पैचान कौन?

Submitted by हस्तर on 2 November, 2022 - 02:58

काही वर्षांपूर्वीचा आमच्या ऑफिस मध्ये घडलेला किस्सा.
आम्ही सारखाच अनुभव असणारे चार पाच समवयस्कर आणि आमचा एक मॅनेजर असे आम्ही सगळे एका टीमचा भाग होतो. अचानक आमच्या टीम मध्ये एक नवीन जॉईन झाला.
आम्ही मॅनेजर ला विचारलं ... "हा कोण".
मॅनेजरने सांगितलं ... "नवीन आहे ... सांभाळून घ्या त्याला".
'सांभाळून घ्या? ... म्हणजे आम्ही नक्की काय करायचं' आम्हालाच प्रश्न पडला.
आम्ही एकमेकाकडे बघितलं. आणि कामाला लागलो.
थोडे दिवस झाले. त्याला काहीच जमेना.
आम्ही मॅनेजरला सांगितलं ... "अरे ह्याला काहीच जमत नाही".
मॅनेजर म्हणाला ... "हो. त्याला कामाचा अनुभव नाही. म्हणूनच सांगितलं ना ... सांभाळून घ्या".
आम्ही एकमेकाकडे बघितलं. आणि कामाला लागलो.
तीन महिने झाले. अचानक मॅनेजरने सगळ्यांना सांगितलं त्याला बेस्ट एम्प्लॉयीच अवॉर्ड मिळालं आहे.
आम्ही एकामेकाकडे बघितलं. मग मॅनेजरला विचारलं "पण त्याला तर काहीच जमत नाही".
मॅनेजरने उत्तर दिल ... "तो संयमी आहे".
'संयमी आहे? मग आम्ही काय करू'? ... कशाचा काहीच संबंध जुळत नव्हता.
गप्पपणे आम्ही परत एकमेकाकडे बघितलं. आणि परत कामाला लागलो.
काही दिवसांनी तो ऑफिस मध्ये दिसायचा बंद झाला.
आम्ही मॅनेजर ला विचारलं ... "तो कुठे आहे"?
मॅनेजर म्हणाला ... "तो आता घरातूनच काम करणार".
आम्ही एकमेकाकडे बघितलं. आणि कामाला लागलो.
मग अचानक एक दिवस ऑडिटच वादळ आलं.
आम्ही मॅनेजरला म्हणालो ... "त्याने आतातरी ऑफिस मध्ये यायला पाहिजे".
ऑडिट झाल्यावर मग तीन चार दिवसांनी तो आला. सोबत आपल्या ५ वर्षाच्या मुलाला पण घेऊन आला.
पूर्ण दीड तास ऑफिस मध्ये होता. कोणाशी काही बोलला नाही. फक्त आपल्या मुलाशी गप्पा मारल्या आणि परत गेला.
तो गेल्यावर आम्ही एकमेकाकडे बघितलं. आणि कामाला लागलो.
मग एक दिवस आम्ही मॅनेजरला सांगितलं ... "तो घरातून काहीच काम करत नाही".
मॅनेजर रागावला. म्हणाला ... "तुम्ही सगळे जितकं काम करत नाही तितकं तो घरी बसून एकटा करतो".
'कधी'? ... मनातला हा शब्द आम्ही मनातच ठेवला.
पुढे काहीच न बोलता आम्ही एकमेकाकडे बघितलं. आणि कामाला लागलो.
मग एक दिवस मॅनेजर आमच्यावर ओरडला. म्हणाला ... "तुम्ही त्याला काम करायला देत नाही. मुद्दाम त्याला त्रास देता".
आम्ही म्हणालो ... "पण तो तर कधीच काहीच काम करत नाही".
मॅनेजर म्हणाला ... "गप्प बसा. तो सुसंकृत आहे".
मनात प्रश्न पडला. 'सुसंकृत आहे? मग आम्ही काय करू'? ... कशाचा काहीच संबंध जुळत नव्हता.
आम्ही नेहमीप्रमाणे एकमेकाकडे बघितलं. आणि कामाला लागलो.
असेच एकदा आम्ही सगळे दुपारी जेवायला टेबलवर बसलो होतो.
त्यावेळी मॅनेजर आम्हाला म्हणाला ... "त्याच्या येण्यामुळे ऑफिसला खूप फायदा झालाय".
आम्हाला वाटलं मॅनेजरने विनोद केला. म्हणून आम्ही सगळे खूप जोरात हसलो.
त्यावर मॅनेजर रागावला. ओरडून म्हणाला ... "गप्प बसा. तुम्ही सगळे ऑफिसद्रोही आहात".
'ऑफिसद्रोही? आता हे काय असतं?' ... आम्हालाच प्रश्न पडला.
आम्ही एकमेकांकडे बघितलं. आणि जेवायला सुरुवात केली.
मग एक दिवस मॅनेजर म्हणाला ... "तो आजारी आहे. आता त्याला त्रास नका देऊ".
आम्ही म्हणालो .. "ह्याआधी कधी दिला त्याला त्रास"?
मॅनेजर म्हणाला ... "तो मला माझ्या घराच्या सदस्या सारखा वाटतो".
मनात परत प्रश्न पडला. 'घराच्या सदस्या सारखा वाटतो? मग आम्ही काय करू'? ... परत कशाचा काहीच संबंध जुळत नव्हता.
आम्ही नेहमीप्रमाणे परत एकमेकाकडे बघितलं. आणि कामाला लागलो.
काही दिवसांनी आमच्यातल्या एकाने जाहीर केलं. "मी त्याच्या बरोबर काम करणार नाही".
मॅनेजर ने विचारलं ... "काय झालं"?
त्यावर आमच्यातला तो एक जण म्हणाला ... "तो घरात बसून फक्त टोमणे मारतो".
त्याला हे समजलं. तो रागावला. मग घरात बसूनच तो ऑफिस सोडून निघून गेला.
आम्हाला ते समजलं. आम्ही एकमेकाकडे बघितलं. आणि कामाला लागलो.
मग त्याच्या जागी दुसरा आला.
तो रोजच ऑफिसला यायचा. सुट्टीच्या दिवशी, सणांच्या दिवशी ऑफिसमधल्या सगळ्यांच्या घरी जायचा.
दुसऱ्यांची काम पण स्वतःच करायचा.
मग एक दिवस मॅनेजरने आम्हाला विचारलं ... "ह्याच्यापेक्षा आधीचाच चांगला होता का? काय वाटत तुम्हाला"?
आम्ही मान डोलावली.
मग नेहमीप्रमाणे आम्ही परत एकमेकाकडे बघितलं. आणि कामाला लागलो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults