भोळा ब्रम्हचारी

Submitted by बिपिनसांगळे on 19 November, 2022 - 00:00

भोळा ब्रम्हचारी
-----------------

तनिषाचे शब्द ऐकून स्वराला जणू कानात शिशाचा उकळता रस ओतल्यासारखं वाटलं .
तनिषा एक गोड चिमुरडी होती.
ज्याच्याविषयी काहीतरी नाजूक, गोड भावना असाव्यात, जे भविष्याचं सुखद चित्र असावं, कोण कोणावर भुललं कधी ? अशी अवस्था असावी... आणि ते सगळं चित्र एका क्षणात काळवंडलं जावं , यापेक्षा जगात वाईट गोष्ट काय असू शकते ?
स्वराला अंकितविषयी काहीतरी अनामिक , ओढ लावणारं वाटायला सुरवात झाली होती आणि .... तनिषाने सांगितलं की ...अंकितने तिला बॅड टच केलं म्हणून.
तिच्या डोक्यात उगा पॉक्सो वगैरे शब्द फिरायला लागले .
स्वरा तनिषाला घेऊन घरी आली. तर ती खालीच बच्चेकंपनीबरोबर खेळते म्हणाली. ती खेळायच्या मूडमध्ये होती . स्वराला बरंच वाटलं . अजाण पोरगी . अंकितने तिच्याशी काय केलं असावं , तिने विचारलं नाही. तिला ते ऐकायची इच्छा नव्हती. पण मन कसलं भयंकर ! ... ते तर नाही नाही ते विचार करतंच की . ती वर आली. आईशी काहीतरी बोलायचं म्हणून बोलली . तिने चहा केला.
“ अगं, चहात साखर नाही घातलीस,” आई म्हणाली.
“नाही तर घाल ना तू, राहते एखाद्यावेळेस ,” ती आईला वैतागून म्हणाली.
आई बिचारी तिच्याकडे बघतच राहिली. काय झालंय पोरीला , तिला कळेना. आरामखुर्चीत बसलेले बाबाही तिच्याकडे पहात राहिले .
स्वराच्या कपात आईने साखर घातली. मग स्वतःच्या आणि नवऱ्याच्याही. पण स्वरा तिथे थांबली नाही. ती कप घेऊन बेडरूममध्ये गेली . मग तिथल्या बाल्कनीत. तिला तिथे खूप आवडायचं . आपण आत्ता तिचा तो मूड नव्हता . ती लांबवर पाहत उभी राहिली. पालीने तोंडात धरलेल्या फुलपाखरासारखं तिचं मन जागेवरच तडफड करत होतं .
आकाश हळूहळू काळवंडत होतं. कुंडीतलं लाजरीचं रोपटं पान मिटून घेत होतं .
चहाचा घोट घेता घेता तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं . मग ती विचारात हरवली. चहा घ्यायचंही विसरली . तो गार झाला . मग तिने कधी नाही, ती कृती केली. तिने तो गार चहा गुलाबाच्या कुंडीत ओतला. गार झाल्याचा राग येऊन , एका तिरमिरीत .
गुलाबाला बोलता येत असतं , तर तो म्हणाला असता,’ बाई गं, तुझं दुःख समजतंय मला ; पण माझ्यावर का राग काढतेस? खरं तर तुझ्या हातातून मी त्याच्या हातात जायचा . ‘
ती समोरच्या अंधाराकडे बघत होती. घरांमधून दिवे लागत होते. तिच्या मनाच्या अंधारातही काही दिवे असेच चमचमू लागले .
-------
स्वराच्या घरी ते तिघेच. आई बाबा आणि ती. ती एका आयटी कंपनीत होती आणि तिचं वर्क फ्रॉम होम चालू होतं. ती सततच्या कामामुळे कंटाळून जायची. तिची चिडचिड व्हायची. तिला ती वर्कोहोलिक लाईफस्टाईल नको झाली होती.
त्यामध्ये आणखी चिडचिड म्हणजे तनिषा !
मोठमोठ्या डोळ्यांची आणि तिच्या मोठ्या डोळ्यांमध्ये प्रश्नही मोठेच असायचे. ती होती सात वर्षांची . तिचं घर शेजारीच होतं . तिचे आईबाबा दोघेही दिवसभर कामाला जायचे. ती एकटीच होती. ते तिला पाळणाघरात ठेवत. पण त्या काकू कोरोनामध्ये गेल्या. मग तिचं पाळणाघर बंद झालं. त्यानंतर तिला दोन-तीन ठिकाणी ठेवून पाहिलं. पण अनुभव काही चांगला नव्हता . कुठे तिचा खाऊ ढापला जायचा, तर कुठे दमदाटी करून झोपायला लावायचे . झोप येत नसली तरी. एवढी बडबडी पोरगी ती ; पण गप्प रहायला लागली . तिच्या आईला हा प्रकार लक्षात आला तेव्हा तिला टेन्शनच आलं . तिला तर मोठाच प्रश्न पडला. नोकरी सोडावी की काय ? असं वाटू लागलं. पण नोकरी चांगली होती. आणि घरकर्जाचे हप्तेदेखील तेवढेच चांगले होते !
त्यावेळी स्वराची आई देवासारखी पुढे आली. तिला म्हणाली,” अगं , फार काही विचार करू नकोस . राहू दे माझ्याकडे तिला. सकाळी शाळेतून आल्यावर थांबेल ती . जशी मला स्वरा तशीच ती .”
आणि स्वराचं घर हे जणू तनिषाचं दुसरं घरच झालं. तिची खूप दंगामस्ती चालायची. स्वराचे बाबा निवृत्त होते. ते आणि आई तिच्याशी खेळायचे . तिला खाऊ आणायचे. तिच्याबरोबर मूल होऊन जायचे. तनिषा त्यांच्याकडे रमून जायची. तिची आईदेखील निर्धास्त झाली होती.
खरं म्हणजे स्वराला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती. तिला ती नुसती नाटकं वाटायची . तनिषाशी लाडेलाडे बोलणं अन लपाछपी खेळणं. शी ! आईबाबांचा या वयातला हा प्रकार तिला नको वाटायचा .
तनिषाचा गोडपणा कधी कधी आगावपणात बदलला जायचा. एवढंच नाही तर तिचे तर्ककुतर्क फिशटॅन्कमधल्या माशांसारखे इकडून तिकडे सुळकायचे.
एकदा तिने स्वराच्या आईला विचारलं ,”हे कोण आहेत तुझे ? “ म्हणजे स्वराचे बाबा.
ती म्हणाली ,”माझे मिस्टर. जसे तुझे बाबा तुझ्या आईचे मिस्टर आहेत तसे.”
“ अस्सं होय ? पण मिस्टर तर यंग पाहिजे ना . माझे बाबा यंग आहेत. तुझे मिस्टर असे म्हातारे कसे काय ?”
त्यावर ते आजी-आजोबा हसतच सुटले.
बाबा कसले खोडकर ! लॅपटॉपवर काम करत असलेल्या स्वराकडे जाऊन त्यांनी ही गंमत तिला सांगितली व म्हणाले , “ऑनलाईन बघ बरं जरा , एखादा तरुण मिस्टर मिळतोय का ते ? तुझ्या आईसाठी .”
मग तिघेही हसू लागले. तनिषा नुसतीच तिघांच्या तोंडाकडे पाहत बसली . टकामका . तिला काही ती गंमत कळली नाही . “
पण चर्चेचा सूर बदलला.आई म्हणाली ,” तरुण मिस्टर हवाच आहे , पण माझ्यासाठी नाही काही....”
आणि स्वरा चिडली. तिने दोघांना बाहेर हाकललं . तिला हा विषय नको असे.
दोघेही बाहेर गेले. आई म्हणाली , “ पाहिलंत कशी चिडते ते. हिच्या लग्नाचा पत्ता नाही , आणि ही परक्या घरी गेल्यावर असं चिडून कसं चालेल ? माझाच सन्मान व्हायचा हिच्या सासरी !”
त्यावर बाबा म्हणाले , “ जाऊ दे गं . कामामुळे होतं तसं.”
आई म्हणाली ,” तुम्ही लेकीचीच बाजू घ्या. बाकी काही विचार करू नका.”
त्यावर बाबा बिचारे नेहमीसारखे गप्प बसले. त्यांच्या आरामखुर्चीत जाऊन .
पण आईला राहवत नसे . एकदा तनिषाला घरी ठेवण्यावरून स्वरा चिडली होती . तेव्हा आई म्हणाली , “ अगं , राहू दे तिला . आम्ही तरी काय करायचं ? तू दिवसभर त्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसतेस . नातवंडं असती आमची स्वतःची, तर सांभाळलीच असती ना...अन वाटतं आम्हालाही आता तसं की …”
त्यावर स्वरा चिडली आणि तिने तनिषासारखी आईशी कट्टीच घेतली .
तनिषाला चित्रकलेची आवड होती. म्हणून तिला चार बिल्डिंग्ज सोडून पलीकडे क्लास लावला होता. अंकितकडे.तो एका मराठी माध्यमाच्या शाळेत चित्रकला शिक्षक होता. एकटाच राहायचा . ब्रह्मचाऱ्याचा संसार होता त्याचा. गावाकडून आलेला . घरची मंडळी गावाकडेच. सकाळची शाळा असायची.घराकडे पैसे पाठवावे लागायचे. पगार पुरायचा नाही . मग चार वाजल्यापासून तो क्लासेस घ्यायचा. त्याची चित्रकला चांगली होती. हाताला वळण चांगलं होतं. अन वागण्यालाही .
त्याचा चित्रकलेचा अभ्यास चांगला होता. खूप माहिती होती. मनात मोठी मोठी स्वप्नं होती. त्यालाही सडवेलकर , सातवळेकर आणि अनेक मोठमोठ्या देशी-विदेशी चित्रकारांसारखं काम करायचं होतं. नाव कमवायचं होतं.
पण परिस्थितीच्या वरवंट्याखाली त्याची स्वप्नं भरडली जात होती.
दोन खोल्यांचं घर. हॉलमध्ये त्याचा क्लास चालायचा. आत किचन. स्वैपाकही स्वतःच करायचा . त्याच्या पाककलेलाही सुंदर वळणं असायची. एखादं चित्र नजाकतीने रंगवावं तसा त्याचा स्वैपाक चालायचा. पदार्थही वेगवेगळे बनवायचा . चित्रकार झाला नसता तर तो शेफ म्हणून पुढे आला असता .
खोलीत चित्रांची पुस्तकं, कॅटलॉग्ज ,मासिकं पडलेली असायची. एका कोपऱ्यात त्याचा ट्रायपॉड अन खाली एक मोठा बॉक्स . विविध रंग अन ब्रश कोंबलेला. त्याला टापटीपपणा आवडायचा ; पण शेवटी पडला ब्रम्हचारी . ब्रम्हचाऱ्याच्या घरात पसाऱ्याने हळूच हातपाय पसरलेले असायचेच की.
क्लास तसा शेजारीच असला तरी एक प्रॉब्लेम होता. त्या बिल्डिंगमध्ये खाली राहणाऱ्यांकडे कुत्रा पाळलेला होता. गावठीच पण आडदांड. पांढऱ्या रंगाचा . दणक्या आवाजाचा. छोटी छोटी पोरं त्याच्या आवाजालाच घाबरायची. तळमजल्यावरचं घर होतं. त्याला एका कोपऱ्यात बांधलेलं असायचं. अंकितकडे जाणारा जिना पलीकडे होता. पण तरी पोरं घाबरायचीच . त्यामुळे तनिषाला क्लासला सोडावं लागायचं आणि आणावंही लागायचं. आई ते काम करायची.
एकेदिवशी क्लासला जाण्याआधी तनिषा स्वराकडे आली. तिला तिची फ्रेश गुलाबी रंगाची लिपस्टिक हवी होती.
“कशाला गं ? अन फ्रेश गुलाबीच का ? ” स्वरा ओरडली.
“मला लावायचीये . ती लावल्यावर सरांना मी आवडेन.”
“अं ? …” स्वरा गडबडली.मग तिने तिच्या हट्टाखातर थोडीशी लिपस्टिक लावून दिली. मग आईने तिला क्लासला सोडलं .
स्वराच्या डोक्यात तोच विचार . तिला राहवेना. तनिषाला आणायला ती पहिल्यांदाच क्लासमध्ये गेली ! तिला तिचा तो लिपस्टिकवाला ड्रॉईंग मास्तर बघायचा होता. मुद्दाम !
पाच वाजता ती क्लासमध्ये गेली. आत पोरं बसली होती .सर दिसत नव्हते . ती दारातच थांबून राहिली कारण आत पाय टाकायला जागा नव्हती, एवढी पोरं . मास्तर फेमस दिसतोय , तिच्या मनात आलं .
ती निरीक्षण करत राहिली .पोरं बडबड करत होती , मस्ती करत होती आणि चित्रंही काढत होती . हॉलमध्ये तीन चित्रं लावलेली होती . एक सरस्वतीचं , एक निसर्गचित्र अन एक ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग . त्याने स्वतः काढलेली असावीत . तिन्ही आकर्षक होती .
अंकित किचनमधून बाहेर आला. त्याच्या हातामध्ये चहाचा कप होता. दारात उभ्या असलेल्या एका नवीन , तरुण , आकर्षक मुलीला पाहून तो गडबडला .
“बोला”, तो सावरून म्हणाला.
“तनिषा “, ती तुटकपणे म्हणाली.
“ पण आपण कोण ? “ अंकितने तिच्याकडे पहात विचारलं .
“तिची ताई समजा. ओके ? मुलं पळवणाऱ्या टोळीतली बाई तर काही मी वाटत नसेन ! …आईला काही काम आहे म्हणून ती आली नाहीये....तनिषा चल “.
“ हो ताई “ , तनिषा म्हणाली. ती तिची बॅग आवरू लागली. स्वराच्या फटकळ बोलण्यावर अंकित गप्प बसला, मग तो थांबून म्हणाला, “आज....तनिषा...लिपस्टिक लावून ? तिच्या आईला सांगाल का आपण ?”
“ हो ना? कोणासाठी लावलीय कोणास ठाऊक ? “ ती नाराजीने म्हणाली. अंकितला याचं उत्तर माहिती नव्हतं. तो बिचारा काय बोलणार ?
मग तो म्हणाला , “ चहा घेणार का आपण ? “
“ काही नको “ .
नशीब! सरांच्या मदतीला तनिषा आली , “ सर तुम्ही म्हणता ना की ओठांना गुलाबी रंग द्यायचा म्हणून. मग तुम्हाला ते चित्र आवडतं ना .” आता अंकितची ट्यूब पेटली. तो हसला आणि स्वराला म्हणाला,” आता आलं लक्षात. अहो, ही चित्रांमधले चेहरे रंगवताना पूर्ण चेहऱ्याला स्किन कलर देते. ओठांनाही. मग मी तिला सांगितलं की ओठांना गुलाबी रंग द्यायचा म्हणून.” आणि तनिषाकडे बोट दाखवत म्हणाला.” हे बोलकं चित्र मला तसंही आवडतं.”
अन स्वतःच्या विनोदावर तो स्वतःच हसला . पण स्वरा काही हसली नाही . तिच्या चेहऱ्यावर नाराजीची आठी मात्र उमटली . फक्त ती त्याचा टीशर्ट पहात राहिली . त्यावर बुद्धाचे दोन चेहरे होते . यलो ऑकर रंगाच्या टीशर्टवर काळ्या-पांढऱ्या रंगात रंगवलेले .
मग तो तनिषाला गंभीरपणे म्हणाला,” जा आता घरी. आणि लहान मुलींनी लिपस्टिक लावू नये बरं.”
एकदम ऍटॅक मोडमध्ये का असावी ही ? पहिल्यांदाच तर भेटतोय आपण . तो विचार करत राहिला . अर्थात , त्याच्यामागे कारण होतं , जे त्याला माहिती नव्हतं .
नंतर असं झालं की दोन दिवसांनी तिची आई आजारी पडली. बाबांची दुपारी झोपायची वेळ असायची. मग ती तनिषाला क्लासला सोडायला आणि आणायला जाऊ लागली.
