पोहे

Submitted by मकरंद गोडबोले on 28 September, 2022 - 19:29

"त्याच्यात काय कोणिही करू शकतंच की"
"कोणिही करेल, पण तुम्हाला जमणार नाहीत"
"हो ना, मी कोणिही कुठाय...." गेले. आजचे पोहे गेले, वर चहा पण बगूनानांच्या डांबरट घशाखाली. असे काही झाले की बगूनानांची मान एका खास पद्धतीनी हलते. त्यात समाधान, विजय आणि आजचे काम झाले ही तृप्तिची भावना असते. ते आता सोफ्यावर छान मांडी घालून माझे वर्तमानपत्र वाचू लागले. त्यांची आजची काळजी तर संपली होती.

जिभेवर थोडा ताबा ठेवला तर ब्रेकफास्ट फास्ट मिळतो, नाहितर नुसताच ब्रेक. सुखी संसारासाठी, लग्नोत्तर नवऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, चांगली घोटवून. तो बाहेर कोणिही असू शकतो, आणि घरात तो कुणिही नसतो. फक्त हुजऱ्या ही एकच पोष्ट त्याच्यासाठी रिकामी असते. जी त्याला कधी घ्यायची नसते, आणि दुसरी रिकामी नसते. त्यातून जर मुलेही झालेली असतील तर मग अजूनच मोठा त्रास. कारण मग बायको, तिचे लग्न या एकंदर संस्कारातले सगळे ऐहिक काम झाले आहे असे समजून, वात्सल्य वगैरे पारमार्थिक गोष्टित गुंतून जाते, आणि मग नवऱ्याला दोन मार्ग मोकळे असतात. एक म्हणजे हुजरेगिरी, आणि दुसरे म्हणजे अध्य आत्म. कदाचित याच मुळे अनेक नवऱ्यांना घरी पोचल्यावर चिंतन, मनन अशा आत्मिक अवस्थांची प्राप्ती सहज होत असावी, आणि स्त्रियःमुखजन्यवाफ ही त्यांच्या कानावरून नकळतच निघून जात असावी.

त्यातून हिला पोहे कुणिही करेल, पण मी नाही, याच्यात काही खास वाटत नव्हते. त्याच्यामुळे बगुनानांना एक खास विषय मिळाला. वर उगाच मी खरेच पोहे केले, तर ते घशाखाली त्यांनाच घालायला लागणार होते, ही जाज्वल्य भिती होतीच. त्यामुळे बगुनाना हट्ट्ला पेटले होते.

“शास्त्रीबुवा तुम्हाला साधा चहासुद्धा....”
“बरोबर आहे मला साधा चहा नाहीच येत करता, मी छान गोडा मसाला घालून मसाला टी करतो, तो अमृततुल्य..”
“अहो त्यात गोडा मसाला नसतो....”
“मला चहात गरम मसाला अजिबात चालत नाही. कळले ना. माझ्यासारखा चहा कुणीच करत नाही बगुनाना.”
“पोहे तर सोडाच..”
“नाही तो बटाटेवड्यात घालतात...”

इतक्यात आमच्या दारातून चक्क एक वाऊ चा इमोजी अवतरला. भोकराएवढे डोळे आणि तोंडाचा मोठ्ठा आ. हा कुठल्या मोबाईलमधून आला म्हणून मी त्या इमोजीला बघत होतो, तर इमोजीला हात पाय फुटून त्याची चक्क पिंकिची आई झाली. तिला एवढे वाउवायला काय झाले ते मला कळेना. मग तो वाउवासर जरा उतरल्यावर, ती, एखादी मनोऱ्यातली राजकन्या, खिडकीतून आलेल्या राजपुत्राकडे कशी बघेल, तसे माझ्याकडे बघत म्हणाली, “तुम्ही पोहे करणार आहात?”

माझे पोहे, हे सुरस आणि चमत्कारिक कथांमधे तरी मोडत असावेत, किंवा जगातल्या सात आश्चर्यांमधेतरी. नाहीतर पिंकिच्या आईचा असा ज्येश्ठवाउ झाला नसता. “आमचे हे ना, काही म्हणजे काही करत नाहीत....” हे हिला उद्देशून होते. “थांबा हं मी यांना बोलवते.” आता मात्र मला माझे पोहे, हे फक्त प्रेक्षणीय किल्ला आहे असे वाटायला लागले होते. बर पिंकिची आई किती जणिंच्या यांना बोलावणार हे नक्की नव्हते. त्यामुळे आता प्रेक्षणीय किल्ल्याची दवंडी पिटली जाणार होती, अख्ख्या सिल्वनटावरगडी.

