एक मूड असाही

Submitted by सामो on 3 October, 2022 - 04:43

कॉफी कमी पडली की, मन प्रचंड रिसेप्टिव्ह होउन जातं. तरल-भावुक. मग लॅपटॉपवर, कीबोर्डच्या वरच्या रिकाम्या जागेत ठेवलेल्या , इवल्याश्या निळ्या व पांढर्‍या रंगांच्या शिंपल्यांच्या डब्याही कशा एकमेकांशी गप्पा मारणार्‍या सख्या वाटू लागतात. टेबलवरचे बांबूचे रोपटे, आपल्याला त्याच्या मनातील अलवार गूज सांगते आहे असे वाटू लागते. आणि हे सारे केव्हा आता ..... पहाटेच्या तीन-चार वाजता. जेव्हा आख्खे शहर निद्राधिन झालेले आहे, सारे शहर अमूर्त मनाच्या राज्यातून फेरफटका मारीत आहे. स्वप्नांच्या अगणित पालख्या, मिरवणुका निघालेल्या आहेत, काही भरजरी, डौलदार, दिमाखदार तर काही शांत, प्रार्थनेसारख्या. रुमीने लिहीलेली - 'Out beyond ideas of wrongdoing and rightdoing, there is a field. I'll meet you there.' तो हा प्रसिद्ध प्रदेश, स्वप्नांचा प्रदेश, अमूर्त मनाच्या अधिराज्याचा प्रदेश.
एकेक आठवणी येउ लागल्यात - कधी खलिल जिब्रानच्या लेखनातील मखमली, गर्वोन्नत निशा आठवते आहे. ती ही अशी की - सर्व दीनदुबळ्या लोकांची दिवसभर उधळलेली स्वप्ने, आणि आकांक्षारुपी खिल्लारे गोळा करणारी जणू गोपस्त्रीच. जिच्या जादूभर्‍या, कोमल अंगुलीस्पर्शाने , शीणलेल्या भागलेल्या लोकांचे नेत्र झाकून त्यांच्या हृदयाकाषात स्वप्नरुपी आनंदाचे नंदनवन फुलविणारी कल्पवृक्षलताशी. जिच्या काळ्या मखमली वस्त्रप्रावरणांच्या घडींत प्रेमिकांना मदनाचे धनुष्य सापडते तर दवबिंदूंनी चिंब झालेल्या जिच्या पावलांपाशी कित्येक एकाकी हृदये मूकपणे अश्रू ढाळतात. अनंत प्रेमिकांच्या प्रेमाची साक्षी, एकाकी हृदयांची मैत्रिण तर बेघरांची आश्रयदाती अशी ही खालील जिब्रानने, वर्णिलेली रजनी. माझ्याकरतासुद्धा वरदानमयीच ठरते. हां असेल जग सूर्योपासक पण सूर्याच्या दाहक आणि वादळी, मनस्वी राज्यानंतर, तप्त हृदयावर फुंकर घालणारी प्रेमिकाच जणू अशी यामिनी मनाला प्रचंड गारवा देणारी.
अशा निवांत वेळी , जगाच्या नजरेपासून दूर, माझ्या फक्त माझ्या वेळात मी संग्रह केलेला, साहित्य-खजिना उघडलेला आहे - तरल कथांचा, भावुक लेखांचा, सुंदर कवितांचा आणि होय ईश्वरविषयक चिंतनात्मक लेखांचा. वेळ कसा जातो आहे ते कळतच नाहीये. वारा शांतावलेला असताना कशा समुद्रावरती हळूवार लाटा येतात तसे तरंग मनात उमटवतात या कथा, लेख आणि कविता. कधी मला विस्कॉन्सिनच्या तळ्यावरती, रात्रीच्या वेळी चमचमणार्‍या रुप्याच्या नाण्यांची आठवण येते तर कधी लहानपणी अनुभवलेल्या सुशेगाद दुपारीची. फार मौल्यवान वेळ असते ही. रिचार्ज करणारी. मला हवे तसे वागण्याचे स्वातंत्र्य असते मग मी वाटले तर देवीची किंवा दत्तगुरुंची स्तोत्रे म्हणु शकते वाटले तर 'मुक्तानंदांच्या चित्शक्तीविलास' पुस्तकाचे वाचन करु शकते, आठवणींच्या राज्यात हरवु शकते तर कानाला हेडफोन लावून मंद सूरावटीची , अटमोस्ट रोमँटिक गाणि ऐकू शकते. आपणच, आपल्या प्रेमात पडण्याची एक संधी. स्वतःच स्वतःला सापडण्याची वेळ की स्वतःमध्ये हरवून जाण्याची वेळ - की एकदमच दोन्ही. होय दोन्ही एकाच वेळी.
वेळ कसा गेला ते कळलेच नाही. लवकरच जगरहाटी सुरु होइल, शांतता भंग पावेल. जग गजबजून जाइल आणि रात्रीचे वनदेव परत आपापल्या प्रदेशात, परततील. पाखरांना जाग येइल. पण आज रिचार्ज झालेला मूड मला अनेक दिवस पुरेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अतिशय सुंदर झाले आहे.
रूमी आणि खलिल जिब्रान यांच्या सुविचारांवर मी दिवसभर मनन-चिंतन करू शकते. आजकाल पुस्तकं वाचून काही मिळणं बंदच झालंय. एखादा सुविचारच पुरता छळतोय. एकुणच सूफी तत्वज्ञानाचा प्रचंड ओढा आहे. मलाही एकांतवास फार हवाहवासा वाटायला लागलाय. सतत कुणाकुणासोबत राहिल्याने मला 'मी' सापडत नाही व बेचैन वाटत राहातं. मुक्तानंदांचं चित्शक्तीविलासही वाचलंय. त्यामुळे हे पोचलंच. Happy

