घरावरणे

Submitted by मकरंद गोडबोले on 18 September, 2022 - 11:15

“तुला उद्यापर्वा सुट्टी आहे ना?”

हे ऐकून माझ्या पोटात खड्डा पडला. हा प्रश्न वाटतो तितका साधा नाही. जातिच्या नवऱ्याला यातला गनिमी कावा नीट ओळखू येतो. मी मान कापलेल्या कोंबडीसारखी नुसतीच मान हलवली. हे अत्यंत कौशल्याचं काम आहे. वरच्या प्रश्नानी माझा मुरारबाजी होणार आहे याची मला खात्री झाली होती. साधारणतः या प्रश्नानंतर तृतीय श्रेणितली कामे काढून मला दिली जातात, आणि ती मी स्वतःचे शीर कापले गेलेले आहे असे समजून, मुरारबाजी बेसिसवर दोन्ही हातात..... तलवारिंच्या ऐवजी केरसुणी, झाडू वगैरे घेउन उत्साहात आणि आनंदाने पुरी करावीत, अशी हिची माफक अपेक्षा असते.

“मग आज घर आवरुया जरा....”

माझ्या पोटातल्या खड्ड्याचा परिघ वाढला. ही मात्र गंमत आहे. असे अनेक खड्डे पोटात पडून त्यांचे परिघ वाढतात, पण त्याचा पोटाच्या परिघावर काहिही परिणाम होत नाही. वाढलेल्या खड्यात पडून मी सुट्टिच्या दोन दिवसांपुरते समूळ नष्टावे असे मला राहून राहून वाटत होते. पण त्या मागच्या वाक्याने शीर आधीच कलम झालेले होते. मला दोन्ही हातात सूक्ष्मतंतूवस्त्र घेउन मी त्या कपाटावर चालून गेलो आहे वगैरे दिसायला लागले. कपाटाची दोन्ही दारे, माझ्याशी दोन हात करत स्वतःचा शीलभंग होणार नाही याची काळजी घेत आहे, आणि मी रणजीत फेम चेहरा घेउन, “ये कप्पा मुझे दे दे ठाकूर” म्हणत, त्याच्यावर तुटून पडलोय.....

“आणि हो लाॅकरचं दार तुटलंय, तेव्हा जरा जपून”

या वाक्यानी माझ्या स्वप्नरंजनाचा अंत झाला. आणि आता खरेच काम करायला लागणार याची चिन्हे जास्त ठळक व्हायला लागली. हिला, अशावेळी मी सुभेदार तानाजीसारखे, “आधि स्वच्छता कपाटाची, मग स्वतःची” असे म्हणत हाताला शेला..... आपलं सूक्ष्मतंतूवस्त्र बांधून.... घेउन, “राजे काम झाले की गवताची गंजी पेटवतो.....”

“नंतर चहा देईन करून, छान आलं घातलेला”

झाला घात. माझे सगळे वशीकरण मंत्र हिला नीट ठाउक आहेत. या वाक्याचा वरवर अर्थ जरी प्रेमानी चहा मिळेल असा असला, तरी गर्भितार्थ तो चहा काम झाल्यावर, आणि नंतरच मिळणार आहे असा होतो. तोपर्यंत नाही. सुट्टिच्या दिवशी चहा नाही, ही किती मोठी शिक्षा आहे, हे फक्त नीट बायकोळलेल्या नवऱ्यांनाच कळते.

मला सांगा जिथे वावर असतो, तिथे सारखे आवरून काही फायदा असतो का? आणि ‘आवरा’ म्हटल्यावर घर आवरले जाते का? (आवरादेविंकडून सशर्त कापिराईट प्रदान) माझे तर असे नीट मत आहे, की घराने असे अघळपघळ पसरूनच असावे. सारखे आवरलेले घर शोरुममधे ठेवलेल्या पुतळ्यासारखे दिसते. साखळदंडानी बांधून ठेवलेल्या तुरुंगासारखे वाटते, गुदमरलेले. टेबलाभोवती नीट लावून ठेवलेल्या खुर्च्या असल्या, की त्यांची ती सूत्रबद्ध रचना बिघडवून, यांच्यावर आपला देह ठेवला, तर त्यांच्यावर घोर अत्याचार होईल असे मला वाटते. एकही चूण नसलेल्या चादरिवर झोपायचे कसे? हा प्रश्न तुम्हाला नाही पडत? पूर्ण स्वच्छ उशी बघितली की यावर आपले मलिन डोके ठेवायचे ही कल्पनाच मला त्रास देते. मग रात्रभर, मधे जाग आली की मी डोके वर उचलून धरत असतो. नाहीतर उद्या लगेच उशी धुवायचे काम मिळायचे.

