या खायच्या वस्तू ठासून भरलेल्या होत्याच त्यामुळे ती बॅग मुलांची फेवरीट.

दुपारी अडीचच्या सुमारास आम्ही पार्कच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो. सुमारे दशलक्ष एकरात पसरलेल हे पार्क हिमाच्छादित पर्वत, पॅसिफिक किनारपट्टी, हिरवीगार समशीतोष्ण जंगलं, वैविध्यपूर्ण वनस्पति, जीवजंतु आणि प्राणी यामुळे जगभरातील निसर्गप्रेमीच आवडीच ठिकाण. इथला 7,980 फूट उंच माउंट ऑलिंपस हा ऑलिंपिक द्वीपकल्पातील सर्वात उंच पर्वत. 95% पेक्षा जास्त भाग सुरक्षित जंगल असलेल अमेरिकेतल्या सर्वोत्तम राष्ट्रीय उद्यानांपैकी एक अस हे उद्यान जागतिक वारसा स्थळही (World Heritage site) आहे.
IMG_20220611_171936.jpgआमच इथलं पहिल ठिकाण होत ऑलिंपस पर्वतरांगेमधली हरिकेन रिज. पार्कच्या प्रवेशद्वारापासून रिजकडे जाणाऱ्या 10-12 मैलांच्या रस्त्याच्या दुतर्फा दृष्टीला पडणार निसर्गसौंदर्य पहातानाच पुढे उलगडणाऱ्या खजिन्याची प्रचिती आली. हिरवेगार घनदाट वृक्ष, उंचच उंच कडे आणि खोल दऱ्यांमधून जाणारा रस्ता..मध्येच पसरणारी दाट धुक्याची झालर..सोबतीला सूर्याचा चाललेला लपंडाव.. क्षणात धुक्याचा पडदा गुंडाळून समोरच्या लॅंडस्केपवर उलगडणारा कॅलिडोस्कोप....जसजशी रिज जवळ येऊ लागली तसतशी वृक्षांची दाटी कमी होऊ लागली आणि बर्फाने भरलेले डोंगर, घळी आणि रस्त्याच्या आसपास बर्फ दिसू लागले. IMG_20220611_172152.jpgथोड्याच वेळात आम्ही रिजच्या कडेवर असलेल्या पर्यटन केंद्रापाशी पोहोचलो. रिजच्या कडेवरुन समोरच्या बर्फाच्छादित ऑलिंपिक पर्वतरांगांच विलोभनीय दृश्य दिसत होत. रिजवर पर्यटकांना चालण्यासाठी पायवाटा आखून दिलेल्या आहेत. या पायवाटानी चालताना थोडीशी वाकडी वाट करून बर्फात चालण्याचा आनंदही आम्ही घेत होतो. पण हा बर्फ जुना, घट्ट झालेला असल्याने बर्फात खेळण्याची मजा नव्हती. IMG_20220611_174835.jpgहिवाळ्यातही हिमवृष्टिवर अवलंबून ही रिज पर्यटकांसाठी खुली असते आणि इथे स्कीइंग, हायकिंग, स्नोबोर्डिंग सारखे खेळ चालतात. या भागात हिमअस्वलांचा निवास असल्याने फिरताना एखाद्या अस्वलाची भेट व्हायच्या शक्यतेच्या सूचनाही जागोजागी आहेत. आम्हाला मात्र हरिण, कोल्हा आणि इथल्या मुंगूससदृश्य मारमोट प्राण्याच्या भेटीतच समाधान मानाव लागल. रिजवर मनसोक्त भटकंती, फोटोग्राफी करून आम्ही इथून 54 किलोमीटर अंतरवरच्या क्रिसेन्ट लेकला जायला निघालो.

या द्वीपकल्पात एकाहून एक सुंदर अशी 650 हून अधिक सरोवर आणि पाणथळ जागा आहेत. त्यातल 12 मैल लांब आणि तीन मैल रुंद निलमणी रंगाच लेक क्रिसेंट हे वॉशिंग्टन राज्यातल दुसर सर्वात खोल सरोवर. हिमनदीपासून बनलेल हे सरोवर म्हणजे निसर्गाची एक अद्भुत कलाकृति जिच्या प्रथमदर्शनीच आम्ही प्रेमात पडलो. डावीकडे पिरॅमिड आणि उजवीकडे माऊंट स्टॉर्मकिंग या दोन पर्वतांच्या अंगाने बनलेल्या या सरोवराच पाणी अगदी स्फटिकासारख स्वच्छ. DSC_0301.JPGत्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे सरोवराच्या पाण्यात शेवाळ आणि त्यासदृश्य जीवजंतुच्या वाढीसाठी लागणारी पोषक तत्व फार कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे पाणी अतिशय स्वच्छ रहात. पर्वतरांगांवरून सरोवराला मिळणाऱ्या बर्फाच्या पाण्याच्या अनेक प्रवाहामुळे सरोवराच्या पाण्याच आणि त्यावरून वाहणाऱ्या वाऱ्यांच तपमान नेहमीच थंड असत. पाण्याच्या कडेने थंडगार वार अंगावर घेत पाईन वृक्षांच्या जंगलामधून पक्षांचा किलबिलाट ऐकत सभोवतीच्या स्वर्गीय निसर्गसौंदर्याची अनुभूति घेत फिरण्याचा अनुभव तर वर्णनातीत. IMG_7986.jpg
सरोवराच्या काठावरच ऐतिहासिक वारसा असलेल ‘लेक क्रिसेन्ट’ हे एक सुंदर हॉटेल आहे. सप्टेंबर 1930 मध्ये राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी या हॉटेलमधील आपल्या मुक्कामात या उद्यानाला राष्ट्रीय दर्जा देण्याची घोषणा केली.IMG_20220611_212446.jpgIMG_7802.jpgबाहेरच्या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेण्यात आम्ही एवढे मश्गुल होतो की आम्हाला या हॉटेलमध्ये शिरेपर्यंत रात्रीचे नऊ वाजून गेले तोपर्यंत सर्व खानपान सेवा बंद झाली होती. तरीहि, हॉटेलच्या लॉबीमधल्या शेकोटी समोर बसून काही फोटो काढण्याची संधी आम्ही साधलीच. तिथल्या कॉफी मशीनच्या कर्मचाऱ्यानेही मग त्याच्या मशीनमधली शेवटची शिल्लक कॉफी आम्हाला चकटफुच दिली. त्या कॉफीने आम्ही दिवसाची सांगता करून फॉर्क गावातील आमच्या मॉटेलकडे रात्रीच्या मुक्कामासाठी प्रयाण केल.

हो रेन फॉरेस्ट
आमच्या या ऑलिम्पिक नॅशनल पार्कच्या या टुरच्या दुसऱ्या दिवशीच ठिकाण ‘हो रेन फॉरेस्ट‘..पर्जन्यवन. सकाळी सर्वांची तयारी होऊन बाहेर पडेपर्यंत अकरा वाजून गेले आणि मॉटेल मध्ये नाश्ता किंवा लंचची सोय नसल्याने बाहेर हॉटेलमध्ये ब्रंच, म्हणजे नाश्ता आणि जेवण याच्या मधला प्रकार, घ्यायच ठरल. मॉटेल मधून चेक आउट करून बाहेरच्या मुख्य रस्त्यावरच्या एका हॉटेल मध्ये आम्ही स्थानापन्न झालो. हॉटेल मध्ये विशेष गर्दी नव्हती पण सगळा कारभार आरामात चालला होता त्यामुळे आम्हाला ब्रंच आटोपून रेन फॉरेस्टच्या रस्त्याला लागेपर्यंत एक वाजला आणि ब्रंचचा निर्णय अगदी योग्य होता याची खात्री पटली. इथून हो रेन फॉरेस्ट एक तासाच्या अंतरावर. आम्ही दोन अडीचच्या सुमारास रेन फॉरेस्टच्या व्हिजिटर्स सेंटर मध्ये पोचलो. सेंटरच्या कर्मचाऱ्याने जंगल आणि त्यातील ट्रेल्सविषयी थोडी माहिती दिली. इथे एक मैलापासून 18 मैल पर्यन्तचे ट्रेल्स आहेत. आपली ताकद आणि वेळेप्रमाणे ट्रेल निवडायचा आणि चालायला लागायच. आम्ही पाऊण मैलाचा छोटा ट्रेल निवडला आणि मार्गी लागलो. सेंटरचा गाईड रेन फॉरेस्ट विषयी माहिती देत आणि विशेष गोष्टी दाखवत आमच्या ग्रुप बरोबर काही अंतरापर्यंत आला.IMG_20220612_142410.jpg
