इतकेच काम राधे

Submitted by किरण कुमार on 20 September, 2022 - 07:25

वृंदावनी अताशा इतकेच काम राधे
होतो तुझ्याचसाठी मी रोज श्याम राधे

वादे हजार केले त्या भाषणात त्यांनी
चढताच पलटले बघ एकेक दाम राधे

मेघातल्या सरी त्या बरसून जात असता
शेतात उगवला बघ त्याचाच घाम राधे

जो ठोकरून गेला दारातल्या दिव्याला
मूर्तीस आज त्याने केला प्रणाम राधे

भाळावरी म्हणे ते असतात भाग्यरेषा
ज्यांच्या खिशात नाही साधा छदाम राधे

- किरण कुमार

Group content visibility: 
Use group defaults