“माझं कपाट आवरलेलेच आहे. काहीच करायला नकोय”
“कारण त्याच्यात काही नाहीच आहे, सगळे धुवून आलेले तुमचे कपडे बाहेरच तर आहेत. टेबल, खुर्ची आणि आरामखुर्ची सगळीकडे विराजमान झाल्येत. हा तुमचा खासे दरबार आवरून टाका.”
“अग हे मला सारखे लागतात, नेहमी नेहमी, ते उगाच आत ठेवायचे आणि बाहेर काढायचे, कशाला दुप्पट काम?”
“हे सारखे लागतात, हे?”
“ते सायकलिंगचे कपडे आहेत, आता उद्या सकाळी लागतीलच....”
“आठ दिवस इथेच पडल्येत”
“ती गोष्ट वेगळी, आताची वेगळी”
“काय वेगळी आहे रे”
“..... उद्या यायचाय ना अजून, मागचे आठी दिवस येउन गेल्येत..., ते राहुंदे तिथेच”
“आणि हा टी शर्ट...”
“ तो चालायचा आहे...”
“हा ही उद्याच लागणार असेल”
“हो, मग... मी जाणारच आहे.....”
“सायकलिंग का चालणे?”
“ते सूर्यावर औलंबून आहे..”
“कुठला संबंध कुठे लावतोस?”
“खरंच आहे. हे बघ माझे आवरून झाले, की जर अजून अंधार असेल तर चालणे, पण जर प्रकाश असेल तर सायकल. म्हणून सूर्यावर डिपेन्डंसी आहे”
“हा गुरुशर्ट का बाहेर....”
“पर्वा गुरूपोर्णिमा झाली तेव्हा......”
“शब्द पकडून विनोद नकोय. हा का इथे आहे? का याच्यात जोरबैठका काढणार आहेस”
“ह्या.. काहितरीच काय. जोरबैठका? तूच म्हणलीस ना हे असे व्यायाम करू नका म्हणून. उगा सारखे डाॅक्टरांकडे जायला लागते....”
“मग हा आत ठेवा.”
“अग ऐक, त्याला इस्त्री करायच्ये..”
“मग टाका तरी तो लाॅंड्रीत..”
“छे, छे... आणि दहा रुपये घालवू? तूच म्हणालीस ना आता इस्त्री घरीच करूया म्हणून”
“झालं म्हणजे इस्त्रीच्या नावाखाली हा अजून चार महिने बाहेर राहील. आत्ता आणून देते, करून टाका इस्त्री.”
“हे काय? आत्ता घर आवरतोय ना आपण. मग इस्त्री आत्ता नको, नंतर करू”
“या वायरी?”
“अगोबाबो, त्यातल्या दोन तुझ्याच आहेत, एक मोबाईल आणि एक लॅपटाॅप” या युक्तिवादावर वायरिंचे जंजाळ आवरण्यातून मुक्त झाले. कारण वायरी आवरून ठेवल्या की तिचीच वायर तिलाच मिळत नाही. म्हणून त्यांना आवरण्यातून मुभा मिळालेली आहे.
“सेंटरटेबलच्या खालचा कचरा आवर”
“तिथे कुठे कचरा आहे”
“किती वर्तमानपत्रे पडल्येत तिथे”
“पडली नाहियेत, ठेवल्येत. तिच जागा आहे त्यांची तो कप्पा त्याच्याचसाठी केलाय. डिझाईनच तसं आहे.”
”हे काय आणि”
“हे बरं आहे, तुझी वायर म्हणजे कचरा नाही, माझा लॅपटाॅप म्हणजे कचरा काय?”
“ती बासरी का पडल्ये अशी”
“अग रियाज करतोय ना...”
“दिवसभर?”
“मग काय करू? मी वाजवायला लागलो, की तुला वाटते मी मोकळा आहे, मग तू मला अशा घोरभयंकर कामाला लावतेस. मग मला ती खाली.... म्हणजे तिथेच ठेवायला लागते, मग थोड काम झालं की परत दोन सुर. मला देतेस का तू थोडी तरी उसंत त्यासाठी?”
“ओटा तरी आवरून...”
“हे बघ, आता सगळे घर झाले ना आवरून, आता चहा करायलाच लागेल ना, मग उगाच ते आत ठेवा, मग बाहेर काढा, कशाला. त्यापेक्षा तू थेट चहाच कर आता”
झालं बुवा सगळं नीट आवरून. नाहितर हिच्या पद्धतिनी करायला लागलो तर अख्खा दिवस गेला असता. बघा ना ही इतकी आटोपशीर पद्धत असताना, उगाच त्याच्यात वेळ कशाला घालवायचा?

