गेल्या काही वर्षात जी 'सो कॉल्ड' ऐतिहासिक चित्रपटांची जी लाट आली आहे त्या सर्वात एक कॉमन गोष्ट आढळते ती म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि अचाट साहस दृश्ये.
मग ते सांदण दरीत sling लावून अक्षरशः उडत येणारे मावळे, अंगावर आलेले बाण, भाले असे सहजपणे हातात पकडणे, पाण्यात भाला फेकून आग लावणे, शत्रूला जमिनीवर आपटून वरती उडवणे आणि मग फुटबॉल सारखी लाथ मारून 15 20 फुटांवर गिरक्या घेत फेकणे असले रम्य प्रकार.
आणि या सगळ्याला गोंडस नाव दिले जाते प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे म्हणून. या सगळ्यात आपण महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा अपमान करतोय हे कुणाच्या गावीच नसतं. महाराजांनी आणि मावळ्यांनी रक्त सांडून निर्माण केलेले स्वराज्य ही आपल्यासाठी एक अभिमानाची गाथा असली पाहिजे, पिटात शिट्ट्या मारणाऱ्या लोकांचे मनोरंजन करणारी तद्दन सुमार फिल्मी कहाणी नाही हे भान कधी येणार?
आणि तुम्हाला अचाटपणाच दाखवायचा आहे ना मग तो शिवचरित्रात ठायी ठायी आढळेल. मोजके सैन्य आणि तुटपुंज्या साधनांच्या साहाय्याने सामान्य जनतेच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग पेटवून चार बलाढ्य सुलतानशाह्यांना, नमवून हिंदवी स्वराज्य निर्माण करणे, गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करत लाटेप्रमाणे येणाऱ्या लाखोंच्या सैन्याला नामोहरम करणे आणि घरदारावर तुळशीपत्र ठेऊन रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणाऱ्या पराक्रमी वीरांची फौज तयार करणे हे जर अचाट नसेल तर काय आहे?
अक्षरशः मूठभर सैन्य घेऊन महिनोन्महिने चाकणचा किल्ला लढवणारे फिरंगोजी नरसाळा, प्राणांची पर्वा न करता दिलेरखानाच्या तळावर हल्ला करणारे मुरारबाजी, रात्रभर धावत राहूनही हजारो सैनिकांना खिंडीत रोखून धरणारे बाजी प्रभू, केवळ 60 सैनिकांना घेऊन पन्हाळा काबीज करणारे कोंडाजी, कड्यावर चढून जाऊन आक्रमण करणारे आणि ढाल तुटली तरी लढत राहणारे तान्हाजी, अक्षरशः उघडा बोडक्याने पठाणांची फौज कापून काढणारे रामजी पांगारा, ज्यांना महाभारती जैसा कर्ण असे म्हणले जायचे ते सूर्यराव जेधे हे सर्व मावळे सामान्य असूनही असामान्य होते आणि त्यासाठी त्यांना उडत वगैरे जायची गरज नव्हती.
आपल्या पाठीवर महाराजांचा शाबासकी देणारा हात आहे आणि आई भवानीचा आशिर्वाद आहे.. बस इतक्या बळावर या मावळ्यांनी कितीही बलाढ्य सैन्य आले तरी त्यांना धोबीपछाड घातलाय. फक्त मराठाच नव्हे तर कातकरी, भंडारी, हेटकरी, रामोशी, कोळी अशा अठरापगड जातीचे मावळे एकत्रीतपणे शत्रुवर जीवाच्या कराराने तुटून पडत आणि त्यांना सळो की पळो करून सोडत.
हे आपण आपल्या नव्या पिढीला कधी दाखवणार आहोत का नाहीत? का त्यांना शिवाजी आणि मावळे हे बाहुबली सारखे अचाट शक्तिप्रदर्शन करणारे काल्पनिक अतिमानव होते आणि त्यामुळेच ते जिंकले असा कमालीचा चुकीचा समज त्यांच्या मनात पेरणार आहोत?