हळूहळू तिला ती दोन मिनिटांची भेट आवडू लागली. सोडताना एकदा अन आणताना एकदा . पुढे त्याच्याशी बोलणंही होऊ लागलं. अंकित साधासरळ मुलगा होता. चित्रकलेवर, घरच्या लोकांवर प्रेम करणारा. मध्यम उंची आणि भरलेल्या शरीराचा. सावळा. दाट काळेभोर केस असलेला. तशाच मिशा. रहायला व्यवस्थित पण साधाच. कुठलाच बडेजाव नसलेला. मुख्य म्हणजे तथाकथित आर्टिस्ट मंडळींसारखा कुठलाच आव न आणणारा . कुठे केसच वाढवले आहेत किंवा दाढी किंवा अगदीच कॉमन नसलेल्या रंगसंगतीचे झब्बे , टॅटू वगैरे , असं काहीच नाही .
तिचं मन तिच्या कंपनीतल्या मुलांशी तुलना करायला लागलं. तिथली तिच्या वयाची पोरं शिकलेली, हँडसम, पैसेवाली. पण सगळाच झगमगाट ! नुसता उथळपणा ! व्यसनं आणि पैशाची उधळामाधळ. अपवाद अभावानेच.
हा साधा ब्रह्मचारी तिला आवडू लागला. ती रोज क्लासला जाऊ लागली. न चुकता . ती क्लासची वेळ कधी होते याची वाट पाहू लागली . कधी तिला जमलं नाही तर तिचा जीव खालीवर व्हायचा . आई सोडायला निघाली की , राहू दे गं तू , किती वेळा जिने खालीवर करशील ? असं म्हणायची .
एकदा त्याच्याकडे तिने एक निसर्गचित्र पाहिलं . अर्थात ते अंकितने काढलेलं असावं . चित्र असं होतं - उंचावरून दिसणारा खालचा गावाचा परिसर. खाली जाणारा नागमोडी रस्ता . पुढे डाव्या बाजूला एक शाळा , छोटीशी . तर उजव्या बाजूला एक देऊळ . त्याचा कळस अन शिखर रंगीबेरंगी . त्याच्या पलीकडे , आकाशाचा आरसा झालेला अस्मानी रंगाचा एक तलाव . बाकी सारी हिरवीगार शेती . कुठे पक्षी तर कुठे आकाशात जाणारा निळसर धूर . भारीच होतं .
" व्वा ! मस्त आहे . " ती म्हणाली .
" थँक्स . आत्ताचं नाही , जुनं आहे . माझ्या गावाचं आहे . गावाची आठवण आली म्हणून बाहेर काढलंय . "
" कित्ती निवांत गाव ! "
त्याने तो बुद्धाचे चेहरे असलेला टीशर्ट घातला होता . “ हा स्वतः रंगवला आहे ? “ तिने विचारलं .
“ हो “.
“पण असे दोन चेहरे का ? तेही वेगवेगळे ? “
त्याने टीशर्टवर दोन बुद्ध रंगवले होते . एक चेहरा डोळे उघडून , हसून पाहणारा होता . तर त्याच्या शेजारीच दुसरा चेहरा होता , नेहमीचा , मंद स्मित विलसत असलेला . मिटल्या नेत्रांचा .
“ बुद्ध म्हणजे चित्रकारांना नेहमीच प्रेरणा देणारा . मला या चित्रातून असं म्हणायचं आहे की , एक बुद्ध जगाकडे हसून पाहत आहे . म्हणजे जगाकडे उघड्या डोळ्यांनी , आनंदाने पहा . तसं पाहिल्यावर तुम्हाला वेगळं काही सुचेल . तर दुसरा शांत , चिंतनात्मक . म्हणजे तुमचा आतला आवाज ऐका . हे मी चित्रकाराच्या नजरेतून म्हणतोय . म्हणजे असं पहा अन चिंतन करा , मग तेच विचार तुमच्या चित्रातून व्यक्त होतील . “
“ ओह ! ग्रेट ? सिम्पली ग्रेट ! “ ती म्हणाली .
या भोळ्याला एवढं सुचतं ? तिला वाटलं .
मग ती तिथून निघाली . तिच्या डोक्यात विचार - याची नेहमीची स्केचेस तर पहिली आहेत . पण याआधी आपण याचं विशेष चित्र कधीच पाहिलं नाही . अन भारीच काम. अन गावही भारीच .तिला त्याचा हेवा वाटला . कसं छान चित्रात रमून जायला मिळतं याला . तिला स्वतःच्या कामाचा आणखीच राग आला . नुसतं काम न काम !
तिला त्याचा कलेचा व्यासंग जाणवला. तिला त्याची कला, त्याची कलेबद्दलची स्वप्नं स्वतः ची वाटू लागली. थोडी संधी मिळण्याचा अवकाश . तो मोठा चित्रकार होण्याच्या योग्यतेचा होता .
अंकितची अवस्था तरी काय वेगळी होती ? त्यालाही तिचा चेहरा, तिचं बोलणं हवंहवंसं वाटू लागलं होतं. उजळ वर्णाची, गोल चेहऱ्याची. हसले की एकसारखे दिसणारे पांढरेशुभ्र, शोभणारे दात, चाफेकळी नाकाची . खांद्यापर्यंत कापलेले पण बांधलेले केस. अन् तिचं हास्य ?....बाबो ! त्याच्यासाठी ते मोनालिसाचं हास्य होतं. पण तिच्यासारखं गूढ नाही तर मोहक, आकर्षक, आश्वासक !
ती नेहमीच सुती , आकर्षक रंगसंगतीचे टॉप्स घालायची . तिची ती आवड होती . तो नेहमीच एखाद्या चित्रकाराच्या नजरेने ते निरखायचा .
असंच एकदा तो पहात असता तिने विचारलं, " काय बघताय आपण ? "
" आपला पांढरा प्लेन टॉप . यावर छान डिझाईन काढता येईल . गळ्याभोवती . "
त्यावर तिने एक नवाच टॉप आणून त्याला दिला . त्याने त्यावर मरून आणि कॉफी ब्राउन रंगाने नाचणाऱ्या वारली आकृत्या काढल्या . पूर्ण गळा आणि बाह्या . त्या नाजूक आकृत्यांनी , रंगाच्या गडदपणामुळे , कॉन्ट्रास्टमुळे त्या टॉपचा लूकच बदलला .
बाबांनी त्याचं कौतुक केलं . तर तिने अंकितला एक गोल गळ्याचा , फिकट निळा टीशर्ट आणून दिला . त्याने त्यावर एक मजेशीर चित्र काढलं , अर्थात स्वराने सुचवलेलं .
एक वयस्कर माणूस . पायजमा अन टीशर्ट घातलेला . तो आरामखुर्चीवर बसलाय , सुखाने सुस्तावलाय . खाली कॅप्शन - जगात आराम हीच एक गोष्ट सत्य आहे !
आईला तो खूप आवडला . ती म्हणाली ," अगं , अगदी माझ्या मनातलं चित्र उमटलंय गं यावर ! "
तो बाबांना वाढदिवसाला भेट देण्यात आला .
एकदा तिने विचारलं, “ तुम्हाला कोणत्या प्रकारची चित्रं काढायला आवडतात ? “
“ मला - जुन्या कालखंडातली, म्हणजे ऐतिहासिक, पौराणिक किंवा पोर्ट्रेट्स !”
“मग तुम्ही का काढत नाही ?”
“हं ... “, तो उसासा सोडत म्हणाला , “ वेळ मिळत नाही आणि अशा चित्रांना बराच वेळ आणि अभ्यास लागतो “.
“मग वेळ काढायचा .”
“अहो , तुमच्याशी बोलण्यासाठी वेळ मिळत नाही अन....”
ती चमकली , “ माझ्याशी ? आणि ते का म्हणे ?”
त्यावर तो सारवासारव करत म्हणाला ,”अहो दिवसभराच्या ह्या व्यापात, सकाळपासून रात्रीपर्यंत मला मुळात वेळ मिळत नाही. मग थोडं वेगळं बोलण्यासाठी कोण आहे? ठराविक लोक भेटतात आणि त्यांच्याशी तेच ठराविकच बोलणं होतं ना . तुम्ही आला की जरा गप्पा होतात. वेगळ्या विषयांवर बोलणं होतं ... कृपया , तुम्ही गैरसमज करून घेऊ नका.”
ती तिथून निघाली. हसतच!...म्हणे गैरसमज करून घेऊ नका. कसला गैरसमज? मला तर तू आवडतोसच बेट्या !
पण तिला हे नक्की कळेना की त्याला ती आवडते की नाही ?
आपल्या मनातल्या नाजूक भावना या वेड्याला का कळू नयेत ? एका तरुण मुलीच्या नजरेतले विशेष भाव याला का कळू नयेत ? एवढा हा भोळा आहे का ? ... भोळा ब्रम्हचारी !
त्याला ठेवलेलं हे नाव तिला स्वतःलाच आवडलं . ती पुन्हा स्वतःशीच हसली .
-------
अंधार वाढला होता. स्वरा तंद्रीतून बाहेर आली.खाली पोरांचा गलका ऐकू येत नव्हता. तनिषा घरी गेली असावी . क्लासमधून तनिषाला घेऊन आल्यापासून, बॅड टच शब्दांनी काळजाला घरं पाडल्यापासून ,ती अजूनही बाल्कनीतल्या खुर्चीत बसलेली होती. ती तशीच बसून राहिली होती . न उठता, विचारात गढून .
आता तिच्या त्या जुन्या आठवणी बाजूला राहिल्या होत्या. तिचं मन व्यवहारी जगात आलं होतं .पण तरी त्याची तगमग, त्याची तडफड काही थांबली नव्हती. बाण लागलेल्या हरणासारखं ते विद्ध होऊन वाट फुटेल तिकडे पळत होतं .
आईने बेडरूममधली लाईट लावली होती . पण बाल्कनीतली लावली नव्हती. स्वराला डिस्टर्ब् करायला नको म्हणून.
ती आरामखुर्चीत तशीच बसून होती .
स्वराचा कंपनीतला पहिलाच दिवस होता, त्या दिवशी एक नुसती मुलींची पार्टी होती . तिला कळलं की, एकीचं म्हणे ब्रेकअप झालंय .म्हणून तिने सेलिब्रेट करायला पार्टी ठेवलीये .
तिला तर हे काही पचेचना. ती काही गेली नाही . अधूनमधून पार्ट्या होतंच रहायच्या . पोरं - पोरी जाम प्यायचे . सिगारेटी , हुक्का . बेताल नाचायचे . नंतरचं काही सांगायलाच नको.
सहकाऱ्यांनी तिला काकूबाई नाव ठेवलं होतं. त्याचं तिला काही दुःख नव्हतं . स्वैर वागून , व्यसनं करून , बडेजाव करूनच आयुष्यात आनंद मिळतो , असं तिचं मत नक्कीच नव्हतं . अर्थात , कंपनीतले सगळेच तसे नव्हते . पण तिचं जनरेशन ...
जिचं ब्रेकअप झालं होतं, ती नंतर थोड्या थोड्या महिन्यांनी वेगवेगळ्या पोरांबरोबर फिरताना दिसायची .आणि ज्याच्याशी तिने रिलेशनशिप तोडली होती, तो जाम प्यायला लागला होता. कंपनीतलाच पोरगा . पुढे तर त्याला त्या कारणामुळे कंपनीतून काढून टाकलं . अगदी अलीकडेच बातमी आली होती. तो गेल्याची . त्याने आत्महत्या केली होती ! त्या दिवशीही त्या पोरीने तिचं दुःख पिऊन साजरं केलं होतं . त्याच्या दुःखात , त्याच्या आठवणीत . दुसऱ्या दिवशी - रात गयी बात गयी ! अन तो वेडा तर जिवानिशीच गेला होता . अशा फालतू , बेताल पोरीसाठी .
पण आत्ता , या क्षणाला स्वराला तो का प्यायला लागला होता, ते कळलं . त्याचं चुकलं होतं पण त्याच प्रेम तर खरं होतं .
तिच्या डोक्यात हरल्याची, पराभूत झाल्याची भावना आली. जिवाचं काही बरं-वाईट करून घ्यावं अशी भावना निर्माण झाली. मध्येच संताप ... ज्या स्पर्शाची आपण आतुरतेने वाट पहिली . तो असा किळसवाणा असू शकतो ? बरं झालं ! तो स्पर्श आपण अनुभवलाच नाही . आणि त्या कल्पनेतल्या स्पर्शाचीही तिला भयंकर घृणा वाटली .
मग ती शांत झाली . भानावर आली. ती बाहेर येऊन फ्रेश झाली. तिने पुन्हा सगळ्यांसाठी चहा केला. साखर व्यवस्थित . गवती चहाही त्यात . ती आई बाबांशी इकडचं तिकडचं बोलली .
पण त्या बिचाऱ्यांना तिच्या मनातली खळबळ काय माहिती ? ती काय करणार आहे , हे त्यांना काय माहिती ?
पण ती स्वतःचं काही बरंवाईट करून घेणार नव्हती तर ती आता अंक्याचा काळ ठरणार होती . तिच्या मनात वेगळेच विचार चालले होते . अंकितचा सूड उगवण्याचे. त्याला धडा शिकवण्याचे. त्याला ती आयुष्यातून उठवणार होती आता.
हूं… भोळा ब्रम्हचारी समजायचो आपण. पण तसं नव्हतं. तो ब्रह्मचारी होता पण भोळा नक्कीच नाही, त्यामुळे त्याने असं केलं. का ? एकटाच राहतो म्हणून ? मनावर ताबा नाही म्हणून ? आपण त्याला ओळखलं नाही . आपण त्याला गावातलं , संस्कारी वळण आहे असं समजलो . आणि अशा माणसाला आपण आपला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडणार होतो ? चूक झाली आपली . अन नशीब की त्याने त्याचे रंग लवकर दाखवले .
का अशी चूक केली साल्यानं ? मोठ्ठा चित्रकार व्हायचंय म्हणे . हट ! आता तुझ्या सगळ्या स्वप्नांवर काळा रंग फासते की नाही बघ .
तनिषाच्या आईकडे जाऊन ती तिच्याशी बोलणार होती . ती नाही म्हणाली तरी- तरी ती पोलिसांकडे जाणार होती . तिने हे ठाम ठरवूनच टाकलं होतं . अन्यायाला विरोध . त्याला दुसरा पर्याय नव्हता . अशा गोष्टी ऐकतो , वाचतो ... पण जेव्हा असा प्रसंग जवळच्या व्यक्तीवर येतो तेव्हा ? ... तेही तनिषासारख्या गोड चिमुरडीवर . ही वेळ गप्प बसण्याची नव्हती . आज त्याने तनिषाला असं केलं , उद्या त्याची डेरिंग वाढली तर तो आणखी किती मुलींना ? .... त्याच्या क्लासमध्ये कितीतरी मुली आहेत .
ती आधी तनिषाच्या घरी गेली. ती मजेत खेळत होती. तिच्या आईने स्वराचं स्वागत केलं.
“चहा ?” तिने विचारलं .
“नको. आत्ताच दुसरा चहा झालाय माझा . “स्वरा म्हणाली .
“अच्छा , बस ना. ये आतच.”
स्वरा तिच्यामागे किचनमध्ये गेली. डायनिंग टेबलवर बसली. विषय कसा काढावा, हे तिला कळत नव्हतं .
तनिषाच्या आईने तिच्यापुढे एक ताटली ठेवली व त्यामध्ये काही बिस्किटे . त्या ताज्या बिस्किटांचा वास मस्त होता .
“मला नको काही.”
“अगं , घे ही बिस्किटं . ऑफिसमधली एक बाई घरी बनवते . छान आहेत.”
“थँक्स ! पण मला नको, “ स्वरा म्हणाली.
असं म्हणताच समोर बसलेली तनिषा टेबलवर चढली व तिने ती डिश स्वतःकडे ओढली.