झाले काय, तर हिला मी उगाच सकाळी म्हणालो, की तुझ्या हातून पोह्यात जरा मीठ जास्त पडले. आता आमच्या आय एस ओ च्या भाषेत याला यूजर रिपोर्ट म्हणतात. तो असा अपमानकारक वगैरे नसतो. तर तो दोन प्रौढ व्यक्तिंनी खेळिमेळिच्या वातावरणात, आपल्या कामात अजून काय सुधारणा हवी वगैरे अशा पाझिटिव्ह पद्धतिनी घ्यायचा असतो. पण ही अगदीच अनायेसो आहे. त्यामुळे तो एकदम जिव्हारी लागला, आणि त्याच्यावरून रोज सकाळी पोहे करणे हे किती मोठे काम असते, वर ते रोज कंटाळा न करता करायला कसा... वगैरे वगैरे सगळे झाले. यावर तरी मी गप्प बसावे की नाही, पण नाही. वर मी मग त्यात काय येवढे, पोहे तर कुणिही करू शकतो, असे एक रिस्क ॲनालाईज न करता विधान केले. तर त्यातली रिस्क लगेच खुद्दच पुढे ठकली. “मग आता तुम्हीच करा पोहे..” असा एक किरकोळ दोन चार टनाचा बाॅंबस्फोट झाला. तो बाहेर माझे वर्तमानपत्र, माझ्या सोफ्यावर बसून वाचणाऱ्या बाबूकाकांच्या कानी गेला, आणि हे खरे वाटून त्यांची तंतरली. चहा पोहे मिळणे हे ठीकच हो, पण ते मी केलेले असले, तर ते घ्यायची त्यांची अजून मानसिक तयारी नव्हती. आणि आता ज्येष्ठवाउ तर्फे सिल्वनटावरगडी पिटलेल्या दवंडीमुळे माझ्या नशिबीचे पोहे हे अटळ होते.

तेवढ्यात पिंकिचे बाबा दत्त म्हणून दारात उभे राहिले.
“ही म्हणाली की शास्त्रिबुवा काही प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत...” हिनी नुसतेच स्वयंपाकघराकडे बोट दाखवले. पिंकीचे बाबा, दत्त म्हणून स्वयंपाकघरात घुसले.
“कसले आहे प्रात्यक्षिक?”
“छे छे प्रात्यक्षिक कसले, मी रोजच करतो ना....”
“नाही पण ही म्हणाली की प्रात्यक्षिक आहे. शास्त्रिबुवा पोहे करून दाखवणार आहेत म्हणून...”
“मग माहिती आहे ना आता! बसा तर गप्प..”
“मला खरंच उत्सुकता होती बरंका, की भातापासून पोहे कसे करतात याची. तुम्हाला येतात ते माहीत नव्हते. कुठला भात वापरणार आहात”
मी चिडून मागे वळून बघितले, तर बिचारे अजूनही दत्तच होते. मीच मग वरमलो, आणि त्यांना बसायला खुर्ची दिली. ते खुर्चिवरही दत्त म्हणूनच बसले.
“तसले भाताचे नाही हो, भाताचे पोहे केल्यानंतर खायचे पोहे करतोय.”
“मग शोधताय काय?”
“पोहे”
“करताय? का शोधताय...” आता मात्र माझा पारा चढू लागला. याचे मी फारच दत्त म्हणून लाड करतोय असे मला वाटायला लागले.
“ करणार आहे, पण त्यासाठी आधी ते मिळायला हवेत, म्हणून शोधतोय”
“तुमच्याच घरी तुम्हालाच पोहे मिळत नाहीत?” मी चांगलीच थोतरीत भडकवणार होतो. परत मागे वळलो, तर हा आपला दत्त म्हणून बसलेला. मी पोहे शोधता शोधता मूग गिळले.
“उठा मदत करा मला जरा, नुसते बसू नका...”
“तुम्हालाच मिळत नाहीत तर मला .....”
“तुमच्या घरात मिळतील तुम्हाला...” यावर मात्र दत्त म्हणून मोठी चलबिचल झाली. मग बाबा उठला आणि पोहे शोधायला लागला.
“कसे करणार पोहे”
“सोप्पे असतात हो, हे असे पोहे घ्यायचे. ते उकळत्या तेलात टाकायचे, मग ते आपणहूनच होतात.”
“फोडणी कुठली..”
“जिऱ्याची...”
“ती तर वरणाला करतात ना? खिचडी आणि पोह्याला कुठली करतात.” मी विचारात पडलो. ही पोहे करताना फक्त मिसळणाचा डबा वापरते बहुतेक. ही फोडणिची गुपिते त्यातच लपली असणार....
“तुम्हाला खरंच येतात का पोहे.” हा दत्त आता फारच वैयक्तिक घुसत होता.
“तिळाचं तेल का सुरसाचे?”
“काय” दत्त एकदम गडबडला.
“तिळाचे तेल वापरायचे का सुरसाचे”
“तिळाचे वापरा, सुरसाचे नसतेच...” दत्ताने विचार करून उत्तर दिले. मला गंमत वाटली. मी मुद्दाम प्रश्नच तिरका विचारला होता. याला कळेल असे वाटलेच नव्हते.”
“असते की पंजाबी लोकं वापरतात....”
“ते सरसूचे...”
“सुसरिचे का वापरेनात, आपल्याला काय त्याचे.” तुम्हाला खरे सांगतो, अगदी काल काल पर्यंत हे पंजाबी लोक सुरसाचे तेल वापरत होते, आणि एकदम आत्तापासून सरसूचे कसे काय वापरायला लागले हो? मलाही काही कळेना. मी गेलो त्याला गप्प करायला, अन.....
“पोहे मिळाले...” आता मात्र मला खरा राग आला. माझाच. माझ्या घरात माझ्या आधी याला कसे मिळाले पोहे. सांगायलाच नको होते शोधायला. पण जाउंदे, झाली न मदत थोडी. मी ते बघितले. मला त्या पोह्यात काही तरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. ते असे जरा जास्तच इस्त्री केल्यासारखे वाटत होते. याचेच करतात काय पोहे. वर ते मोठेपण होते. पण करणार काय, आधीच शोधण्यात इतका वेळ गेला होता.
“अय्या तुम्ही मदत करताय? कित्ती छान? बघा तुमच्यामुळे एका दिवसात यांच्यात किती फरक पडला. आता रोज पाठवीन बरका!”
माझ्या हातातल्या पोह्याच्या डब्यानी स्वतःच्या मनानी सरळ जमिनीवर उडी मारली. पिंकीच्या वडलांनी जवळपास डाईव्ह मारून डबा वाचवला पण पोहे धारातिर्थी पडले होते. मी पिंकिच्या आईकडे बघितले, तर तिच्या तोंडाचा परत ज्येष्ठवाउ झाला होता.
“अय्या, याचे करणार होतात पोहे? याचा तर चिवडा करतात ना?” तिनी आम्हा दोघा पतितांकडे बघितले. आमच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तिला जरा आमची कीवच वाटली असावी. मग तिनी खाली सांडलेले पोहे पटापटा भरून ठेवले.