नुसता पराक्रम नव्हे तर महाराजांनी अतिशय हुशारीने, कल्पकतेने आणि सखोल नियोजन करून ही युद्धे जिंकली आहेत. लाखोंच्या संख्येने आलेल्या अफझलखानाला जावळीच्या अरण्यात खेचून आणत त्याच्यासह सैन्याचा नायनाट करणे असो वा भौगोलिक रचनेचा फायदा घेत कारतालब खानाला उंबरखिंडीत सापळा रचून त्याला मुठीत नाक धरुन शरण यायला लावणे असो वा प्रचंड मोगली फौजेच्या गराड्यात सुरक्षित बसलेल्या शाईस्तेखानवर अचूक झेप टाकून त्याची बोटे तोडणे असो वा कडेकोट पहारा भेदून अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेत पन्हाळ्यावरून केलेली सुटका असो वा खुद्द आग्र्यातून औरंगजेबाला फसवून सुखरूप परत येणे असो हे किती रोमहर्षक आहे. हे अविचारी धाडस नव्हते, यामागे अभ्यास होता, अतिशय कुशल हेर यंत्रणा होती आणि कितीही धाडसी बेत असला तरी तो अंमलात आणणारे विश्वासू सहकारी होते.
हे जसेच्या तसे दाखवले तरी नव्या पिढीला कमालीचे स्फूर्तिदायक वाटेल. पण यांना हे असलं दाखवण्यात रस नाहीये, त्यांना फक्त बाहुबलीच दाखवून पैसे मिळवायचे आहेत आणि त्यासाठी स्वतंत्र कथा लिहायची नाही तर आयते जे मिळेल ते ओढून आपल्या साच्यात बसवायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी आता महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना वेठीस धरले आहे.
आता तर प्रतापराव गुजर यांचा नंबर लागला आणि शिवाजी म्हणून अक्षय कुमार....
आधीच तो भंसाळ्या दिसेल त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला डोंबाऱ्यासारखे ग्रुप डान्स करायला लावतो त्यात आता यांची भर
हे असेच चालत राहीले तर आग्र्याहून सुटका होताना महाराज धाडकन दरवाजाला लाथ मारतील, मग फौलादखान आणि बाकीचे सैनिक दहा दिशांना फेकले जातील. हे सगळे सौध्यात बसून बघणाऱ्या औरंगजेबाला महाराज सुनावतील ... अस्सल मराठा आहे मी, मराठ्याला आणि त्याच्या छाव्याला अडकून ठेवण्याची कुणा मुघलाची माय नाही व्यायली. लक्षात ठेव पातशहा, एक दिवस हीच मराठी भिमथडी तुझ्या दिल्लीवर चाल करून येतील आणि बादशहा त्यांचा अंकीत राहील.....
लग्गेच फुल्ल टाळ्या, शिट्ट्या आणि घोड्यावर बसून रुबाबात महाराज निघून जातील आणि औरंगजेब मान खाली घालेल वगैरे हे बघावं लागेल....
तेव्हाही लहान मुलांना हेच आवडतं बघायला म्हणून आपण समर्थन करत राहणार का?
एक शिवप्रेमी म्हणून या सगळ्या बाजारूपणाचा आता खरोखर उबग आला आहे आणि कुठंतरी हे थांबायला हवं असं मनापासून वाटतं
लोकांना हे असे च बघायला आवडते
लोकांना हे असे च बघायला आवडते हे चूक .
>>>>>>
बहुसंख्य लोकांना नसेल आवडत. पण धंद्याचे गणित जमवायला पुरेश्या लोकांना नक्कीच आवडत असेल.
आणि त्यांना सोबत मिळते ते कसे का होईना आपल्या वीरांवर पिक्चर बनून त्यांच्याबद्दल सर्वांना समजत तर आहे ना अश्या विचारसरणीच्या लोकांची.
निदान हि विचारसरणी बदलली तरी चित्र बदलेल.
लोकांना फक्त लिहिण्या
लोकांना फक्त लिहिण्या/बोलण्यापुरता तात्विक निषेध नोंदवायला आवडते. अमितव म्हणतात ते काही प्रमाणात बरोबर आहे.. करमणुकीसाठी लोक तत्व/विचार वगैरे सगळं पायदळी तुडवतात. असे लोक पुढच्या पिढीला सारासार विचार करायला कसा शिकवणार देव जाणे.
हे लोक सिनेमा प्रदर्शित झाला की सहकुटुंब सहपरिवार सिनेमाला जाणार, मग आपल्यापाशी कुठलेही क्रेडेंशिअल नसतांना चित्रपटाचे परिक्षण लिहिणार, त्यात सकाळी ऊठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंतचा वैयक्तिक वृत्तांत सांगणार आणि शेवटी मराठी सिनेसंस्कृतीच्या प्रसारासाठी थिएटरध्येच बघा असा सोज्वळ आग्रह करणार.