तिच्या आईचं त्या भोचक पोरीकडे लक्ष होतंच. तिने पटकन तिचा हात धरला. त्यावर तनिषा ओरडली, “बॅड टच ! “
स्वरा आणि तिच्या आईचे, दोघींचे डोळॆ विस्फारले गेले.
मग तिच्या आईने तिला विचारलं. तेव्हा तिने सांगितलं , “ चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला म्हणजे बॅड टच ! आज आम्हाला शाळेत शिकवलं . गुड टच , बॅड टच .”
मग मोठ्या दोघीनी डोळे मिचकावले.
तनिषाला त्या शब्दांचा अर्थ कळला नव्हता. कारण ? कोणास ठाऊक ? खूप लहान असल्यामुळे किंवा लक्ष नसल्यामुळे किंवा सांगणाऱ्या बाईंनी नीट न सांगितल्यामुळे .
तिला ते पुन्हा नीट समजावून सांगावं लागणार होतं … पण त्यामुळे केवढा अनर्थ घडू शकला असता ! मुलांचं सारंच काही खरं धरायचं नसतं . तिच्या मनावरचं ओझं उतरलं .
जे बोलायचं होतं ते न बोलताच तिने तनिषाच्या आईचा निरोप घेतला . त्याची आता काही आवश्यकताच नव्हती ती बाहेर पडली .
तिला त्याच्या टीशर्टवरचे ते दोन बुद्धाचे चेहरे आठवले . जगाकडे उघड्या डोळ्यांनी , आनंदाने पहा . अन चिंतन करा . त्या चित्राचा , बुद्धाचा विचार तिच्या मनातला नकारात्मक अंधार दूर करू लागला . त्या क्षणापुरती तिची अवस्था ‘अत्त दीप भव’ अशी झाली .
तिला काही आनंदसंवेदना जाणवत होत्या .आता हवा सुखद होती. वातावरणही प्रसन्न होतं. तिला हलकं वाटत होतं. अन ती गालात हसत होती... लाजतही होती.
ती अंकितच्या घरी गेली. इतक्या उशिरा तिला आलेलं पाहून त्याला आश्चर्य वाटलं.
“या ना . काही काम ? काही प्रॉब्लेम ? “ तो म्हणाला .
“सॉरी ! “ ती म्हणाली .
“ सॉरी ? कशाबद्दल ? “ त्याला काहीच कळेना.
आज त्याचा ट्रायपॉड नेहमीची जागा सोडून वाटेत आलेला.
“ आज आमच्या बाईने काय पराक्रम केलाय ? “तिने विचारलं .
आधी त्याला बाई शब्द कळलाच नाही. मग कळल्यावर तो म्हणाला ,“ काही नाही. तनिषाने माझे रंग घेतले. हातावर ब्रशने हिरवे -पिवळे टॅटू काढले. माझं लक्ष नव्हतं. मी पाहिलं तेव्हा तिने हात लपवले. रागाच्या भरात मी खसकन तिचे हात धरले आणि तिला ओरडलो . बास . एवढंच . का ? ती रडली का , घरी जाऊन ? की माझी तक्रार केली तुमच्याकडे ? “तो म्हणाला .
स्वराच्या हृदयावर जे पाषाणओझं होतं. त्यावरचा शेवटचा पाषाणही आता खाली निखळून पडला होता.
“हरकत नाही . तसं जरी असेल तरी त्यामुळे ,यावेळेस आपली भेट झाली . आणि तुम्ही मला जाब विचारला तरी चालेल . तुमची ती स्टाईलही यानिमित्ताने मला पहायला मिळेल .” तो म्हणाला .
बापरे ! कसला बोलतोय हा ? आगाव ब्रम्हचारी ! तिला मजा वाटली.
मग तिने तनिषाची बॅड टचची स्टोरी ऐकवली . ती म्हणाली, “ पण नो प्रॉब्लेम ! तिच्या मनात तसं नव्हतं किंवा तसं तिने ते आईलाही सांगितलं नाही , “ ती म्हणाली.
अंकित तर बिचारा दचकलाच होता . अशा गोष्टींवरून लोक सुतावरून स्वर्ग गाठतात ! ... त्याच्या चेहऱ्यावर भीती अन आश्चर्य स्पष्ट दिसत होतं .
काही न सुचून ती अचानकपणे पुढे झाली . त्याचा हात धरून त्याला रिलॅक्स करण्यासाठी. त्याचवेळी कुकरची शिट्टी वाजली . तिच्या त्या कृतीमुळे तो गडबडून मागे सरकला . मागेच त्याचं इझल उभं होतं . त्याचा धक्का लागून ते खाली पडलं . शेजारच्या स्टूलवरचं कलरपॅलेटही खाली पडलं .
त्या ट्रायपॉडचं तोंड किचनच्या दिशेने होतं . चित्रकारबुवा स्वैपाक करता करता ते न्याहाळत असावेत . पण काय ? कुठलं चित्र ? ... ते उलट दिशेने असल्यामुळे आधी त्यावरचं चित्र नीट दिसत नव्हतं . ते एक जलरंगातलं चित्र होतं ... पोर्ट्रेट ... खाली पडल्यामुळे ते दृश्यमान झालं होतं ... आणि ते स्वराचं होतं !
म्हणजे एकांतात भोळा ब्रम्हचारी ! …
ते पाहून तर ती बिचारी चक्क लाजलीच .
तर तो एकदम, लहान पोराची खोडी पकडला गेल्यासारखा खजील झाला .
