हरवले चांदणे

Submitted by द्वैत on 7 October, 2022 - 09:48

हरवले चांदणे चंद्र ही शून्यसा
काच काळोख हा भोवती खिन्नसा

मी पहाटे तुला शोधते अंगणी
ऊनवाटेवरी कापते पापणी
सांजमाळेतले आठवांचे मणी
राहिला एवढा हा तुझा वारसा
हरवले चांदणे चंद्र ही शून्यसा....

तू न माझा सखा ना कुणी पाहुणा
राहिल्या का तरी खोल काही खुणा
शोक हा अंतरी रोज होई दुणा
ये घरा एकदा होउनी कवडसा
हरवले चांदणे चंद्र ही शून्यसा....

का समेची हवा आज गंधावली,
ऐल काठावरी नाव रेंगाळली
दूर का कोणती सावली हालली?
भास होती मला पाहता आरसा
हरवले चांदणे चंद्र ही शून्यसा....

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा!
सगळ्याच प्रतिमा सुंदर आहेत, पण 'काच काळोख' ही प्रतिमा विशेष आवडली मला.
प्रकाशाचा, ध्वनीचा अभाव, एक थंड गुळगुळीत निर्मम भिंत, जिच्यावर काही ठरत नाही, सगळं ओघळून जातं.
कुठल्या कोपर्‍याकंगोर्‍यांनी स्पर्शाला प्रतिसाद देत नाही अशी एक भिंत!

काच काळोख >>> सुरेख!
अगदी सुयोग्य शब्द वापरले आहेत कवितेत. जे म्हणायचंय ते अचूक मनापर्यंत पोहोचतंय.