ट्रेलरमधेच काय वाढून ठेवले आहे हे दिसत असतांना ईथे लेखाशी सहमती दर्शवणार्या किती जणांनी तान्हाजी थिएटरमध्ये बघितला असेल?
दुतोंडीपणा हे आताशा सोमिवर अॅक्टिव लोकांचे व्यवच्छेदक लक्षण व्हायला लागले आहे.
लेख पूर्णत: पटला. ऐतिहासिक
लेख पूर्णत: पटला. ऐतिहासिक सिनेमांचा आता उबग यायला लागलाय. एवढंच आहे तर कुणीतरी फ्रँचाईजी घेऊन वेगवेगळे भाग काढायला हवे होते. कलाकार तेच ठेऊन. एकच भूमिका कितीजण करणार आणि त्यात कितीजण 'सूट' होणार? लहानपणापासून ऐकलेल्या इतिहासातल्या गोष्टी आणि हे सिनेमे यात प्रचंड फरक जाणवतो. आणि तो खटकतो. VFX च्या नावाखाली फक्त अचाट, अतर्क्य काहीतरी दाखवणे आणि हॉलिवूडसारखेच आम्ही हे दाखवायचा अट्टहास करणे निव्वळ हास्यास्पद वाटते.
हे सगळे सिनेमे पूर्ण बघून डोकं न भंजाळलेला माणूस विरळाच.
भव्यदिव्यतेच्या नावाखाली खरा इतिहास झाकोळला जातोय हे खरं.
अक्षर आणी अक्षर पटल.
अक्षर आणी अक्षर पटल.
लोकाना हेच बघायला आवडते हे कारण असेल तर कल्पना विश्वाला मर्यादा नाहित, राजामौलीसारखी घ्या की एखादी काल्पनिक कथा आणी मग दाखवा काय हवे ते
पण इतिहासाशी खेळ करु नका.
माझी मिक्स्ड रिअॅक्शन आहे.
या लेखावर माझी मिक्स्ड रिअॅक्शन आहे. नविन तंत्रज्ञान जरुर वापरावं, पण त्याचा सदुपयोग होणं जरुरी आहे. महाराजांच्या कारकिर्दितल्या अनेक प्रसंगांवर एक स्वतंत्र सिनेमा किंवा एपिसोड होउ शकतो. त्या काळातले लँडस्केप्स, गावं, किल्ले आणि त्यातला रस्टिक फील तंत्रज्ञाना शिवाय येउ शकत नाहि. उदाहरणादाखल जिओटिच्या बॅटल ऑफ दि बास्टर्ड्स मधला हा सीन बघा. त्या प्रसंगातली भव्यता आणि तीव्रता व्हिएफएक्सच्या वापरा शिवाय पडद्यावर येउच शकत नाहि.
आता मांजरेकरांचं बजेट किती आहे याची क्ल्पना नाहि, पण ते मराठ्यांच्या या ऐतिहासीक/भावनिक प्रसंगाला न्याय देतील अशी आशा करुया. अक्षय कुमारची निवड सुद्धा चूक आहे असं मला वाटत नाहि. एखाद्या भुमिकेत ब्लेंड होणं हे खुप कमी कलाकारांना जमतं, अक्षय कुमार त्यातला एक आहे...
््
््
शब्द न् शब्द पटला.
आधीच तो भंसाळ्या दिसेल त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला डोंबाऱ्यासारखे ग्रुप डान्स करायला लावतो >>>>
मला विनय आपटेंची एक सिरीयल आठवली शिवाजी महाराजांवर केलेली. दूरदर्शन वर होती पण काही कारणांमुळे पूर्ण झाली नाही. काय सुरेख होती ती सिरीयल . असं दर्जेदार काम कोणी का करू शकत नाही?
एक शिवप्रेमी म्हणून या सगळ्या
एक शिवप्रेमी म्हणून या सगळ्या बाजारूपणाचा आता खरोखर उबग आला आहे आणि कुठंतरी हे थांबायला हवं असं मनापासून वाटतं >> मनापासून पटलं. शिवाजींवर भालजींनंतर सिनेमे नव्हते ते बरेच होते असे वाटत होते. फे फ च्या प्रत्येक शब्दाला अनुमोदन. स्वार्थासाठी महाराजांना आपापल्या अगेंड्यांमधे बसवणे हा भयंकर उबग आणणारा प्रकार आहे. ह्या सगळ्यांना टकमक टोकावरून ढकलून दिले जावे किंवा हत्तीच्या पायी दिले जावे.
मधे नागनाथ महाराजांवर तीन सिनेमे काढणार ज्यांचा फोकस व्यक्ती, डावपेच , नाट्य असा असणार असे वाचलेले. तिथे अपेक्षा धरायला हरकत नसावी.
मस्त मुद्देसूद मांडणी. आवडले.
मस्त मुद्देसूद मांडणी. आवडले.
ह्या सिनेमॅटीक लिबर्टीवाल्यांनी महाराज आणि अफझलखान यांना स्विट्झरलंडमध्ये ड्रिम सिक्वेसांत "तू मेरे सामने, मै तेरे सामने, तुझको देखूं के ठार करूं" असं गाणं आणलं की ते ही सुटले नि आपणही... तोवर हे असंच चालायचं....
ओघवते व ओजस्वी
ओघवते व ओजस्वी
मूळ लेखाशी टोटली सहमत.
मूळ लेखाशी टोटली सहमत. रानभुली, अमितव व इतर अनेकांच्या प्रतिक्रियाही बरोबर आहेत.
लेख प्रचंड आवडला आणि पटला.
लेख प्रचंड आवडला आणि पटला. शब्दाशब्दाशी सहमत आहे. प्रतिसाद पण उत्तम आले आहेत.
आशुचँप, तुझी काही हरकत नसेल तर व्हॉट्सअॅप वर हा लेख तुझ्या नावानिशी शेअर करायला आवडेल मला. जरूर सांग.
खूप खरं लिहिलंय आशूचँप. उबग
खूप खरं लिहिलंय आशूचँप. तुम्ही लिहिलेल्या खर्या मावळ्यांची ओळख आणि त्यांची कामगिरी वाचून अक्षरशः अंगावर काटा आला. तसं सिनेमात बघून होणं पण अपेक्षित आहे. पण भव्य दिव्य ऐतिहासिक च्या नावाखाली वाट्टेल दे दाखवणं आणि लोकांना तेच खरं वाटून त्याचा उदोउदो करणं याची चिड आणि खेद दोन्ही वाटतं. तुमच्या लेखातला उबग हा शब्द परफेक्ट आहे. हॉलिवूड तुमचा आदर्श असतो तर मग निदान त्या लोकांची जुना काळ उभा करण्याची पद्धत एकदा बघावी. नुसते अॅव्हेंजर्स सारखे मुव्ही बनवून काय उपयोग?
तुम्ही खरंच हा लेख पेपरात छापून आणता येईल का बघा.
>> तुम्ही खरंच हा लेख पेपरात
>> तुम्ही खरंच हा लेख पेपरात छापून आणता येईल का बघा.>> ++
तसंच सोशल मिडीयावरही शेअर करा.
एकंदरीत सर्वांचा नाराजीचा सूर
एकंदरीत सर्वांचा नाराजीचा सूर आहे हे या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांमुळे समजले. आपण एकटेच नाहीत याचे समाधान सुद्धा वाटले. दोन प्रतिसाद वेडेवाकडे लिहीलेत, आपण सांभाळून घेतले आणि आवडल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद.
आशुचँप तुम्ही अशा सर्वांचे प्रतिनिधित्व केल्यामुळे आभार.
लेख प्रचंड आवडला. अगदी अगदी
लेख प्रचंड आवडला. अगदी अगदी झालं वाचताना. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून, मासिकांमधून छापून आणायला हवा. सोमी वर ही. प्रतिसाद ही छान.
हा लेख पेपरात नक्की यायला हवा
हा लेख पेपरात नक्की यायला हवा.
मला ताना(न्हा)जी आवडला होता.आणि तरीहि हे पटलं आणि सर्व प्रतिसादही.
संपूर्ण लेखाशी सहमत.
संपूर्ण लेखाशी सहमत.
हा लेख खरेच सोशल मीडियात जायला हवा
संपूर्ण लेख पटला. अगदी एक अन
संपूर्ण लेख पटला. अगदी एक अन एक वाक्य.
एकदम सटीक लिहीलंय दादा. एक
एकदम सटीक लिहीलंय दादा. एक नंबर. यथार्थ आणि सडेतोड. पूर्ण सहमत.
Sahi pakade hai..
Sahi pakade hai..
Mee baghayachi himmatach karat nahi anekada..
खरच मनातले लिहिले आहे तुम्ही.