आता चहा.....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हा हा!
तू पसारा/कपाट आवरले कि मला काहीच सापडत नाही असे माझा नवरा बोलतो. Happy

Lol Lol
माझे तर असे नीट मत आहे, की घराने असे अघळपघळ पसरूनच असावे>>> आळसोत्मा ठेविले अनंते तैसेची रहावे! Wink

फटके खाणे मटेरियल असलेला नवरा आहे Lol

छान .. अगदी अगदी Lol

बायकोने घर आवरणे म्हणजे खरेच एक त्रास असतो. एक तर आपली सवयीची वस्तू तिने भलत्याच जागी ठेवलेली असते. म्हणजे सापडली नाही की पुन्हा तिलाच विचारा, म्हणजे तिच्यावरच अवलंबून राहा. आणि वर हे आवराआवरीचे काम केले म्हणून कौतुकही अपेक्षित असते.

आठवड्याभराचे वापरायचे कपडे खरेच बाहेरच कुठेतरी खुंटीवर वा खुर्चीवर लटकावलेले बरे पडतात. फक्त बाहेरच्या लोकांनी येऊन बघितले तर त्यांना काय वाटेल या फालतू कारणासाठी ते कपाटात घुसडले जातात.

मस्त खुसखुशीत लेख.
आठवड्याभराचे वापरायचे कपडे खरेच बाहेरच कुठेतरी खुंटीवर वा खुर्चीवर लटकावलेले बरे पडतात. फक्त बाहेरच्या लोकांनी येऊन बघितले तर त्यांना काय वाटेल या फालतू कारणासाठी ते कपाटात घुसडले जातात.>> खरंय

ह्या वरुन आठवलेला एक जोक

*1st Law of आवराआवरी*

पसारा can neither be created nor be destroyed. It can only be transferred from one place to another.

*Second law of आवरा आवरी*

If number of आवरणारे हात
is less than
the number of पसारा करणारे हात
then
पसारा can never get आवरो फाईड

*Third law - of आवरा आवरी*

The पसारा in a home
as produced by the people
is directly proportional to
the magnitude of आळशीपणा
of the people,
is always stored in the आतल्या rooms
or balconies
hidden from guests
and directly proportional to
the size of the home.

*4th Law of आवराआवरी*.

आवराआवरी is temporary, पसारा is permanent.

*5th Law of आवराआवरी*.
When you throw something during आवरा आवरी
It comes back to you with दुप्पट speed if it belongs to your बायको.

*6th Law of आवराआवरी*.
During *आवरा आवरी*, if you *फेक* away something that you haven't *वापर* in a *दशक*
You will need it *लग्गेच* after you *फेक* it away...

आई ग्गं! इथले प्रतिसाद वाचून फ्रेंड्स मधल्या मोनिका सारखं झाडू पोछा घेऊन एकेकाच्या घरी सफाई ला जाईन म्हणते Wink