छानच. खुप मस्त वाटलं वाचून.रिलेट झालं अशा करता कि जेव्हा काही भरतकाम किंवा पेंटींग करते ना तेव्हा तो छान मुड बरेच दिवस पुरतो राहतो

छान लेख..
मनातल्या भावना लेखात अगदी अलगद उतरवायला जमतं तुला..!!

वा! काय सुंदर लिहिले आहे. रात्री बद्दलच्या एवढ्या छान कल्पना कधीच मनात आल्या नव्हत्या. खलील जिब्रान वाचायला पाहिजे. कोणत्या पुस्तकापासून सुरवात करावी सुचवाल का?

ते एक "कॉफी कमी पडली की" याचा संदर्भ लागला नाही.
कॉफीने झोप जाते किंवा शांत झोप लागत नाही. कॉफी कमी पडली की चांगली झोप होऊन लौकर जाग येते आणि मन रिसेप्टिव्ह होते, असे?

मस्त!! मंद सुरावटीची अटमोस्ट रोमँटीक पहाटेची प्लेलिस्ट द्या प्लीज... मला ज्योतीकलश छलके शिवाय मंद सुरावटीचे पहाटेचे गाणे आठवेना आणि ज्योतीकलश रोमँटीक नाही.
(जगरहाटी सुरू व्हायच्या आधी म्हणजे पहाट अपेक्षित असावी म्हणून पहाट विचारलं. रात्रीची गाणी असतील तरी चालेल.)

@सी -
https://www.youtube.com/watch?v=s7VV_LrYnKE&list=RDs7VV_LrYnKE - विशेषतः
Strumm Sound ची कोणतीही घे.

https://www.youtube.com/playlist?list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG0ekjtOQ4GUu - बंगाली गाणी

https://www.youtube.com/watch?v=IWxfrusf0S4&list=PLo4u5b2-l-fDllmvY5TWKd...
-----------------------
@मानव - मला कॉफी कमी पडली की डिप्रेशन येते. पण डिप्रेशन यायच्या आधी मूड ग्रॅज्युअली मेलो होउ लागतो व वेळीच कॉफी वाढवावी लागते. हे भान नीरीक्षणाअंती आलेले आहे. लवकर जाग येण्याचा व कॉफीचा अर्थाअर्थी संबंध नाही.
@मानव प्रॉफेट तर कोणीही सांगेल पण जिब्रानचे 'अर्थ गॉडस' जरुर वाचा - इथे सापडेल - http://gutenberg.net.au/ebooks05/0500561h.html

वंदना धन्यवाद.

मंद सुरावटीची अटमोस्ट रोमँटीक पहाटेची प्लेलिस्ट >>> यात मला फक्त एकच गाणं आठवतं - मालवून टाक दीप.

पण पहाटेचं अजून एक गाणं माझं आवडतं आहे ते इथे देते - https://www.youtube.com/watch?v=odh-nEGIhPs
हा आख्खा अल्बमच आवडता आहे माझा.

हुं.
नेहमीप्रमाणेच गुंगावणारं लेखन आणि वारा शांतावलेला असताना सुचलेलं काही.

पहाटे / देर रात ऐकायला मंद सुरावटीचे अटमोस्ट रोमँटीक अजून एक गाणे -
https://www.youtube.com/watch?v=bh6et8Ko200

हे तामिळ व्हर्जन आहे. पर्सनली मला हेच ऐकायला जास्त आवडले. पण कोणाला हिंदी व्हर्जन हवं असेल तर ही लिंक -
https://www.youtube.com/watch?v=yWoP4G0-N3E

Pages