खरच मनातले लिहिले आहे तुम्ही. मी यातला एकही चित्रपट पाहिला नाही. ट्रेलर पाहूनच हिम्मत झाली नाही. अजून एक ट्रेंड लक्षात आला तो म्हणजे ऐतिहासिक व्यक्ति च्या तोंडी आताची टपोरी भाषा घुसडायची. बाजीराव वाट लागली म्हणणार, बाजी प्रभू चल हट म्हणणार. असला वैताग येतो ना हे बघून.
मराठी मध्ये तर खूप सिनेमे
मराठी मध्ये तर खूप सिनेमे येवून गेले.
आता खरे तर जागतिक दर्जा चा सिनेमा त्यांच्या जीवनावर आला पाहिजे .
आणि अगदी रिअल मध्ये.
त्या काळचे वातावरण ,सामाजिक स्थिती सर्व हुबे हुब आले पाहिजे
अशा सिनेमाची गरज आहे.
तसा एक पण सिनेमा आता तरी अस्तित्वात नाही.
गांधी हा सिनेमा कसा बनला होता.अगदी रिअल.
तरी कलाकार ब्रिटिश होता .
अजून एक ट्रेंड लक्षात आला तो
अजून एक ट्रेंड लक्षात आला तो म्हणजे ऐतिहासिक व्यक्ति च्या तोंडी आताची टपोरी भाषा घुसडायची. बाजीराव वाट लागली म्हणणार, बाजी प्रभू चल हट म्हणणार.
>>>>>
हो अगदीच.
आणि हे ट्रेलरमध्ये दाखवतात. म्हणजे यामागे व्यावसायिक ॲंगल असतो हे उघड आहे.
आशुचॅम्प >>> अगदीच सहमत!
आशुचॅम्प >>> अगदीच सहमत! ह्यातले कोणतेही चित्रपट (मराठी व हिंदी दोन्हीही) बघितले नाही, आणि इच्छाही नाही.
ह्यावरून आठवलं. आमचा एक सामान्य बुद्धिमत्तेचा मित्र होता. त्याने एक संशोधनपर लेख लिहिला, आणि एका जगप्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित केला. सगळ्यांनी फार कौतुक केले, हुरूप येऊन त्याने आणखी २ - ३ लेख प्रकाशित केले, परत कौतुक झाले. त्यामुळे मित्राने हुरळून जाऊन (कोविड १९ महामारीत घरी असतांना मिळालेल्या मोकळ्या वेळेत) लेख लिहायचा सपाटाच लावला, चांगले ३० - ४० लेख प्रकाशित झाले. ह्यात एकाच विषयाचे विभिन्न पैलू अभ्यासले असले तरी, सगळ्या लेखांत एकच विश्लेषण पद्धती वापरली होती; तथापि नाविन्यता राहिलीच नाही. त्यामुळे हे लेख वाचायचे सोडाच, जाणकार साफ दुर्लक्ष करत (कारण सगळं तेच तेच). कदाचित त्याच्यात सर्जनशीलता/कलात्मकताच (क्रीटीव्हिटी) नव्हती (कोणतेही संशोधन करायला ती फार आवश्यक आहे असे माझे ठाम मत आहे). सुरुवातीला कोणाच्या प्रेरणेने वा मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या २ - ३ लेखांवरून जे काही कौतुक झाले त्यावरून त्याने तोच मार्ग पत्करला
(हे लिहिण्यास कारण की, असेच काहीसे दिगपाल लांजेकर ह्याचे झाले आहे असं मला वाटत. चिन्मय मांडलेकरांच्या सोबतीने 'तू माझा सांगाती' ही कलर्स मराठीवरील काहीशी गाजलेली मालिका सोडली तर त्याच्या इतर मालिका फारश्या चालल्या नाही उदा., सख्या रे व चंद्र आहे साक्षीला, (दोन्हीही कलर्स मराठी). पुढे मांडलेकरांच्याच सोबतीने 'फर्जद' चित्रपट लिहिला व कदाचित तो चालला, त्यामुळे हुरळून जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधी ८ चित्रपट काढायचे घोषित केले, हे सर्वश्रूत आहे. दरम्यान दूसरा की तिसरा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांच्या पाठीराख्यांनी समाज माध्यमांवर आणखी अशीच ऐतिहासिक चित्रपटांची मक्केदारी घेतलेल्या एक खासदार-अभिनेत्यावर धूळफेक सुरू केली. त्यातूनच दोघांच्याही पाठीराख्यांचे/समर्थकांचे विविध माध्यमांवर आभासी युद्ध सुरू झाले. ह्यावरून महाराज व मावळेही प्रचंड दुखी झाले असतील. मग मांजरेकर तरी का मागे राहतील? ऐतिहासिक चित्रपट चालत आहेतच, त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवायचे ठरवले).
सर्वांना खूप खूप धन्यवाद
सर्वांना खूप खूप धन्यवाद
मनातला उद्वेग बाहेर काढावा असे वाटलं आणि खरडून काढलं, रानभूुली म्हणतात तसे आपण एकटेच नाही, सगळ्यांचाच नाराजीचा सूर आहे हे पाहून बरे वाटलं कारण फेसबुकवर या सिनेमांचा जो काही उदोउदो चाललेला असतो ते पाहून वाटलं आपणच आता आउटडेटेड झालोय का काय
कारण एका काकांनी तर तुम्हाला सिनेमे कसे बघायचे कळत नाही या शब्दात हर हर महादेवचे समर्थन केलेलं, त्यामुळे परत त्यांना काही बोलण्याच्या फंदातच पडलो नाही
हे सिनेमे लहान मुलांचे - बालसिनेमे म्हणून घोषित करावेत >>>>
त्यांनीच बघू नयेत असं वाटतं, ज्यांनी शिवचरित्र वाचलं आहे ते यातला आचरटपणा बाजूला ठेऊन चित्रपट बघू शकतात, पण मुलांना हे शिवाजी महाराज हे बाहुबली किंवा सिंघम नव्हते हे कळणार नाही याचीच भिती आहे
ज्यात शिवाजी महाराजांची भुमिका अक्षय कुमार करत आहे. अजून काहीतरी पचवायची मनाची तयारी करून ठेवा>>>>
हो ना, तेच पाहिलं म्हणूनच लिहावं वाटलं की अरे आता बस करा
दोन्ही पोस्ट अतिशय मस्त, अभ्यासपूर्ण रानभुली
प्रेक्षकसुद्धा ‘असू दे, त्यामुळे मुलांना/महराष्ट्राबाहेरच्या लोकांना
मराठी इतिहास तर कळला‘ अशी दरिद्री मानसिकता दाखवणारी भुमिका घेतात >>>>
अगदी अगदी, हे त्या तानाजी आणि बाजीराव मस्तानी सिनेमाच्या वेळी असलीच समर्थने आली होती, अजूनही येतात
आता बजेट आहे, कलाकार आहेत, vfx आहे पण जे पोहचवायचं ते पोहचवण्याची कल्पनाशक्ती, creativity आणि ताकद नाहीये का हा प्रश्न पडतो.>>>>
हो ना, अधिक चांगल्या पद्धतीने शिवचरित्र दाखवता येऊ शकते आता तर, भव्यदिव्य स्वरुपात पण त्यासाठी इतके कष्ट कोण घेणार
भरपुर अभ्यास करुन चित्रपट बनवायचे कष्ट कोणी घेतलेच तर त्याला लोकाश्रय किती मिळेल ही शंका आहेच…>>>>
हा ही एक महत्वाचा मुद्दा आहेच, पण खरोखरच तसा अभ्यासपूर्ण सिनेमा बनवला तर प्रेक्षक नक्की मिळेल पूर्वीच्या मानाने आता प्रेक्षक प्रगल्भ झालाय असे म्हणणे धाडसाचे ठरेल, पण फँड्री सारख्या सिनेमालाही उचलून धरलेच की लोकांनी. भले तो सुपर डूपर हिट होणार नाही पण महाराजांवर खरोखरच असा अभ्यासपूर्ण सिनेमा आला तर तो फ्लॉप नक्की जाणार नाही
त्याला विरोध नसून आचरटपणाला आहे. +११११
श्रीमान योगी, स्वामी, राऊ हे सगळे लिबर्टी घेऊनच बनलेल्या कलाकृती आहे, पण सत्य आणि काल्पनिक यात कुठं थांंबाव हे कळणे गरजेचे
आशूचॅम्प तुमची परवानगी असल्यास नावासहित whatsapp ला ढकलते - >>>>
नक्कीच, नाव नाही दिलं, नुसतं एक शिवप्रेमी म्हणलं तरी चालेल
लोकांपर्यंत पोचणे महत्वाचे
राजामौलीसारखी घ्या की एखादी काल्पनिक कथा आणी मग दाखवा काय हवे ते +११११
नविन तंत्रज्ञान जरुर वापरावं, पण त्याचा सदुपयोग होणं जरुरी आहे. >>>
तंत्रज्ञानाच्या वापराला आक्षेप नाहीचे, उलट त्याचा वापर करून युद्धे, लढाया अधिक परिणामकारक दाखवत्या आल्या असत्या, जास्त ऑथेंटिक वाटाव्या अशा, पण आता जे चालू आहे ते सगळं फार्सिकल आहे
हॉलिवूड तुमचा आदर्श असतो तर मग निदान त्या लोकांची जुना काळ उभा
करण्याची पद्धत एकदा बघावी. नुसते अॅव्हेंजर्स सारखे मुव्ही बनवून काय
उपयोग? +११११
उत्तम पोस्ट राहुल
ऐतिहासिक चित्रपट चालत आहेतच, त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवायचे ठरवले
हेच दुर्दैव आहे
लेखाशी सहमत.