माऊंट ऑलिंपसपासून पॅसिफिक किनाऱ्यापर्यंत वाहणाऱ्या हो नदीवरून या जंगलाला हो रेन फॉरेस्ट नाव पडल. संपूर्ण हिवाळाभर येथे सतत पाऊस पडतो. दरवर्षी होणाऱ्या सरासरी 140 इंच पर्जन्यवृष्टी मुळे बनलेल हे पानझडी आणि सूचिपर्णी वृक्षांच जंगल म्हणजे जणू काही दाट हिरवागार मंडपच. IMG-20220616-WA0044.jpgवर पसरलेली शेवाळ (Moss) आणि फर्न (म्हणजे आपल्याकडील बांडगूळ म्हणता येईल) ची झालर एव्हढी दाट की अगदी भर दुपारी कडक उन्हात पण सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही. जंगलात मुबलक वाढणाऱ्या विविध प्रकारच्या बेरी, फर्न आणि शेवाळ मुळे रूझवेल्ट एल्क (मोठ्या हरिणासारखा प्राणी), अस्वल आणि हरण, माउंटन लायन, बॉबकॅट, रिव्हर ऑटर आणि बाल्ड ईगल सारखे प्राणी या जंगलात मोठ्या संख्येने आहेत. IMG_7948.jpg
आम्ही चालत असलेल्या ट्रेलच नाव होत ‘हॉल ऑफ मॉसेस’. नावाप्रमाणेच पायवाटेच्या आजूबाजूला उंचच उंच, शेवाळ आणि फर्नचा कोट घातलेले विशाल वृक्ष दिसत होते.....जणू काही तपाला बसलेले ऋषिच. जमिनीवर शेवाळाचा हिरवागार गालीचा पसरलेला. चालता चालता गाईड देत असलेली रेन फॉरेस्ट आणि त्यातल्या जैवसाखळीची माहिती ऐकताना निसर्गाचा जन्म-मृत्यू-पुनर्जन्माचा अनोखा खेळ आमच्या समोर साकार होत होता. IMG_20220612_160438.jpgजंगलातली जवळ जवळ सगळी जमीन शेवाळ, फर्न आणि दाट झुडुपांनी व्यापलेली त्यामुळे नवीन बियाण्याला अंकुर फुटायला जमिनीवर जागाच नाही. अशा परिस्थितीत जगण्यासाठी चाललेल्या धडपडीत पडलेल्या झाडांच्या ओंडक्यांमधून बी-बियाण अंकुरत. दर वर्षी हिवाळ्यात होणाऱ्या जोरदार वादळात जंगलातले पाचशे वर्षांपेक्षाही जुनाट आणि दोनशे फुटाहुन उंच असे काही मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात. एका जीवनाचा अस्त होतो पण त्यातूनच नवीन जीवन जन्मालाही येत. या वृक्षांवर शेवाळ आणि इतर झाडांच्या बियांचा खजिनाच असतो. पडलेल्या वृक्षावरच हे बी-बियाण त्याच वृक्षांच्या खोडातल्या अन्नावर जीव धरत आणि हळूहळू रोपटयांची मूळं जमीनी पर्यंत पोचून खोडाच्या आधाराने वाढू लागतात. काही काळाने खोड कुजून जात पण तोपर्यंत या नवीन बाळांनी चांगलच बाळस घेतलेल असत आणि त्यांची वृक्ष बनण्याकडे वाटचाल सुरू झालेली असते. युगानुयुगे चालत आलेला जन्म,मृत्यू,पुनर्जन्माचा हा नैसर्गिक खेळ. IMG-20220705-WA0056.jpg
या ट्रेलवर दोन तास मनसोक्त भटकंती आणि फोटोग्राफी करून आम्ही परत व्हीजिटर्स सेंटरला आलो आणि दूसऱ्या दीड मैलांच्या स्पृस ट्रेल वर चालू लागलो. या ट्रेलवरची वृक्षसंपदा त्या मानाने तरुण. हो नदीच्या जवळून जाणारा हा ट्रेल तेवढाच सुंदर आणि जीवसृष्टीच रहस्य उलगडणारा. इथल्या जैवसाखळीचा केंद्रबिंदू म्हणजे ऑलिंपस पर्वतावरुन खळाळत येणारी आणि जंगलामधून वहात पॅसिफिक समुद्राला मिळणारी ‘हो’ नदी. ट्रेलच्या मध्यावर आपण या नदीच्या किनारी येतो. नदीच्या आजुबाजूने वाढणाऱ्या जंगलामुळे जमिनीची धूप होत नाही आणि पाण्याबरोबर वाहून आलेला गाळही नदीत वाहून