“ मी... मी... खूप दिवसांत पेंटिंग केलं नाही ना म्हणून म्हणलं .. एखादं करून पाहू ... अजून अपूर्ण आहे ... पहिलाच हात दिला आहे . “
“हो ? ... मग तनिषाचं करायचं ना ! नाहीतरी ते तुमचं आवडतं चित्र आहेच ! “ ... ती खट्याळपणे म्हणाली .
तो दोन क्षण थांबला अन म्हणाला , “ सॉरी ! ... मी ... मी ... चालेल ना ? “
“ अहो काय हे ? नीट सांगा काय ते - चित्र काढलं तर चालेल की ... तुम्ही मला चालेल ? ... “
काहीच न सुचून बिचाऱ्याने हाताची मूठ वळली आणि नाजूकपणे स्वतःच्या कपाळावर मारली . त्याचा तो निष्पाप भाव पाहून तिनेच धाडस केलं . ती पुढे झाली . त्याचा हात तिने हातात घेतला .
त्याही अवस्थेत त्याने हसून विचारलं , “ बॅड टच ? “ ब्रम्हचारी हजरजबाबी होता आणि मिश्किलही .
पण तो स्पर्श गुड टच होता की बॅड टच , हे कोणीच कोणाला सांगण्याची आवश्यकता नव्हती . ती त्याच्या डोळ्यांत पहात राहिली . हे काहीतरी वेगळं होतं . संमोहित करणारं . पण त्याही क्षणाला ,तिच्या मनात कुठेतरी एक छटा अपराधीपणाचीही . एका चांगल्या चित्राचे रंग पूर्णतेआधीच फिस्कटले जाणार होते .
तोही तिच्या बदामी डोळ्यांत पहात होता . तिचं मुखकमल आता थेट त्याच्या नजरेसमोर, प्रत्यक्ष होतं . चित्रातली जागा सोडून बाहेर आलेलं . इतके दिवस लांबून पाहिलेलं , जणू स्वप्नातलं . स्वप्नातली आर्त साद बाजूला पडली होती - जो बात तुझमें है , तेरी तस्वीरमें नहीं !
त्याने अभावितपणे पटकन तिला जवळ ओढलं आणि मिठीत घेतलं . हे आधीही घडू शकलं असतं खरं तर . पण आज अंतरीच्या खुणा इकडच्या तिकडे झाल्या होत्या . दोन वेगळे रंग एकत्र होऊन , त्यांची एक वेगळीच ,नवीन, आकर्षक छटा तयार झाली होती .
ते चित्र फारच तजेलदार आणि उत्स्फूर्त होतं . ज्यामध्ये कितीतरी सुंदर अर्थ लपलेले होते .
ती तशीच , त्याची रोमांचित करणारी मिठी अनुभवत राहिली . मनात कुठेतरी सुखद भावना फेर धरत होत्या . विचार रुंजी घालत होते ...भोळा ब्रम्हचारी ! ... हं ! ... नशीब ! ब्रह्मचारी अगदीच काही भोळा नाहीये . आपल्या मनातल्या अपूर्ण असलेल्या चित्राचा अर्थ , त्याला मनापासून कळलाय .
खाली पडलेल्या पॅलेटवरचे जलरंग इकडे तिकडे धावले होते . ते सप्तरंगी झालं होतं .
----------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाकी लहान मुलं कधीकधी फार आगाव असतात. आमच्या बिल्डिंगमध्ये एक ८-९ वर्षाचं पोरगं आहे. लिफ्ट बोलवली आणि हा जर हॉलवे / पॅसेज मध्ये असला तर धावत काय येतो. गप्पा काय मारत बसतो. आपल्यालाही मग अरे वा, हो का? छान वगैरे लाडं लाडं बोलत बसावं लागतं. बरं लिफ्टमध्ये जर आपण व तो व त्याचे वडील असतील तर आपल्याला पहील्यांदा जाउन वगैरे देतो. स्त्रीदाक्षिण्य का कायसं. Happy मला असली लहान मुलं म्हणजे म्हणजे जरा वैतागवाडीच वाटते.

खूप छान आहे. विशेष् म्हणजे कथा वाटली नाही तर चक्क प्रत्यक्ष वर्णन वाटले. म्हणजे नुकतीच घडुन गेलेली कहाणी. का माहीत नाही, पण कुठलिही कथा मला आवडली की तिच्यातली पात्रे जिवंत होऊन माझ्या समोर वावरतायत असे मला कायम वाटते.

अप्रतिम लिखाण बिपीन सर.... आपल्या कथा नेहमीच दर्जेदार असतात. आणि आमच्या सारख्या नवोदितांना प्रोत्साहन देत असतात.

आभार तर मानायलाच हवेत मी साऱ्यांचे

काही वाचक आवर्जून माझ्या कथा वाचत असावेत ...
कदाचित प्रतिक्रिया देत किंवा न देत ,
ज्ञात - अज्ञात अशा साऱ्याच जणांचे

आभार तर मानायलाच हवेत मी साऱ्यांचे .

खूप सुंदर कथा...!!
वेगळा विषय.. आणि कथेची सुंदर मांडणी ..!
बिपिनजी, पुढील अश्याच सुंदर कथा लेखनास शुभेच्छा..!

तरल

अरे काय मस्त लिहिलेय.. कामाच्या राड्यातून वाचली आणि मूड फ्रेश झाला.. धन्यवाद या कथेबद्दल Happy

Pages

नवीन प्रतिसाद लिहा