लेखाशी सहमत.
प्रतिसादात चांगली चर्चा.
अतिशय सुंदर लेख आणि प्रतिसाद.
अतिशय सुंदर लेख आणि प्रतिसाद. हे खरंच सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे विशेष करून ह्या सगळ्या निर्मात्यांना हे कळवल पाहिजे
मीही यातले बरेचसे पिक्चर्स
मीही यातले बरेचसे पिक्चर्स पाहिलेले नाहीत. पावनखिंड पाहिला आणि त्यातल्या हास्यास्पद सीन्स वरून कल्पना आली होती. तान्हाजी सुद्धा अर्धाच पाहिला. ते झिपलाइन वगैरे पाहिल्यावर पुढे फार इंटरेस्ट राहिला नाही.
या सगळ्यात आपण महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा अपमान करतोय हे कुणाच्या गावीच नसतं. >>> हेच मलाही वाटले. पावनखिंड मधे एक सीन आहे. एका किल्ल्यावर महाराज व त्यांचे सरदार चढाई करत असतात. वरती बुरूजावरून एक शत्रूचा सैनिक भाला मारतो. तो भाला महाराजांच्या चेहर्याच्या जेमतेम फुटापर्यंत पोहोचतो. इथे एकदम क्लोज अप. नाट्यपूर्ण सीन वगैरे. मग एकदम एक "बाहुबली" मजबूत हात साइडने पुढे येतो व तो भाला रोखतो. मग त्या व्यक्तिरेखेची (रायाजी) एण्ट्री. एकदम साउथ स्टाइल.
या सगळ्या ड्राम्यामधे यांना हे लक्षात येत नाही की खुद्द शिवाजी महाराज तो भाला इतका जवळ येईपर्यंत नुसतेच बघत बसतील काय? पण मुख्य हीरो सोडून बाकीच्यांनी "बघत बसणे" हा या पिक्चरचा स्थायीभाव आहे. या सीन नंतर सुद्धा मग रायाजी तो भाला अडवतो. पुन्हा वरती बघतो. तर बुरूजावर तो भाला फेकलेला सैनिक तसाच बघत बसलेला आहे. मग रायाजी तो भाला पुन्हा वर फेकतो तर तो "येउ द्या" स्टाइलने अजूनही तसाच उभा असल्याने मरतो.
लढाया, मारामार्या या बर्याचश्या साउथ पिक्चर्सच्या प्रभावाने कोरिओग्राफ केल्यासारख्या आहेत. त्या अजिबात अस्सल वाटत नाहीत. एरव्ही शेती वगैरे करणारे, किंवा बारा बलुतेदारांपैकी लोक स्वराज्यासाठी लढायला उठले. ते शरीराने बाहुबली नव्हते. डोंगरांजवळ राहणारे, शेती व इतर कामांकरता रोज १५-२० किमी सहज चालणारे मराठी लोक अगदी व्यायाम करणारे असले, तरी टीपिकल धिप्पाड पंजाब्यांसारखे दिसत नाहीत. पण ते भयंकर काटक असतात. तो तसा लुक प्रमुख व्यक्तिरेखांचा दिसत नाही. इथे अंकित मोहन वगैरे एकदम गोल्ड जिम मधे जात असल्यासारखा दिसतो.
पण याने हरखून जाणारे पब्लिक आहे. गेल्या काही वर्षांत डीसी/मार्व्हल वाले पिक्चर्स एका बाजूला, तर एक हीरो, दोन हिरॉईन्स आणि प्रत्येक फाइटीत पन्नास लोक गारद टाइप साउथ च्या हाणामार्या असलेले पिक्चर्स - यांचा एक प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग महाराष्ट्रात सुद्धा उगवलेला आहे. त्यांना यातले कलाकार, त्यातील कथा वगैरे सगळे तोंडपाठ असते. एखाद्या तेलुगू प्रेक्षकाइतकेच त्यांनी अल्लू अर्जुन, महेश बाबू हे लोक, त्यांची तेथील स्टाइलिश स्टार छाप टोपण नावे वगैरे "इंटर्नलाइज" केलेले आहे. त्यांना हे पिक्चर्स म्हणजे आपल्या इतिहासाचा गौरव वाटतो. "अॅव्हेंजर्स मधे तुम्हाला हे चालते, तर तानाजी मधे का चालत नाही" असे अफाट प्रश्न या गप्पांत आलेले पाहिले आहेत. आपलाच इतिहास याने चीप होतो हे यातील अनेकांच्या लक्षात येत नाही.
मूळचा पहिलवान किंवा अॅथलीट नसलेला साधा शेतकरी रात्री प्रचंड अवघड पद्धतीने गड चढून जातो आणि मग त्यानंतर तेथे लढाई करतो. याचे अप्रूप पब्लिकपर्यंत पोहोचायला हवे. तो जर एरव्हीही एका फाइटीत दहा जणांना लोळवताना दिसला, तर तो एका उडीत डोणजे गावातून थेट कल्याण दरवाज्यात का पोहोचत नाही असा प्रश्न पडेल
अतिशय उत्तम प्रतिसाद फारएण्ड!
अतिशय उत्तम प्रतिसाद फारएण्ड!
'पावनखिंड'मध्ये बहिर्जी नाईक राजरोस येऊन शिवाजी महाराजांना भेटतात. नाचगाणंही आहे बहुतेक. सगळे लोक त्यांना ओळखत असतात, की हे महाराजांचे प्रमुख हेर आहेत.
गुप्तहेराला असे सगळेजण ओळखायला लागले तर त्याला गुप्तहेर का म्हणायचं? श्रीमान योगीमध्ये बहिर्जी नाईक पन्हाळ्यावर येण्याचा प्रसंग किती छान रंगवलाय. भर पावसात रात्री बैराग्याच्या वेशात बहिर्जी नाईक येतात आणि पहारेकरी त्यांना पकडतात. ते महाराजांनाच भेटण्याचा आग्रह धरतात, फक्त महाराज त्यांना ओळखतात आणि ते एकटेच त्यांच्याशी बोलतात. असंच काहीसं झालेलं असण्याची शक्यता जास्त आहे ना.
मराठी लोक अगदी व्यायाम करणारे
मराठी लोक अगदी व्यायाम करणारे असले, तरी टीपिकल धिप्पाड पंजाब्यांसारखे दिसत नाहीत >> हे डिटेलिंग खूपच पुढचं झालं. हे भारतात सार्वत्रिक आहे. आपल्याकडे पूर्वी कधीच सिक्स पॅक बॉडी आणि मसल कटस दिसणे हे सौंदर्याचं लक्षण नव्हतं. आपल्या देवदेवतांच्या मूर्ती बघा, चित्रं बघा, त्यात एकवेळ मारुतीराया धिप्पाड असेल, पण सिक्स पॅक वाला नसतो. त्याउलट ग्रीक काळापासून पाश्चात्त्य देशांत सिक्स पॅक हे सौंदर्याचं लक्षण आहे. आपला मावळा, रांगडा गडी, हा एरवी शेतात, उन्हातान्हात राबत असे, त्याला कधी खायचे वांदे असत. त्याउलट ग्रीक रांगडा गडी हा मुद्दाम रांगडेपणासाठी वेगळा व्यायाम आणि आहार देऊन तसा घडवला जात असे. आपल्याकडे आता कुठे गेल्या काही दशकात ही पद्धत यायला लागली तेव्हा लोकांना सिक्स पॅकचं सौंदर्य डोळ्यात भरलं आणि ते ही इतकं, की अमुक एक माणूस सुंदर होता असं दाखवायचं असेल तर त्याला तशी बॉडी असणारच हे गृहित धरलं जाऊ लागलं आहे.
पण ते एकवेळ ठीक आहे. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं. आणि जर आता बघणाऱ्यांच्या नजराच बदलल्या आहेत, तर त्यांना कुठे पटवत बसा की तुम्ही समजता ते सौंदर्य पूर्वी नव्हतं. त्यापेक्षा हा घ्या ग्रीक शरीराचा मराठी मावळा.
Pages