जात नाही आणि जमीन सुपीक बनते. नदीच्या पात्रात पडणाऱ्या झाडांमुळे बनलेली तळी म्हणजे सालमन माशांची वसतीस्थानं. ही तळी जलचर आणि इतर वन्य प्राण्यांना मुबलक खाद्य पुरवतात त्यामुळे इथल वन्य आणि जलजीवन समृद्ध आहे. आम्हाला या जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या ‘बनाना स्लग’ या आपल्याकडील गोगलगाई सदृश्य प्राण्याच दर्शन झाल.IMG_20220612_144625_2.jpg पानं,अळंबी खाऊन त्यांच विघटन करून निसर्गाला ऊर्जा परत करणारा हा प्राणी या जैवसाखळीतील एक महत्वाचा घटक. पर्वत, नदी, जंगल आणि समुद्र यांच्या परिसंस्थेवर (Ecosystem) अवलंबून असणारी जैवसाखळी आणि या साखळीतील घटकांचं महत्व या रेन फॉरेस्टच्या भेटीत आम्हाला अनुभवता आल. कल्पनाही करता येणार नाही अशा हिरव्या रंगांच्या छटांची उधळण इथे आहे. कितीही सुंदर छायाचित्रण त्याला न्याय देऊ शकत नाही. हे प्रत्यक्षच अनुभवण्याजोग.. हे जंगल अमेरिकेतल्या काही शिल्लक राहिलेल्या रेन फॉरेस्टपैकी एक. या साखळीत नैसर्गिक किंवा मानवी आपत्तीमुळे खंड पडू नये यासाठी इथल्या लोकांची धडपड सुरू आहे. IMG-20220705-WA0043.jpgIMG_20220612_154056.jpg
इथे फिरताना प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे इथल्या अगदी आतील भागातल्याही रस्त्यांचा दर्जा. या भागातही पाऊस भरपूर, भरीला हिमवर्षाव, तरीही सर्व रस्ते खड्डेविरहित. रस्त्यांवर ठराविक अंतराने मार्गदर्शक खुणा त्यामुळे गुगलबाबाच्या मदतीशिवाय आपण अगदी नवख्या ठिकाणीही सहजपणे पोहोचू शकतो. वाहनचालकही नियम काटेकोरपणे पाळणारे. त्याचा हा बोलका अनुभव. इथला एक नियम म्हणजे सिंगल लेन रस्त्यांवर खुणा असलेल्या जागीच ओव्हरटेक करायच. एके ठिकाणी एका ट्रेलरच्या मागे आमच्यासह दहा बारा गाड्यांची रांग संथ गतीने चाललेली. समोरून येणारा रस्ता रिकामा असतानाही कोणी त्या ट्रेलरला ओव्हरटेक करत नव्हत कारण मध्ये कुठेच ओव्हरटेकिंगची खुणा नव्हती. शेवटी जवळजवळ अर्ध्या तासाने एका क्रॉसिंगवर ट्रेलर दुसऱ्या रस्त्याने गेल्यावरच मागच्या सर्व गाड्यांनी वेग घेतला…...माझ्या डोळ्यांसमोर आपला मुंबई-पुणे एक्सप्रेस वे उभा राहीला.... Road.jpg (क्रमश:)

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

छान. Happy

मध्यंतरी 'अनुभव' अंकातल्या सदराच्या निमित्ताने गॉर्डन हेम्प्टन या ध्वनी-पर्यावरणतज्ज्ञाच्या (acoustic ecologist) कामाबद्दल बरीच माहिती वाचली गेली. तो जगभरातली शांत ठिकाणं शोधत फिरतो, त्यांचं जतन करण्यासाठी झटतो. ऑलिंपिक नॅशनल पार्कमध्ये त्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने 'one square inch of silence' म्हणून एक जागा मार्क केली होती.
जगभरातल्या वेगवेगळ्या जंगलांतले नैसर्गिक आवाज त्याने रेकॉर्ड करून ठेवले आहेत. ते त्याच्या वेबसाईटवर ऐकता येतात. त्यात या नॅशनल पार्कमधल्या आवाजांची क्लिप मी विशेष लक्षपूर्वक ऐकली होती.
'हो' नदी आणि तिथल्या समुद्रकिनार्‍यावर वाहत येणार्‍या स्प्रूस झाडांच्या पोकळ खोडांमध्ये आत बसूनही त्याने रेकॉर्डिंग केलेलं आहे.
असो.
ऑलिंपिक नॅशनल पार्क हे शब्द वाचल्यावर हे सगळं आठवलं. जगात माणसं काय काय करत असतात!