“कसे करणार पोहे?” पिंआ..

“सोपे तर असते. हे असे पोहे घ्यायचे, ते असे तेल गरम होइपर्यंत खरपूस भाजायचे. फार काही अवघड नसतं. मग त्यात दाणे घालायचे. काहीच नाही. वरून थोडी मिरची भुरभुरवायची. आहे काय अन नाही काय. मग ते दाण्याच्या कुटाबरोबर नीट मिसळून घ्यायचे. ते परातिला चिकटू नये म्हणून त्याला वरून थोडे पीठ लावायचे. पोहे म्हणजे काही खास नसतं काही, असे बघता बघता होईल.”

यानंतर पिंकिच्या आईच्या डोळ्यात जे भाव होते, ते कसल्याही ज्येष्ठच्या जवळ नव्हते. आजपर्यंत मिळवलेली इज्जत एका क्षणात...

याच्यानंतर पिंकीची आई बाहेर ट्रिपल रोल करत होती. एक पिंकीची आई, दुसरा म्हणजे बगूनाना आणि ही, यांची रखवालदार, आणि तिसरा म्हणजे आमची सल्लागार. पिंकीचे बाबा हे दत्त म्हणून निरोप बाहेरून आत पोचवायचे काम करत होते, आणि मी सगळा दंभ सोडून मान खाली घालून फक्त त्या पाळत होतो. या सर्वमान्य पद्धतिमुळे सरतेशेवटी पोहे होते झाले, आणि बाहेर ते खाताना एकदा बगूनानांची मान नकळत पसंती दर्शवून गेली. हिच्या डोळ्यातली पावती मात्र खूपच भरीव होती.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अनायोसो, दत्त ( माझ्या नावात आहे म्हणून नाही) हे आणि असेच इतर शब्दप्रयोग खूप आवडले.
पोहे बनवणं येवढं विनोदी असू शकत ?
रोज ब्रेकफास्टला पोहेच खावे लागतात तुम्हाला...अरे रे...आणि वर घरात तुम्ही कुणिच नाही वगैरे वगैरे...
धन्यवाद, खूप बिलंदर ( हे सुंदरचे विनोदी रुप ) लेख.

मला खरंच उत्सुकता होती बरंका, की भातापासून पोहे कसे करतात याची. तुम्हाला येतात ते माहीत नव्हते. कुठला भात वापरणार आहात”
>>> लोल