कल्लोळ

Submitted by SharmilaR on 18 November, 2022 - 23:46

कल्लोळ

बाहेर धो धो कोसळणारा पाऊस..
मी बसलेय खिडकीत.. तुषार अंगावर घेत..
घरात पिठा मिठाने शिगोशिग भरलेले डबे..
पाऊस कोसळतोय..

हातात पुस्तक.. पुस्तकात सावरकर..
अंगावर येणारं अंदमान..
पन्नास वर्षे तुरुंगवास.. ती काळी कोठडी..
ते घाण्याला जुंपण.. ते भिंतीवर कोरलेलं कवीमन..
ती कोपऱ्यातली बकेट..
तो घाणेरड्या पाण्याबरोबर, कसाबसा पोटात ढकललेला भाताचा गोळा..
पुढे वाचवतच नाही..
त्यांनी ते भोगलय.. आम्ही फक्त वाचतोय.. स्वत: कोरडे राहून..
इथे चिकित्सा होतेय रोज.. उबदार सोफ्यावर...
कुणाचं काय चुकलं..... कुणी माफी मागितली..
पाऊस अजूनही कोसळतोय..

रिमोटचं बटण दाबल्या जातं..
राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथ..
कोण कुठल्या गटात.. त्यांनाही माहीत नाही..
कुणीतरी कॅमेरा समोर अश्रु ढाळतोय..
तीनदा निवडून आलो..
तेव्हा मंत्रीपद मिळालं.. तेही दुर्लक्षित खात्याचं..
केवढा हा अन्याय..
पावसाचा जोर वाढलाय..

कुठे कोसळणारे पूल.. अन् वाहून गेलेले साकव..
हाकेच्या अंतरावर असलेल्या नदीला महापूर..
गॅलरीतून दिसतंय.. उफाणलेलं पाणी..
लोंढ्याबरोबर वहात असलेलं बरच काही..
पाऊस कोसळतोच आहे.. उधाणल्यासारखा..

मी सुरक्षित घरात.. हातात गरम चहाचा कप घेउन..
कधी पुस्तक.. कधी टीव्ही.. कधी नदी.. हा कल्लोळ .. तो कल्लोळ..
पाऊस कोसळतोच आहे..
*****

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults